फोन बूथ

Submitted by अविनाश जोशी on 25 September, 2017 - 05:57

फोन बूथ
मला अचानक जाग आली.
मी दचकून जागा झालो.
मी म्हणजे सुहास जावडेकर.
आजूबाजूला बघितलं तर मी रस्त्याच्या मधेच झोपलो होतो. उठून बाजूला गेलो. रस्ता निर्मनुष्य होता. मी इथे कसा आलो मला आठवेना. सकाळी घराबाहेर पडलो तेव्हा पॅन्ट, शर्ट, सॉक्स आणि बूट अशा कपड्यात होतो. आता मात्र वेगळेच कपडे होते. खिशात हात घातला तर खिसाच नव्हता. नाही म्हणायला पॅन्ट मात्र माझीच होती आणि त्यात दोन तीन रुपयाची चिल्लर होती.
दुपार झाली हे कळत होत पण किती वाजले हे कळायला मार्गच नव्हता हातातले घड्याळही नव्हते.
समोरून एक बाई येत होती. दुपारचं ऊन असल्यामुळे ती छत्री घेऊन चालली होती. जवळ आल्यावर तिला थांबवून मी वेळ विचारली. त्या बाईने वेळ सांगायला माझ्याकडे बघितले आणि किंचाळून छत्री तिथेच टाकून पळतच सुटली.
उन्हाचे चटके बसत होते. म्हणून मग ती छत्री मी उचलली आणि चालायला लागलो. जाताना कुठे रिकामी रिक्षा दिसते का बघत होतो. त्याच वेळेला माझ्या बाजूने एक रिकामी रिक्षा आली. तिला थाबवून मी रिक्षावाल्याला म्हणालो जरा टिळकरोडवर सोडता का ? रिक्षावाल्याने माझ्याकडे बघून विचारले. टिळक रोडला कुठे जायचं आहे? माझ्याकडे बघताच तो रिक्षाचा गियर टाकून पसार झाला.
तेवढ्यात मला एक फोन बूथ दिसले. हल्ली फोन बूथ जवळ जवळ नसतातच. पण मोबाइल वरून फोन करायला माझ्याकडे माझा सेलफोन नव्हता. शेवटी फोन बूथ वरून हेमाला फोन करायचं ठरवलं. हेमा म्हणजे माझी बायको.
फोन बूथ वरून हेमाचा मोबाइल नंबर डायल केला. नशीब माझं!! हेमाचा मोबाइल नंबर माझ्या लक्षात होता. तीन चार वेळा फोन केल्यावरही फोन' तुम्ही डायल केलेल्या नंबर वर सध्या पोहचू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा' असच येत होत.
मग घरी लँडलाईन वर फोन करून कोणी सापडतय का बघायचं ठरवलं. घरी कोणी फोन उचलण्याची शक्यता कमीच होती. दोन तीनदा फोन वाजल्यावर कोणीतरी फोन उचलला. समोरून भसाडा पुरुषी आवाज ऐकू आला.
' कोण आहे ?
' जरा हेमाला फोन देता का? 'मी'
' कोण हेमा?
' हे जावडेकरांचंच घर आहे ना? 'मी'
' हो.
' आपण कोण बोलताय ? 'मी'
' मी मिसेस जावडेकरांच्या भावाचा मित्र.
' मग जरा मिसेस जावडेकरांना फोन देता का? 'मी'
' त्या बाहेर गेल्यात?
' कुठे गेल्या आहेत काही माहित आहे का ? 'मी'
' वैकुंठ स्मशानभूमीत नवऱ्याच्या अंत्यसंस्काराला गेल्या आहेत. बिचाऱ्याच्या चेहऱ्याचा सकाळी अपघातामध्ये चेंदामेंदा झाला होता.
[नादभय ह्या आगामी संग्रहातून]

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा छान,
पण शेवटचा ट्विस्ट थोडा आउट ऑफ प्लेस वाटतोय,
घरी आलेल्या रँडम फोन ला अपघाताचे डिटेल देणे थोडे ऑड वाटले.
>>>>> वैकुंठ स्मशानभूमीत नवऱ्याच्या अंत्यसंस्काराला गेल्या आहेत. >>>>
एवढे पुरले असते,
किंवा " समोर आरश्यात माझा छिन्न विच्छिन्न चेहरा पाहून मीच दचकलो"

आता मात्र वेगळेच कपडे होते. खिशात हात घातला तर खिसाच नव्हता. नाही म्हणायला पॅन्ट मात्र माझीच होती आणि त्यात दोन तीन रुपयाची चिल्लर होती
खिसा नव्हता तर चिल्लर कशात होती Wink
मी मिसेस जावडेकरांच्या भावाचा मित्र.>>>
मग तो नवराच आहे का अ‍ॅक्सिडण्ट झालेला? मग त्याने फोनवर खोटं सांगितल का? आणि का?

भारी आहे. आवडली.

@सिम्बा Submitted by सिम्बा on 26 September, 2017 - 08:28>>.+१

आणि माझ्या माहितीनुसार बाया स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी जात नाहीत>>>>>जातात काहींच्यात.

आणि माझ्या माहितीनुसार बाया स्मशानभूमीत अंतिम संस्कारासाठी जात नाहीत...
माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार मी स्वतः केले आहेत. स्मशानभुमीत जाऊन.

सिम्बा +१

अग्निपंख, परत वाचा एकदा शांतपणे Proud तुमचा प्रतिसाद वाचुन मी पंण भंजालले एक मिन