तोचि खरा साधू...

Submitted by झुलेलाल on 25 September, 2017 - 11:21

तोचि खरा साधू...

कधीकधी आपण खूप आळशीपणा करतो. एखादी गोष्ट आज करू, उद्या करू अशा चालढकलीत पुढे जाते आणि नंतर राहूनच जाते. पुढे एक वेळ अशी येते, की आपण तेव्हा ते केले नाही याचा पश्चात्ताप होतो.
हे असं वाटायचं कारण, अरुण साधूंची बातमी! ते आता नाहीत हे जाणवलं आणि तोच पश्चात्ताप वाटू लागला.
साधूंचा आणि माझा जिवलग वाटावा असा परिचय नव्हता. जवळपास तीन वर्षांपूर्वी आमची भेट झाली. तेव्हा ते मला नावावरून ओळखत होते. 'मी वाचत असतो तुमचं. चांगलं लिहिता!' एवढं एक वाक्य बोलून त्यांनी एक मंद स्मित केले. वसिष्ठांनी विश्वामित्राला ब्रह्मर्षी म्हटल्यावर विश्वामित्राला जसा आनंद झाला असेल तसाच आनंद त्या एका वाक्याने मला झाला. त्या क्षणी मी फुलासारखा स्वत:शीच फुललो!
याचं कारण आहे.
एक तर पत्रकारांच्या जगात असं कुणी कुणाला म्हणावं अशी फारशी प्रथा नाही.
आणि एखाद्या ज्येष्ठ, पत्रकारितेतील दीपस्तंभ असलेल्याने म्हणावं हेही दुर्मीळ!
साधूंच्या त्या वाक्याने आमच्यातले अंतर पुसून टाकले आणि पुढचे दोन दिवस त्यांच्या सहवासाने अक्षरश: मोहरून गेले.
कुमार केतकर, दिनकर रायकर, मित्रवर्य दिलीप चावरे आणि जुना सहकारी श्रीकांत बोजेवार अशी मस्त सोबत आणि साधूंचा सोज्वळ सहवास असा दुग्धशर्करा योग!!
केतकर, रायकर, बोजेवार यांच्यासोबत प्रदीर्घ काम केलेलं असल्याने मोकळेपणा होताच, साधूही सोबत असल्याने मला थोडं दडपण वाटलं होतं. साधू आम्हाला जाॅईन झाल्यावर ते काही मिनिटांतच संपलं.
एवढी उंची असलेली साधू-केतकरांसारखी माणसं सोबत असताना सावली होऊन शांतपणे सोबत वावरण्यातलं समाधान त्या भटकंतीत मी पहिल्यांदा अनुभवलं. कुणा पत्रकार मित्राने लिहिलेल्या एका कादंबरीवर केलेल्या संस्कारांचे असंख्य किस्से साधूंच्या तोंडून ऐकतच आमचा प्रवास सुरू झाला. पुढे त्या कादंबरीचा बऱ्यापैकी बोलबाला झाला, लेखकाचं कौतुकही झालं, पण त्याचं खरं आणि सारं श्रेय साधूंचं होतं, हे त्यांनी कुठेही स्वत्व न मिरविता सांगितलेल्या त्या किश्शांवरून सहज समजून गेलं.
काही मोजके पत्रकार हे समाजातले विचारवंत असतात. मलाही, केतकर, साधू यांच्यासारखे विचारवंत पत्रकार काय वाचतात, व्यक्तिशः: ते कसा विचार करतात याविषयी उत्सुकता होती. विशेषत: केतकर यांना मी खूप जवळून पाहिलेले असल्याने, पत्रकार केतकर, लेखक केतकर आणि केतकरांचे विचार मला माहीत असूनही, 'माणूस केतकर' म्हणून त्यांची खूप चांगली ओळख त्या दौऱ्यातील रात्रीच्या गप्पांच्या मैफिलीत झाली. अशा मैफिलीत साधू एवढे मोकळे भासले, की हा दौरा आणखी कितीही लांबला तरी चालेल असेच वाटत राहिले. विदेशी नाटक-चित्रपट हा साधूंचा जिव्हाळा... त्यावर ते असे काही भरभरून बोलले, की, हा माणूस लिहितो कधी, वाचतो कधी आणि नाटक, चित्रपट पाहतो कधी असा प्रश्न पडावा. अनेकदा, चित्रपट हे आभासी दुनिया असल्याचे आणि विरंगुळा म्हणून वापरायचे साधन अशीच अनेकांना समजूत असते. मीही त्यातलाच एक होतो. पण साधूंच्या त्या दौऱ्यातील चित्रपट परीक्षणांच्या सहज कथनाने चित्रपट पहायला वेगळी दृष्टी लागते हे तीव्रतेने जाणवून गेले.
साधूंच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे अनुभवांचा प्रचंड खजिना साठला होता. त्यातले काही किस्से तर, मनाच्या कप्प्यात फक्त जपून ठेवावेत एवढे सुगंधी! पण साधूंनी अगदी सहजपणे तो सुगंधही आमच्यावर उधळला.
इतका सहज आणि सामान्य होऊन वागणारा मोठा माणूस त्या वेळी मी बहुधा पहिल्यांदाच अनुभवला!
त्या भेटीनंतर लगेचच लिहिलं असतं, तर त्यांच्या सहवासात साठविलेलं सगळं सहज मांडतां आलं असतं.
ते केलं नाही याचाच पश्चात्ताप होतोय!
पण ते सारं दोन तीन शब्दांत मांडतां येऊ शकतं!
साधूंच्या दोनच दिवसांच्या निर्मळ सहवासानंतर एक गोष्ट त्यांच्याविषयी माझ्या मनावर कायमची कोरली गेली.
ती म्हणजे, 'तोचि खरा साधू!'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

.

सुंदर !

ऐशा साधूची संगत / तोची एक भाग्यवंत !