एकदा काय झालं?

Submitted by विद्या भुतकर on 13 September, 2017 - 21:27

तो सकाळी उठला, डोळ्यांवर अजूनही ग्लानी होती. वर पंखा जोरजोरात फिरत होता. त्याचं वारं अंगाला झोंबत होतं. अंग जड झालं होतं. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला पण तगमग होत होती. नाईलाजाने घड्याळाकडे पाहून त्याने अंगावरचं पांघरूण काढलं. अंग तापानं फणफणत होतं. तसंच बाथरूममध्ये जाऊन त्याने कसंबसं आवरलं. आंघोळ करावीच लागणार होती. इतक्या उकाड्याचं असंच राहणं शक्यच नव्हतं. अंगावर पाण्याचे थेम्ब पडले तसा तो शहारला. दोन चार मिनिटांतच उरकून तो कडमडत बाहेर आला. कपडे इस्त्री करणं शक्य नव्हतंच. त्यातला त्यात बरा ती-शर्ट, पॅन्ट घालून तो तयार झाला.

आता सगळ्यांत कठीण काम होतं. इतक्या उन्हाचं गाडीवरून इतक्या दूर जायचं. स्वतःला सांभाळत त्याने गाडी काढली. गाडीवर बसेपर्यंतच त्याला दम लागला होता. जीव सांभाळत, गाडीचा तोल सांभाळत गर्दीतून रस्ता काढत तो पुढे जात राहिला. डोळ्यांसमोर अंधारी आल्यावर त्याला काही सुचत नव्हतं. पार्किंग मध्ये पोचल्यावर त्याला हुश्श झालं. आता तिथून लिफ्टमधून जागेवर पोहोचेपर्यंत चक्कर येऊ नये इतकीच प्रार्थना करत चालत राहिला.

हातातलं सामान जागेवर ठेवून दोन चार मिनिट खुर्चीत बसून राहिला. थोडं बरं वाटल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं, घड्याळ्याकडे बघत त्याने कॉफीचा कप घेऊन गाळून गेलेले त्राण गोळा केले आणि ब्रेकरूमकडे चालत राहिला. पोहोचत असतानाच त्याला तीआत पाठमोरी उभी दिसली. तिला पाठमोरं पाहूनही त्याला क्षणभर बरं वाटलं. शेजारच्या भिंतीला डोकं टेकवून थोडा वेळ उभा राहिला. ती दिसणार या कल्पनेनं त्याचं मन सुखावलं. आत जाऊन तो तिच्यासमोर उभा राहिला.

"हाय", ती हसून म्हणाली.

त्यानेही 'हाय' केलं.

"काय रे बरं वाटत नाहीये का तुला?", तिने काळजीनं विचारलं.

"हां जरा कणकण आहे.", तो हळू आवाजात बोलला.

"मग आलास कशाला? सुट्टी घ्यायची ना?", ती.

तो नुसताच हसला.

"ते काही नाही, घरी जा बरं. मी मॅनेजरला सांगते." ती हक्कानं बोलली.

तो तिच्यासोबत जागेवर परतताना त्याला चालवत नव्हतं.

"हे बघ कसा जाशील घरी? चल मीच येते सोडायला.", म्हणून ती डेस्कवरून गाडीची किल्ली घ्य्यायला गेली.

तो तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं आणि भीतीही होती आपण काय करतोय याची.
तिची ओढ त्याला आज इतक्या दूर घेऊन आली होती.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप्प्प गोड...
ती दिसावी म्हणून इतकं आजारी असून तो हापिसात आला.
ती फक्त दिसलीच नाही तर सोडायला येते म्हणाली म्हणजे चारो उंगली घी मे, और सिर कढाई मे " झालं की...
मस्तच..

मस्त !
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना एकदा फक्त आणि फक्त तिच्याच ओढीने मी ऑफिसला जायचा प्रयत्न केला होता... पुढचे स्पस्पेन्स ठेव्तो तुर्तास.. मलाही या अनुभवावर लिहावेसे वाटतेय Happy

थँक्यू Happy असेच छोटे प्रसंग सामान्य माणसालाही हिरो बनवतात. Happy त्यामुळे छोटी का होईना लिहायची इच्छा झाली. तुम्हाला आवडली, छान वाटलं. खरेतर माझ्या कथा पाहता हा त्याचा भाग असू शकतो असे वाटते पण सध्यातरी इतकेच. Happy

विद्या.