'किनारा'यण!...

Submitted by झुलेलाल on 20 September, 2017 - 07:44

एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला. पण वादळ आणि लाटांच्या तांडवात तो केविलवाणा आवाज तिकडे पोचलाच नाही. मग आसपास आणखी कुणी आपल्यास वाचविण्यासाठी भेटते का याचाही शोध सुरू झाला.
कुणीच दिसत नव्हते.
अखेर नाईलाज झाला. होडीचं काय होईल ते आता नशीबावर सोपवावे असा स्वाभिमानी विचार करून तिघेही खवळलेल्या समुद्राकडे हतबलपणे पाहात राहिले.
होडी भरकटतच होती.
लांबवर एक कि'नारा' दिसत होता. होडी हळुहळू तिकडेच जात होती.
सुदैवाने सारे कि'नाऱ्या'वर उतरले.
जीव वाचल्याचा आनंद तिघांनाही लपवतां येत नव्हता. काही वेळ विश्रांती घेऊन ते आत शिरले.
आणि त्यांना धक्का बसला!
त्या बेटावर एकही प्राणी दिसत नव्हता. माणसाचा तर मागमूसही नव्हता...
तिघेही काही क्षण घाबरले. मधल्याने दाढीवरून उगीचच हात फिरवला.
'आता दाढी वाढवावीच लागणार!' तो पुटपुटला आणि मोठ्याने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला.
आता आपणच काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून आवाजात उसना उत्साह आणून तो म्हणाला,
'चला... आजपासून आपणच या बेटावर राज्य करू! आपण इथले राजे!'
उरलेल्या दोघांचे डोळे चमकले!
आणि तिघंही हातात हात घेऊन उंच आवाजात नारा दिला, 'हा कि'नारा' आमचा आहे!'....
बेटावर चहुबाजूंनी त्या नाऱ्याचा एकमुखी आवाज घुमला!!!

Group content visibility: 
Use group defaults