चौबटिया गार्डन्स: रानीखेत

Submitted by अमेय२८०८०७ on 2 September, 2017 - 08:59

उत्तराखंड भटकंतीत रानीखेतच्या बाहेर थोड्या अधिक उंचीवर वसलेल्या बागेच्या या प्रचंड निसर्गविस्तारास भेट देणे हा एक आगळा अनुभव होता. आधी डोंगरउतारावर लावलेली सफरचंदाची झाडे, विविध फळ-फुलझाडे आणि औषधी वनस्पती आणि पुढे गहिरे होत जाणारे ओक, देवदार आणि पाईनवृक्षांचे जंगल बघत फिरताना धाप लागते पण जीव आणि डोळे निवतात.

नव्या मनूतील नव्या जगाचा पाईक असल्याने आंबा, गुलाब, झेंडू, पेरू इत्यादीच्या पुढे आमचे वनस्पतिज्ञान ब्रेक लावल्यासारखे थांबते. झाड बघितल्या बघितल्या डेलिया, क्रीसंथमम, ऱ्होडेडेंड्रोन असे चित्कारणाऱ्या लोकांबद्दल मला भयंकर आदरयुक्त भीती वाटते. आंब्याचे मूळ नाव मंजिफेरा इंडिका आहे वगैरे माहिती जांभळाची बी थुंकल्यासारखी सहज बाहेर काढणाऱ्याचा तर जाहीर सत्कार करावासा वाटतो.

अशी दिव्य स्थिती असल्याने त्या अवघड चढावरही टणाटण उड्या मारणाऱ्या गाईडने चालवलेली ज्ञानाची उधळण वरून मोहक वाटत असली तरी संत म्हणतात तशी आत्म्याला भिजवत मात्र नव्हती. अर्थात त्या कमालीच्या शुद्ध वातावरणात फिरणे, तऱ्हेतऱ्हेचे सुगंध नाकात साठवणे यातही सुख असल्याने स्वतःच्या अल्पज्ञानाचा तसा विषाद वाटत नव्हता. मात्र उत्साही गाईडचा हिरमोड करायचा नाही म्हणून तो सांगत असलेल्या गोष्टी गंभीरपणे ऐकून घेणे, एखादा हुशार प्रश्न विचारणे हे सुरू ठेवले होते. त्यातून बरेच दिवसांनी न कुरकुरता पाच-सहा किमी चालणारे आम्ही पर्यटक त्याला भेटलो होतो. बाकीचे बहुतेक कब है होली? च्या थाटात, "कहा है एप्पल गार्डन?", असे विचारून केवळ सफरचंद तोडण्याचा फोटो काढून मग तिथल्याच केंद्रात जाऊन ताजे ज्यूस पिण्यात समाधानी असतात असे त्यानेच सांगितले त्यामुळे त्याच्यालेखी त्याची बडबड तीनेक तास ऐकून घेणारे आम्ही फार वरच्या श्रेणीचे पर्यटक ठरलो होतो.

पाय गळ्यात येऊ लागल्यावर मात्र आमचीही चाल मंदावली. अमृतांजनच्या वासाचे पान, बोराएव्हढे सफरचंद, अंगभूत तेलामुळे आगीत टाकताच झडझडून पेटणारी झाडाची साल इत्यादी बाबी मनोरंजक असल्या तरी आता पोटात कावळे कोकलायला सुरुवात झाल्यामुळे आम्ही आगमापाशी परतण्याची नम्र इच्छा जाहीर केली. गाईडचा थोडा विरस झाला कारण पट्टीचे गायक जसे पहिले तासभर आ ऊ आलाप काढून मग कुठे "याद पिया की आये", वगैरे मूळ मुद्द्यास हात घालतात तसे त्याच्या मते आता कुठे भटकंती खरी कुठे सुरू होत होती. तरी आमच्या तोवरच्या प्रतिसाद-पुण्याईमुळे त्याने मनाविरुद्ध का होईना परत फिरण्याची उदार परवानगी दिली.

परतताना एका छोट्या झुडुपाजवळ थांबला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ठेवीतला हुकूम फेकणाऱ्या पत्तेबाजाचे गूढ स्मित होते. एक छोटा प्रयोग करण्यासाठी त्याने दोन स्वयंसेवक हवेत असे सांगितले. चतुर स्त्रीवर्ग लगोलग दोन पावले मागे सरकल्याने आपसूक आघाडीवर आलेला पुरुषवर्ग या कामासाठी मुक्रर झाला.

गाईडने दोन छोटी पण खालच्या भागावर अनेक तंतू असणारी पाने हलकेच तोडली आणि आमच्या मनगटांवर केवळ तीन-चारदा फिरवली. सर्वांगाला एकदम डेंजर झिणझिण्या आल्या आणि अंगातून वीज वाहत असल्याचा भास झाला. यापूर्वी असे फक्त हिला बघितले तेव्हा झाले होते (तसे आणखी काही प्रसंग आहेत पण माणसाने सेफ खेळावे).

गाईडबाबाच्या डेली मनोरंजनाचा हा हायपॉईंट असल्याने तो आम्हाला लाह्यांसारखे तडतडताना पाहून हॉ हॉ करत हसत बसला होता (ते हसणे बघून त्या बिकट वेळीही 'ऐलाने जंग'च्या काला नागची आठवण झाली). शेवटी आमची वेदना त्याच्याप्रती हिंसेत बदलणार अशी चिन्हे दिसल्यावर त्याने दुसरी मूठ उघडून तुळशीसारखी दोन पाने चुरडून मनगटांवर चोळली. नळ बंद व्हावा तशी दुखी थांबली खरी पण सूक्ष्म झिणझिण्या पुढे बराच वेळ सुरू राहिल्या.

"इसको नेटल कहते है, अच्छे अच्छोको सीधा करती है. गांव में कोई चोरी या बदमाशी करता है तो उसे पकड कर बस ये पत्ते उस के कूल्होपर रगड देते हैं. दो मिनिट में सब कबूल देता है बदमाश", असे त्याने म्हणल्यावर 'सॅम्पल' म्हणून दोन-चार पाने मागणाऱ्या स्त्रीवृंदास हात धरून पुढे नेत (आणि आमची उत्तमांगे झाकत) आम्ही गडबडीने बागेबाहेर आलो.

नेटलची पाने होती बाकी जबरदस्त. त्यांचा उपयोग करून सरळ करावेसे वाटणारे अनेक चेहरे समोर आले. पुढच्या रानीखेत भेटीत (हिच्या नकळत) पानांची एक जुडी आणून ठेवावीच म्हणतो. गरजूंनी ऑर्डर नोंदवावी.

-- अमेय

----------------------------------

IMG_20170902_180845.jpg

प्रचि 1

IMG_20170902_180858.jpg

प्रचि 2

IMG_20170902_180915.jpg

प्रचि 3

IMG_20170902_180938.jpg

प्रचि 4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहलंय. त्या नेटलच्या पानांचा/झाडाचा फोटो (आणि त्यावर रामबाण उपाय असणार्‍या पानांचा फोटो) आहे का?

गाईडने करंट लावल्यावर पुढे काहीवेळ फोटोबिटो सुचला नाही, मनगटावर छोटे दाणेही उठले पण अगदी थोडावेळ.
Common Nettle नावाने शोधल्यास माहिती व फोटो मिळतील नेटवर. उतारा म्हणून बहुतेक Dandelion फुलझाडाची पानं वापरली गाईडने, असे वाटते.

CURRENT MAARE NETLIYAA navacha picture Nigel pudhemage.,☺☺.. Lekh chan vatla ajun jara photo taka pls..