‘मनी रुतले क्षण………..’

Submitted by निर्झरा on 23 September, 2017 - 05:40

‘मनी रुतले क्षण………..’
खुप वैतागले होते आज. दिवसभर नुसती चिडचिड. बरं ती का होतेय ते पण कळेना, त्यावरून अजून चिडचिड. घरात असते तर राग बाहेर काढायला हक्काच माणूस तरी मिळाल असत. ईथे ऑफिस मधे कुणाला धरू……. शेवटी पर्स उचलली आणि तडख कोणाला काही न सांगता ऑफिस मधून बाहेर पडले. घर गाठल. पण तिथही मन लागेना. मला शांतता हवी होती. कोणी नको होत आजू-बाजूला. मी खोलीचा दरवाजा बंद केला. नवरा घरातच होता. त्यालाही माझ्या या वागण्याची सवय झाली होती. त्यामुळे तोही मला डिस्टब करयाला आला नाही.
एक-दोन तास असेच गेले असतील. मी उठून बाहेर आले. तस नवरा उठून किचन मधे गेला आणि पाचच मिनिटांत बाहेर येऊन गरम गरम कॉफीचा कप माझ्या समोर धरला. कॉफीचा एक घोट घशातून पोटात गेला आणि दिवसभराचा थकवा जणू क्षणात नाहिसा झाल्यासारख वाटल. आता मला जरा बर वाटू लागल. पुढचे तीन दिवस म्हणजे शनिवार-रविवार आणी सोमवारची महाराष्ट्र् दिनाची सुट्टी आल्यामुळे मला जरा निवांतपणा मिळणार होता. पण तरीही मिळालेल्या सुट्टीत काय काय काम संपवायची याच गणित चालू झाल. कारण कितीही ठरवल तरी सगळी ठरलेली काम पुर्ण होतच नाहीत.
माझी कॉफी संपली होती. मी कप तसाच खाली ठेवला. उठायचापण कंटाळा आला होता. अशावेळी मला वयस्कर लोकांच फार नवल वाटत. वयाची सत्तरी गाठली तरी त्यांच्यातला उत्साह कायम टिकून असतो. माझ्या डोक्यात विचारचक्र चालू असताना नवर्‍याने ट्रिपला जायच्या प्लानच्या बॉम्बने माझी कामांची लिस्ट ऊधळून लावली. मलाही निवांतपणा हवाच होता. त्याला जायचे ठिकाण विचारताच माझ्या चेहर्‍यावरचा आनंद त्याने लगेच हेरला. माझ आवडत ठिकाण , जिथे मला हवी तशी शांतता असते. आजूबाजूला जंगल, मधोमध उभ असलेल हे ‘जंगल रिसॉर्ट’. कुठल्याही खोलीतून बाहेर बघा समोर मस्त बाराही महिने वाहणारा धबधबा ( ह्ं आता तो आर्टिफिशल होता. पण त्याच्याकडे बघताना खुप छान वाटायाच). त्याच्या तो खळखळ वाहणार्‍या पाण्याचा आवाज, त्यात मिसळण्यार्‍या हवेचा तो सूं-सूं आवाज. त्या खोट्या धबधब्याला खर समजून त्यावर किलबिल करणारी पाखर. आजूबाजूला लावलेल्या फुलांवरून वेग वेगळ्या रंगांची स्वच्छ्ंद बागडणारी फुलपाखरं, जंगलातल्या झाडांचा येणारा तो विशिष्ट वास. हे सगळ मला फार आवडायच.
ठरल्याप्रमाणे आम्ही तिथ पोहोचलो. खोलीत बॅगा टाकल्या. नवरा सवयीप्रमाणे निसर्गाला कॅमेरात कैद करायला बाहेर निघून गेला. ईथ आमच कधीच एकमत व्हायच नाही. मला निसर्ग डोळ्यात साठवायला आवडायचा आणि त्याला कॅमेरात. माझ्यामते कॅमेरात काही गोष्टी कैद कारयच्या नादात आपण डोळ्यांना मिळणार्‍या सुखद अनुभवापासून वंचित राहतो. मी जरा फ्रेश झाले आणि फेरफटका मारायला बाहेर पडले. या ठिकाणी मी कितीही वेळा यायला तयार असते. कारण परत जाताना मला नेहमी नविन अनुभव मिळालेले असतात. फेरफटका मारून झाल्यावर मी माझ्या आवडत्या जागे जवळ गेले. नवरा आधीच तिथे पोचलेला दिसला. मला बघताच त्याने हातातील कॅमेरा माझ्यावर रोखला. मला कुठलीही ईकडे तिकडे बघण्याची किंवा विशिष्ट अशा पद्धतीत उभी राहण्याची अथवा बसण्याची सूचना न देता त्याने कॅमेरा तीन चार वेळा क्लिक केला. मी ही काही बोलले नाही. कारण आत्तापर्यन्त त्याने माझे असे काढलेले फोटो खुप संदर आले होते.
मी तिथल्या हिरवळीवर बसले. तोही माझ्याजवळ आला. खाली बसला. माझ्या खांद्यावर डोक टेकवत त्याने मला विचारल, “शुभू, काय झालय? कसल टेंशन आहे? त्याला काय उत्तर द्याव ते कळेना. दरवेळी तो माझ्या मनाची घालमेल अचूक ओळखायचा. मलाच कळत न्हवत मी अशी का चिडले ते. पण कुठेतरी हे जाणवत होत की आत्ताची लाईफस्टाईल याला कारणीभूत आहे. सतत धावपळीच जीवन. कुठलीही स्पर्धा नसताना देखील एके मेकांच्या पुढे जाण्याची शर्यत. नुसतीच शर्यत नाही… तर अडथळ्यांची शर्यत. त्या शर्यतीत पळताना अडथळे निर्माण करणारे दुसरे तीसरे कोणी नसून आपलेच जवळचे ओळखीचे चेहरे. ज्यांच्यावर आपण विश्वास टाकावा तेच पाठीमागून खंजीर खुपसणारे. जाऊदे, हे सगळ विसरायलाच मी ईथे आली आहे. नको पुन्हा तेच तेच विषय.
पण संचितच्या प्रश्नाला उत्तर देण भाग होत. कदाचीत माझ्या मनावरचा ताण त्याच्याशी बोलण्याने हलका झाला असता. मी त्याला सांगायला सुरूवात केली. तो ही मधे मधे न बोलता ऐकून घेऊ लागला. माझ बोलून झाल तस तो माझ्या चेहर्‍याकडे बघत बसला. मला वाटल तो आता मला पुन्हा तेच सांगेल माझी समजूत काढेल की आत्ताच लाईफ हे असच आहे, हे असच आपल्याला जगाव लागेल. सगळ्या गोष्टी येतील तश्याच जगाव्या लागतील. वगैरे वगैरे… पण नाही…. त्याने तर एकदम वेगळ्याच विषयाला हात घातला.
“ शुभू आपण तुझ्या बालपणाबद्दल कधीच फार बोललो नाही. चल आज तुझ्या काही आठवणी सांग मला.” अचानक तो मला माझ्या बालपणाच्या आठवणीत घेऊन गेला. आता मला प्रश्न पडला की ह्याला किती आणि कस सांगू. नेमकी कूठली आठवण पहिली सांगू. कॉलेज बद्दल सांगू की शाळेबद्दल. बहूदा संचितने माझ्या मनाचा गोंधळ ओळखला आणि त्यानेच मला सुचवल की माझ्या जन्मापासून जे मला आठवत असेल ते सांग. किती बर वाटल मला हे ऐकल्यावर. माझ काम एकदम सोप्प झाल.
आता संचितने माझ्या खांद्यावरील त्याचे डोके काढले आणि तो माझ्या हिरवळीवर पसरलेल्या पायांच्यावर डोके ठेवून ऐकू लागला. माझा एक हात त्याच्या केसांतून फिरत होता आणि दूसरा हात त्याच्या हातात त्याने घट्ट् धरला होता. मी बोलू लागले… माझ्या घराबद्दल, माझ्या चाळीबद्दल…. ‘चाळ….’ हिच्याबद्दल तर सांगायलाच हव. माझ जन्मस्थान आहे ती.
‘चाळ’
म्हणजे बघ हं संचित, अस चाळीकडे तोंड करून उभ राहिल की उजव्या हाताला एकमेकाला जोडलेल्या सात / आठ खोल्या. या बाजूला दोन खोल्यांची एक रांग. दहा बाय दहा च्या दोन खोल्या एक स्वयंपाक घर आणि दुसरी खोली हॉल कम बेडरूम. घराला दोन्ही बाजूने दारं. दरवाजाच्या पायर्यांना लागूनच तीन फरश्यांचा ओटा. दोन घरांना जोडणार्‍या भिंतीपुढे एक शहाबादी फरशी बसेल ईतकी झाड लावायला मोकळी जागा. या एवढ्याशा जागेत माझ्या आज्जीने गुलाब, सोनटक्का, कृष्ण्कमळ, तुळस, ओवा अशी झाड लावली होती.
आता डाव्या हाताला बघ. ईकडे एकच खोली असणारी घरं. म्हणजे किचन, हॉल, बेडरूम सगळ तिथच. यांना एकच दार. दोन्ही बाजूच्या चाळीमधून एक मातीचा जाणारा रस्ता. एक टूव्हिलर जाईल ईतकीच त्याची रुंदी. म्हणजे आपल्या पायरीवर उभे राहून जरा लांब पाय टाकला तर आपण समोरच्याच घरात. चाळीच्या सुरूवातीला डाव्या बाजूला दोन नळ असलेल कोंढाळ, तर उजव्या बाजूला तीन सामाईक संडास. या नळ कोंढाळ आणि संडास यांच्यामधे जी मोकळी जागा होती तिथ आम्ही पोरं खेळायचो. आमची चाळ ही सर्व धर्म समभाव अशी होती. म्हणजे ब्राम्हण, मारवाडी, गुजराथी, सोनार, मराठा अश्या सगळ्या जातींची बि-हाड तिथं होती. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे. बोलण्याची ढब वेगळी. रुढी वेगळ्या. जेवण बनवण्याच्या पद्धती वेगळ्या.
आम्हा पोरांची पण एक गम्मत होती. काही जण आमच्याहून मोठे होते, तर काही जण लहान. आम्ही सात आठ जणं समवयस्क. नुसतेच समवयस्क नाही तर एकाच महिन्यातले. अगदी दोन चार दिवसांचा फरक आमच्यात. मग काय मस्त ग्रुप झाला होता आमचा. लहानपणीचा बराचसा काळ मी याच चाळीत काढला. प्रत्येक घरात दोन पोरं(काही अपवाद सोडता. त्या घरात सहा –सात भाव्ंड होती.) त्या वेळी सगळी घर ही मातीची होती. कुठेही सीमेंटचा वापर न्हवता. घरावर पत्रा. या पत्र्यावर चढायला खुप मज्जा यायची. उन्हाळ्यातील वाळवणं या पत्र्यावर केली जायची. पावसाळा आला कि या गळणार्‍या पत्र्याखाली झोपताना किती कसरती काराव्या लागायच्या. या विषयी मी तुला नंतर सांगते. त्या आधी आमचे खेळ बघूयात.
आमचा लहान मोठे मिळून पंधरा वीस जणांचा घोळकाच असायचा. आम्ही खेळणारे खेळ म्हणजे ‘हे मुलांचे- हे मुलींचे खेळ’ अस कधीच नाही केल. अप्पारप्पी पासून ते सागर गोट्या, हाडक्या, पतंग खेळण्यापर्यन्त आम्ही मुल – मुली एकत्र खेळायचो. आमच्या घरच्यांनी आम्ही मुली म्हणून कधी आम्हाला घरात बसवून नाही ठेवल. माझे वडिल तर म्हणायचे कि ‘तुम्ही स्वताच्या पायाचवर उभे रहायला शिका. चार पैसे कमवून आणायला शिका. कुठल्याच गोष्टीत मुलांच्या मागे रहायच नाही.’
त्या मुळे आमच्या घरात विटी दांडू, हाडक्या- गोट्या, पतंग, बॅट-बॉल हे सगळ वडिलांनी घेऊन दिलेल. सगंळ्यात जास्त मजा कधी यायची मिहितिये? मे महिन्याच्या सुट्टीत सायकल शिकताना. त्या वेळी एक रूपया एक तास अशी सायकल भाड्यानी मिळायची. आम्ही चार जणांत मिळून सायकल भाड्याने आणायचो. आम्हीच एकमेकांना सायकल शिकवायचो. एकाने कॅरिअर धरून सायकलच्या मागे ‘मार पॅडल- मार पॅडल’ म्हणत पळत रहायचे आणि चालवणार्‍याने थरथरत्या दोन्ही हाताने कसबस हँडल सांभाळत हाफ पॅडल मारत, कधी सीटवर बसून तर कधी उभ राहून सायकल चालवायचा प्रयत्न करायचा. यात किती तरी वेळा गुढगे फोडून घेतले होते. यात आमची भांडण व्हायची ती सायकल परत नेऊन देणार कोण यावरून. त्या वेळी आमच्यात कशावरूनही भांडण व्हायची. पण लगेच गट्टी पण व्हायची. ही भांडण घरापर्यन्त कधीच गेली नाहीत. कधी कोणी घेऊन गेल तर घरचेच सांगायचे. ‘तुम्ही मुल बाहेरच मिटवा काय असेल ते.
दुपारच्या वेळी बैठे खेळ खेळायचो. जस सागरगोटे, बिट्ट्या, चल्लस-आठ, काचापाणी, पत्ते’, नाव-गाव-फळ्-फुल, कॅरम आणखी एक खेळ खेळायचो त्याच नाव माहित नाही पण एका कागदावर एक आकृती काढायची, ती काढताना दोन गुणीलेच्या फुल्या मारायच्या मग त्याला एक चौकोन आखायचा, त्या चौकोनाच्या बाहेर अर्धवर्तूळ काढायचे. पण हे सगळ करताना आपला पेन किंवा पेन्सील एकदा कागदावर ठेवला की अजीबात उचलायची नाही. सागरगोटे खेळताना तो फरशीवर घासून त्याचा चटका द्यायचा. अजून एक खेळ म्हणजे काचेची फुटकी बांगडी मेणबत्तीबर गरम करत वाकवायची, तिला पाकळीचा आकार द्यायचा. अस करत एक एक पाकळी एक मेकात अडकवत जायची आणि तिची एक साखळी तयार करायची.
संध्याकाळी लगोरी, बॅटमिंटन, अप्पारप्पी, खो-खो, बॅट-बॉल असे खेळ खेळायचो. बॅट- बॉल खेळताना तर ईतके नियम होते की बस. डिक्लेअर रन मुळे पळून रन काढायची गरजच पडायची नाही. मारला ईकडे की एक रन, गेला तिकडे की दोन रन, ह्या घराच्या पुढे चार रन. सिक्स मारायच्या भानगडीत फारस कोणी पडायच नाही. कारण कोण्याच्या घरात बॉल गेला की आमचा खेळ तिथच बंद व्हायचा. त्यात टीम निवडताना कोणाला कोणाच्या टीम मधे घ्यायच ह्या वरून होणारी लटकी भांडण. मग कोण पहिल खेळणार हे ठरवण्यासाठी कोणाला तरी खाली वाकायला लावायचे, मग त्याच्या पाठिवर हाताच्या मुठीने दोन तीन वेळा थापा मारून काही बोट आत मुडपून काही बोट बाहेर ठेवून हा नंबर कोणाला मिळणार ते ओळखायला लावायचे. पहिला नंबर देवाचा हे ठरलेल असायच. खेळ रंगात आला की हळू हळू काही नियम मोडले जायचे. यात अजून एक गम्मत आठवते ती म्हणजे ‘पाटलीन बाई……’ ह्यांच्या घरी जर बॉल गेला तर तो परत यायचाच नाही आणि आला तर तो सुरीने कापलेला असायचा. मग आमची मॅच तिथेच संपून जायची. बॉल जण्याच्या भितीने कोणी घरून बॉल आणायला तयारच व्हायच नाही. मग आम्ही दिवस ठरवून घेतले. त्याप्रमाणे रोज एकाच्या घरून बॉल आणला जायचा. लपाछपी आणि डबडा ऐस पैस खेळताना ईतकी मजा यायची. एकदा का एकावर राज्य आल तर ते दोन दोन दिवस चालायच. चाळींच्या मधल्या गल्लीत एकदा का कुणी लपून बसल की लवकर सापडायचच नाही. कारण प्रत्येक गल्ली एक-मेकाला जोडलेली होती. ज्याच्यावर राज्य् आहे तो एका गल्लीत शोधण्यासाठी गेला की आपण लगेच दुसर्‍या गल्लीत पळायच.
“व्वा! खुप मजा केलीस की तु तुझ्या लहानपणी. आमच्याकडे न्हवती अशी मजा. अजून काय काय व्हायच तुमच्या चाळीत? नळावरची भांडण कधी झाली का?”
अरे… खुप व्हायची. पंधरा बिर्‍हाड मिळून दोन नळ. त्यातून एकच वेळ पाणी यायच सकाळी. सगळ्या बायका हंडे, बादल्या, कळश्या घेऊन रांगेत उभ्या असायच्या. एक्-एकीचे चार-पाच भांडी. एक भरल की लगेच दुसर लावणार. जीचा नंबर शेवट तिला कस बस दोन हंडे पाणी मिळायच. मग व्हायची भांडण. फक्त एक मेकीच्या झिंझ्या धरायच्या नाहीत एवढच. जे काही व्हायच ते शाब्दिक. यात माझ्या आज्जीनी एक शक्कल लढवली. तसा माझ्या आज्जीचा दरारा होता चाळीत. सगळे घाबरुन असायचे तिला.(माझी आई मात्र याच्या अगदी उलट). पाणी यायच्या वेळेला ती नळाच्या कट्ट्यावर जाऊन थांबायची. प्रत्येकीला दोन हंडे पाणी. ते भरून झाल की पुढच्या वेळेस परत मागे नंबर लावायचा. जर तिनी ऐकल नाही तर तिने भरलेला हंडा तिच्या मागच्या बाईच्या कळशीत आज्जी स्वतः ओतून द्यायची. तिला थांबवायची कोणाची हिम्मत व्हायची नाही. या मुळे झाल अस की सगळ्यांना न भांडता योग्य ते पाणी मिळू लागल. कालांतराने चोवीस तास धो-धो पाणी आल चाळीत. त्या नंतर काही दिवसातच नळ कोंढाळ जाऊन प्रत्येकाला घरात नळ मिळाला आणि नळावरची सगळी गंम्मत संपली.
“सण वार कसे साजरे व्हायचे ग तुमच्या चाळित?”
सणाचा दिवस कमी पडायचा आम्हाला तयारी करताना. आपला पहिला सण गुढीपाडवा. चाळीत स्पर्धा असायची कोणाची गुढी सगळ्यात ऊंच ते. दोन चाळीतल अंतर कमी असल्यामुळे या गुढ्या एकमेकांत मिक्स व्हायच्या. जर चाळीसमोर उभ राहून बघितल तर छान रंगीबेरंगी कमान तयार झालेली असायची. गणपतीत तर धमाल असायची दहा दिवस. सगळ्यांची घरं वर्षातून दोनदा लिंपली आणि रंगवली जायची. एक गौरी-गणपतीच्या स्वागताला आणि दूसर दिवाळीला. घरातलेच सगळे मिळुन हे लिपापुतीच काम करायचे. एवढ्याश्या जागेत सूद्धा तिथल्या तिथच सामानाची हलवा-हलवी करून खुप छान रंगवल्या जायच्या भिंती. आधी त्या पॉलीश पेपरने घासायच्या, मग एका बादलीत रात्रभर रंग भिजत ठेवायचा. दुसर्‍या दिवशी त्या घासलेल्या भिंतीवर रंग द्यायचा. प्रत्येकाच्या हाताने उभे आडवे मारलेले ते रंगाच्या ब्रशचे फरकाटे म्हणजे त्या वेळेचे पॅचवर्कच होते ते. मला त्या ओल्या रंगाचा वास खुप आवडायचा. कालांतराने काहीजणांनी घराला प्लॅस्टर करून घेतले आणि ऑईलपेंटनी भिंती रंगवून घेतल्या. त्यामुळे दरवर्षी घर रंगवायची प्रथा बंद झाली.
गणपती बसले की रोज मंडळा मधे मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जायच्या. विविधगुणदर्शनात केले जाणारे डान्स्, एकपात्री कर्यक्रम्, नाट्यछटा, संगीत खुर्ची खुप छान असायचे ते दिवस. गौरींच्या हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाला आई बरोबर जाताना उत्सुकता असायची ती छोट्याश्या घरातील टिचभर जागेत केलेली सुरेख आरास बघण्याची. केवढे ते फराळाचे पदार्थ. लाईटच्या माळांचा झगमगाट. त्या एकमेकांत आडव्या तिडव्या लावून केलेली ती रंगबिरंगी झिरमुळ्यांची आरास. काहींचे पितळी तर कुठे शाडूमातीचे ते प्रसन्न् मुखवटे. प्रत्येकाच्या घरातील वेग-वेगळ्या धुपाचा-उदबत्तीचा दरवळणारा सुवास. ते आनंदी वातावरण. हे सगळ एका दिवसात बघूनच व्हायच नाही. मग दुसर्‍या दिवशी राहीलेली घर करायची. विसर्जनाच्या दिवशीची केली जाणारी डाळीची खिरापत तर काय मस्त लागायची.
गौरीविसर्जन झाल की त्या दिवशी वडील आम्हाला गणपतीचे देखावे दाखवायला घेऊन जायचे. कुठे लाईटींग तर कुठे संगीताच्या तालावर नाचणार कारंज, तर कुठे हलते देखावे काय मज्जा यायची हे सगळ बघताना. रात्रभर पायी चालून सगळ्या गणपतींच दर्शन घ्यायच, देखावे बघायचे आणि पहाटे घरी पोहचून मस्त अंथरूणावर अंग टाकून द्यायच. त्या दिवशी शाळेला बुट्टी असायची. गणपती विसर्जन मिरवणूकीची सुद्धा अशीच मज्जा यायची. दिड दिवस मिरवणूक चालायची. तो ढोल-ताशांचा घुमणारा आवाज, त्या अलोट गर्दीत उभे राहून पाय दुखले तर दुसर मंडळ येईपर्यन्त तिथच फुटपाथवर बसायला जागा शोधायची. मिळेल त्या हातगाडीवरच ते हायजीन आहे की नाही हे न बघता पटापट हादडायच. एखाद मंडळ आवडल तर त्यांच्यात सामील होऊन मनसोक्त नाचायच. कोणीही ओळखीच नसायच पण तरीही एक आपुलकी असायची सगळ्यांच्यात. मग ते आपलं मंडळ नसल तरी आपणही त्यांच्या घोषणा देताना आपला आवाज उगाचच वाढवायचा. घरी आल्यावर देखील ढोल-ताशा-झांजा यांचे आवाज निनादत असायचे कानात.
नवरात्रीमधे रोज आमच जेवण बाहेरच व्हायच. रोज भोंडला असायचा. खिरापत जेवणासारखीच मिळायची. आम्ही आपाअपलं ताट-वाटी घेऊनच जायचो भोंडला करायला. कित्ती ती गाणी असायची, पण कधीच कंटाळा नाही आला ती म्हणताना किंवा आता बास ह्ं अस पण नाही झाल. ऊलट गाणी म्हणून झाली की अजून कूठल रहिलं आहे ते आठवून आठवून म्हणायचो. खिरापत ओळखताना पण मज्जा यायची. काही जणांची ठरावीक खिरापत असायची. ती पटकन ओळखायला यायची. काही जणांची ओळखताना मात्र कधी कधी आम्ही हारायचो. जेवणं झाली की गर्भा आणि दांडिया खेळायचो. दसर्‍याच्या दिवशी केली जाणारी वह्या पुस्तक, सायकल यांची पुजा. पाटीवर किंवा वहीवर एक् आणी चार हे आकडे वापरून काढलेल सरस्वतीचे चित्र्. मग आईच्या हातचा गोड स्वयंपाक. संध्याकाळी आपट्याची पान गोळा करायची. त्यातल एक पान वहीत जपून ठेवायच.
मग यायची ती दिवाळी. पुन्हा घराची रंगरंगोटी आणि आवरा-आवर करायची. फराळाच्या पदार्थांची तयारी सगळीकडे सुरू व्हायची. चाळित एक चक्कर मारली की सगळ्या पदार्थांच्या वासांनीच पोट भरून जायच. आम्हा मुलांची लगबग सुरू व्हायची ती किल्याच्या तयारीची. किल्ल्यासाठी माती शोधायची, दगड-विटा गोळा करायचे, घराच्या बाहेर किल्ला करायचा. दगड विटा कशाही रचायच्या, मग त्यावर पोतं किंवा कापड टाकायच, त्यावर टबात कलवलेली मातीचे गोळे करून थपाथप मारायचे. यात आमचे हात कोपरापर्यन्त मातीने खराब व्हायचे. कपडे चिखलाने माखायचे. पण घरचे कधी ओरडले नाहीत. या किल्ल्याच्या पायर्‍या उलतन्याने सपाट करायच्या. शिवाजी महाराजांच आसन पण एखाद्या फरशीचा तुकडा बसवून छान करायच. मग किल्ल्यात गुहा करायची, खराट्याच्या काड्या वापरून जेल करायच. नारळाच्या करवंटीच तळ करायच. यात सलाईनची बाटली आणि नळी वापरून आम्ही कारंजपण करायचो. कुस्तीच मैदान, शेत अस काय काय करायचो. त्यावर मोहरी- आळिव टाकायच आणि रोज ते किती ऊगवल हे बघायच. संध्याकाळ झाली की किल्ल्यावर मावळे ठेवायचे. किल्ल्यावर एक पणती लावायची.
घराच्या बाहेर लावलेले प्रत्येकाचे वेग-वेगळे आकाशकंदील या मुळे चाळ रंगबिरंगी रंगानी न्हाऊन निघायची.. हे सुद्धा तेव्हा आम्ही घरी तयार करायचो. घरासमोरच अंगण शेणाने सारवलेल. त्या सारवलेल्या अंगणावर लावलेल्या पणत्या खुप सुंदर दिसायच्या. प्रत्येकाच्या दारापुढे सडा मारून सुंदर अशे रंग भरून काढलेली रांगोळी. मग त्या मधे अगदी पाच- दहा ठिपक्यांपासूनच्या पुढे तुम्ही वाढवाल तितकी मोठी रांगोळी असायची. नातेवाईकांच्या घरी सगळ्यांनी एकत्र जमून केलेला फराळ. त्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
संध्याकाळी सगळे एकत्र फटाके वाजवायला जमायचो. लवंगी, वायर, नागगोळ्या, सुरसूरी, भूईचक्र, भुईनोळा, पताका, आपटबार, लक्ष्मी बॉम्ब, बाण असे काय काय प्रकार असायचे. जास्त मजा यायची ती टिकल्या फोडताना. दहा-बारा टिकल्या एक मेकावर रचून ठेवायच्या मग एका मोठ्या दगडाने किंवा हतोडीने त्याच्यावर घाव घालायचा किंवा खरबुडीत भिंतीवर हाताने घासून फोडायच्या. या टिलकल्या फोडायला आम्ही बंदूक कधी वापरलीच नाही. नविन ड्रेस सांभाळत हे फटाके वाजवताना काय धांदल उडायची. मग त्यात काही वात्रट पोरं उगाचच मागन ओरडून घाबरवायचे ‘ए पेटला-पेटला’ आणि आपण पण खरच फटाका पेटला आहे की नाही हे न बघता उगाच फटाका पेटला म्हणून मागे पळायचे. मग दुसर्‍या दिवशी सकाळी अर्धवट किंवा न वाजलेले फटाके गोळा करून आणायचे. कागदांचा ढीग करून तो पेटवायचा त्यात हे फटाके टाकायचे आणि मजा बघायची. किंवा ह्या फटाक्यांमधील दारु एका कादावर काढायची आणि तो पेटवायचा, मस्त जाळ निघायचा त्यातून. हे सगळ घरच्यांना कळू न देता गुपचूप करायच.
त्यानंतर फार सण नसायचे. मग यायची ती संक्रांत. पुन्हा एकदा आई बरोबर हळदी-कूंकवाला जायची मजा. कोण काय देतय आणि कोणाची तिळवडी कशी झालीये हे बघायच, एक छोट्याश्या डब्यात आई तिळगूळ भरून द्यायची. ( आम्हा मुलांना वड्या वाटायला कधीच मिळायच नाही. फक्त शाळेच्या आणि क्लासच्या बाई सोडल्यातर.) मग तो छोटासा डब्बा हातात धरून आणि आईची नेसलेली साडी सांभाळत चार मैत्रीणींबरोबर सगळ्या घरात तो वाटत आणि मिळालेला तिळगूळ त्याच डब्यात गोळा करत फिरायच. घरात येईपर्यन्त कुठला कोणी दिला आणि नंतर आपणही आपला संपल्यावर कसा दुसर्‍याचा तिळगूळ आपला म्हणून खपवला याचा विचार करताना हसायला यायच. आईने केलेल्या गुळाच्या पोळ्या तिच्या नकळत लंपास करायच्या. पण ती आमची आईच होती. तिनेही आधीच एक वेगळा डबा करून आमच्यापासून लपवून ठेवलेला असायचा.
मग यायचा तो रंगपंचमीचा सण. या दिवसाच तर काही विचारूच नकोस. दोन वेळा साजरी करायचो आम्ही. एकदा धुलवडीला आणि एकदा रंगपंचमीला. प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकाराची पिचकारी. कोणाची लहान तर कोणाची मोठी. कोणाचा वेळ सारख त्या पिचकारीत पाणी भरण्यात जायचा तर कोणाला एकदाच पाणी भराव लागायच. आम्हाला टेंशन असायच ते नळाच पाणी जाईल की काय याच. कारण पाणी गेल तर फुगे कसे भरणार. पाण्याने भरलेल्या फुग्याचा सपका पाठिवर बसल्याशिवाय होळिचा सण साजरा होणारच नाही. मग आदल्या दिवशीपासूनच फुगे फुगवून ठेवायचे. एक वेळ पिचकारी नसेल तर चालेल पण पाण्याचे फुगे आणि रंगीत पाण्याच्या बादल्या हे हवेच हवे. एक-एक जण अस रंगलेल असायच की बस्स. दिवसभर त्या रंगलेल्या अवतारात हुंदडायच.
घरी गेल की तो सुकलेला रंग काढताना नाकी नऊ यायचे. बरर्‍याच वेळा दुसर्‍या दिवशी शाळेत आलेल्यांची हीच अवस्था असायची. दोन-दोन दिवस रंग उतरायचा नाही.
‘शुभू, तुझ हे सगळ ऐकून मला अस वाटायला लागलय की मी पण तुमच्याच चाळीत राहणारा हवा होतो. मलाही ही सगळी मज्जा करता आली असती. मग आपल लग्न पण लव मॅरेज झाल असत.’
धत्…, मग आपल लव मॅरेज नसत झाल. कारण आम्हा सगळ्यांमधे फक्त मैत्रीचच नातं होत. निखळ मैत्री जी आजही आम्ही सांभाळली आहे. मग आपणही मित्रच राहिलो असतो. ए, तु खरच अशी काहीच मजा नाही केलीस्?
नाही ग, खरं सांगू का. मला ना कधी कोणात मिक्स व्हावसच नाही वाटल. मी नेहमी माझा अभ्यास आणि माझी पुस्तक यातच रमायचो. तस आमच्यापण चाळीत अशी मज्जा केली जायची, पण तुमच्या ईतकी नाही. खरच आपले लहानपणीचे दिवस वेगळेच होते. एक एक दिवस अजूनही आठवणीत आहे. जणू मनाच्या एका कोपर्यात अजूनही आपण हे दिवस जगतोय.
खरच आहे तुझ, मी सुद्धा कधी अपसेट झाले की हे दिवस आठवते. मन फ्रेश होत मग.
अजून सांगना काही आठवणी….
तुला मघाशी म्हणाले तसं पत्र्यावर चढून तिथ वाळवण करणे. घरापुढे पुरेशी जागा नसल्याने वाळवण पत्र्यावर केली जायची. आई आणि आज्जी घरात बसून सांडगे, कुरडया, पापड्या हे एक एक ताटावर आणि पाटावर घालायच्या. आमच्य घरचे पाट जणू छोटे चोपळेच. त्या पाटांवर चांदीच्या फुलांची नक्षी होती. आतून हे ताट आणि पाट बहीण ओट्यावर ऊभे असलेल्या वडिलांच्या हातात द्यायची, मग वडिल ते वर माझ्या हातात द्यायचे. ते सगळे पाट पत्र्यावर व्यवस्थित रचून ठेवायचे. संध्याकाळी पुन्हा ते घरात आणायचे.
आपल्या घरच सगळ करून झाल की चाळीत बाकीच्यांच्या घरी पण पापड करायला जायच. प्रत्येक जण आपल पोळपाट आणि लाटण घेउन यायच. सगळे पापड झाले की जाताना पाच पापडांचा वाणोळा मिळायचा. पापडाच भिजवलेल पीठ पण खुप खाल्ल् आम्ही. त्या केलेल्या बोट्यांना तेल लावायच आणि खायच किंवा त्याची छोटी चानकी करायची ती तव्यावर आणि गॅसवर भाजायची आणि खायची. तसच गव्हाचा चीक पण. कोणी त्यात दूध साखर घालून खायच तर कोणी तेल घालून.
पावसाळा आला की पत्र्याला होल पडले असेल तिथे सिमेंट लावायचे. तरीही पत्रे गळायचेच. झोपताना काय हाल व्हायचे आमचे. पाणी गळणारी जागा सोडून झोपायचे. मग आम्हाला झोपायला जागाच उरायची नाही. सगळ्या घरात पातेली, परात अस सगळ मांडून ठेवाव लागायच. ते भरलं की पुन्हा रिकाम करून ठेवायच. रात्रभर हेच काम.
अजून मजा यायची ती रोड बनवण्यासाठी रोडरोलर आणि डांबराचे ड्र्म आले की. तासन् तास त्यांच काम बघत बसायच. त्या खणलेल्या रस्त्यावर आधी मोठी खडी टाकायची, मग त्यावर डांबर टाकायच. ते वाफाळत डांबर त्या झारीतून पडताना काय छान दिसायच. त्या तापलेल्या डांबराल एक विशिष्ट वास यायचा. मग त्यावर बारीक खडी टाकली जायची, पुन्हा डांबर आणि मग फक्की. फक्की टाकतानासुद्धा ते घमेल अस काही फिरवायचे की रोडचा बराचसा भाग त्यात कव्हर व्हायचा. मग त्या वरून रोड रोलर फिरायला लागला की आपणही त्याच्या सोबत मागे पुढे फिरायच. त्या वेळी पायात रबरी स्लिपर घालून त्या गरम रस्त्यावर चालताना चपलेला डांबर चिटकायच. ती चिटकलेली चप्पल जोर देउन काढताना त्याच्या पट्ट्या तूटणार नाहीत हे सांभाळायच. कधी कधी चप्पल तिथच चिटकून रहायची आणि आपला पाय बाहेर यायचा. मज्जा यायची अस करताना.
मला नवल वाटायच ते चाकावर पोती फिरवणार्या बायकांच. त्या फिरत्या चाकावर बादलीत बुडवलेल फडक धरून ठेवायच, चूकूनही कधी त्यांचा हात त्या चाकासोबत पुढे गेला नाही की अडकला नाही. संध्याकाळी काम संपवून हे लोक घरी गेले की आम्ही पोरं त्या डांबराच्या ड्र्म जवळ जायचो. त्यात काडी घालून दगड घालून डांबर काढायचो.
आणखी मजा यायची ती भांड्याला कल्ह्ई करताना बघताना. त्या बाईच ते छोटस हाताने फिरवायच यंत्र्. ते जमीनीत पक्क् बसण्यासाठी आधी एक छोटासा खड्डा करायचा, मग त्याच्या नळीच्या तोंडापाशी काही कोळसे टाकायचे.
हाताने ते यंत्राची दांडी फिरवत त्यावर ते कोळसे फुलवायचे. त्या वेळी त्या फिरणार्‍या यंत्राचा तो टरटर् आवाज आणि फुलणार्‍या कोळशांचा तडतड आवाज हे बघायला आणी ऐकायला खुप छान वाटायच. आपल जे भांड असेल ते त्या कोळशांवर फिरवत गरम करायचे. ते तापले की कथिलाची तार दोन-चार ठिकाणी फिरवायची. लगेचच नवसागराची भुकटी टाकून सुती कापडाचा बोळा हातात घेऊन पटापट सगळ्या भांड्यावर फिरवायचा. काही क्षणातच ते काळवंडलेल भांड चांदी सारख चमकायच. मग ते गार पाण्यात बुडवल की चर्रर्र् आवाज करत पाणी बाजूला उडायच. ते पाणी ऊडाल की आम्ही दोन पायावर ऊकीडवे बसलेले पोरं तिथच बुदकन पडायचो.
‘काय ग? बोलायची का थांबलीस.’
अरे बोलण्याच्या नादात किती वाजलेत हे पण कळाल नाही. बघ सगळीकडे काळोख झालाय. बोलून बोलून माझ्या घशाला कोरड पडलीये. चल आता रूम वर जाऊ आणि मस्त पैकी ज्युस घेऊ. अजून उद्याचा दिवस आहे आपण ईथे. उद्या परत बोलू.
‘शुभू, आज डिनर मधे काही वेगळ खाऊयात का?’
‘हो चालेल की. नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. तसही नोकरीमुळे आपण आठवड्यातून दोनदा बाहेरच खातो. बघ काही शेफ स्पेशल वेगळी डिश आहे का.’
‘हे बघ हे कस वाटतय, मेक्सीकन डिश वाटतीये बघूया ट्राय करून’
हो मागव. संचित तुझ्या त्या कलिगच काय झाल रे? ज्याला मागच्या आठवड्यात वॉर्निंग मिळाली होती.
‘अग फायनली त्याला काढलं. पुन्हा पुन्हा त्याच चुका करत होता. मागच्या मिटिंग मधे तर हद्दच केली. गेस्ट् समोरच विचित्र् वागायला लागला. त्या वेळी बॉसनी वेळ मारून नेली. पण मिटींग संपताच बॉसनी त्याला अस काही फायर केल आणि त्याच वेळी काढून टाकल. बरच झाल तो गेला ते, त्याच्या चुकांमुळे आम्हाला बॉसची बोलणी खायला लागायची. बरं तुला ही डिश कशी वाटली. मला तर फार आवडली.’
‘मलाही आवडली. मस्त् झाल जेवण आजच. बाहेर वातावरणही खुप छान आहे. संचित झोपायला जायच्या आधी आपण एक चक्कर मारून येऊयात का?’
‘ आत्ता…., अग ईथे लाईटमुळे उजेडतरी आहे. बाहेर गेलो तर अंधार असेल सगळा. बॅटरीचा ऊजेडपण पुरेसा पडणार नाही.,
‘संचित जाऊयातना आपण, खुप दिवसांता तुझ्या हातात हात घालून फिरले नाहीये. तसही मला कुठलाच उजेड नकोय. जो काही चांदण्यांचा ऊजेड असेल तो पुरेसा आहे मला. अशा अंधारात चांदण्या बघायला खुप छान वाटत.’
‘बरं, जाऊयात. तरीही सेफ्टी साठी मी बॅटरी बरोबर ठेवतो.’

‘काय मॅडाम, आज उठायच नाही का?’
‘नाही, आज उठायचा मूड नाही. खुप दिवसांनी अशी शांत झोप लागली मला.’
‘हो पण तिकड नाष्ट्याची वेळ संपून जाईल. जवळ दुसर काही नाही बाहेर. त्या मुळे चला लवकर तयार व्हा, नाष्टा करू आणि जवळच एक स्पॉट आहे तिथ जाउ. आत्ताच मॅनेजरशी बोलताना कळाला. तो म्हणत होता की फोटो साठी तर अगदी योग्य् जागा आहे.’
‘ ए, मग नाही हं मला तिकड यायच. तु बसशील तुझा कॅमेरा हातात घेऊन फोटो काढत. मी काय करू तिथे?’
‘अग तो म्हणाला त्या ठिकाणी कोणाला बोअर होणारच नाही. जाऊन तर बघू. तुला नाही आवडल तर परत येऊ.’
‘ठिक आहे. मी तयार होते.’
‘शुभू मला वाटत आपण पोहोचलो त्या जागी. गाडी ईथेच लावून थोड उतरून खाली जाव लागेल आपल्याला.’
‘पण ईथे नक्की आहे तरी काय? पुढे तर जंगलच दिसतय. संचित आपण परत जाऊयात.’
‘अग, थोड पुढ जाऊन तर बघूयात.’
‘व्वॉव…’! संचित खरच मस्त स्पॉट आहेरे हा. रस्त्यावरून बघताना कुणाला वाटणारपण नाही की आत ईतकी छान जागा आहे. समोरच तळ पाण्याने भरल आहे. ते ही भर उन्हाळ्यात.’
‘बघ तुला म्हणत होतो ना मी. आलो नसतो तर मिस केल असत हे सगळ. मॅनेजर बरोबर म्हणाला होता. त्याने हे पण सांगीतल की ईथे एक गुप्त् झरा आहे. त्यामुळे ईथल तळ कायम भरलेल असतं आणि त्या मुळे आजू-बाजूचा परिसर नेहमी हिरव गार असतो. ही जागापण त्या रिसॉर्टवाल्यांचीच आहे. काही दिवसांतच ईथेपण रिसॉर्ट् काढणार आहेत ते.’
‘काय?, ईतक्या सुंदर जागेला ते खराब करून टाकणार.’
‘ अग नाही. ईथल्या निसर्गाला धक्का लागणार नाही याची ते काळजी घेणार आहेत. बर, शुभू, ईथून थोड पुढे गेल की अजून एक छान जागा आहे. मॅनेजर सांगत होता की ईथे असलेल्या तळ्यामुळे वेग वेगळे पक्षी- प्राणी ईथ येतात. त्यांच्या साठी तिथ त्यांनी खास जागा तयार केली आहे. तू पुढे जाऊन तिथ बस. मी एवढे फोटो क्लिक करून आलोच’
‘म्हणजे तू मला एकटीला तिथ बसवणार. नेहमीप्रमाणे पाच मिनटांचे एक तास होणार.’
नाही, या वेळेला तस नाही होणार. आलोच मी, तू हो पुढे.

‘अरे! तू खरच लगेच आलास की.’
‘किती छान जागा आहे ना ही . मस्त् वाटतय ईथे बसून. मला यांच एक आवडल. निसर्गाला धक्का लागेल अस काहीच या जागेत केल नाहीये. बसायचे हे बाकडे लाकडी, वेग वेगळी शिल्प उभी केली आहेत ती सुध्दा दगडाची आणि झाड विशिष्ट् पद्धतीत वाढवून कापून तयार केलेली. प्रत्येक प्राण्याचा आणि पक्षांचा विचार करून ईथे झाड लावली आहेत. आपल्या जवळून फिरणारे ससे, तळ्यातली छोटी छोटी कासवाची पिल्ल्, आगगाडीच्या डब्यांसारखी चाललेली बदकाची पिल्ल्ं, डोक्यावरचा तुरा डौलात मिरवत फिरणारे मोर, आंब्यांच्या झाडावररून सुंदर तान घेणारा कोकीळ, एवढासा जीव असून देखील सतत चिवचिवाट करूनपण न थकणार्‍या चिमण्या, झाडावर लटकणारी ती सुगरणीची घरटी, या आधी का नाही आलो आपण ईथे?’
‘अग, मॅनेजरनी सांगीतल आत्ता काही महिनेच झालेत ही जागा डेव्हलप करायला घेऊन. या जागेबद्दल अजून फारस कोणाला ते सांगत नाहीत. आपण त्यांचे नेहमीचे कस्ट्मर आहोत, आणि तुझी निसर्गाची आवड आणि माझा फोटोग्राफीचा छ्ंद त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी आपल्याला ही जागा सांगीतली.’
‘संचित नेहमीप्रमाणेच या वेळेसपण ईथून जाताना एक् वेगळा अनूभव घ्यायला मिळाला. काल तुझ्याशी बोलून झाल्यावर खुप बरं वाटल. आज पुन्हा फ्रेश झाल्यासारख वाटत आहे. या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वताच्या आनंदाकडे लक्षच देत नाही. सुट्टीचे दिवस असेच घरात आराम करून नाहीतर राहीलेली काम पुर्ण् करत घालवतो. आता मी ठरवलय महिन्यातून निदान एखादी सुट्टी आपल्यासाठी राखून ठेवायची आणि त्या दिवशी मनात काही आठवणी ठेवून जाणारे क्षण जगायचे. चला आजही या जागी फिरताना वेळ कसा गेला ते कळाल नाही. निघायला हव आता.’

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आवडलं...
पुढिल लेखणासाठी शुभेच्छा!!!!!! Happy

छान.
पहिल्या परिच्छेदातील चहा की काॅफी ? कृपया संपादित करा.

चाळीचे वर्णन खूप बोअरिंग व जेनेरिक आहे ते फास्ट फॉरव र्ड केले बाकी विद्या भुतकर स्टाइल लिखाण आहे. उमजत जाते तसे पोस्टत जातात.

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
'पहिल्या परिच्छेदातील चहा की काॅफी ? कृपया संपादित करा.' मला माझी चूक सापडत नाही. दोनदा वाचल. तिथे 'कॉफी' असे आहे.
@अमा जी, चाळ जशी बघितली आहे तशीच ईथे उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विद्या भुतकर खुपच छान लिहितात.

छान लिहीलय.
दुसऱ्या पॅरा मध्ये कॉफी लिहीलय आणि तिसऱ्याच्या सुरवातीला चहा लिहीलय त्याबद्दल म्हणत असतील ते .

वर्णन पाल्हाळिक वाटले. बाकी आशय छान Happy

तस नवरा उठून किचन मधे गेला आणि पाचच मिनिटांत बाहेर येऊन गरम गरम कॉफीचा कप माझ्या समोर धरला. >>>

>> माझा चहा संपला होता. मी कप तसाच खाली ठेवला. >> नवर्‍याने कॉफी आणून दिली होती. मग त्याचा चहा कसा झाला असे म्हणायचे आहे त्यांना.
कॉफी चहाच्या कपात दिली असेल हो. Biggrin कृपया हलके घ्या हो. गंमत करतेय.

>> माझा चहा संपला होता. मी कप तसाच खाली ठेवला. >> नवर्‍याने कॉफी आणून दिली होती. मग त्याचा चहा कसा झाला असे म्हणायचे आहे त्यांना.
कॉफी चहाच्या कपात दिली असेल हो. Biggrin कृपया हलके घ्या हो. गंमत करतेय.
बदल केला आहे. धन्यवाद.