रहस्य

Submitted by वैशाली अ वर्तक on 8 September, 2017 - 01:16

रहस्य
मनात येतात राहून राहून
महा-भारतातील, काही रहस्य

कुमारीवस्थेत कुंतीस, कैसे मिळाले मातृत्व?
दुर्वांसांच्या श्लोकात, कोणते गुढ सामर्थ्य ?
करिता मंत्रोच्चार कुंतीने ,सूर्य देव झाले प्रसन्न
अन् ,जन्मास आले, तेजस्वी पूत्र कर्ण
मनात येतात राहून राहून.....
दुर्योधनाने कणकनीतिने , रचिली एक नामी युक्ती
पांडवाचा नाश करायास ,लढविली कूटील बुद्धी
बांधूनिया लक्षागृह ,पाठविले तयांना वारणावत वनी
परि ,पांडव निघाले कुशलक्षेम, जळत्या लक्षागृही
मनात येतात राहून राहून......
होते जरी पितामह, राज-सभेत हजर
दुःशासनाने मांडिले ,पांचालीचे वस्त्र हरण
का हतबल पितामह ,पाहूनी त्या दुष्कृत्यास
कैसे पुरविले वस्त्र सख्याने, तिच्या लज्जा-रक्षणास
मनात येतात राहून राहून.......
एकच तुळसी पत्र, सेवन करिता माधवाने
शिष्यांसह दुर्वांस मुनी, परतले समाधानाने
न भक्षिता अन्न कण, झाले संतृप्त भोजनाने
काय गुढ होते असे , द्रौपदी च्या थाळी मधे.
मनात येतात राहून राहून
महाभारतातील काही रहस्य

........... वैशाली वर्तक

.

Group content visibility: 
Use group defaults