आवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी

Submitted by बेफ़िकीर on 3 September, 2017 - 13:53

आवडलेल्यांचा इतकाही करू नये अभ्यास कधी
की वाटावे ह्यांचा आता घडू नये सहवास कधी

विरक्त व्हावे ठरवल्याक्षणी नवी नवी फुलतात फुले
गाभुळलेल्या चारित्र्या मी स्वीकारू सन्यास कधी

बघ, बसला ना धक्का, आपण किती क्षुद्र असतो ह्याचा
म्हणून सांगत होतो, लावू नये हात झाडास कधी

असे लिही, तू तसे लिही, तू लिही बरे, नक्कोच लिहू
कुणानशीबी ना येवो कवितेचा सासुरवास कधी

मला एवढे कळायलाही एक जमाना लागावा?
तुझ्यामुळे जग खास भासते, तू नव्हतीसच खास कधी

'दोघांचेही आहे' हा एकावेळी झाला नाही
तुला व्हायचा भास कधी तर मला व्हायचा भास कधी

येतो त्याला हाकलती ही दोन फुफ्फुसे चोखंदळ
अजून आला नाही बहुधा घेण्यालायक श्वास कधी

तिला पाहुनी केव्हा माझे हृदय नीट चालेल बघू
मला पाहुनी विस्कटेल त्या भुवयांची आरास कधी

'बेफिकीर' लोकांची सारी गार्‍हाणी ऐकतोस तू
मीही वाट बघत आहे, ये भेटाया जमल्यास कधी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__
असे लिही, तू तसे लिही, तू लिही बरे, नक्कोच लिहू
कुणानशीबी ना येवो कवितेचा सासुरवास कधी
>>>
हा शेर सर्वाधिक आवडला Happy

बघ, बसला ना धक्का, आपण किती क्षुद्र असतो ह्याचा
म्हणून सांगत होतो, लावू नये हात झाडास कधी >> वा खुपच छान ओळी...

काय लिहिता बेफी तुम्ही __/\__
अफाट.
खरं सांगू तर २ कार्यक्रम अटेंड करून तुमच्या गझलेचे सादरीकरण पहायला/ऐकायला मिळाले नाही.
कधी मिळेल देव जाणे. (त्यामुळे वाचूनच समाधान मानते आहे. :))

मला गझलेतले काही कळत नाही. पण शीर्षक वाचून हल्ली एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडली की त्या व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम वा तत्सम अकौंटसची छाननी करून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा, मतांचा आणि आवडीनिवडी जुळत आहेत का वगैरे याचा अभ्यास केला जातो त्याची आठवण झाली.

खुप छान सर....

विरहात हा प्रवास त्यात तुझा ध्यास कधी..
तुझ्या असण्याचा हा सुवास अन् छळतो हा हव्यास कधी..