असहिष्णु मिरवणूक

Submitted by निष्काम-कर्मयोगी on 25 August, 2017 - 05:31

सातव्या मजल्यावरील माझ्या सो कॉल्ड फर्निश्ड फ्लॅटमधनं समोरील झोपडपट्टी मधल्या गणपतीची रस्त्यावरून जाणारी मिरवणूक पाहत खिडकीशी उभा होतो, जशी डोलीबाजा मधल्या कॅसिओनी सरगम छेडली तशी माझ्या हातातली ८ महिन्यांची माझी मुलगी उड्या मारू लागली, सहज वाटलं खाली जाऊन पिल्लुला मिरवणुकीच क्लोज लुक द्यावा, लिफ्ट मधनं खाली उतरतांनाच तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तिला घेऊन चौका पर्यंत गेलो तेंव्हा डोलीबाजा वाजवणारी पोरं चित्र विचित्र धुनी काढून एकमेकांमधला सिन्क जुळवत होते. अगदी सुलभ सौचालायाच्या समोर एक ट्रक उभा होता ज्यामध्ये अष्टभुजाधारी शिवाचे रूप असलेले बाप्पा आरामात उभे होते.

मी बाप्पांचं दर्शन घेऊन ट्रकच्या पुढे येऊन मिरवणुकीपासुन थोड्या अंतरावर उभा राहिलो. ४-५ यूपी बिहारचे रिक्षावाले, बाजूच्या बिल्डिंग मधला वॉचमन, गिरणीवाला अब्दुल, सकाळी कचरा घ्यायला बिल्डिंग मध्ये येणाऱ्या २-३ बायका आणि त्यांची पोरंबाळं अशी सगळीजण मिरवणुकीत होती थोड्या अंतरावर तिथले भाई स्कॉर्पिओ (महाराजांचा फोटो गाडी मागे असलेली) लावून ६-७ तरुणांसोबत मिरवणुकीवर लक्ष ठेवत होते. रिक्षावाल्यांचा देवसभराचा मुबईतील ट्राफिक मध्ये रिक्षा चालवल्याचा थकवा दिसत होता, वॉचमन आणि गिरणीवाले अब्दुल भाई पण थोडे पेंगलेलेच दिसत होते, पोरंबाळं आरडाओरडा आणि धिंगाणा करण्यात गुंग होती. तितक्यात बेंजो ने धून छेडली ... पार्वतीच्या बाळा$$$$$$$$ आणि सगळेच थिरकू लागले. एक रिक्षावाला हातात पिशवी घेऊन ट्रक मागून आला आणि त्याच्याभोवती ५-६ जणांचा गराडा पडला, २-२ जणांनी आळीपाळी ने बाटल्या घेतल्या आणि तोंडाला लावल्या दोनच मिनिटात सगळे बेभान होऊन नाचू लागले. डॉल्बीवाल्या बोलावं तू माझ्या डीजेला ची धुन ऐकताच सगळ्यांना चेव आला. बायका पोरी लहान मुले सगळीच त्यात. तितक्यात एक सत्तरीच्या आसपासचे आजोबा खांद्यावर गुलालाचं पोतं घेऊन मिरवणुकीत शिरले, कुठून आली त्यांच्यात ते गुलालाचं पोतं उचलण्याची ताकत हे तो ट्रक मध्ये उभा असलेला देवच जाणे. मिरवणूक पुढे सरकत होती आणि बारगीन करून सेट केलेल्या डॉल्बीवाल्या मुलांना पण वाजवण्यात चेव येत होता. मी आपला रस्त्याच्या कडेला बँजोच्या धुनीवर हळूहळू पाय हलवत उभा होतो.

मुंगळा, तुझी घागर नळाला लाव, पोरी जरा जपून दांडा धर अशा भक्तिगीतात सगळे भक्तगण तर्रर्र झाले होते. किती कर्ज, दुःख, आजार, वेदना असतील त्या मिरवणुकीत पण प्रत्येक जण अगदी धुंद होऊन आपल्या जिवाभावाच्या मित्रांसोबत नाचत होता. गिरणीवाला अब्दुल, कचरा उचलणाऱ्या बायका आणि ते बिहारचे कोण्याजातीचे रिक्षावाले ह्याच त्याला काहीच वाटतं नव्हतं का, बरं सुलभ शौच्यालयाजवळ ट्रक उभकेला तेव्हासुध्दा काहीच बोलला नाही तो त्याला कसलंच वावगं कसं नव्हतं हेच कळायला मार्ग नव्हता मला.

फेसबुकवर इतकी असहिष्णुता वाढलेली असताना ते सगळेजण त्यांच्या गणपतीला घेऊन इतका आनंद कसा साजरा करू शकत होते हे मला सहनच झालं नाही. मी पिल्लूला घेऊन घरी आलो आणि लॅपटॉप घेऊन फेसबुक ओपन केलं तिथे तीन तलाक बद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या बंदीच्या निर्णयावर चर्चा सुरूच होती, मी सुद्धा चर्चेत सहभागी होऊन सहिष्णुतेबद्दल माझी मते मांडली आणि मुस्लिम लोक किती स्त्रियांवर शरिया नियमानुसार कसा अत्याचार करतात हे स्पष्ट केले.दुसऱ्या एका थ्रेड वर हाय कोर्टाने पदोन्नती मधील आरक्षणा वर बंदी जाहीर केलेल्या निर्णयावर चर्चा सुरु होती तिथेसुद्धा मी कसे काही श्रीमंत दलित (येस देअर आर मेनी) आरक्षणाचा उगाचंच लाभ घेत आहेत हे सांगितलं.
आताच मुंबईत घडून गेलेल्या किंवा घडवून आणलेल्या मराठा मोर्च्या मधून महाराष्ट्रा समोर आलेले मराठ्यांवरती झालेले अत्याचार, त्यांचं दारिद्र्य आणि आक्रोश बघून तर खुद्द बाबासाहेबाना ही स्वर्गा मधून वाटलं असेल की दलितांचं आरक्षण काढून देऊन टाकावं मराठ्यांना कारण तसेही आता आठवले साहेब दलितांना मार्गदर्शन आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी केंद्रात पोहोचलेच आहेत (त्यांच्या विद्वात्तेच्या बळावर).

उद्या सकाळच्या ट्राफिकचा, अशा असहिष्णु देशाच्या भवितव्याचा आणि एकतेचा विचार करत मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो, मागून धुन कानावर येत होती "चीर दु दुश्मन का जो सीना ऐसी गोली हु.."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users