एक विचित्र अनुभव

Submitted by बेफ़िकीर on 25 August, 2017 - 09:46

आठ दहा दिवसांपूर्वी मी व वडील माझ्या गाडीतून कोल्हापूरहून पुण्याला यायला निघालो. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही निघालो आणि हायवेला लागून एक दहा पंधरा किलोमीटर झाले तेव्हा एक विचित्र प्रकार घडला. माझ्या वाहनाचा वेग साधारण ९० ते १०० किमी प्रतीतास असेल. अचानक डिव्हायडरवर पलीकडच्या रस्त्यावरून एक अजस्त्र काळकुट्टं डुक्कर धावत आले आणि आपण ओलांडतो आहोत तो एक रस्ता आहे हेच न बघता तसेच तीरासारखे धावत रस्ता ओलांडू लागले. माझ्या गाडीची आणि त्याची धडक बसणार हे नक्की आहे हे कळल्यावर मला आणखी एक गोष्ट कळली की मला आता काहीही करणे शक्य नाही.

पूर्ण वेगातच माझ्या गाडीची त्या डुकराला धडक बसली. खरे तर डुकराचीच माझ्या गाडीला धडक बसली. तो इम्पॅक्ट इतका भयंकर होता की धडामकन् आवाज झाला आणि गाडी दहा वीस फुटांवर जाऊन थांबलीही! मी गाडी हळूहळू साईडला घेतली आणि मागे वळून पाहिले तर ते डुक्कर उताणे पडून पाय झाडत तडफडत होते. क्षणभर मला फार वाईट वाटले की त्याला खूप लागले असेल. पण मला हे नक्की माहीत होते की डुक्कर, बैल असे प्राणी जेव्हा वाहनाला धडकतात तेव्हा वाहनाचीही मोडतोड होते. मी वळून पाहिले तर केवळ दोन क्षण उताणे पडून ते डुक्कर तडफडले आणि पुढच्याच क्षणी उठून काही झालेच नाही अश्या थाटात पुन्हा धावत सुटले. मी मात्र हबकलो. तीन, चार सेकंदात ते डुक्कर इतके अगाध सावरलेले पाहून मी वडिलांना म्हणालो की नक्की गाडीची मोडतोड झालेली असणार!

म्हणून मी बाहेर येऊन गाडीचा पुढचा भाग पाहिला तर त्याच्यावर काळ्या रंगाची इतकी घाण लागलेली होती की मला ते दृश्य बघवतही नव्हते आणि खरंच काही झाले आहे का हे दिसतही नव्हते.

शेवटी मी गाडीत वैतागून बसलो आणि गाडी आधीच्याच वेगाने नेऊ लागलो. काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता. मधेच एक कडकड आवाज येऊ लागला म्हणून पाहिले तर काय वाजत होते ते समजतच नव्हते.

पुढच्या टोलनाक्यावर नेहमीच उभ्या असणार्‍या पोलिसांनी गाडी अडवली. म्हणाले तुमची नंबर प्लेट दिसत नाही. मी त्यांना डुक्कर धडकल्याचे सांगितल्यावर त्यांनी हसत हसत मला सोडून दिले.

मग भुईंजपाशी एक गाडी धुणारा मिळाला. तिथे गाडी आधी धुवून घेतली आणि पाहिले तर गाडीला काहीही झालेले नव्हते.

तसाच पुण्याला आलो. आता आवाजही येत नव्हता. त्यानंतर आठ दिवस गाडी नाही नाही त्या गावांना, अत्यंत खराब रस्त्यांवरून घेऊन गेलो. पण गाडी परफेक्ट परफॉर्मन्स देत होती. दोन दिवसांपूर्वी मात्र अचानक एसी काम करेनासा झाला. एसीशिवाय गाडी चालवणे अशक्य असल्याने पहिला मेकॅनिक गाठला. तो म्हणाला रु. १४५० मध्ये गॅस भरून देतो कारण गॅस लीक असणार. मलाही तेच वाटले प्ण क्रॉसचेक म्हणून नेटवर पाहिले तर रु. १२५० मध्येही गॅस भरणारे काही मेकॅनिक दिसले. त्यातल्या एकाला फोन केला तर तो येऊन गाडी घेऊन गेला. त्याने वीस मिनिटांनी फोन करून सांगितले की आत पूर्ण मोडतोड झालेली असून कंडेन्सर, रेडिएटर आणि एक बार असे सगळे बदलावे लागेल. चौदा हजार खर्च येईल. त्याला मी गाडी परत आणायला सांगितली. त्याने गाडी आणून पार्किंगमध्ये लावून दिली. मग मी परत पहिल्या मेकॅनिककडे गाडी नेली. त्याने चेक करण्यासाठी गाडी खोलली तर खरोखरच आतमध्ये सगळी मोडतोड झालेली होती. पण त्याने फक्त कंडेन्सर व एक बार बदलला व रु. ८३०० मध्ये माझे काम झाले.

डुकराच्या धडकेचा परिणाम बाहेरून काहीही दिसत नव्हता कारण जिथे ते डुक्कर धडकले होते तिथे फायबर होते. मेटल असते तर ते डॅमेज झाल्याचे दिसले तरी असते.

अश्या प्रकारे एका डुकराची धडक मला भलतीच महागात पडली.

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी धडक भरपूर महागात पडते. मागे एकदा आमच्या टू व्हिलर खाली एक डुक्कर आले होते. आम्ही पडलो. बाबांना थोडे लागले. पण डुक्कर मात्र लगेच उठून पळून गेले. पण तुम्ही जे केले ते बरोबरच होते अशा परिस्थितीत.

इथे हरणं अशी आडवी येतात, फ्रॉम नोव्हेअर. इंश्युरंस ने नुकसान भरपाई दिली असेल अशी आशा करतो...

सहीये डूक्करशॉट ..
त्या डुकराला आपल्या ताकदीचा माज असावा, म्हणून असा रस्त्यावर सुसाट बागडत होता.
आमच्या गावाला बॉम्ब लावून यांची शिकार होते. आणि त्यानंतर अख्खे गाव जेवते. आता गणपतीनंतरच असतो वाटते शिकारीचा सीजन.

आमच्या गावाला बॉम्ब लावून यांची शिकार होते. आणि त्यानंतर अख्खे गाव जेवते. आता गणपतीनंतरच असतो वाटते शिकारीचा सीजन.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2017 - 12:04
>>>
यात काय मोठेपणा वाटतो काय तुला???
डुक्कराची शिकार करताना मांसाच्या तुक्ड्यात बॉम्ब लपवला असतो.असे तुकडे जंगलात रात्री त्यांच्या वाटेवर टाकून ठेवतात.डुक्कर जेव्हा हे मांस चावते तेव्हा प्रचंड स्फोट होऊन त्याचा जबडा छिन्नविछिन्न होतो,रात्रभर तडपून मग त्याचा अंत होतो.सकाळी हे शिकारी त्यांचे गतप्राण देह उचलून आणतात.
टोटली रिडीक्युलस ॲन्ड इन्हुमन आहे हे.

यात काय मोठेपणा वाटतो काय तुला?
>>>>
मोठेपणा काय त्यात. मी माझ्या काकांकडून ऐकलेली माहिती ईथे पुरवली ईतकेच.
तसेही आपल्या खाण्यासाठी कुठलाही जीव मारणे हे वाईटच. मग झटका पद्धतीत मारा किंवा हलाल हालहाल करा. दोन्ही पद्धतीत जो प्राणी मारतो त्याच्या बायकापोरांचा आक्रोश तेवढाच असतो. फक्त तो मटण खाताना आपल्या कानावर पडत नसल्याने घास घश्याखाली सहज उतरतात ईतकेच.

समोर पण फायबर असतो का हल्ली... इंटरेस्टिंग आहे बाहेरून काहीच नाही आणि आत इतकी मोडतोड.
आधी इतकी धडक बसली आणि काहीच झालं नाही ही कोणाची कृपा ह्या वळणावर धागा जाणार असं वाटू लागलेलं, ते झालं नाही ते बरं झालं. Happy

अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत असे इथे, इथे आणि इथे वाचल्यास लक्षात येईल. पण तुमचे हे नुकसान हे इन्श्युरन्समध्ये कव्हर व्हायला हवे होते.

त्याने वीस मिनिटांनी फोन करून सांगितले की आत पूर्ण मोडतोड झालेली असून कंडेन्सर, रेडिएटर आणि एक बार असे सगळे बदलावे लागेल. चौदा हजार खर्च येईल.
>>>> इथे तुम्हाला शंका नाही अली का. कारण गाडी तुम्ही 8 ते 10 दिवस फुल्ल पिळली होती.
परफेक्ट परफॉर्मनच देत होती.या मेकॅनिक नेच गडबड केलेली असू शकते.

>> डुक्कर जेव्हा हे मांस चावते तेव्हा प्रचंड स्फोट होऊन त्याचा जबडा छिन्नविछिन्न होतो,रात्रभर तडपून मग त्याचा अंत होतो.

क्रूर वास्तव

>> जो प्राणी मारतो त्याच्या बायकापोरांचा आक्रोश तेवढाच असतो

क्रूर थट्टा

ईनामदार,
कधी मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर कसा तडफडून मरतो ते पाहिले आहे का?
तरीही जगभर मासेमारी करताना माश्यांना पाण्यातून बाहेर काढूनच मारले जाते, गोळ्या घालून नाही.
शिकारी आपली सोय बघतो हेच वास्तव आहे. स्विकारायला हवे.

असो, हा विषय ईथे अवांतर आहे. आता यापुढे यावर एक पोस्ट जरी आली तरी मी वेगळा धागा काढणार.

आता यापुढे यावर एक पोस्ट जरी आली तरी मी वेगळा धागा काढणार.>>>>>बापरे,,मी प्रतिसाद टाईप केलेला डीलीट केला हे वाचुन. Happy

@ऋन्मेऽऽष: सिंजी यांनी सांगितलेला प्रकार अत्यंत क्रूर आहे. जबडा फाटल्याने कित्येक तास तडफडून तो प्राणी मरत असेल. त्यावर तुम्ही उत्तर म्हणून "कसेही मारले तरी मारलेल्या प्राण्याची बायकापोरे तेवढीच रडतात" असली मस्करी करणारी अत्यंत टुकार प्रतिक्रिया लिहिली आहे. आणि वर कळस म्हणून "अजून एक धागा काढेन" म्हणून तुमचा मस्करी सुरूच आहे. फारच sadist दिसता तुम्ही. धागा काढण्यापूर्वी ब्लेड ने बोट थोडे कापून पहा किती यातना होतात. आणि मग ते जबडा फाटलेले डुक्कर आठवा. मग पहा बुद्धी होते का धागा काढायची. निषेध !

काळजी घ्या... थोडक्यात निभावले.

एकंदर वाहन सौख्य कमीच आहे असे वाटते .. यापुर्वीही एक अपघात झाला होता ना ? .. लिंबूला पत्रिका दाखवून घ्या.

बहुधा मेक्यानिक एका विशिष्ट धर्माचेच असतात. त्यामुळे त्यानेच काहीतरे घोळ करून तुम्हाला खर्चात पाडले असावे.

बहुधा मेक्यानिक एका विशिष्ट धर्माचेच असतात. त्यामुळे त्यानेच काहीतरे घोळ करून तुम्हाला खर्चात पाडले असाव >>>
निरर्थक आणि खोडसाळ प्रतिसाद.

निरर्थक आणि खोडसाळ प्रतिसाद.
>>

हा धागाकर्त्याचा अनुभव आहे काय? तुम्ही कशासाठी चोंबडेपणा करताय?

@स्वामीजी, ललितलेखनातील धागाही, ज्याचा कुठल्याही राजकीय बाबींशी संबंध नाहीये त्यावर राजकीय कुरघोडी करण्यासाठीचे प्रतिसाद टाकून चर्चा फक्त वादावरच न्यायची असेल तर चालूद्या तुमचं!
धन्यवाद.

तुम्ही कशासाठी चोंबडेपणा करताय?>>>अहो, असे लिहिले की दोन चार अनुमोदन देणारे प्रतिसाद मिळवता येतात. जे त्यांना हवे असतात, बाकी काही नाही.
इतरत्र त्यांचे स्वतःचे प्रतिसाद कायम निरर्थक, अनावश्यक आणि खोडसाळ असतात हे ते सोयीस्कर पणे विसरून जातात. चालायचेच कोणी सद्गुणांचा पुतळा थोडी असतो.

समजू शकतो तुमचा वैताग .
एकदा असचं हरीण आडवं आलं होतं केवळ काही सेकंदाने वाचलो पण त्या सेकंदात काय जबरदस्त दडपण आलं होतं .

इनामदार,
मी आधीच सांगितले होते.
आता गणपतीनंतर नवीन धागा झेला माझा.
गणपतीत मांसाहार शिकार खूनखराबा असा कुठलाही धागा नकोय मला.
पण त्यानंतर मात्र आपली येथील चर्चा घेऊन नवीन धागा काढेन. तुमची परवानगी आवश्यक आहे. जर तुम्हाला आपले मत योग्य वाटत असेल तर ती द्यालच Happy

गणपतीत मांसाहार शिकार खूनखराबा असा कुठलाही धागा नकोय मला.
>>> किती दिवसाचा गणपती असतो तुमच्याकडे... डिड , पाच की दहा दिवस.

Pages