असेही जग, जगते!

Submitted by झुलेलाल on 7 September, 2017 - 22:14

'मुझे इधर मारा... पकडो उसको... मुझे मारा है'... आपला थरथरता, अपंग हात खांद्यावरून मागे नेत तो कळवळून बोलत होता.
'कौन है, वो, किधर है?'... सोबतच्या ब्रदरने त्याला विचारलं आणि हवेत कुठेतरी बोट दाखवत तो भेसूर हसला...
काही वेळानं शांत झाला.
त्या दोघांमधला हा संवाद. नेहमीचाच.
आसपासच्या खाटांवरचा प्रत्येकजण आपल्यातच गुंतलेला दिसत होता. कुणी बसल्या जागी डुलत होतं, कुणी हवेत हातवारे करत होता, कुणी तोंडाने विचित्र आवाज काढत डोळे फिरवत होता, कुणी उभ्याउभ्या नाचत होता...
ते दृश्य केविलवाणं होतं.
माणूस म्हणून जन्माला आले, आणि जगत राहिले, एवढंच त्यांचं माणूसपण... बाकी, माणसांच्या जगाशी त्यांचा मानसिक संबंधही नाही. आपण कुठे आहोत, आपल्या आसपास काय चाललंय, आपल्याला काय हवंय, काय नकोय, आपल्याला काही मिळणार आहे की नाही, आपल्याभोवती वावरणारी माणसं आपली कोण आहेत, आपण तरी आहोत की नाही.... कशाचंही भान नसलेली, ही माणसं.
कुणीतरी रस्त्यात सोडून दिलं, आणि आपण आता माणसांच्या जगात नाही याचंही भान नसल्याने, जगण्यासाठी काय करायचं, याचीही काळजी न करता तसंच बेवारस स्थितीत पडून राहिल्यावर कुणीतरी इथे आणून टाकलं...
त्यांना त्याचंही काहीच नसतं.
वय, बुद्धी आणि मन यांना या माणसांच्या जगात कुठेही स्थान नाही. शरीरही, केवळ पुढे सरकणाऱ्या दिवसागणिक वाढते, म्हणून वय वाढत जाते. बाकी, हे शरीर आपले आहे, याचेही त्यांना भान नाही.
भूक लागली की जेवायचं असतं, हेही त्यांना माहीत नाही, आणि बसल्या जागी, जेवताना, खाताना नैसर्गिक विधी करायचे नसतात, हेही त्यांना कळत नाही...
... दुपारी आम्ही तेथे गेलो, तेव्हा चहाची वेळ झाली होती. कुणा कुटुंबाने या माणसांसाठी वडापाव आणि जिलेबी आणली होती.
वेगवेगळ्या हॉलमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतील माणसांना दुपारच्या नाश्त्यासाठी आणून बसवले गेले.
प्रत्येकाच्या समोर, एका वाडग्यात जिलबी आणि वडापावचा कुस्करा पडलेला होता..
समोर आलेलं हे काहीतरी विशेष आहे, याचंही भान नसलेले ते सारे जिलेबी आणि वडापाव, दोन्हीही, एकाच त्रयस्थपणे खाण्याचा प्रयत्न करत होते. खूप प्रयत्न केल्यावर हात आणि तोंड यांचा मेळ बसलाच, तर एखादा घास पोटात जायचा, आणि पुन्हा पुढचा प्रयत्न सुरू व्हायचा...
अनेक शऱीरं केवळ गोळा... व्हीलचेअरमध्ये ठेवलेला... डोळ्यातला जिवंतपणा पार हरवून गेलेला...
... सारे दृश्य, केवळ केविलवाणे!
हतबल करणारे, आणि माणसांच्या रोजच्या जगापलीकडच्या एका भयाण विश्वाची अस्वस्थ जाणीव करून देणारे!
-----
... बोरीवलीच्या गोराई खाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे एक कमान दिसते. 'शांति दान' असा फलक त्या कमानीवर दिसतो. बाहेर वाहनांची रोजचीच वर्दळ सुरू असते. त्या कमानीच्या आतल्या जगाला मात्र, बाहेरच्या जगाची जरादेखील जाणीव नसते.
कमानीतून आत शिरलं, की आतल्या जगाचे अस्वस्थ करणारे अस्तित्व जाणवू लागते.
माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरही, माणूस म्हणून नाकारल्या गेलेल्यांचं हे जग!
मदर तेरेसा यांच्या मानवतेच्या शिकवणुकीचा एक अखंड झरा या जगात वाहात असतो, म्हणून या जगालाही आपलं असं एक अस्तित्व टिकवता आलंय.
मानसिक दौर्बल्य आणि त्याच्या जोडीला अपंगत्व, अशा दुर्दैवी जिण्याचं ओझं अंगावर वागवणाऱ्या या जगातल्या त्या माणसांची इथे अहोरात्र सेवा सुरू असते.
यातल्या अनेकांना भावना व्यक्त करता येत नाहीत, बोलता येत नाही, चालता येत नाही, आपलं नाव माहीत नाही, वय माहीत नाही आणि आपण माणूस आहोत, हेही त्याना माहीत नाही...
अशाच अवस्थेत कधीतरी कुणीतरी त्यांना रस्त्यावर टाकून दिलेलं असतं, आणि माणुसकी जिवंत असलेल्या कुणीतरी त्यांना पुढे इथे आणून सोडलेलं असतं.
मग इथे त्यांची काळजी घेतली जाते. त्यांच्या जिवात जीव असेपर्यंत, त्यांचा सांभाळ केला जातो. माणुसकीचे झरे जिवंत होतात...
अनेकदा, जन्मला आलेलं मूल मतिमंद आणि अपंग आहे हे समजल्यावर पोटचा गोळा काळजावर दगड ठेवून कुणीतरी रस्त्यावर टाकलेला असतो. त्या जिवाला आपण पोरके झाल्याची जाणीवही नसते, त्याला इथे पालकत्वाची सावली मिळते...
घर, जन्मदाते, समाज, यांच्याशी त्यांचे नाते कायमचेच तुटलेले असते.
कधीतरी कुणीतरी भेट द्यायला येतात. जगाची ओळख कायमची हरवलेल्या नजरेने स्वमग्नपणे अापल्या स्वतःच्या अस्तित्वाचेही भान हरवलेल्या एखाद्या जिवासमोर रेंगाळतात, हळूच मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात... कधीतरी एखाद्याला हुंदका अनावर होतो...
आणि तुटून गेलेलं नातं जिवंत झालं असावं, हे ओळखून इथली सेवाभावी माणसं त्रयस्थपणे या जिवांच्या सेवेला लागतात...
इथल्या अनेकांना नावगाव नाही. त्यामुळे जन्मदात्यांचा पत्ताही माहीत नाही. अनेकजण अशाच अवस्थेत वाढले, वय झालं, आणि इथल्याच एखाद्या खाटेवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला... जिवंतपणाचा कोणताही आनंद वाट्याला न आलेल्या या जिवांचा जगण्यानंतरचा प्रवास तरी सुखाचा व्हावा अशी प्रार्थना करून त्या देहांवर पश्चात संस्कार केले जातात...
------
अशा संस्थांना माणुसकीच्या आधाराची गरज असते. कपडे, धान्य, खाऊ, आणि वेगवेगळ्या स्वरूपात मदत करणारी अनेक कुटुंबे संस्थेशी जोडलेली दिसतात.
म्हणूनच, जगाची आणि स्वतःच्या अस्तित्वाचीही जाणीव नसलेल्या त्या जिवांच्या तोंडात अधूनमधून जिलेबीचाही घास पडतो.
त्यांना त्या चवीचं वेगळेपण माहीत नसलं, तरीही!....
संध्याकाळ होते, हळुहळू अंधारू लागतं, आणि माणसांच्या जिवंत जगाची जाणीव नसलेलं ते जग अंधारात बुडून जातं. त्याचंही त्या जिवांना भान नसतंच!...
दिवस, रात्र, महिने, वर्षे, हा सारा पसारा घेऊन तुमचंआमचं जग पुढे सरकतच असतं....

Group content visibility: 
Use group defaults

निःशब्द....

मदत करणारे खरेखुरे देवदूतच.... त्यांना दंडवत...

____________/\____________

काय बोलु... १५ march ला तिकडेच होतो. तुम्ही जे शब्दात मांडता ते मला जमत नाही. डो़क्यात भरपुर असते. पण मांडता येत नाहि.

अश्यांना मदत करणारेही खरेच ग्रेट.. कारण मोबदल्यात तुम्हाला कृतज्ञतेची एक नजर मिळेल का याचीही शाश्वती नसते
__/\__

माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरही, माणूस म्हणून नाकारल्या गेलेल्यांचं हे जग!

खूप अस्वस्थ वाटलं सगळ वाचल्यावर ! त्या सेवाभावी महामानवानां अनेकदा वंदन !

माणूस म्हणून जन्माला आल्यानंतरही, माणूस म्हणून नाकारल्या गेलेल्यांचं हे जग!

खूप अस्वस्थ वाटलं सगळ वाचल्यावर ! त्या सेवाभावी महामानवानां अनेकदा वंदन !

जे माणसा सारखे जगत नाहीयेत, जगणार नाहीयेत त्यांना इतर माणसांनी जगवत ठेवणे याला माणुसकी म्हणता येईल का असा विचार करतेय Uhoh

हृदयस्पर्शी आहे. ते एकच एक २४ तास बोलण्याचा प्रयत्न करत असत्तात आणी सामान्य जगाला त्याची काहीच कल्पना नसते त्याना काय म्हणायचे आहे. मला शान्तीदूत चा पत्ता मिलेल का? मदत करावीशी वाटते. एक वयस्क माणुस वेडा होता आणी रस्त्यावरच रहात होता. त्याला लोक अजुनही वेड करुन त्याला तेच तेच बोलायला लावायचे आणी तो तेच तेच बोलुन लोकाना दगड मारायचा. मी फक्त ४/५ वर्षाची असेन पण त्यावेळेस मला त्या असहायतेची जाणीव झाली होती. तेव्हा कही केले नाही पण आता मदत करावीशी वाटते.