मिरर्चींया - द ट्रॅप (६७२) ... सत्यघटनेवर आधारीत

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2017 - 12:00

धामनसोली स्टेशनवरून तो बाहेर पडला. मोकळे आकाश आणि त्याखाली स्मशानाला लाजवेल अशी शांतता. त्या शांततेची राखण करत एक मशीद समोर स्तब्धपणे उभी होती. त्याने आपले जान्हवे सरकवून आत घेतले, आणि घड्याळात वेळ चेक केली. रात्रीचे पावणेतीन वाजले होते. एव्हाना कुत्रेही भुंकून झोपले असतील. बरेच झाले एकाअर्थी. ईथून जवळपास तीन किलोमीटर चालत जायचे होते. रिक्षाही मिळणार नव्हती. भेटला असता तर एखादा कुत्राच भेटला असता. एखादा लघुशंका मिटवायला अर्ध्या झोपेतून उठलेला. हे भटके कुत्रे म्हणजे रात्रीचे वाघसिंह असतात. आपल्याला बघताच भुंकतात. पण एखादा चावरा निघाला तर काय ही भिती सतत डोक्यात राहतेच.

आणि खरंच दोनचार कुत्र्यांचा दूरवर आवाज आला, जिथे त्याला जायचे होते त्याच दिशेने आला. आणि ईथे याच्या पोटात भितीचा गोळा ऊठला. भितीने भूकेची जाणीव झाली. पण आता या वक्ताला खायला कुठे मिळणार? हा विचार डोक्यात येतो न येतो तेच, नाकात गरमागरम समोश्यांचा वास दरवळला. या वेळी? या अवेळी? गरमागरम समोसे? निव्वळ परमेश्वराचीच कृपा. की एखाद्या भूताची करणी? एखाद्या कुत्र्यासारखाच माग काढत तो जिथून वास येत होता त्या गल्लीत शिरला. खरेच एक टपरीवजा हॉटेल उघडे होते. उघड्यावरचेच हॉटेल होते. त्यावर एक पत्र्याचा बोर्ड लागला होता. "खय्याम" असा एकच शब्द त्यावर दोन भाषेत लिहिला होता. एक उजवीकडून डावीकडे, एक डावीकडून उजवीकडे. हॉटेलात माणसेही फक्त दोनच होती. दोघेही गोल टोपी. एक समोसे तळणारा. आणि एक गल्ल्यावर झोपलेला. पण आणखीही कोणी तरी तिथे असावे. असे त्याला उगाचच वाटले. कोणाची तरी चाहूल लागल्यासारखे. पण दुर्लक्ष केले. समोर गरमागरम समोसे बघून पोटातला भूकेचा आगडोंब आणखी उसळला होता. दो समोसे देना.... पहले कूपन लेना..!

टपरीवर कूपन? रात्रीचे तीन वाजता. ते ही अश्या आडगावात. काय फालतूगिरी आहे!
झोपलेल्या ढेरपोट्याला तेवढ्यासाठी उठठावे लागले. त्या नादात त्याच्याही झोपेचे खोबरे झाले. पैसे दिले, कूपन घेतले. कूपन दिले, समोसे घेतले. समोश्यासोबत दोन मिरच्याही हक्काने घेतल्या. जवळच्याच ताटात ताज्याताज्या तळून ठेवल्या होत्या. आणि मग ईथेतिथे पाहिले. दहाबारा टेबलं मावतील ईतकी जागा होती. पण एकच टेबल मांडून ठेवले होते. बाकी सर्व खुर्च्यांच. त्याच खुर्च्यातून वाट काढत तो तिथे गेला. गरमागरम समोश्याचा पहिला घास घेतला आणि मिरची चावणार तोच...

मिरच्या होत्या कुठे प्लेटमध्ये..?? त्या तर गायब झाल्या होत्या. कुठे पडल्या असाव्यात? खाली जमिनीवर नजर फिरवली तर कुठेच नाहीत. पुढे जाउन डावीकडे पाहिले, उजवीकडे पाहिले, आणि तो दिसला...!

एक अक्राळविक्राळ गावठी कुत्रा. डोळे अर्धवट मिटून. जबडा अर्धा उघडून. झोपला होता. मिरच्या त्याच्या अगदी नाकाशी जाऊन पडल्या होत्या. काळे पिवळे नाक. गुरगुरणारे. कि घोरणारे..?? "खा बाबा खा, तूच खा त्या मिरच्या. मी दुसर्‍या घेतो.." मनातल्या मनात त्याची चांगलीच चरकली होती. हा सुद्धा "त्यांच्यातलाच" असावा, असे त्याला उगाचच वाटून गेले.

तो पुन्हा काऊंटरवर गेला. त्याने पुन्हा दोन मिरच्या घेतल्या. पुन्हा वेड्यावाकड्या रचलेल्या खुर्च्यातून वाट काढत टेबलापाशी आला. पुन्हा एक समोश्याचा घास घेतला आणि पुन्हा हातातल्या प्लेटमध्ये पाहिले.....
मिरच्या त्यात नव्हत्याच!

आता ईथे तिथे न शोधता त्याने थेट कुत्र्याकडेच पाहिले. आधीच्या दोन मिरच्या त्याच्याच नाकाजवळ तश्याच पडल्या होत्या. आता त्याच्या जोडीला आणखी दोन नव्या येऊन विसावल्या होत्या. काय होते हे? भूताटकी??
कुत्र्याचा जबडा आता बर्‍यापैकी सैलावला होता. गुरगुरही वाढली होती. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिले. दूरदूरपर्यंत कोणी नव्हते. दुकानाचा मालक आता पुन्हा घोरू लागला होता. काऊंटरवरचा पोर्‍या जणू या जगातच नव्हता. कानाला ट्रान्झिस्टर लावून बसला होता, पण त्याचा आवाज त्याच्या कानाच्या बाहेर येत नव्हता. हळूहळू त्याला सारेच विचित्र भासू लागले. साधे वर आकाशात बघायचीही हिंमत होत नव्हती. न जाणे नेमका चंद्रच कुठे दिसला नाही तर... त्याच्या मनात भितीने आपला संसार थाटून झाला होता.

पण मिरच्यांशिवाय समोसा! त्याच्या घश्याखाली घास उतरलाच नसता. त्याने ठरवून पुन्हा हिंमत केली. पुन्हा मिरच्या घ्यायला काऊंटरवर जायचे ठरवले. आता त्याला बघायचेच होते की मिरच्या अश्या ऊडून त्या कुत्र्याजवळ जातातच कश्या? छातीत मात्र काय घडणारेय याची धडधड होतीच!

तो तिसर्‍यांदा काऊंटरवर गेला. तिसर्‍यांदा त्याने मोजून दोनच मिरच्या घेतल्या. ज्या रस्त्याने मगाशी आला होता, तसेच पुन्हा त्या टेबलापाशी जाऊ लागला. फक्त आता त्याची नजर मिरच्यांवरच होती. खुर्च्यांना चुकवतच तो मालकाच्या समोर आला. मालक, तो आणि कुत्रा. तिघेही आता एका सरळ रेषेत आले होते. जणू चंद्रग्रहणाचीच स्थिती. आणि अचानक बघता बघता त्याच्या डोळ्यांदेखत प्लेटमधील मिरच्या हवेत ऊडाल्या. आणि जाऊन पुन्हा एकदा थेट त्या कुत्र्याच्या नाकावर आदळल्या. त्याचा अक्राळविक्राळ जबडा आता पुर्ण उघडला होता. ऊठून गुरगुरत दबक्या पावलांनी आता तो त्याच्याच दिशेने येऊ लागला होता. आणि तो मात्र एखाद्या ट्रॅपमध्ये अडकल्यासारखा जागीच खिळला होता. मालकाचा घोरण्याचा आवाज आता पुर्णपणे थांबला होता. त्या नीरव शांततेत मालकाच्या डोक्याशेजारील टेबलफॅन तेवढा घरघर फिरत होता...

- समाप्त !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे मोजलेत, ६६२?
मी एकेक शब्द बोट ठेवून मोजलाय.... चुकून हाताची दहा बोटे सुद्धा मोजली की काय Uhoh

पुन्हा मोजून बघा बरं.. Lol
मी विचार करतोय, धागा अजूनही एक आकडीच का बरं आहे? काय कमी पडलंय बरं..............

मी विचार करतोय, धागा अजूनही एक आकडीच का बरं आहे? काय कमी पडलंय बरं..............
>>>>>>
बहुतेक हेच ते चांगले लिखाण जे मायबोलीवर मागे पडतेय.... शुभरात्री Happy

Lol आता प्रतिसाद नक्कीच!

पडलेले स्वप्न नाही घडलेली घटना आहे.
आणि माझ्यात ईतकी प्रतिभा नाही की काही काल्पनिक लिहू शकेन.
फक्त कथेचा फिल यायला पदरचे चार शब्द घातलेत ईतकेच.
उरलेले 668 सत्यमेव जयते आहेत.

त्या नीरव शांततेत त्याच्या डोक्याशेजारील टेबलफॅन तेवढा घरघर फिरत होता
>>> मी यांच्यावरून अंदाज लावला की स्वप्न असेल..

ओह..
त्याच्या म्हणजे मालकाच्या आहे ते..
कन्फ्यूजन होत असेल तर चेंज करायला हवे वाक्य. अन्यथा सगळा अर्थच बदलतो.

मिरच्यांनाच कसली भुताटकी. समोसे उडुन पडले असते तर मानलं असतं. Happy
पण पुन्हा पुन्हा जाउन समोसे घेता आले नसते मिरच्यांसारखे.
पण मी म्हणते एवढ्या खुर्च्या बिर्च्या पार करुन जावंच का? उभ्या उभ्या समोसे हाणावेत नी जावं आपल्या मार्गाला Wink
आणि ही सत्यघटना आहे??? Uhoh
बरं ते शीर्षकातलं मिरर्चींया काय वाचता येइना मला. मिर्चीया असं लिहायचंय का?

सस्मित,

1) भूत आपल्या मनात असते.
मिरच्या वा समोसा हे निमित्तमात्र !

2) हो हि सत्यघटनाच आहे. चार शब्द ईकडचे तिकडचे खुलवायला वापरलेत. मात्र कथेचा आत्मा सत्यघटनाच आहे.

3) रात्री तीन वाजता एकटादुक्टा पुरुष असा उभ्याने समोसे नाही हाणू शकत.

4) अरेबियन नाईटसमध्ये उडणारया मिर्च्यांना मिरर्चींया बोलतात. तसेच ट्रॅप हा ईंग्रजी शब्द आहे.

छान वातावरण निर्मिती.
रात्री तीन वाजता एकटादुक्टा पुरुष असा उभ्याने समोसे नाही हाणू शकत. Lol Lol Lol

अरेबियन नाईटसमध्ये उडणारया मिर्च्यांना मिरर्चींया बोलतात.>>> अरेबियन नाईट्समधे मिरच्या उडतात?? Uhoh
रात्री तीन वाजता एकटादुक्टा पुरुष असा उभ्याने समोसे नाही हाणू शकत.>>> Lol

मिरच्या झोंबणे हा जसा वाक्यप्रचार आहे तसाच मिरच्या उडाल्या असा वाक्यप्रचार आहे तिथे.
मराठीतला अर्थ भितीने गाळण उडणे.
आता बोला, गाळण उडते?

खुप छान ऋन्मेऽऽष भाऊ....
>>>>
कथा समजली असेल आणि त्यानंतर आवडली असेल तरच छान बोला हं. तुम्हाला मी आवडत असेल म्हणून छान बोलू नका.
ईन एनी केस, कथा किंवा मी, माझे काहीतरी तुम्हाला आवडले वा आवडते म्हणून धन्यवाद Happy

त्याने समोसे खाण्याआधी ते निट सरकवले का कायसे केले तो उल्लेख आहे लेखात. डिटेलिंग हो!
>>>>>

जेव्हा तुमच्यासारखे दक्ष आणि जागरूक वाचक अचूक हेरतात तेव्हाच या लेखनकौशल्याचे चीज होते Happy
मनाच्या कोपरयापासून धन्यवाद.

कथेत समजण्याचाही काही फॅक्टर होता ही वरच्या प्रतिसादातुन कळलं. म्हणजे मला कथा समजली नाही.
>>>>>>

कारण आपण ऋन्मेषचा धागा उघडतो आणि धडाधड धडाधड वाचत सुटतो. कधी एकदा याचा लेख कथा संपवतो आणि प्रतिसादात घुसतो असे आपल्याला वाटते. पण तासभरासाठी आपले आयुष्य रिव्हाईंड करून पहा, एकाला तरी वाटले की आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी नवीन माहिती मिळेल, ज्ञानात काहीतरी भर पडेल... कोणालाच नाही? मिरच्या उडाल्या हे सर्वांना समजले.. पण त्या का उडाल्या याचा कोणीतरी विचार केला?

Pages