कभी हाँ, कभी ना - १

Submitted by रसप on 14 September, 2017 - 10:24

सुनील संध्याकाळी घरी परततो आणि बघतो.. घरच्यांनी सुनीलच्या जबरदस्त मार्क्स मिळवून पास होण्याच्या आनंदात मस्तपैकी पार्टी ठेवलेली असते.
गोव्यातल्या त्या छोट्याश्या शहरात, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात, आजपर्यंत सुनीलला सगळे कुचकामी समजत असतात. पण आज सुनीलचे वडील अभिमानाने त्या सगळ्यांना सांगत असतात की, 'नाही.. माझा मुलगा कुचकामी नाही! त्याने आज त्याच्या बापाला जिंकलंय.. आजपासून मी त्याला माझ्या गॅरेजमध्ये काम करण्याची जबरदस्ती करणार नाही.. त्याला 'म्युझिक'मध्ये काही करायची इच्छा आहे.. तो तेच करेल. माझा पूर्ण पाठिंबा आणि आशिर्वाद आहे त्याला..!'
उपस्थित सगळे लोक टाळ्यांच्या कडकडाटात सुनीलला शुभेच्छा देतात. अभिष्टचिंतन करतात. तिथे त्याचे मित्रही असतात, 'अ‍ॅना'ही असते, तिचे आई-वडील व भाऊसुद्धा आणि फादर ब्रीगेन्झादेखिल.

सुनीलचं मन त्याला खायला उठतं. खरं तर तो लागोपाठ चौथ्यांदा नापास झालेला असतो आणि घरच्यांना त्याने नकली मार्क्सशीट दाखवून फसवलेलं असतं !
'हे मी काय करून बसलो ! सगळ्यांचा माझ्यावर किती विश्वास, किती प्रेम आहे.. आणि मी? खोटी मार्क्सशीट बनवून ह्या सगळ्यांना फसवतोय..!'
स्वतःची शरम वाटत असते त्याला..
'पटेल.' 'चायना टाऊन'चा मालक. त्यानेच त्याला ही आयडिया दिलेली असते आणि बनावट मार्क्सशीटही बनवून आणून दिलेली असते. तो त्यालाच पकडतो.
'काय झालं यार हे, पटेल?'
'सुनील, मला पण वाटलं नव्हतं की इतकं मोठं प्रकरण होईल. पण आता तू खरं सांगितलंस तर काय होईल? कठीण आहे. कोण मदत करू शकेल आता ?'
फादर ब्रीगेन्झा..!! सुनीलवर खूप माया करणारे फादर. ते दिसतात सुनीलला. तो लगेच त्यांना बाजूला नेऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो. फादर हादरतात ! चिडतातही..!
'अरे हे काय केलंस सुनील! तुझ्या आई-बापाच्या चेहर्‍यावर बघ कसा आनंद ओसंडून वाहतोय. त्यांना खरी गोष्ट कळेल, तेव्हा त्यांना काय वाटेल? काही तरी विचार करायचा होतास रे.. ते काही नाही.. आत्ताच्या आत्ता तू तुझ्या आई-बापाशी बोलायचंयस, त्यांना खरं खरं सांगायचंस.. हात जोडून, पाया पडून, काय जमेल ते करून क्षमा मागायचीस.. बस्स्स, हे सगळं कांड तू केलं आहेस, तुलाच ते निस्तरावंही लागेल.. चल जा.. सांग विनायकला - तुझ्या वडिलांना - आत्ताच्या आत्ता.. !'

सुनील जातो. आई-बापाला सांगतो.
एकीकडे पार्टी चालू आहे. सगळे हसतायत, खिदळतायत. दुसरीकडे पटेलच्या चेहर्‍यावर टेन्शन.. फादर ब्रीगेन्झा चिंताक्रांत.. आणि इतक्यात सुनीलच्या वडिलांचा - विनायकचा - आवाज चढतो ! ते त्याच्या एक मुस्कटात ठेवून देतात आणि धक्के मारून दूर ढकलून देतात..
'चल निघ इथून..!! पुन्हा पाऊल ठेवू नकोस ह्या घरात.. चालता हो......!!'

पब्लिक सुन्न..
हात जोडून विनायक सांगतो -
'मित्रांनो, माझ्या ह्या मुलाने मला फसवलं. बनावट मार्क्सशीट दाखवली. तो फर्स्ट क्लास मिळवून पास झालेला नाही.. हा नालायक तर पुन्हा एकदा नापास झालाय.. मी मघाशी मोठ्ठं अभिमानाचं भाषण दिलं होतं, ते सगळं खोटंय.. हा माझा मुलगा आहे, ह्याची मला लाज वाटते.. लाज..! तुम्ही लोक इथे आलात मी तुमचे आभार मानतो..... पण मला माफ करा..!'
कुणाला काय करावं, काही सुचेनासंच होतं !
मटकन् खाली बसून टीपं गाळणार्‍या विनायककडे फादर जातात.. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतात - 'विनायक, सुनील फेल नाही, पास झालाय.. इतक्या सगळ्या लोकांसमोर आपली चूक कबूल करायला खूप मोठी हिंमत लागते. ह्यावरून हेच दिसून येतं की ह्याचं मन किती स्वच्छ आहे ! अरे, जगात असे अनेक लोक असतात ज्यांना उद्याचा विचार करणं पटत नाही. त्यांच्यासाठी आयुष्याचा प्रवासच जास्त महत्वाचा असतो. प्रत्येक क्षण त्यांना सोहळा करायचा असतो. सुनील त्यांच्यातला आहे. त्याला असं परीक्षांच्या निकालावर पास-फेल करू नकोस.. असं बिनधास्त आयुष्य जगायसाठी जबरदस्त मानसिक बळ लागतं. अरे तो 'स्पेशल' आहे.... तो मनाने स्वच्छ आहे, त्याला क्षमा कर.. बघ, माझं म्हणणं तुला पटतंय ना ? पटत असलं तर लगेच बोल की तू त्याला क्षमा केली आहेस..'
सुनीलची आई, अ‍ॅनाचे वडिल, पटेल सगळे विनायकच्या आजूबाजूला.. त्याला 'फादरचं ऐक' असं नजरेतून सांगत आहेत.
विनायक मूक.. शांत.

सुनील आपली सॅक उचलून घराबाहेर जाऊ लागतो.......
आणि गाणं सुरू..................

'वोह तो हैं अलबेला, हजारों में अकेला
सदा तुमने ऐब देखा, हुनर को न देखा....'

मजरूह सुल्तानपुरींचे सुंदर शब्द, जतीन-ललितचं अप्रतिम संगीत आणि हृदयाच्या गाभ्यातून येणारा सानूचा गोड आवाज..........
सगळे उपस्थित लोक एकेक ओळ गाऊन विनायकचं मन वळवतात..

'बन्सी को लकडी सदा समझा किये तुम
पर उसके नग़्मों की धुन कहाँ सुन सके तुम..'

आणि मग स्वत: विनायकही म्हणतो, 'वोह तो हैं अलबेला..!!'
तो सुनीलला जवळ घेतो, मिठी मारतो आणि सगळं पब्लिक पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करतं.. प्रत्येक वेळेस तिथे दोन-तीन टाळ्या मीसुद्धा वाजवतो. गलबलून आल्यावर काही गोष्टी नकळत घडून जातात.

543904_10151797280449798_761670024_n.jpg

'कभी हाँ, कभी ना' मध्ये असे अजूनही काही गलबलून आणणारे क्षण आहेत. ही कहाणी एका 'नोबडी'ची आहे. शाहरुखने लोकांच्या मनात घर करण्याचं एक कारण त्याचे हे सुरुवातीचे काही सिनेमे आहेत. ज्यात तो अगदी तुमच्या-माझ्यासारखा वाटला होता. तो आपलं रिप्रेझेंटेशन बनला होता. इथला त्याचा 'सुनील' एकदम 'परफेक्ट'! त्याचं हुरळून जाणं, निराश होणं, इतकंच काय.. 'अ‍ॅना'चं 'ख्रिस'वर आणि 'ख्रिस'चं अ‍ॅनावर प्रेम असणं, ह्यामुळे त्याचा होणारा जळफळाट हे सगळं त्याला एक 'कॉमन मॅन' च बनवतं. खरं तर इथली सगळीच कॅरेक्टर्स अशीच 'जमिनीवरची' आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्याशी नातं सांगणाऱ्या लोकांनी विणलेलं हे कथानक फक्त एक विरंगुळा देत नाही, तर आपल्यातल्या अस्तित्वहीन सामान्य माणसालाही काही कहाणी असते, ही सुखावह भावना चाळवतं.

poster.jpg

'कुंदन शाह'च्या 'जाने भी दो यारों' ने 'ब्लॅक कॉमेडी' मध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान बनवलेलं आहे. पण माझ्या मते 'जाने भी दो यारों' पेक्षाही कैक पटींनी सरस काम 'कभी हाँ, कभी ना' आहे. ह्यात काही मेसेज वगैरे नाहीय, तो असायलाच का हवा ? पण एक-एक पैलू काळजीपूर्वक पाडलेला आहे. सुरुवातीला वर्णन केलेला गाणं आणि त्याच्या आधीचा पूर्ण प्रसंग हे एक उदाहरण. प्रत्येक गाणं असंच खूप विचारपूर्वक चित्रित केलं आहे. 'आना मेरे प्यार को ना तुम..' आपल्याला गुदगुल्या करतं, 'ऐ काश के हम..' आपल्याला झुलवत झुलवत नाचवतं, तर 'दीवाना दिल दीवाना..' गायलाच लावतं. गाण्यांच्या उत्कृष्ट चित्रीकरणासाठी हा सिनेमा एक परिपाठच ठरावा.

'कभी हाँ, कभी ना' सारखे सिनेमे शाहरुखला 'शाहरुख'बनवून गेले आहेत. आज त्याचा राग येतो कारण त्याच्या 'सुनील', 'राजू' वर आम्ही जीवापाड प्रेम केलं आहे आणि करतोही. जो चेहरा कधी आम्हाला 'आमचा' वाटायचा तो आता वाटेनासा झाला आहे, हे खरं दु:ख आहे, हा खरा राग आहे.
हरकत नाही.
आयुष्यभर एकच एक काम कुणी कलाकार करत नाही, करूही नयेच. त्यानेही स्वत:ची इमेज बदलली, टिकवली आता ती पुन्हा बदलायची वेळ आली आहे. मला तो पुन्हा एकदा आपला वाटून घ्यायची इच्छा होते आहे. त्यासाठी त्याने परत बदलावं. सुनील, राजू नको, इतर काही बनावं. त्यात मला 'मी' दिसावा, तो मला 'माझा' वाटावा. कारण तोसुद्धा 'अलबेला' आहेच, नि:संशय !

- रणजित पराडकर

(क्रमश:)
http://www.ranjeetparadkar.com/2017/08/blog-post.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू रसप!

मला तो पुन्हा एकदा आपला वाटून घ्यायची इच्छा होते आहे. त्यासाठी त्याने परत बदलावं. सुनील, राजू नको, इतर काही बनावं. त्यात मला 'मी' दिसावा, तो मला 'माझा' वाटावा. कारण तोसुद्धा 'अलबेला' आहेच, नि:संशय ! >>> +१ अगदी अगदी!

हा धागा ज्या विषयाबद्दल आहे तो सोडून इतर प्रतिक्रिया उडवल्या जातील. मायबोलीवर कुणि काय लिहावे, किती लिहावे , कोण आयडी कसा आहे/नाही हा धाग्याचा विषय नाही.

रसप लेख आवडला. छान लिहीले आहे. हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मला ते सुरूवातीचे शाखाचे पिक्चर कधीही बघावेसे वाटले नाहीत, बाजीगर पाहिल्यावर. आता पाहावासा वाटतोय. बाकी दीपक तिजोरी व इतर कलाकारांची कामे कशी आहेत त्याबद्दलही लिही. इंग्लंड टीम च्या बाबतीत वर्ल्ड कप बद्दल जे म्हणतात - always a bridesmaid but never a bride - तसे त्याच्या बाबतीत त्यावेळच्या अनेक पिक्चर्स मधे झाले असे मला वाटायचे. जो जीता, खिलाडी ई.

धन्यवाद रसप,
आणि एक नंबर लेख !

फार आवडीचा चित्रपट. आणि त्याहून जास्त आवडीचे शाहरूखचे त्यातले कॅरेक्टर. अगदी आपल्यासारखेच. त्यातील शेवटच्या सीनमध्ये चर्चमध्ये रिंग खाली पडते आणि त्यालाच एकट्याला दिसते तेव्हा लहान मुले आपल्यातील निरागसतेला जपत जसे आशाळभूतपणे बघतात तसे तो त्या अंगठीकडे बघताना दाखवलेय. क्लास सीन. पण डोळ्यातून पाणी काढतो. शेवटी जुही येते आणि त्याला भेटते तेव्हा मात्र चेहर्‍यावर स्माईलही येते. त्या स्माईलसाठी पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा चित्रपट.

तुम्ही उल्लेख केलेला सीनही आवडीचा पण त्यापेक्षा अफाट आवडीचे ते गाणे.. लहानपणे ऑर्कुटवर धागे निघायचे, तुमच्या आयुष्याला वा व्यक्तीमत्वाला साजेसे गाणे लिहा. मी हमखास हेच गाणे लिहायचो - वो तो है अलबेला, हजारो मे अकेला, सदा तुमने ऐब देखा, हुनर तो ना देखा.... आणि माझा विश्वास आहे की दहापैकी ८ जणांना ते आपल्यासाठीच आहे असे वाटले असेल आणि त्या सीनमध्ये त्यांनी शाहरूखमध्ये स्वत:लाच शोधले असेल.

ईतरही गाणी आवडीचीच. अगदी लहान होतो तेव्हा त्या वयाला साजेसे डॉनचे गाणे आवडले, मग प्रेमात पडायचे वय झाले तसे कब से करे है तेरा ईंतजार हे उडत्या चालीचे रोमांटीक, मग स्वत: प्रेमात पडलो तेव्हा ए काश के हम होश मे अब आने ना पाये.. आणि कॉलेजला गेल्यापासून ते आतापर्यंत माझ्या ऑलटाईम फेव्हरेट टॉप थ्री गाण्यात ये तो है अलबेला Happy

पुन्हा एकदा , मस्त लिहिलय ,
मला शाहरूख आवडतो तो हा , डर, अंजाम , बाजीगर अन राजू मधे. तिथे तो खरा वाटतो . ( चांगला असे ना की वाईट ).
दिल तो अन दिलवाले .. पण ओके.
पण नंतर तो कुछ कुछ , कभी खुशी न सगळा बट्ट्याबोळ झाला .

कभी खुशी कभी गम आमच्या होम थिएटरला हिट आहे. जेव्हा चॅनेल बदलता बदलता दिसतो, पुर्ण बघूनच पुढे जातो. पहिल्यांदा पाहिलेला तेव्हा ओके वाटलेला. मग व्यसनच लागले. त्यातील शाहरूखची एंट्री तर बेस्ट एवर ईन बॉलीवूड आहे. अर्थात कभी हा कभी ना आणि कभी खुशी कभी गम हे दोन्ही वेगळ्याच धाटणीचे पिक्चर आहेत. एक लार्जर दॅन लाईफ आहे. आपापल्या जागी दोघे सही आहेत.

पिक्चर तेव्हा खूप आवडलेला. अ‍ॅना तर खूपच. तिच ते शेखर कपुर बरोबरच पॉप गाणं खुप आवडायचं.
आता बघितला तर खुप बोअर होईल अस वाटतं. बाजीगर बोर झालेला .

मस्त फिल्म , मी तर पहिल्यान्दा रडलो होतो , आणि भन्नाट लिहीलय.