ओम्निव्होर्स डिलेमा -- मायकल पोलान

Submitted by सई केसकर on 15 September, 2017 - 07:28

नुकतेच मायकल पोलान यांचे 'द ऑम्निव्होर्स डिलेमा' हे चारशे पानी पुस्तक वाचले.
हे पुस्तक घेतल्यानंतर आणि ते वाचायला सुरुवात करायच्या आधी मी याची परीक्षणं आणि त्यावर झालेली टीका वाचली. ती इथे आधी लिहायला हवी असे मला वाटते.
लेखक मायकल पोलान हे मूळचे शाश्त्रज्ञ नसून पत्रकार आहेत. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी काही काळ अमेरिकेतील शेतीचा अभ्यास केला. काही शेतांवर ते स्वतः जाऊन राहिले आणि काही दिवस शेतात कामही केले. पण शेती हा त्यांचा व्यवसाय नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर कुठलीही 'बाहेरची' व्यक्ती एखाद्या क्षेत्रात काही काळ शिरून काम करते तेव्हा तिच्यावर होते तशी टीका झाली. यामध्ये, कुठलेही भक्कम उपाय न सुचविणे, उच्चभ्रू संस्कृतीचे उपाय सुचवणे, काही दिवस शेती बघून शेतीमधले सगळे कळू शकत नाही अशा प्रकारचे मुद्दे आहेत. हे सगळेच मुद्दे पुस्तक वाचल्यावर कुठे कुठे योग्य वाटतात पण तरीही, ज्या ज्या व्यक्तींना आहाराबद्दल आणि खाद्य उद्योगाबद्दल कुतूहल आहे अशा सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. हे पुस्तक अमेरिकेतील शेतीबद्दल असल्यामुळे या परीक्षणात तिथल्याच शेतीबद्दल लिहिले जाईल. तरी कृपया या परीक्षणाचा संबंध देशभक्तीशी जोडू नये.

पुस्तकाचे तीन भाग आहेत. इंडस्ट्रियल, पास्टोरल आणि पर्सनल.

पहिला भाग मला सर्वाधिक रोचक वाटला. त्यामध्येही अमेरिकेत मका या पिकाने संबंध अमेरिका कशी व्यापून टाकली याचा अतिशय सुंदर इतिहास लिहिला आहे. सुरुवातीला जेव्हा इंग्रज अमेरिकेत स्थायिक होऊ लागले तेव्हा त्यांना त्यांच्या सवयीचा गहू पिकवणे अधिक पसंत होते. मका हा त्याकाळी नेटिव्ह लोकांचे पीक समजला जायचा. पण अमेरिकेतील हवामान गव्हासाठी तितके उत्पादक ठरले नाही आणि हळू हळू अमेरिकन लोकांनी मक्याला आपल्या आहारात स्थान देऊ केले. मिडवेस्टमध्ये काही राज्यांमध्ये, जसे की आयोवा, इलनॉय, नेब्रास्का, मक्याची शेती जोमाने होऊ लागली. आणि आता तर या संपूर्ण पट्ट्याला कॉर्न बेल्ट या नावाने ओळखले जाते. हळू हळू मनुष्य मक्यावर अवलंबून राहू लागला होता. पण हे अवलंबन मात्र या पिकाच्या बाबतीत, दोन्ही बाजूनी आहे. मका आत्ता जसा आहे, तशा रचनेत त्याचे माणसाच्या मध्यस्थीशिवाय बीजारोपण होणे खूप अवघड आहे. कारण कणीस आणि दाणे हे बाहेरील पानांच्या घट्ट आवरणाच्या आत असतात. त्या पानांमध्ये आणि दाण्यांमध्ये रेशीम असते, जे काढल्यावरच दाण्यांना मुक्त करता येते. आणि दाणे देखील कॉबमध्ये घट्ट बसलेले असतात. अशा रचनेमुळे ज्या प्राण्याला चार बोटांच्या विरुद्ध दिशेला असलेला अंगठा आहे, असेच प्राणी हे दाणे कुठलीही हानी न पोहोचवता काढू शकतात. इतर धान्यांच्या बिया पिकल्यावर आपोआप निसटून जमिनीत जातात तसे मक्याचे होत नाही. आणि संबंध कणीस जमिनीत रुजले तर त्यातून इतके अंकुर येतात की त्यांच्या दाटिवाटीमुळे कुठलेच रोप पूर्णत्वाला पोचू शकत नाही.
असे पीक मानवाच्या हातात लागणे, आणि यशस्वी होणे यात जसे पिकवणाऱ्याचे यश आहे तसेच पिकाचे देखील आहे असे एक समांतर पोलान मांडतात.

पारंपारिकरित्या कुटुंबाची, आणि राष्ट्राची संपत्ती धान्यसाठ्यातून मोजली जाते. जगभरातील जनता कुठल्या ना कुठल्या धान्यावर पूर्णपणे अवलंबून असते. धान्य पिकवणे म्हणजे सुसंस्कृत असणे असे सगळीकडेच समीकरण आहे. याचे कारण धान्य दीर्घकाळ साठवून ठेवता येते. त्यातही मक्यासारखे कार्यक्षम धान्य विरळाच. धान्यातून मिळणाऱ्या ग्लुकोजची एकरावरी तुलना केली तर मक्याचा पहिला नंबर येतो. तसेच वाळल्यावर मका साठवून ठेवायला आणि वाहतुकीसाठी अतिशय सोपा होतो. नेमका हाच गुण अमेरिकन खाद्य उद्योगांनी हेरला आणि पुरेपूर वापरला.

सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या कुठल्याही तयार खाद्यपदार्थावरचे लेबल वाचले तर त्यातील ८० % घटक हे मक्यापासून बनलेले असतात. यातील सर्वव्यापी घटक म्हणजे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप (HFCS). जशी उसापासून साखर बनते, तसे मक्यापासून HFCS बनते. याला हाय फ्रुक्टोज असे नाव आहे कारण खाद्य उद्योगांकडून वापरण्यात येणाऱ्या HFCS मधील फ्रुकटोज चे प्रमाण ५५% इतके असते, जे सामान्य साखरेपेक्षा पाच टक्के जास्त आहे. HFCS हे सुक्रोज पेक्षा अधिक वाईट असे मानले जाते. पण वैज्ञानिक दृष्ट्या दोन्ही अतिशय वाईट असेच म्हणणे योग्य आहे. आपले शरीर ग्लुकोज वापरण्यास कार्यक्षम आहे. शरीरातील तंतूंपासून ते मेंदूपर्यंत सगळे अवयव ग्लुकोज वापरू शकतात. पण फ्रुक्टोज मात्र लिव्हर शिवाय कुठेही वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे जसे अल्कोहोल फक्त लिव्हरमध्ये प्रोसेस होते तसेच फ्रुक्टोजही. त्याच्या अतिसेवनाने लिव्हरवर ताण येतो, जसा मद्यपानानी येतो. फ्रुक्टोज हे ग्लुकोजपेक्षा अधिक गोड असल्याने साखरेच्या तुलनेत HFCS तितकाच गोडवा कमी प्रमाणात वापरूनही उत्पन्न करू शकते. हे बनवणे साखरेपेक्षा प्रचंड किफायती आहे कारण मक्यापासून इतर अनेक घटक कारगिल सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या बनवत असतात, जसे की व्हिटॅमिन सी, माल्टोडेक्स्ट्रीन, कॉर्न स्टार्च, डेकिल ग्लुकोसाइड (शाम्पूमध्ये वापरले जाते), डेक्स्ट्रोज (बिस्कीट आणि आईस्क्रीममध्ये वापरले जाते), झान्थान गम इत्यादी (यादी मोठी आहे). त्यामुळे मक्याच्या शेवटच्या अणुरेणू पर्यंत सगळे वापरून तयार खाद्यपदार्थ बनवले जातात.

पूर्वीच्या काळी, म्हणजे १९६० च्या आधी अमेरिकन शेतकरी पॉलीकल्चर शेती करत असे. म्हणजे, एकाच जमिनीवर वर्षातून वेगवेगळ्या वेळी पिकं घेत असे. आणि भारतात जसे लोक मुख्यत्वे वनस्पतींवर आणि धान्यावर अवलंबून आहेत तसे अमेरिकेत मात्र वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती मध्ये, हे सगळे प्राणी पाळून, त्यांना धष्टपुष्ट करून विकणे हेही येत होते. बीफ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा काही भाग कुरणांना द्यावा लागत असे. हे गवत म्हणजे एक संपूर्ण इकोसिस्टिम असायची. गवतात गाई चरतात, आणि त्यांच्या मागून कोंबड्या चरतात. गाईंच्या शेणात तयार होणाऱ्या अनेक किड्यांमुळे कोंबड्यांचे पोषण होई. आणि कोंबड्यांच्या विष्टेमुळे जमिनीला प्रचंड प्रमाणात नायट्रोजन मिळे. गवत उगवून आणि प्राणी चारल्यामुळे सुपीक झालेल्या जमिनीवर मग शेतकऱ्याला दुसरे पीक घेता येई.
ही नैसर्गिक, पण थोडी कष्टाची साखळी शेतकऱ्यांनी तेव्हा तोडली जेव्हा गाईंना गवताऐवजी मका चारण्यात येऊ लागला. यात शेतकऱ्याचा फायदा होता. गवतावर गाईला लठ्ठ व्हायला वेळ लागतो. तेच मक्यावर गाई लगेच मास धरतात. यात फक्त एक गोष्ट चुकते. गायीचे रूमिनंट पोट हे मका पचवायला अयोग्य आहे. त्यामुळे भरपूर मका खाणाऱ्या गाईंवर सतत अँटिबायोटिकचा मारा करावा लागतो. जसा आपला आहार संतुलित लागतो तसाच डेअरी आणि बीफ साठी पाळण्यात येणाऱ्या गायींचादेखील असावा लागतो. मधल्या काळात पाश्चात्य खाद्योदोग हे संतुलन शक्य तितक्या कमी किमतीत राखण्यात इतके वाहवत गेले की गाईंना मक्याबरोबर, प्रथिनांसाठी बोनमील देण्यात येऊ लागले, जे बीफ साठी वापरण्यात आलेल्या गाईपासूनच बनवले जायचे. हे निसर्गाच्या इतके विरोधी होते की यातूनच मॅड काऊ रोगाचा उगम झाला. अशा आजारांच्या संसर्गातून पाश्चात्य खाद्य उद्योग मोठे मोठे धडे शिकले. पण ते धडे शिकायला माणसांचे बळी जावे लागले, आणि आजाराच्या भीतीमुळे या उद्योगांच्या नफ्यात घट व्हावी लागली.

खाद्याचे औद्योगिकरण स्वस्त आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे बनवण्यासाठी अमेरिकेत मोनोकल्चर शेती होऊ लागली. शेतकऱ्यांनी बीफ, पोर्क, चिकन आणि अंडी शेतावर बनवणे बंद केले आणि संबंध जमीन फक्त मक्यासाठी वापरण्यात येऊ लागली. मग प्राण्यांचे पण वेगळे फार्मिंग होऊ लागले. हे कॉन्सन्ट्रेटेड ऍनिमल फीडिंग ऑपरेशन (काफो) मध्ये होऊ लागले. जसे आयोवा मक्याच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे तसे कॅन्सस या अशा काफो साठी प्रसिद्ध आहे. याबद्दल पोलान खूप खोलात जाऊन लिहितात. गाईंना आणि कोंबड्यांना सरसकट दोन नंबरचा माकाच खाऊ घालून कुरणांचा खर्च आणि त्यांना लागणारी जागा या सगळ्यावर उद्योगांनी फुली मारली.

मका इतका कसा परवडतो त्यामागेसुद्धा एक कारण आहे. अमेरिकन गव्हर्नमेंट गेली कित्येक वर्षं मक्याला सबसिडी देत आलेले आहे. सुरुवातीला सगळेच मका पिकवू लागल्यामुळे मक्याचे भाव कोसळले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने त्यांच्याकडून मका विकत घ्यायला सुरुवात केली. आणि जमीन रिकामी ठेवायचे पैसे सुद्धा सरकारने शेतकऱ्यांना देऊ केले. पण हे भाव प्रत्येक वर्षी थोडे थोडे कमी करत इतके कमी केले की आता मोठे मोठे शेतकरी सुद्धा मक्याच्या शेतीतून अगदी जेमतेम गुजराण करतात. मक्याचे अखंड स्वस्त भाव मॅकडोनाल्ड, कोकाकोला अशा कंपन्यांना मात्र फारच फायद्याचे ठरले. अमेरिका असा देश आहे, जिथे बाजारातून भाजी, पिठं, तेल मीठ घेऊन रोज सकाळ संध्याकाळ घरी केलेले जेवण हे अशा मोठ्या कंपन्यांच्या तयार जेवणापेक्षा महाग पडते. आणि याचे मुख्य कारण मका हेच आहे. मका सोडल्यास इतर कुठलीही कमोडिटी इतक्या सब्सिडीवर जगत नाही. आणि जर बाजारात स्वस्त आणि चमचमीत जेवण तयार असेल तर सकाळी उठून डबा भरायचे कष्ट कुणी का घेईल? जे घेतात त्यांना नक्कीच या सगळ्याच्या पलीकडे बघण्याची दुष्टी आहे. शेतकऱ्यांनी दुसरे काही पिकवू म्हंटले तर त्याला बाजारात मागणी नाही. आणि कॉर्न बेल्टच्या आसपासची दळणवळण व्यवस्था सुद्धा मक्यासाठी इतकी स्पेसिफिक केलेली आहे, की त्या पट्ट्यात दुसरी पिकं घेणे जोखिमेचे ठरते. हे सगळे वाचताना या पुस्तकावर झालेल्या टीकेची सारखी आठवण होते. पण यावरचे उपाय हे सरकारच्या आणि खाद्योद्योगांच्या लॉबीच्या हातात आहे. त्याबद्दल पोलान एकटे काही करू शकत नाहीत.

घरचे जेवण हा "उद्योग" कसा झाला? १९६० नंतर अमेरिकेत स्त्रिया अर्थार्जन करू लागल्या. त्यामुळे घरगुती कामाची जबाबदारी स्त्री आणि पुरुषांमध्ये विभागून घ्यायची वेळ आली. ही त्याकाळी उदयाला येणाऱ्या यांत्रिक खाद्य उद्योगांसाठी सुवर्ण संधी होती, जी त्यांनी झडप मारून घेतली. केन्च्युकी फ्राईड चिकन (KFC) या ब्रँडनी तेव्हा त्यांच्या लाल चुटुक तळलेल्या चिकनच्या बदलीवर, मोठ्ठी 'विमेन्स लिबरेशन' असं लिहिलेली फीत लावून जाहिरात केली होती. याचा अर्थ फेमिनिझम चळवळ व्हायला नको होती असे नाही, असे मात्र पोलान आवर्जून सांगतात. जिथे समाज व्यवस्था बदलून घरात कामाचे वाटप व्हायला हवे होते, तिथे देशाची खाद्यव्यवस्थाच बदलली गेली.

१९६०-७० च्या दरम्यान अमेरिकेत अजून एक चळवळ उदयाला येत होती. ती म्हणजे हिप्पी चळवळ. सरकारवरचा आणि सरकारच्या खिशात पैसे कोंबून सरकारला आपल्या बाजूने करून घेणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांवर असलेला अविश्वास या चळवळीचा आधारस्तंभ होता. या चळवळीतून ऑरगॅनिक शेतीचा जन्म झाला. १९२४ साली लिहिलेल्या रुडॉल्फ स्टेनर यांच्या ऑरगॅनिक शेतीवरील पुस्तकाचे प्रयोग छोटे छोटे हिप्पी शेतकरी करू लागले. यातूनच कासकेडियन फार्म्स या कंपनीचा उदय झाला. तसेच कॅलिफोर्नियातील सालिनास व्हॅली मध्ये मायरा गुडमन आणि त्यांचे यजमान यांनी अर्थबाउंड फार्म्स या कंपनीची स्थापना केली. अर्थबाऊंड आणि कासकेडियन ही दोन्ही हिप्पी चळवळीची बाळे. यांनी ऑरगॅनिक शेती करायला सुरुवात केली. कुठलीही फवारणी न करता, सिंथेटिक खतं न वापरता शेती करून यशस्वी झालेली ही दोन उदाहरणे आहेत. मोठ्या खाद्य उद्योगांना आधी ऑरगॅनिकची धास्ती होती. पण नंतर सोयीस्करपणे जनरल मिल्सने कासकेडियन विकतच घेऊन टाकले. त्यामुळे फास्ट फूड उद्योगाला शह देऊ पाहणारी ऑरगॅनिक चळवळ शेवटी फास्टफूडचाच एक भाग होऊन बसली. पण हा अगदीच सिनिकल विचार झाला. "बिग ऑरगॅनिक" म्हणजे मोठ्या ऑरगॅनिक उद्योगांमुळे पर्यावरणाला मदत नक्कीच होते. एखादा कासकेडियन किंवा अर्थबाउन्ड जेव्हा काही हजार एकर शेती संपूर्णपणे ऑरगॅनिक करतात तेव्हा कित्येक टन कमी सिंथेटिक खतं आणि कीटनाशक जमिनीत पाझरतात.

औद्योगिक ऑरगॅनिक शेती मध्ये खटकणारा एक महत्वाचा भाग म्हणजे त्या उद्योगाचे खनिज तेलवरचे अवलंबन. कॅलिफोर्नियामधल्या सालिनास व्हॅली मधून जेव्हा हिरवे हिरवे लेट्युस मिशीगन किंवा न्यूयॉर्कला जातात तेव्हा त्यांच्यावर प्रचंडप्रमाणात खनिजतेल वापरले जाते. आणि त्यांचा कार्बन फूटप्रिंट प्रचंड मोठा होतो. तसेच ऋतुचक्राच्यासुद्धा ते विरोधात असते. खऱ्या ऑरगॅनिक चळवळीतला ग्राहक शेतकऱ्याच्या दारात जाऊन भाजी घेणारा असतो. आणि तिथवर यायला त्याला फक्त त्याच्या दोन पायांचा उपयोग करायला लागल्यास ती चळवळ अजून जास्त यशस्वी होते. पण आजकालच्या जमान्यात, तेही अमेरिकेसारख्या प्रगत देशात इतकी आदर्शवादी शेती कोण करेल?

यालाही एक उत्तर आहे. ते म्हणजे व्हर्जिनियामधील पॉलिफेस फार्म (http://www.polyfacefarms.com/our-story/). जोएल सालातीन या शेतकऱ्यांनी सडे चारशे एकरावर हे आदर्श जग वसवलं आहे. तो स्वतःला गवताचा शेतकरी (ग्रास फार्मर) समजतो. साधारण शंबर एकरात त्याने कुरणांची शेती केली आहे. त्या कुरणांमध्ये गाई, कोंबड्या (अंडी), डुक्कर आणि ससे असे विविध मांसाहारात खाल्ले जाणारे प्राणी तो वाढवतो. अर्थात अमेरिकेत याला शेती म्हणतात कारण वनस्पतीचा मनुष्य हा टर्शरी भोक्ता मानला जातो. पॉलिफेस फार्मच्या कामाबद्दल पोलान अभ्यासपूर्ण लिहितात. पॉलीफेसच्या प्रत्येक चेहऱ्याचे वर्णन त्यांनी इतके प्रभावीपणे केले आहे की वाचताना आपण किमान घरी कंपोस्टिंग तरी चालू करावे असा विचार सारखा येतो. आणि इथेच पोलान सफल झालेले आहेत.
पॉलिफेस फार्म मध्ये काही वाया जात नाही. गवतात चरणाऱ्या गाईंच्या विष्टेवर कोंबड्या चरतात, कोंबड्यांना मारून राहिलेल्या वेस्टपासून कंपोस्ट होते. कंपोस्टला उलटून अधून मधून ऊन दाखवायचे काम डुक्कर करतात. कोंबड्यांना मुक्त चरू दिल्यामुळे त्यांना फीडमधून लागणाऱ्या नायट्रोजनमध्ये २० % कपात होते. तसेच त्यांच्या अंड्यांची प्रत ही मका खाणाऱ्या कोंबड्यांपेक्षा सरस असते. याचा पुरावा म्हणजे पॉलीफेसच्या आसपासचे कित्येक शेफ आवर्जून पॉलिफेसची अंडी आणि चिकन आपल्या मोठ्या मोठ्या रेस्तरॉमध्ये वापरतात. आणि पॉलिफेसारख्या प्रस्थापित औद्योगिक वातावरणाच्या विरोधात जाणाऱ्या व्यवसायाला मरण येत नाही.

या पुस्तकाकडे निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली असे दोन्ही पद्धतीने बघता येते. जरी फास्ट फूड विरोधी असले तरी, या पुस्तकात अन्नाच्या औद्योगिकरणाची जी उदाहरणे दिली आहेत, ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहेत. मक्याची शेती आणि त्याचा विनियोग हे माणूस ध्येयानी पछाडलेला असला की तो काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. थोडावेळ कॉर्पोरेट (एक्स्प्लॉईटर) आणि कन्झ्युमर (एक्स्प्लॉईटी) हे नातं बाजूला ठेऊन या व्यवसायाकडे बघितले तर माणसाच्या सृजनशीलतेचा दुसरा नमुना नाही असे नक्कीच वाटून जाते. मका हा खाद्य उद्योगासाठी, कल्पवृक्षासारखा आहे.
तसेच कुठलाही पुरवठा मागणीशिवाय होत नाही हेदेखील या पुस्तकात पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. फास्टफूड, कन्व्हिनियन्स फूडचा जन्म जसा मागणीमुळे झाला, तसाच ऑरगॅनिक शेतीचा उद्योगही मागणीमुळेच झाला. याचा अर्थ लोकांनी त्यांना नक्की काय हवंय हे नीट विचार करून ठरवलं तर उद्योग ते पुरवण्याची सगळी तजवीज करत असतात. आणि आपल्याला नक्की काय हवंय हे आपण तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा आपण जे आहे त्याचा थोडा अभ्यास करण्याच्या मनस्थितीत येतो. आणि हे घडवण्यात पोलान यांच्या पुस्तकाचा महत्वाचा वाटा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ओळख करुन दिली आहेस. मराठीतून इतकं व्य्वस्थित लिहिल्याबद्दल अभिनंदन.

ऑम्निव्होर्स वाचून सामुदायिक लग्ना सारखे सामुदायिक घटस्फोट असे काकी असेल असे वाटले आधी. मग लेखकाचे नाव वाचून उलगडा झाला Happy

सई, अतिशय माहितीपूर्ण लेख.
कार्बन फूटप्रिंटबद्दल अनुमोदन. पण आजच्या युगात (unless तुम्ही स्वतःच्या घराच्या परसात भाज्या उगवून, शेळ्या-कोंबड्या पाळून फक्त तेच अन्न खात असाल किंवा शेतावरच रहात असाल) कार्बन फूटप्रिंट टाळणं अतिशय अवघड आहे - जवळ जवळ अशक्य.

फारच सुंदर आणि comprehensive ओळख करून दिली आहे. नक्की वाचेन. थोडाफार शेतीशी संबंध असल्याने आणि आता कॉर्न बेल्टमध्ये 3 वर्षे राहात असल्याने वाचायला अजून मजा येईल. इतके दिवस पुस्तकाचे शीर्षक वाचून हे काहीतरी शाकाहारी वि मांसाहारी विषयावरचे पुस्तक आहे असेच वाटत होते म्हणून कधी उचलले नाही

छान ओळख सई! अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांचा कार्बन फूटप्रिंट किती आहे हे पाहीले की हतबल व्हायला होते Sad

अतिशय छान माहिती...
लागवडीसाठी ऑरगॅनिक रादर पाॅलिफेस पद्धत आवडत असल्यामुळे तर लेखातला संबंधित भाग खूपच आवडला...

छान परिचय. कॅलिफोर्निया मधे पोलान बराच चर्चेत असतो. मक्यावर "किंग कॉर्न " नावाची एक डॉक्युमेण्टरी पाहिली होती त्यात अशीच माहिती होती. त्यात मायकेल पोलान चा उल्लेख होता व बहुधा मुलाखतही होती. त्यानंतर लायब्ररीतून त्याची काही पुस्तके वाचली होती. खूप उपयोगाची माहिती असते त्याच्या पुस्तकांमधे.

ऑरगॅनिक पेक्षा "लोकल" फूड चे महत्त्व त्याच्या लेखांतून जास्त दिसते. अंजली ने वर लिहीले आहे तसे ते अवघड आहेच, आणि अमेरिकेतील अनेक भागांत फक्त काही महिन्यांतच शक्य आहे. पोलानही ते सगळीकडे शक्य आहे असा क्लेम करत नाही. जितके शक्य आहे तितके वापरा असेच म्हणतो.

त्याचे 'फूड रूल्स' हे पुस्तक मिळाले तर बघा. मला ते फार इन्टरेस्टिंग वाटले. "फास्ट् फूड तुम्ही घरी बनवा आणि मग भरपूर खा", "दुकानात मिळणार्‍या पदार्थाच्या पॅकेज वर घटक पदार्थ जे लिहीलेले असतात त्यात तुम्हाला माहीत नसलेले (केमिकल टर्म्स) दिसले तर ते घेउ नका" असे बरेच साधे सोपे सल्ले त्यात आहेत Happy

गेल्या काही वर्षांत ट्रेडर जो'ज वगैरे कंपन्यांनी अमेरिकेत पर्यायी पदार्थ आणले आहेत बाजारात. त्यात ती केमिकल वाटणारी नावे कमी दिसतात घटक पदार्थांत. तसेच हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप ऐवजी नेहमीची साखर असते.

सई - वरती तू फ्रुक्टोज च्या परिणामाबद्दल लिहीले आहेस, ते फ्रुक्टोज बद्दलच म्हणायचे आहे, की हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप बद्दल?

याबद्दल विचारतोय :
पण फ्रुक्टोज मात्र लिव्हर शिवाय कुठेही वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे जसे अल्कोहोल फक्त लिव्हरमध्ये प्रोसेस होते तसेच फ्रुक्टोजही. त्याच्या अतिसेवनाने लिव्हरवर ताण येतो,

या पुस्तकातच चीज इण्डस्ट्रीबद्दलही होते का? बिग कॉर्न सारखेच बिग चीज बद्दलही खूप वाचले आहे.

एकूण याचे लेख, पुस्तके अत्यंत वाचनीय आहेत. शब्दश: घेणे किती योग्य आहे माहीत नाही. पण ती वाचली की आपण रोज काय खातो याबद्दल आपणच खूप विचार करतो आणि खाण्यातही फरक पडतो असा माझाही अनुभव आहे.

आधी मी ते टायटल एअरफोर्स डिप्लोमा असं वाचून सोडुन दिलं होतं Lol
इन्टरेस्टिंग लेख. डिस्टर्ब व्हायला होतं वाचून.

छान लिहिलेयस सई. पुस्तक वाचताना मधे हे फिलिंग आले "थोडावेळ कॉर्पोरेट (एक्स्प्लॉईटर) आणि कन्झ्युमर (एक्स्प्लॉईटी) हे नातं बाजूला ठेऊन या व्यवसायाकडे बघितले तर माणसाच्या सृजनशीलतेचा दुसरा नमुना नाही असे नक्कीच वाटून जाते." तरी त्याचा इम्पॅक्ट कमी वेळ राहतो हि चांगली गोष्ट आहे. फा म्हणतो तसे शेवटी "पण ती वाचली की आपण रोज काय खातो याबद्दल आपणच खूप विचार करतो आणि खाण्यातही फरक पडतो असा माझाही अनुभव आहे." हे मह्त्वाचे आहे.

ह्या प्रकारांमधे रस असणार्‍यांनी हे https://cspinet.org/ आर्वजून बघा. ह्यात अतिशय उपयुक्त माहिती असते.

एकंदर food industry मूळे जीवन पद्धतीवर मूलगामी परीणाम झालेल्या ज्या घटना आहेत त्याबद्दल उत्सुकता असेल तर हे वाचा.
Big Chicken: The Incredible Story of How Antibiotics Created Modern Agriculture and Changed the Way the World Eats.

मस्त लिहिलंयस.
'फूड रूल्स' मलाही आवडलं होतं. हेही बघते.

सई, खूप छान रसग्रहण. धन्यवाद या ओळखीसाठी. अमेरिकेतील अन्नाबद्दल आणि धान्याबद्दल आता इत़कं
वाचलं आहे की आता प्रत्येक घास घेताना मन काचरते. आणि खरेच ही अतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे पुस्तक वाचवले जाईल की नाही महीत नाही. पण ही तोंडओळ्खही चाम्गली आहे. Happy

>>>पण फ्रुक्टोज मात्र लिव्हर शिवाय कुठेही वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे जसे अल्कोहोल फक्त लिव्हरमध्ये प्रोसेस होते तसेच फ्रुक्टोजही. त्याच्या अतिसेवनाने लिव्हरवर ताण येतो,

हो हे सगळं फ्रुकटोज बद्दल आहे. पोलान यांच्या पुस्तकात फ्रुकटोजच्या बायोकेमिस्ट्रीबद्दल लिहिलेले नाही. ती माझी एडिशन आहे.
ग्लुकोज हे शरीरासाठी आवश्यक आहे. पण फ्रुकटोज शरीराला काही उपयोगाचे नाही. फ्रुक्टोजचे फोस्फोरिलायसिस होते आणि थेट मेदात रूपांतर होते. तसेच ग्लुकोज हे इन्सुलिन सिक्रीट करायला कारणीभूत आहे. ग्लुकोजच्या थोड्यासुद्धा सेवनाने किंवा कुठल्याही ग्लुकोजमध्ये विघटन होणाऱ्या पदार्थाच्या सेवनामुळे इन्सुलिन सिक्रीट होते. तसे फ्रुकटोजमुळे होत नाही. साखरेत २ मोनोमर्स असतात. ग्लुकोज आणि फ्रुकटोज. १ चमचा साखर खाल्ली की त्यातील अर्धा चमचा ग्लुकोज साठी इन्सुलिन सिक्रीट होते. पण उरलेला अर्धा फ्रुकटोजचा भाग इन्सुलिनच्या रडारवर येत नाही. कारण इन्सुलिन ला त्याला प्रतिसाद द्यायचे आदेश नसतात. यामुळे कशी हानी होते?

इन्सुलिन जसे पचनक्रियेसाठी आणि शरीरात ग्लुकोज पसरवण्यासाठी कार्यरत असते तसेच ते अप्रत्यक्षपणे लेप्टीन या संप्रेरकाच्या स्रावासाठी सुद्धा कार्यरत असते. लेप्टीन हे आपले पोट भरले आहे असा संदेश देते. साखरेत निम्मा भाग फ्रुक्टोजचा असल्यामुळे त्याचा हिशोब इन्सुलिन-लेप्टीनच्या साखळीला नीट ठेवता येत नाही आणि परिणामी पोट भरले आहे असा संदेश मिळण्यात अडचण येते. तसेच १ चमचा साखरेमधील अर्धाचमचा फ्रुकटोजचे थेट फॅट झालेले असते.

पूर्वी फक्त अल्कोहोलिक लोकांना होणारा फॅटी लिव्हर आजार आता १० वर्षांच्या मुलांना होताना दिसतोय. त्याचे कारण म्हणजे जूस, शीतपेय अशा गोष्टींमधून लहान मुलांच्या सिस्टीमवर सतत होणारा फ्रुकटोजचा मारा. सगळ्यात धोकादायक पदार्थ म्हणजे जे आपल्याला हेल्दी वाटतात पण तसे नसतात आणि आपण न कळत ते मुलांना देतो. यात ब्रेकफास्ट सिरियल्स आणि फ्रुट जूस हे दोन्ही येतात. आपल्याला वाटतं १ बोल फ्रॉस्टेड बॉम्ब्स (जे डी आणि ए ने फोर्टिफाइड आहेत) खाऊन आणि १ ग्लास जूस पिऊन मूल शाळेला गेले तर त्याला शक्ती येईल. पण हे दोन्ही मुलांसाठी अनावश्यक आहेत. कारण या दोन्हीतून प्रचंड सुक्रोज त्याच्या पोटात जाणार आहे.

असो.

प्रतिसादांसाठी धन्यवाद! सध्या फॅट चान्स (रॉबर्ट लॅस्टिग) आणि प्युअर व्हाईट अँड डेडली (जॉन युडकीन) वाचते आहे. त्यांचेही असे रिव्ह्यू लिहिणार आहे. Happy

@ सनव

शीर्षक अशासाठी आहे की नॉनव्हेज फूड खाणाऱ्यांना या सगळ्या कटू सत्यांचा सामना करावा लागतो. जो व्हेजिटेरियन लोकांना करावा लागत नाही (तितक्या प्रमाणात). मग या अशा सिस्टीम मधून आलेलं बीफ/पोर्क/चिकन खायचं की नाही हा तो डिलेमा आहे.

@ असामी
लिंकबद्दल धन्यवाद. नवीन खजिना मिळाला!

मस्त लिहिलं आहेस सई.
कोणतंही प्रॉडक्ट अगदी बघून ऑर्गॅनिक म्हणून घेतलं तरी त्याच्या लेबलबद्दल किंचित शंका मनात असतेच. ब्रेड, केचप वगैरे घेतानाही HFCS नाहीये ना ही खात्री करुनच घेतो.

Pages