भृंगू!

Submitted by केजो on 14 September, 2017 - 18:13

पहाटेची वेळ होती, दाल सरोवरात वेगवेगळ्या रंगांची मनमोहक कमलदले फुलली होती. त्यांचा मादक गंध आसमंतात दरवळत होता. त्या सुगंधाला भुलून एक भुंग्यांची टोळी बेधुंद होऊन रसपान करू लागली. भृंगूला कळेच ना की ह्या कमळावर बसू की त्या? अखेर त्यानी एकाची निवड केलीच. कोवळ्या पांढऱ्या स्वच्छ पाकळयांवर विराजमान होऊन भृंगराज स्वतःशी गुणगुणू लागले. सूर्याची कोवळी किरणे जाऊन आता जरा ऊन बोचू लागलं होतं. म्हणून मग जरा जंगलात फेरफटका मारायचा बेत ठरला. सगळी भुंग्यांची टोळी सुरूबनात गारव्याच्या शोधात गेली. आपले भृंगराजही मित्रांबरोबर पकडापकडी खेळण्यात दंग झाले. त्याचे आई-बाबा जरा वामकुक्षीसाठी तिथेच एका केसरफुलावर विसावले. "भृंगू, जास्त लांब जाऊ नकोस रे! आणि हो जास्त भूणभूण करू नकोस, जरा डोळा लागू देत सुखानी!" पण आई-बाबांचा ऐकण्यासाठी भृंगू कसला थांबतोय; तो तर केव्हाच खेळण्यात दंग झाला होता. एव्हाना लपाछुपीचा डाव सुरू झाला होता. भृंगूला एक मोठं सूर्यफूल दिसलं होतं आणि त्यात तो बेमालूमपणे लपला जात होता. कोणा -कोणालाच तो दिसत नव्हता. कित्तीतरी वेळ तो त्याच्या नावाच्या हाक ऐकत बसून राहिला. पण आज मुळी कोणाच्या हाती लागणारच नव्हता तो.
थोड्याच वेळात छान गार वारं सुटलं आणि कमलदलांचा सुंगध त्याला पुन्हा भुकेची आठवण करून देऊ लागला. खरंतर आई-बाबांची झोप झाली की ते सगळेच रात्रीच्या जेवणासाठी निघणार होते. पण आज भृंगूला खूप मोठं झाल्यासारखा वाटत होतं. कोणी त्याला शोधू शकलं नव्हतं, आणि सगळे सरोवरावर आले की तो त्यांना चकित करणार होता. भृंगू एकटाच सरोवराच्या दिशेनी निघाला. आता इथपर्यंत आलोच आहोत तर रसपान का करू नये, ह्या विचारानी त्यानी जेवायला सुरुवात केली. टम्म पोटानी झोपेच्या डोळ्यांनी भृंगू सगळ्यांची वाट बघू लागला.
अचानक सगळीकडे प्रचंड शांतता असल्याची भृंगूला जाणीव झाली. डोळे किलकिले करून बघतो तर काय आजूबाजूला सगळीकडे मिट्ट काळोख! जरा पंख हलवून बघितले तर तो धाडकन कशावर तरी आदळला. जरा अंधाराला डोळे सरवल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो एका कमळाच्या आत बंदिस्त झालाय. त्याच्या लक्षात आलं की मगाशी वाट बघता बघता त्याचा डोळा लागला असावा आणि सूर्यास्तानंतर कमळानी पाकळ्या मिटून घेतल्याने तो त्यात अडकून पडला होता. भृंगू कावरा बावरा झाला. आई बाबांची, त्याच्या मित्रांची त्याला आठवण येऊ लागली. कितीही भुणभुण केली तरी कोणीच त्याची हाक ऐकायला जवळपास नव्हतं. आता आपण कधी कधी कोणाला भेटू शकणार नाही, कोणाशी खेळू शकणार नाही.. एवढाच काय आई-बाबांचा ओरडाही ऐकू शकणार नाही ; ह्या विचारांनी भृंगूला रडूच फुटलं. येऊ नये ते सगळे वाईट विचार मनात दाटून आले; भृंगूनी आशाच सोडून दिली. रडता रडता त्याचा पुन्हा डोळा लागला....
सूर्याच्या कोवळ्या किरणांनी भृंगूला हलकेच गुदगुल्या करून उठवलं. रोजच्यासारखा भृंगू पडून राहिला, आईची हाक ऐकू येण्याची वाट बघू लागला. आणि त्यानी टुणकन उडी मारली; मी तर कमळात अडकलो होतो! मग हा प्रकाश कुठून येतोय? आणि आईच्या हाकाही येतायेत. त्याच्या लक्षात आलं की, नवीन दिवसाची सुरुवात झाल्याने कमळानेही डोळे उघडले होते आणि भृंगूची काळरात्रीतुन सुटका झाली होती. त्यानी जोरजोरात आईला हाक मारायला सुरुवात केली. आई-बाबा, सगळे मित्र बघून त्याला खूप आनंद झाला. त्याची पहिलीच वेळे होती घराबाहेर एकट्याने राहण्याची! सगळे मित्र विचारू लागले, "काय रे भृंगू, मजा आली असेल ना? खूपच शूरवीर आहेस रे तू! कमळात कित्ती छान झोप लागली असेल नं ? इतका मऊ मऊ पलंग तर शोधून सापडणार नाही, आणि पानावरुन पडून जाण्याचीही भीती नाही ..." एक ना दोन, सगळयांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आता भृंगूला जाणवला कि अरेच्चा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचारही केला नाही; नुसतंच रडत बसलो रात्रभर! स्वतःच्या वेड्या विचारांना आठवून त्यालाच हसू फुटलं.. म्हणे ह्यातून आता कधीच सुटका नाही; फक्त सकाळ होण्याचा अवकाश होता हे आधी माहिती असतं तर?

आपणही भृंगू सारखं करतो ना कधी कधी? सकाळ होणार असते, मार्ग निघू शकतो हे वेळीच लक्षात आलं तर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy
बाल साहित्यामध्ये सुद्धा टाकायला हवी असं वाटतं.

छान आहे , आवडली
छोट्याश्या गोष्टी तुन मोठा संदेश दिलात तोही सहज सोप्या रितीने

किती गोड गोष्ट आहे ही!!
मला खूप आवडली.आजच्या निगेटिव्ह जगात अश्या पोझिटिव्हिटि देणार्‍या गोष्टिनन्ची खूप गरज आहे.