माणसं बदलतात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2017 - 15:40

हा धागा माझ्या या धाग्यावरील चर्चेतून सुचला - https://www.maayboli.com/node/63892
तेथील शीतपेये विरोधाचा उदात्त विषय भरकटू नये म्हणून हा विषय ईथे आणला.
तिथला सारांश सांगायचा झाल्यास विराट कोहली हा एकेकाळी पेप्सीसारख्या शीतपेयांची जाहीरात करायचा. तसेच स्वत:ही प्यायचा. मात्र हल्ली तो आपल्या फिटनेसबद्दल जागरूक झाल्याने त्याने ही आरोग्याला अपायकारक असलेली शीतपेये पिणे सोडले आहे. तसेच त्या पेयांची जाहीरात करायलाही नकार दिला आहे.
तर कोहलीत हा बदल खरेच घडला असावा का? असा साधारण सूर तिथे उमटला.
हाच या धाग्याचा विषय आहे - एखादा माणूस असा खरेच बदलतो का?

स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. तर सवयी या सातत्याने प्रयत्न केल्यास बदललात असेही म्हणतात.
पण मला पडलेला प्रश्न हा आहे की माणसं बदलतात का? म्हणजे एखाद्या माणसाचे आचारविचार बदलतात का?

चित्रपट मालिकांमध्ये आपण पाहतो, जादूची कांडी केल्यासारखी माणसे बदलतात. एखाद्या भ्रष्ट पुलिस ईनस्पेक्टरचे विचार क्लायमॅक्सच्या दहा मिनिटे आधी बदलणे हे घरी आल्यावर टॉवेल लावून अंतर्वस्त्रे बदलण्याईतके सहज घडते. क्लायमॅक्सला तर कित्येकदा खुद्द मेन व्हिलनच बदलतो. जर तो हिरो किंवा हिरोईनचा बाप असेल तर त्याला बदलण्यावाचून पर्यायच नसतो. डेलीसोप मालिकांमध्ये तर आपण रिमोटशी चाळा करत दोनचार चॅनेल फिरून यावे तर तेवढ्यात ईथे पात्रे बदललेली असतात. अर्थात ही झाली रुपेरी पडद्यावरची चंदेरी उदाहरणे. पण महत्वाचे म्हणजे आपण हे बदल कथानकाची गरज म्हणून का होईना, स्विकारतो.

प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो याकडे बरेच जण एक दंतकथा म्हणूनच बघतात. त्यातल्या त्यात वाल्मिकीचा वाल्या झाला यावर, "हल्ली कोणाचा भरवसा राहिला नाही, या जगात काहीही होऊ शकते" असे म्हणत चटकन विश्वास ठेवतात. पण तेच कोणी वाईटाकडून चांगल्याकडे प्रवास केल्यास "नौ सो चूहे खाके बिल्ली हज को चली", किंवा "करून करून भागली आणि देवपूजेला लागली" अश्या आचरट म्हणींचा पटकन वापर करतात.

तर माणसे बदलू शकतात यावर तुमचा विश्वास आहे का? तुमच्या आसपास अशी उदाहरणे आहेत का? प्रसिद्ध व्यक्तींमधे अशी काही उदाहरणे चटकन आठवतात का? आपले विचार आणि किस्से ईथे शेअर करा.

मला चटकन आठवणारे दोनतीन किस्से -

१) आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये एक दादा होता. दादा म्हणजे भाईगिरी करणारा मवाली टाईप्स माणूस. पोरींचा नाद, जुगार, मद्यपान आणि सर्वात आवडते म्हणजे मारामार्‍या. हे त्याचे शौक. लग्न झाल्यानंतरही बदलला नाही. फार तर एखाद वर्ष बायकोला आपले असली रंग दाखवले नाही ईतकेच. पुढे दोन पोरं झाली तरी सुधारला नाहीच.

आणि मग एके दिवशी एक अपघात झाला. बाईक घसरली आणि ट्रकखाली आला. एक हात कापावा लागला. एक पाय असून नसल्यासारखा झाला. एका क्षणात सारे धंदे सुटले. सारी मस्ती उतरली. पैसा बराच कमावून ठेवला होता, त्यामुळे आर्थिक विवंचना नव्हती. पण अचानक आयुष्याचा खरा अर्थ गवसल्यासारखा, साक्षात्कार झाल्यासारखा, तो देवपूजा आणि आध्यात्माच्या नादाला लागला. नेहमी असंगाशी संग करणारा, नव्हे स्वत:चा एक असंग असणारा, एकाएकी सतसंग करू लागला.

आज बावीस वर्षे झालीत त्या घटनेला. आमच्याकडे एक खरीखुरी लोककथा म्हणून आमचे काका मामा प्रत्येकाला त्याबद्दल सांगतात. आजही ती व्यक्ती जिवंत आहे. चेहर्‍यावर एखाद्या साधूसारखे तेज आहे. ते पाहता ही व्यक्ती कधीकाळी गुंडमवाली होती यावर विश्वास बसत नाही.

२) साधारण असेच एक उदाहरण आमच्या कॉलेजचे आठवते. एक पोरगा कॉलेजचा भाई होता. तो ज्या शाळेतून आलेला त्या शाळेतही तो भाई म्हणूनच ओळखला जायचा. त्याचा मोठा भाऊही त्याच शाळेत होता. आणि त्याच्या आधी तो शाळेचा भाई होता. हे दोघे आपल्या वडीलांचा कित्ता गिरवत होते, जे एका राजकीय पक्षाशी संबंध ठेवायचे आणि आपल्या एरीयाचे भाई म्हणून ओळखले जायचे. एकंदरीत आपण दोघे भाई भाई सारी दुनिया भाड मे जाई अशी परीस्थिती होती.

माझ्यासारखी अतरंगी आणि मस्तीखोर मुले, पण अश्या रिअल गुंडागर्दीपासून चार हात दूर राहणारी मुले, अश्या भाई पोरांचे किस्से एकमेकांना रंगवून सांगण्यात धन्यता मानायची. आम्हा सर्वांची मते एका बाबतीत मिळायची. आणि आम्हा सर्वांचीच जळायची. ते म्हणजे अश्या भाई टाईप्स मुलांना पोरगी लवकर पटते. यांचा थोबडा कसाही असो, लायकीपेक्षा सरसच भेटते.

पण हा भाई नेमका एका मुलीच्या अतोनात प्रेमात पडला. नव्हे आकंठ बुडाला. समोरून ती मुलगीही तितकीच गटांगळ्या खात होती. मात्र तिच्या घरी याचे प्रताप समजले तसे तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तिचे दुसर्‍या पोराशी लग्न लाऊन दिले. हा भाई राडा करायचा, दारू प्यायचा, जुगार खेळायचा., पण स्वत:ला नीच नाही समजायचा. त्यामुळे याने स्वत:ला बदलायचे ठरवले. फुल्ल दिलजले टाईप्स! स्वत:ला एक आदर्श मुलगा म्हणून स्वत:ला जगासमोर ठेवायचे ठरवले. आणि ते त्याला जमलेही. शेवटचे त्याबद्दल समजले ते असे, की स्वारी नुकतीच अमेरीकेत लग्न करून सेटल झाली आहे. त्याला अमेरीकेत घेतले आणि विमानतळावरूनच कपडे काढून परत पाठवले नाही हेच माझ्यासाठी तो सुधारला यावर विश्वास ठेवण्यास पुरेसे आहे.

अमेरीकेचे सरकार बदलले. ओबामा गेले आणि ट्रंप आले. पण माझ्यासाठी मात्र गेल्या दशकात अमेरीकेच्या भूमीवर झालेले सर्वात मोठे परीवर्तन हे आहे.

३) दोन किस्से बाप्यांचे झाले, आता एका ललनेचा ऐका.

ही ललना आमच्याच बिल्डींगमधील, जी एकेकाळी आऊं लोल्लिता म्हणून ओळखली जायची. बिल्डींगमधील निम्मी मुले हिच्या मागे होती. आणि प्रत्येकाला वाटायचे ही आपल्यालाच पटलीय. कारण ही प्रत्येकाकडे बघून हसायची. एखाद्या मुलाने आपल्या पॉकेटमनीचे पैसे साठवत खर्च करायची तयारी दाखवली, तर ही त्याच्याबरोबर ईराण्याच्या हॉटेलात पेप्सी पिऊन यायची. पण त्याने कधी कोणाच्या अंगातले प्रेमाचे किडे नाही मेले.

हळूहळू ती पंचक्रोशीत ईतकी गाजली, की एखादा मुलगा तिच्याशी साधे हाय हेल्लो बोलताना दिसला तरी घरी आईचा मार खायचा. प्रत्येक आईला एकच भिती. उद्या जर ही मुलगी आपल्या घरी सून बनून आली तर आपण वासूची सासू म्हणून ओळखले जाऊ.

पण कोणत्या ना कोणत्या माऊलीच्या नशीबी हे येणे होतेच. माझ्याच एका मित्राच्या आईने हा मान पटकावला. आपला मुलगाही तसलाच आहे हे तिला ठाऊक होते. तरीही आपल्या या अ-सत्यवानाला बायको म्हणून सती सावित्रीच मिळावी अशी तिची अपेक्षा होती. साम: दाम: दंड: भेद: सारे उपाय वापरून झाले. एकुलत्या एक कमावत्या मुलाशी ऐन महिनाअखेरीस बोलणे टाकले. शेवटचा इमोशनल अत्याचार! पण तौबा तेरा जलवा आणि तौबा तेरा प्यार. मुलगा पगार हातात येताच तिच्यासोबत पळून गेला. चार दिवसांनी लग्नासोबत हनीमून उरकूनच परतला. मग नाईलाजाने घेतले गेले दोघांना पदरी.

लोकांनी वर्षभरात दोनाचे चार होतील हा अंदाज बांधला होता. म्हणजे हा दुसरीबरोबर आणि ती दुसर्‍याबरोबर. असे चार. पण आज साडेचार वर्षे झाली त्यांच्या संसाराला. दोघे एकमेकांच्या प्रेमात आजही ईतके गुरफटले आहेत की मध्ये तिसर्‍याला स्थान नाही. मुंगी सुद्धा आल्यापावली परत फिरते. अजून दहा वीस वर्षांनी काय स्थिती असेल हे भविष्य कोणी वर्तवू शकत नाही. पण खरे प्रेम माणसाला बदलते हा विश्वास त्यांच्याकडे बघून वाटतो.

--- --- ------ --- ------ --- ------ --- ------ --- ------ --- -----

तीनही किस्से नव्याण्णव पुर्णांक नव्याण्णव दशांश खरे आहेत. विषयाला अनुसरून थोडक्यात निपटवले आहेत. डिट्टेलवार पुन्हा कधीतरी. तुर्तास माणसं बदलतात का? या विषयावर आपली मते येऊ द्या. धन्यवाद,
ऋन्मेष .... नाम तो याद रहेगा !!

मस्करी केली हं, जात नाहीये मी कुठे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

#२ वाचताना दुनियदारीचा डियासपी वाटला...

छान किस्से रूनमेश भाऊ... आणि माणसे बदलतात... हे नक्की..

मी 2000 मध्ये शाळेत असताना खूप चॉकलेट्स खायचो...आता नाही खात..

जोपर्यंत घरी राहायचो अंडा पण नाही खाल्ला... घराबाहेर पडलो.. नुसता नॉन व्हेज खातो..

मी चांगल्याकडून अति वाईट होण्याकडे बदललो - वयाच्या १६ व्या वर्षी. अजून तसाच आहे, जे काही उपजत थोडे फार संस्कार होते त्यामुळे, अगदीच काही वाईट झाले नाही. पण अत्यंत असमाधानात बरेचसे आयुष्य गेले. पण बाकीचे बरेचसे सुखीचे आहेत. पण आपले या।ऊन खूप खूप चांगले झाले असते अशी टोचणी सतत मनाला लागली आहे.

एका चांगल्या विषयावर धागा काढल्याबद्दल अभिनंदन!

माणसाचे स्वभाव बदलू शकतात.
वर रीया यांनी म्हटल्याप्रमाणे परीस्थिती नक्कीच कारण ठरत असते.

मला वाटतं, आपल्या जडणघडणीच्या काळात आपल्या स्वभावाचा एक ठराविक पैटर्न तयार होत असतो आणि बाकी उरलेल्या आयुष्यात आपल्यात होत जाणारे बदल हे त्या पैटर्न शी संलग्न असतात. उदा. मी मनानं संवेदनशील आहे, परीस्थितीने मला लहानपणापासून तसं घडवलं आहे. मग मी कुठल्याही गोष्टीचा विचार संवेदनशीलतेच्या अंगानंच करतो. उद्या कुठली घटना, प्रसंग माझ्या आयुष्यात मला बदलवण्यास कारण ठरले तरी होणारे बदल हे मुळ स्वभावाला (संवेदनशीलता) संलग्नच असतील.

प्रेमात पडल्यानंतर माणसं बदलतात हे स्वानुभवानं माहिती आहे.

आध्यात्मिक गोष्टींकडे जे एकाएकी वळतात अशा लोकांपैकी बहुतांश जण 'चमत्कार' बघून बदललेले असतात. हा स्वतंत्र धाग्याचा आणि चर्चेचा विषय आहे.

आध्यात्मिक क्षेत्रांतील कार्यरत व्यक्तींचे (येथे ज्ञानमार्गी साधक अभिप्रेत आहे, कृपया आता येथे भोंदूगीरी, बाबा, महाराज वैगरे विषय येऊन चर्चा भरकटू देऊ नये ही विनंती. ) बदलत जाणारे विचार ही सतत घडत राहणारी एक नित्याची गोष्ट आहे. तुम्ही आज जो विचार करता, तोच उद्या कराल हे शक्य नसतं कारण केला जाणारा विचार अनुभूतीमधून येत असतो आणि अनुभूती ही साधनेगणिक अविष्कारत असते. मग विचारांचा ढाचाही सतत बदलत राहतो.

'आपल्याला नक्की बदलायचं आहे' हा विचार प्रबळ असेल तर नक्की बदलता येतं. शेवटी ज्याच्या त्याच्याच हातांत असतं.

बाकी, ऋन्मेषनं कित्येक धागे काढले लोकांनी नावे ठेवली. मागे ऋ च्या धाग्यांवरील चर्चेत कुणीतरी म्हटलं होतं, 'तुझ्या एकातरी धाग्याचा काही उपयोग कोणाला झाला का?' यावर दुसरी एक प्रतिक्रिया आली होती, ' ऋचा सायबर हल्ल्यावरचा धागा माबोच्या मुख्य पानावर आहे.' त्यानंतरचं माझं एक साधारण निरीक्षण नोंदवतो,
पूर्वी भारंभार टाईमपास धागे काढणारा ऋन्मेष सध्या, चालू घडामोडींवर धागे काढतो आहे. हा त्याच्यामध्ये घडणारा एक बदलच आहे, नाही का??

"नव्याण्णव पूर्णांक, नव्याण्णव शतांश" असे म्हणायचे असते ऋ... तू अभियंता आहेस ना?

तू अभियंता आहेस ना?
>>>
हो पण माझी ईंजिनीअरींग ईंग्रजी भाषेत झालीय Happy

जोपर्यंत घरी राहायचो अंडा पण नाही खाल्ला... घराबाहेर पडलो.. नुसता नॉन व्हेज खातो..
><<<

हो. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात.
तसेच तुम्ही सात्विक आहार सोडून तामसी खाऊ लागलात की आपसूक तुमचे वागणेही बदलते.

माणसं बदलतात. परिस्थीती बदलवते..>>> रिया +१

तसेच तुम्ही सात्विक आहार सोडून तामसी खाऊ लागलात की आपसूक तुमचे वागणेही बदलते.>>>>> ह्या एका वाक्यात धागा दुसर्या विषयाकडे भरकटवण्याचं सामर्थ्य आहे.

तसेच तुम्ही सात्विक आहार सोडून तामसी खाऊ लागलात की आपसूक तुमचे वागणेही बदलते.>>>>> ह्या एका वाक्यात धागा दुसर्या विषयाकडे भरकटवण्याचं सामर्थ्य आहे.>>>>> नवीन धागा काढायच पण पोटेन्शियल आहे. Wink

मुळ धागा विषय.
माणस बदलतात का ????
रीया +१ हो.परिस्थिती बदलते.
काही अपेक्षित अनपेक्षित घटना ही सेकंदात आयुष्य बदलतात परिणामी माणस ही बदलतात.
काहीची क्षणात बदलतात्,बाकीच्या सामान्य माणसाची बदलण्याची प्रोसेस संथ गतीने का होईना पण चालुच असते.
रुन्मेष जरा चांगल्या उदा.ची अपेक्षा होती रे.

ऋन्मेष मध्ये अचानक बदल होऊन त्याची हि उठता बसता धागे काढायच्या वाईट प्रवुत्तीचा नाश व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

रुन्मेष जरा चांगल्या उदा.ची अपेक्षा होती रे.
>>>>
Proud
एका धाग्यातून निघालेला धागा आहे ही. काही उदाहरणे पाहून धागा आठवला असे झाले नसून धागा काढायचाय उदाहरणे आठवली असे झालेय.
तरी तुम्ही द्या की काही चांगली उदाहरणे. प्रसिद्ध व्यक्तींचीही चालतील. माणसं बदलू शकतात, किंबहुना सुधारू शकतात यावर लोकांचा विश्वास टिकून राहणे फार गरजेचे आहे. त्याने चांगुलपणा जिवंत राहायला मदत होते.

माणसं बदलत नाहीत.
Submitted by सिंथेटिक जिनियस on 19 September, 2017 - 11:27
>>>>>>>

सिंजी, हे ईलॅबोरेट करा.

हॉस्टेल हे एक तरुणांना बदलण्याचे मशीन आहे. काही बदल चांगले असतात तर काही वाईट. माझ्यातले हॉस्टेलमुळे झालेले मोठाले बदल मी नंतर नोंदवतो.

हो

हॉस्टेल नाही.. मुख्यता घराबाहेर पडणे हे रिसन आहे..
मी कधीही किचन मध्ये काहीही मदत केली नाही, पण आता अक्खा स्वयंपाक करतो, पोळ्या तर इतक्या सुंदर करतो की कोणालाही कॉम्प्लेक्स येईल..
याउलट जे घरीच राहिले ते अजूनही काहीही स्वतः करत नाहीत, चहाचा कप पण उचलून आत किचन मध्ये ठेवत नाहीत..
यात एक कहर अनुभव सांगतो.. एका मित्राकडे जेवायला गेलो होतो एकदा, जेवण झाले मी उठू लागलो, तर म्हणे हात धु.. मला कळेचना कुठे आणि काय..
जेवण झाल्यावर ताटा तच हात धुवायचा, ते ताट खरकट्या पाण्याने भरायचे नंतर घरातल्या बायका ते ताट उचलून आत नेणार असा तो घाणेरडा प्रकार होता... मी बेसिन मध्ये हात धुणे पसंद केले..
नन्तर त्याच्या घरी गेलो नाही..

थोडं अवांतर आहे पण विषय निघला म्हणून, आणि शेवटी धागा आपल्या ऋन्मेषचाच आहे...... Happy
आणि वी.जे.टी.आय ला होतात न? >>>
विजेटिआय ला होते असे अनेक माबोकर आहेत. उदा. अभिदादा (तुमचा अभिषेक), अनंतयात्री.. बाकी आणखी शोधावे लागतील. असं कोणीतरी नक्की सापडेल जे ऋ ला ओळखत असणार. Lol

सिंजी, हे ईलॅबोरेट करा.
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 September, 2017 - 13:19
>>
biology is destiny!
म्हणजे बघ हा,मी पुरुष आहे ,तरुण आहे आणि हळवा देखील.माझ्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी मी कधीही पेड सेक्सचा आधार घेतला नाही,कारण हळवा सहसंवेदनशील स्वभाव,मला पेड सेक्स ही व्यवस्था खुपच अमानवी वाटते म्हणून मी कधीही शिंदळक्या केल्या नाहीत.याला कारण माझा स्वभाव ज्याला मी biological determinism म्हणतो.
दुसरीकडे सिगरेटी फुंकणे मला योग्य वाटते म्हणून रोज ओढतो ,अगैन biological determinism.
एक उदाहरण देतो.पुरुषी होर्मोन टेस्टिस्टीरॉनला रिस्पॉन देणारा androgen receptor gene हा X chromosome वर असतो,यात CAG repeat हे बेस पेअर्स असतात. साधारणतः मानवामध्ये ८ ते ३६CAG repeats असतात.कमी CAG रीपीट्स असतील तर असे पुरुष अग्रेसिव्ह,गुंड प्रवृत्तिचे व लैंगिकदृष्ट्या आक्रमक असतात.यावर काही उपाय नाही.आपले प्रत्येक बिहेविअर हे जीन्स ठरवतात ,त्यामुळे एखादा मनुष्य बदलत नाही फक्त परीस्थीतीला घाबरुन काहीकाळ मुळ स्वभाव बाजुला पडतो.परिस्थीती अनुकुल झाल्यास परत मुळ स्वभाव उचल खातो.

सिंजी, इंटरेस्टींग आहे. माझे या विषयातील ईतके ज्ञान नसल्याने नो कॉमेंट. आणखी कोणी जाणकारच दुजोरा देऊ शकतो.

ऊडुजी, हे वाचून या
आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - १ - अंड्या प्याटीस ! ए लव्ह ई स्टोरी Happy
https://www.maayboli.com/node/62355
याला जाहीरात समजू नका. पण तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ईथे मिळेल.

तसेच मी वीजेटीआयचा आहे हा शोध तुम्हाला कुठून लागला हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
बाकी वीजेटीआयसारख्या कॉलेजने मला प्रवेश दिला यावर आपण विश्वास ठेवता यातच मला समाधान. अन्यथा शाहरूखचे जसे अमेरीकेत कपडे काढले होते तसे माझे वीजेटीआयच्या गेटवरच वाभाडे काढतील की काय या भितीने मी कधी त्या वडाळा-माटुंगा परीसरात फिरकतही नाही. नाईलाजाने फाईव्ह गार्डनला जावे लागते तितकेच. ते का आणि कश्यासाठी हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे, ते किस्से पुन्हा कधीतरी Happy

जेवण झाल्यावर ताटा तच हात धुवायचा, ते ताट खरकट्या पाण्याने भरायचे नंतर घरातल्या बायका ते ताट उचलून आत नेणार असा तो घाणेरडा प्रकार होता...
>>>>>>
फिंगर बाऊल म्हणतात त्याला. पाश्चिमात्य पद्धत आहे. मला हे फिंगर बाऊलमध्ये हात धुणारे चूळ कुठे मारतात हा नेहमी प्रश्न पडतो. तोंडातल्या तोंडात गिळतात की मिस्टर बीन बनत शेजारच्याच्या खिशात मारतात?

तसेच मी वीजेटीआयचा आहे हा शोध तुम्हाला कुठून लागला हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. >> मागे तू तुझ्या कॉलेजचे वर्णन देताना VJTI चे वर्णन तंतोतंत करून दिले होते. बिल्डींग कशी आहे, आतला वर जाणारा जिना कसा आहे वगैरे टाइप्स.

मागे तू तुझ्या कॉलेजचे वर्णन देताना VJTI चे वर्णन तंतोतंत करून दिले होते. बिल्डींग कशी आहे, आतला वर जाणारा जिना कसा आहे वगैरे टाइप्स.
>>>>>>
मला कल्पना नाही ते वर्णन वीजेटीआयचे आहे की नाही, पण एकदा वीजेटीआयला गेलेलो. तिथे कसलेसे फुलांचे प्रदर्शन भरलेले. आणि मला फुलं बघायला फार आवडतात. तरी तेव्हाही त्या कॉलेजचे फार बारकाईने निरीक्षण केले नव्हते. पण कुठेतरी डोक्यात बसले असावे. जसे ते मेरे करुण अरुण आयेंगे मध्ये स्वप्न पडतात आणि पुराणी हवेली दिसते तसे मला कधीकधी असे आतला वर जाणारा जिना वगैरे कॉलेजेस दिसतात त्यानुसार वर्णन दिले असेल.

बाकी मी माझ्या शाळाकॉलेजचे नाव कधी पब्लिक फोरमवर सांगून त्यांना बदनाम करत नाही. मला लिविंग सर्टीफिकेट त्यांनी त्याच अटीवर दिलेय Happy

आता विषयांतर होईल पण फुलांचे प्रदर्शन VJTI मधे होते ते कँपस च्या पाठच्या भागात असते. मेन बिल्डींग वेगळी आहे. त्याचा प्रवेश भाग पण मुख्य प्रवेशद्वारापासून वेगळा असायचा आमच्या वेळी तरी. तुझ्या कॉलेजचे वर्णन करायला तू VJTI नसतानाही वापरलेस म्हणजे सरळ सरळ खोटे बोललास तर.

मी केलेले वर्णन माझ्याच कॉलेजचे होते. एखाद डिटेल ईथला तिथला बदलला. ती पोस्ट शोधायला हवी. त्यात असे काय होते जे विजेटीआयचेच होते की ते वाचता लोकांना विजेटीआयच आठवले पाहिजे वा वाटले पाहिजे. कारण वर्णन करताना तर विजेटीआय वगैरे माझ्या डोळ्यासमोर नव्हते हेच तर मी वर सांगतोय. कुठे होती ती पोस्ट आठवतेय का? रात्री शोधतो मी..

ऋन्मेSSष.....
Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2017 - 00:36
राज, विजेटीआय नावाजलेले आहे म्हणून तुम्हाला तसे वाटत असेल. मात्र बरेच कॉलेजात डिप्लोमा वा डिग्री पैकी एकच असते. निदान ईंजिनीअरींगच्या काही शाखांबद्दल तरी लागू होते..
येनीवेज, जोक्स द अपार्ट..
मी विजेटीआयचाच आहे.
पण हे सांगितल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून मीच लोकांना नाही बोलत कन्फ्यूज करून सोडतो.

Rofl

Pages