चंद्रमण्यांचे पाझर

Submitted by अनन्त्_यात्री on 11 September, 2017 - 02:31

आज माझ्या ओंजळीत
चंद्रमण्यांचे पाझर
भले विझून जाऊदे
माथ्यावर चंद्रकोर

आज माझ्या नजरेत
दिव्य रंगांचे वितान
भले अंधुक होउदे
इंद्रधनूची कमान

आज माझ्या रोमरोमी
ब्रह्मकमळ फुलेल
बिंब कैवल्याचे मग
पाठोपाठ उगवेल

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!
किती सहज वाचली जातेय, लयीत!

सुरेखच.....

शेवटच्या ओळी मी अशा वाचल्या....

रोमरोमी जेव्हा माझ्या
निर्मळता स्थिरावेल
बिंब कैवल्याचे मग
आपसूक प्रकटेल .... Happy

सुंदर !

-शशांकजी, आपल्या प्रतिसादाबद्दल व सूचनेबद्दल धन्यवाद.
-याबाबत माझी अशी धारणा आहे की, चैतन्य हे सर्वव्यापी व स्वयंसिद्ध आहे, तर कैवल्य ही साधकाने आत्मोन्नतीच्या मार्गावर अभ्यासपूर्वक प्राप्त करून घेण्याची व (ब्रह्मकमळासारखी) दुर्लभ अवस्था आहे. म्हणूनच इथे कैवल्य हा शब्द वापरलाय.

anjali_kool, आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!