पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...

Submitted by मीनल कुलकर्णी on 14 September, 2017 - 06:18

पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...

पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
तुला हवं तेंव्हा तो बरसतो
हवा तिथे थबकतो...
थेंब थेंब होतो
पुन्हा आवेगाने येतो
सप्तसूरांसारखा रिमझिमतो...
कधी वाजत गाजत
झिम्माड कोसळतो
अल्लडपणे तुला येऊन बिलगतो....
पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
नेहमीच ओळखतो
तो तुझ्या मनातला भाव..
नाही पुसू देत थेंब थेंब जोडून
लिहिलेलं तुझ नाव....
कधी कधी तो तुझ्यासाठी
रात्र रात्र जागतो..
तर कधी माझ्याहूनही जास्त
स्वतःची वाट पहायला लावतो..
तो आला की मात्र
तू सारे हिशेब विसरतेस
आणि तितक्याच ओढीने
त्याला आपल्या कवेत घेतेस
तोही उगा तुला असा छेडत असतो ....
पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
भिजतो आपण दोघेही
पण तो थेट तुझ्या
डोळ्यात उतरतो...
पापणीवर हलकेच विसावत
तुझ्या अवखळ बटांशी खेळून
तुझ्यातच विरुन जातो...
मी फक्त लांबूनच
तुझ्यात एकरुप होणा-या
पावसाला बघत बसतो...
पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
मलाही तो जाणवतो, ओळखतो
औपचारिकपणे भेटतो देखिल
पण मला नाही घेऊन जात
तुझ्यासारखा इंद्रधनूच्या कमानीखाली
नाही दाखवतं ढगांचा लपंडाव...
नाही भरत माझ्या
मनातला एकही घाव....
तुझ्यासारखा तो माझ्या
डोळ्यांतून पाझरत नाही...
सारे बंध झुगारून
मनाच्या गाभा-यात उतरत नाही...
तो माझा कधीच होत नाही..
पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
पाऊस नेहमी फक्त तुझाच असतो...
- मीनल

Group content visibility: 
Use group defaults

छान !

Thank u frndz