बरेली की बर्फी - गोड तरीही चटकदार!

Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2017 - 07:34

इतकी निखळ रॉमकॉम हिंदीतच काय पण इंग्लिशमध्येही बर्‍याच दिवसांत पाहिली नव्हती! 'बरेली की बर्फी' सर्वात आधी काही असेल, तर एंटरटेनिंग आहे. निखळ धमाल करमणूक. बॉलीवूडमध्ये 'कॅरॅक्टर डेव्हलपमेंट' हा प्रकार इतक्या सुंदर रीतीने फार कमी वेळा पाहिला आहे, आणि कॉमेडीमध्ये तर जवळपास नाहीच. ह्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा ह्या 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंत खर्‍या आहेत. लोभसवाण्या आहेत. आणि प्रत्येक अभिनेत्याने त्या अ श क्य तोलल्या आहेत. कृती सनोनला अभिनय येत असावा अशी पुसट शंका आधीपासून होती, पण 'दिलवाले' आणि 'राबता'सारख्या सिनेमांमुळे ती आशा मावळत चालली होती. पण चांगली दिग्दर्शिका मिळाल्यावर काय नाही होऊ शकत महाराजा! दिल खुश कर देता तुस्सी!

स्त्री-दिग्दर्शक असलेल्या सिनेमांमधून आजकाल वेळोवेळी मला जाणवायला लागलेलं आहे, की 'रेप्रेझेंटेशन मॅटर्स'! स्त्री-दिग्दर्शक असलेले २-३ चांगले सिनेमे पाहिल्यावर जाणवतं, की स्त्री व्यक्तिरेखा चांगली उभी करण्यामागे त्यांच्या मनात अंतर्भूत स्वारस्य असतं, तसं फार कमी पुरूषांच्या मनात असतं. अश्विनी अय्यर-तिवारीने आधी 'निल बटे सन्नाटा'मध्ये सुंदर दिग्दर्शन केलंच होतं. आणि आता 'बरेली की बर्फी'मधून ती कृती सनोनच्या 'बिट्टी'ला योग्य न्याय देते. ही बिट्टी रूढार्थाने थोडीशी बिघडलेली, थोडीशी चढेल वाटते, पण मनाने अत्यंत निर्मळ आणि स्वतःला काय हवंय ह्याबद्दल क्लीअर असलेली आहे. तिला जास्त लाऊड न करता ठाम दाखवायची भट्टी कृती सनोनला चांगली लावता आली आहे. तिचा अभिनय बघून खरंच छान प्रसन्न वाटलं.

ह्या बिट्टीचं लग्न काही जुळत नाहीये. तिच्या घरचेही थोडे तिच्यासारखेच पण कमी अतरंगी आहेत. पण त्यांनाही मुलीची काळजी लागून राहतेच. घरचं मिठाईचं दुकान आहे, त्यामुळे तशी पैशाची फार काळजी नाही. बिट्टी स्वतः विद्युतविभागामध्ये तक्रारी (न) नोंदविण्याचं काम करते. पण असं सगळं असूनही तिच्या पुढारलेपणामुळे म्हणा, की आणखी कशाने म्हणा, योग काही येत नाही. अश्या ह्या बिट्टीच्या हातात एकदा 'बरेली की बर्फी' येते, आणि त्या बर्फीच्या हलवायाचा शोध घ्यायला ती आयुष्मान खुरानाचा 'चिराग' हाती घेऊन बाहेर पडते, आणि राजकुमार रावच्या 'विद्रोही'पणाकडे जाते. मग पुढे काय होतं, सगळा घोळ एकदाचा कसा मिटतो, काय काय कसं कसं होतं, हा खूप उत्कंठावर्धक प्रवास आहे. 'दंगल'चाच लेखक नितेश तिवारी इथे आहे, त्याचं आणि श्रेयस जैनचं हे लेखक म्हणून पुरेपूर यश आहे. चित्रपट अजिबात कंटाळवाणा न होता अगदी मजा करत करत शेवटाकडे येतो.

राजकुमार राव. राजकुमार राव. राजकुमार राव. काही दिवसांनी ह्या माणसाची असंच पाच अक्षरी नाव आणि दोन अक्षरी आडनाव असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील एका 'व्हेटेरन' अभिनेत्याशी तुलना व्हावी अशी परिस्थिती येईल, असं त्या अभिनेत्याचा आब राखूनही भाकित करायची इच्छा होते आहे. ह्याची 'नशा'च तशी आहे. Wink ज्या ज्या सीनमध्ये राजकुमार राव आहे, तो तो सीन त्याने अक्षरशः 'खाल्ला' आहे. साडी नेसण्याचे सीन असो, की ट्रॅफिक थांबवायचे सीन असो, हसून हसून पुरेवाट होते! दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा एकाच चालू सीनमध्ये सलग वठवायच्या, म्हणजे खायचं काम नाही. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण हसणं गमावत चाललो आहोत का, असं मला कधीकधी वाटतं. ह्या माणसाने ते रोजच्या जगण्यातलं हसणं साध्यासाध्या सीनमधून पुन्हा अधोरेखित केलं माझ्यासाठी. क्या बात! क्या बात! आयुष्मान खुरानाचा इतका चांगला वठवलेला 'चिराग'सुद्धा झाकोळून जातो. पण आयुष्मानचंही काम खरंच सुंदर. 'व्हाईट नाईट इन शायनिंग आर्मर' ते 'ग्रे शेड्स' हा प्रवास इतक्या सहजतेने त्याने उभा केला आहे, की बोलायची सोय नाही. कृती सनोनचा परफॉर्मन्सही वर म्हटल्याप्रमाणे लाजवाब. त्या व्यक्तिरेखेत मला आता आलिया भटलाही बघता येणार नाही. तिच्या चेहर्‍यावरचे भावही फार झरझर बदलतात, त्यामुळे ती फार लोभसवाणी आणि आपलीशी वाटते. त्या बर्फीसारखीच गोड. तिचे आईबाबा आणि आयुष्मानचा मित्रसुद्धा छोट्याछोट्या गोष्टींत भाव खाऊन जातात.

तुमच्याकडे चांगली गोष्ट सांगायला असेल, तर बाकी उणीवा थोड्याफार झाकल्या जातात, ह्याचं हा चित्रपट म्हणजे चांगलं उदाहरण आहे. शेवट थोडा बॉलीवूडी आहे, पण ते अपेक्षित आहे. शेवटी पिक्चरला स्टार पॉवर अशी नाही, त्यामुळे त्यांना बर्फीचा शेवट तसा चांगला करणं भाग आहे, पण तरी तो कुठे खोटा वाटत नाही, त्यामुळे त्रास होत नाही. मुख्य म्हणजे ह्यातली कुठलीच पात्रं कटकटी नाहीत, त्यामुळे मेलोड्रामा नाही. पुलंनी कुठल्याशा कीर्तनकार बुवांबद्दल म्हटलं होतं, की खारं बिस्कीट आपण चहात पूर्ण न बुडवता थोडीशी डूब देऊन ओलावा मिळवतो, तसं ते कीर्तन करतात. ह्या चित्रपटाचंही तसंच आहे. सगळेच अभिनेते आणि लेखक-दिग्दर्शक हे कुठेही 'अती' न करता भावनांचा एक छानसा ओलावा देऊन आपल्यासमोर हा चित्रपट सादर करतात. छान करमणूक होते. तेव्हा तुम्हाला शक्य असेल, तर हा चित्रपट चुकवू नका. बॉलीवूडमध्ये असे चित्रपट येत आहेत, ही मला खूप आश्वासक बाब वाटते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिती सॅनन कोण आहे? मला ती अजिबातच माहिती नाही.
आता सिनेमा बघायला हवा
>>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स
मला असा चित्रपट आलाय हे देखील ईथेच समजले. अन्यथा असे गोडूस नाव आणि स्टारकास्ट पाहता घरीही बघितला गेला नसता. आता गणपती सुट्टीचा फायदा उचलत हा विकेंड प्लान करू शकतो.
चित्रपट परीक्षण कम ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

छान लिहिलं या गोड सिनेम्यावर. आयुषमान आणि राजकुमार- दोघांचा त्यांच्या पहिल्क्या सिनेम्यापासूनच फॅन झालो. फार कमी काळात अभिनयाची मोठी उमज..
हे दोघेच नाही, तर बाकीचेही अ‍ॅक्टर्स आणि कथेची सरळ, प्रामाणिक मांडणी, एकंदरच नो नॉनसेन्स ट्रीटमेंट- हे सारंच मस्त आहे. पंकज त्रिपाठीचं बेअरिंग तर सॉलिड. "रात रात भर बाहर घुमती है. बेटी है हमारी, कोई चुडैल थोडी ना है.." इथंच सारं वसूल. बाकी सिनेमा बोनस म्हणून.
असे सिनेमे येणं, त्यांची संख्या वाढणं हे आपल्या ऑडियन्ससाठी आवश्यक आहे. यातूनच आणखी जरा जास्त डार्क सिनेम्यांकडे बघायची नजर मिळाली तर बरं होईल. 'लिप्स्टिक अंडर..' मधल्या रत्ना पाठक शहाच्या सीन्ससारख्या ठिकाणी फिदीफिदी हसणारे कोऑडियन्स बघून फार निराशा येते. ते त्यांच्या जागी बरोबर चूक काय असेल ते असोत बिचारे, पण आपलं कानकोंडं होतं आणि उठून फार पुढच्या रांगेत, जिथं कुणीच बसलेलं नसेल, अशा ठिकाणी बसून सिनेमा बघावा लागतो, हे थोडंसं वाईट.. Sad

सॉरी फॉर विषयांतर, भाचा. अशा सिनेम्यांवर लिहित राहा..

पंकज त्रिपाठी थिएटर अ‍ॅक्टर आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये आला असताना त्याने "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" गाण्यावर जगजीत सिंगची माफी मागून जे काही परफॉर्म केलं होतं ते लाजवाब होतं.

थँक्स एव्हरीबडी. Happy हा सिनेमा पाहिल्यावर जास्तीत जास्त लोकांनी हा पहावा असं वाटलं, म्हणूनच ही ओळख लिहिली.

साजिर्‍या, असे सिनेमे येणं, त्यांची संख्या वाढणं, ह्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणूनच हे लिहिल्याने तुझं विषयांतर मुळीच नाही. ह्यानिमित्ताने अशी चर्चा झाली, तर मला आनंदच आहे. <<"रात रात भर बाहर घुमती है. बेटी है हमारी, कोई चुडैल थोडी ना है.." इथंच सारं वसूल.>> हे विशेष आवडलं. Happy

किमान कथेमध्ये त्यांनी (सहाही व्यक्तिरेखा, आणि दिग्दर्शिका) इतका हलका फुलका आणि तरीही ताकदीचा 'चित्रपट' केला तेव्हा राहून राहून मला इम्तियाज अलीला शिव्या घालाव्या वाटत होत्या >> Happy

पंकज त्रिपाठी छोट्या रोलमधे पण चमकुन जातो. त्या अनारकली ऑफ आरामधेही भारी काम केले आहे.

हा सिनेमा पाहिल्यावर जास्तीत जास्त लोकांनी हा पहावा असं वाटलं, म्हणूनच ही ओळख लिहिली.>>जपानात या शनिवारी आहे एके ठिकाणी. तुझा रिव्ह्यु वाचुन बघायला जायचा विचार आहे.

प्राजक्ता, कपिल शर्माचा तो शो बघायला हवा.

पंकज त्रिपाठी छोट्या रोलमधे पण चमकुन जातो. त्या अनारकली ऑफ आरामधेही भारी काम केले आहे. >> तो आता बघायचा आहे.

तुझा रिव्ह्यु वाचुन बघायला जायचा विचार आहे. >> नक्की जा केपी. मस्त टाईमपास होईल.

लहान मुलांना ( वय वर्षे ७ आणि ५) घेऊन बघण्यासारखा आहे का? तुम्ही लिहिलेलं वाचून बघावासा तर वाटतोय ! >>

वावे, मला तरी ह्यात अश्लाघ्य काही असल्याचे आठवत नाही. व्हर्जिन असण्याचा उल्लेख एका प्रसंगात आहे, पण तो असा अंगावर येणारा नाही. ट्रेलरमध्ये तो प्रसंग बघू शकता वाटल्यास. बाकी कोणाला मी मिस केलेलं काही आठवलं तर सांगा. Happy

>>> अश्लाघ्य Lol तुम्हाला अश्लील म्हणायचं आहे का?
नाही, अश्लाघ्य शब्दच बरोबर आहे - केवळ अश्लीलच नव्हे तर मुलांनी पाहू नये असं अश्लील किंवा हिंसात्मक किंवा शिवराळ किंवा अन्य कुठल्या अर्थाने अनुचित असं त्यात काहीही नाही, असं म्हणतोय तो.

- केवळ अश्लीलच नव्हे तर मुलांनी पाहू नये असं अश्लील किंवा हिंसात्मक किंवा शिवराळ किंवा अन्य कुठल्या अर्थाने अनुचित असं त्यात काहीही नाही, असं म्हणतोय तो.>> मग तर खूपच चांगलं आहे

छान लिहिलय परिक्षण, मस्त आहे पिक्चर ,सगळीचं कॅरॅक्टर्स मस्त आहेत ,पण राजकुमार राव ने धमाल आणलीय, तो सुरुवातीला पान खाऊन कॅरॅक्टर चेंज करतो,तेव्हां नुस्त्या एक्स्प्रेश्न्सने गाडीतल्या मुलांना खाली बसायला सांगतो,तो सीन धमाल झालाय

कधीचा बघायचा होता तो आज बघुन आली..
फक्त १. राजकुमार राव आणि २. आयुष्यमान खुरानासाठी बघायचा ठरवला होता... किर्ती वॉज ओके ओके.. या दोघांसमोर तिच्याकडे लक्षच गेलं नाही का तर.. पंकज त्रिपाठी माझापन आवडता..
कपिल शर्माच्या शोमधला प्रसंग इथे साम्गितल्याबद्दल धन्यवाद.. मलापन बघायला मिळाला.. याम्च्यासारख्या सपोर्टींग रोलमधे काम करणार्‍या अभिनेत्यांनासुद्धा बोलावलं तिथे याचं कौतुक वाटलं मला..
पिच्चरमधला तो गाडी भर रस्त्यात आडवी लावतो तो सीन अफाट सुंदर वठवलाय राराने.. अजब मिश्रण दाखवलय त्याच्या पात्राचं... परत एकदा फक्त त्याच्यासाठी बघेल.. मला आयुष्यमान सुद्धा खुप आवडतो खरा पण खरच राराने खाल्लाय त्याला..
बाकी त्याचा,"अगर शकल देख के लडकीया शादी करती ना, तो हिंदुस्तान मे आधे लडके कवारे होते.." हा डायलॉग खुप आवडला Lol Proud

अनारकली आराहवाली हा त्यातल्या सार्‍या अभिनेत्यांसाठी बघायला गेली होती मी.. पहिल्या क्रमांकावर फक्त आणि फक्त संजय मिश्रा करिता..पंकज त्रिपाठी आणि इतरही सार्‍या कलाकारांच काम मस्तच आहे त्यात.. अगदी दिल्लीत गेल्यावर तिला मदत करणारा तो डिविडी विकणारा सुद्धा मस्त होता..

मी पाहिला हा चित्रपट .मस्त हलका फुलका आहे.टिपिकल एन्ड असला तरीही कंटाळा येत नाही.
मला राजकुमार आणि आयुष्यमानची काम आवडली. आयुष्यमानने मस्त काम केलेय. मूळचा वाईट नसणारा पण प्रेमासाठी वाटेल ते करणारा माणूस छान रंगवलाय.राजकुमारच भिगी बिल्ली टू राम्बो च रूपांतरण जबरी झालेय .कसला attitude देतो त्या गाडीच्या सिनमध्ये. पंकज त्रिपाठी पण मस्त काम करतो.
एकदातरी बघावाच हा सिनेमा

लहान मुलांना ( वय वर्षे ७ आणि ५) घेऊन बघण्यासारखा आहे का? तुम्ही लिहिलेलं वाचून बघावासा तर वाटतोय ! >> पिक्चर कूल आहे. कोवळ्या मनासाठी नाही पण.. तुम्ही मुलांशिवाय नक्की बघा...
सुरुवात सिगारेट्च्या सीनने होते.. मध्ये मध्ये होरो होरोईन सिगरेट/ दारु पित असतात..

पिक्चर कूल आहे. कोवळ्या मनासाठी नाही पण.. तुम्ही मुलांशिवाय नक्की बघा...>>>>> हे मी आधी वाचायला हवं होतं Sad तेव्हढे सीन वगळता सिनेमा खुप आवडला! सिगरेट वगैरे उगीचच दाखवलं आहे. त्याशिवाय ही बिट्टी बिनधास्त आणि वेगळी मुलगी आहे हे दाखवता आलं असतं. सिगारेट स्मोकिंग चे सीन हल्ली सिनेमात नसतात आणि असले तरी तिथेच वैधानिक इशारा असतो असा माझा गैरसमज होता तो दूर झाला....
एकुणात सिनेमा मस्त जमून आला आहे! जास्तीत जास्त लोकांनी बघावा म्हणून फेसबूक वर चेक इन पण केलं : D

बरेली की बर्फी मलाही खूप आवडला. चकाचक, परदेशात केलेली शूट्स, बडी स्टारकास्ट यापेक्षा असे स्मॉल टाईम सिनेमे बघायलाच छान वाटतात. मस्त रस्टीक कॅरेक्टर्स, फारसं नाव नसलेले पण गुणी कलाकार, कथा-संवाद यातही नाविन्य यामुळे काहीतरी छान बघीतल्याचं समाधान मिळतं. बद्रीनाथ की दुलहनीया सुद्धा याच कारणांकरता आवडला होता.

असा माझा गैरसमज होता तो दूर झाला....>> वैधानिक इशारा दाखवलाय ना...>>>> मी मेलबर्नमध्ये बघितला. त्या कॉपी वर वै इ नव्हता.
शर्मिला, you said it! असाच मला दम लगाके पण आवडला होता. त्यात आयुषमान खुराना किती बारीक होता.

मस्त मुव्ही. आत्ताच पाहिला व आवडला. राजकुमार राव ने कमाल केलीय. गुपचूप 'मिठा पान देना ' कुजबुजणारा आणि नंतर एकदम बेरिंग घेऊन गर्दीला गप्प बसवणारा विद्रोही मस्त दाखवलाय. हिरोईन सिगरेट व दारू पिते हे दाखवून ती बोल्ड आहे हे ठसवण्याची गरज नव्हती खरे तर.. आणि आमच्या इथेही कोपऱ्यात खाली वॉर्निंग होती.

चकाचक लोकेशन्स, डीझाईनर कपडे, मोठ्या हवेल्या यांचा उबग आलाय आता. यातले बिट्टीचे चिटकुले घर खूप खरे वाटते.

मला सर्वात जास्त आवडली ती पात्रांची भाषा. आजच्या युगातले इंग्रजी शब्द अधून मधून पेरत जी शुद्ध हिंदी बोलली गेलीय ती कानाला एकदम गोड वाटते.

माझ्या शेजारीच एक एकटी स्त्री 3 4 वर्षांच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेली. मूल खूप कंटाळलेले व आईशी गप्पा मारत होते. मला त्यामुळे काही संवाद नीट ऐकू आले नाहीत. आईनेही चित्रपट नीट पाहिला नाही कारण बेबीला गप्पा मारायच्या होत्या. लोकांना घरी मुले ठेऊन यायला जमतेच असे नाही हे मला माहित असल्याने मी काही बोलले नाही.

बघितला. आवडला Happy

वर आयुष्मान आणि राजकुमार राव बद्दल जे जे लिहीलंय त्या सर्वांनां प्रचंड अनुमोदन.
बिट्टी ची आई म्हणजेच पुर्वी हम लोग मध्ये दिसलेली बडकी (ना ?)

फिल्मोग्राफी:
राजकुमार राव - लव्ह सेक्स और धोका, रागिनी एमएमेस, कायपोछे, शाहीद, क्वीन, सिटीलाईट्स, डॉली की डोली, अलिगढ, ट्रॅप्ड, राबता, बहन होगी तेरी, बरेली की बर्फी. (कमिंग सूनः न्युटन, इत्तेफाक). तलाश आणि वासेपूरमध्येही दिसला होता, पण आता आठवत नाहीत त्याचे रोल. पुन्हा पाहायला पाहिजेत.
आयुषमान खुराना - विकी डोनर, मनमर्झियां, नौटंकी साला, हवाईजादा, दम लगाके हैशा, बेवकुफियां, आग्रा का डाबरा, मेरी प्यारी बिंदू, बरेली की बर्फी. (कमिंग सूनः शुभमंगल सावधान)

या दोघांनी निवडलेले (किंवा यांना ऑफर झालेले) सिनेमे बघितले तर यांची जातकुळी वेगळी आहे हे लक्षात येतं. राजकुमार रावची रेंज जास्त इंटेंस आणि वाईड आहे (हॉरर्/थ्रिलिंग फिल्म्सपासून ते ट्रॅप्ड्/सिटीलाईट्स आणि शिवाय कॉमेडी/ब्लॅक काँमेडीपर्यंत). पण तरीही आयुषमानचे विकी डोनर आणि दम लगाके- हे अविस्मरणीय सिनेमे.

Pages