शेवया, पास्ता वगैरे...

Submitted by sukhada on 19 August, 2017 - 16:19

शेवया

तुंबळ महायुद्ध होऊ घातले होते. दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयारच नव्हते. क्षेपणास्त्रे एकमेकांवर रोखलेली होती. जगाची उलथापालथ करणार्‍या ’जेवायला पोळीशी काय ?’ या गहन प्रश्नाचे उत्तर मी शेवयांची खीर करून चुटकीसरशी सोडविले. दूध, तूप, वेलची पूड आणि सढळ हस्ते काजू, बेदाणे, बद्दम घातलेली खीर खाऊन दोन्ही पक्ष तृप्तीची ढेकर देऊन झोपण्याच्या मार्गावर होते.

युद्धाचे ढग पुरते मावळून गेल्याने, मी शेवयांच्या जनकाचे आभार मानावे या हेतूने शोधकाम चालू केले. खरेच कोणी शोधल्या असाव्या शेवया ?? आजही शेवयांच्या शोधाचे श्रेय चीन किंवा इटली कोणाला द्यावे याचे वाद सुरू आहेतच. पण एकंदरीतच लोकांचा असा दावा आहे की चीनच ’शेवया’ या खाद्यप्रकाराचे उगमस्थान असावे व ’सिल्क रुट’ च्यामाध्यमातून हा खाद्यप्रकार अशिया, मध्य अशिया मार्गे युरोप मध्ये पोहोचला असावा. केवळ शेवया प्रकाराचे उगमस्थान शोधण्यासाठी एक अमेरिकन खाद्यवेडी सिल्क रूट मार्गे चीन ते युरोप भटकंती करून आली.
चीन मधे ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात नूडल्स खल्ले जात होते असा दावा ही केला जातो. मार्को पोलो १३व्या शतकात जेव्हा चीन मध्ये पोहोचला तेव्हा ’पास्त्या सारखा’ पदार्थ खाल्ल्याचे म्हणतो. थोडक्यात मार्कोपोलोच्या पुर्वीपासूनही इटली मध्ये पस्ता खाल्ला जात होता.
काहींच्या म्हणण्यानुसार पुर्वेकडे आणि पश्चिमे कडेही एकाच वेळी नुडल्स चा उगम झालेला असू शकतो. दक्षिण अशिया मधील देशांकडे चीन मार्गे नुडल्स पोहोचले असावेत तर इटली मधून मध्य अशिया वा युरोप मध्ये पोहोचले असवेत. त्याशिवाय वाळविलेल्या पास्त्याचे जनक अरबस्तान असल्याचा दावाही काही जण करतात. अरबांनीच पास्त्याचा शोध लावला असेही म्हटले जाते.

चीन मध्ये लांब शेवया हे दीर्घायुष्याचे लक्षण असल्याने शेवयांची लांबी जितकी लांब तितके चांगले. तसेच तिथे वाळविलेल्या शेवयांपेक्षा ताज्या शेवया करून खाण्यावर भर दिला जातो.

भारतात मात्र अरबांकडून शेवया पोहोचल्या असाव्या असे आपल्या खाद्यसंस्कृतीवरील त्यांचा प्रभाव पाहता संशोधकांचे म्हणणे आहे. भारतात शेवयांचे गोड पदार्थ जास्त प्रमाणात लोकप्रिय आहेत दक्षिण भारतात इडियप्पम हा ओल्या कुरडयांचा इडली प्रमाणे वाफवलेला नाश्त्याचा प्रकार व शेवयांचा उपमा खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात शेवयांप्रमाणेच गव्हले, नखोले, मालत्या, फणोले इत्यादी पास्ता सदृश पदार्थ लग्नकार्यात हमखास केले जातात. केवळ त्यांना गोड चवीतच पसंत केले जाते. देशावर कुरडया वाफवून भाजीही केली जाते. मृग नक्षत्र लागताच भरपूर पाऊस पडावा या हेतूने कोकण पट्ट्यात इडियप्पम प्रमाणे ओल्या शेवया करून नारळाच्या दुधासह खाल्ल्या जातात.

जपान, कोरीया, आणि संपूर्ण दक्षिणपूर्व अशियामध्ये शेवया विविध प्रकारे खाल्ल्या जातात. किर्गिझस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, अझर्बैजान, पर्शिया इत्यादी भागात 'केस्मे' किंवा 'रेश्ते' या नावाने शेवया ओळखल्या जातात. शेवयांचे पीठ भिजवताना त्यात अंडे वापरले जाते. अशाच प्रकारे जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, हंगेरी इत्यादी युरोपिय देशांत 'श्पेत्झ्ले' नावाने शेवया बनविल्या जातात. पर्शियन फालुदा तर आपल्या अगदी आवडीचा आहे. एकोणीसाव्या शतकात इजिप्त मध्ये 'कोशॅरी' नावाने भात डाळ आणि मॅकरोनी पास्ता घातलेली खिचडी बनवू लागले. लिबिया, मोरोक्को, टुनिशिया सरख्या अफ्रिकन देशांत भरपूर भाज्या घातलेला 'खुसखुस' नावाचा गव्हाच्या रव्यापासून बनविलेला ज्वारीच्या दाण्याएव्हढा पास्ता खाल्ला जातो. इटलीचे तर काय सांगावे ! त्यांनी पास्त्याचे ३००-३५० प्रकार बनविले आहेत !

तर थोडक्यात काय तर पास्ता किंवा शेवया यांचे उगमस्थान कोणतेही असले तरी प्रत्येक देशाने, संस्कृतीने आपापल्या परीने त्याला समृद्ध केले हे निश्चित ! अशा शेवया लहानथोरांना सारख्याच प्रिय आहेत यात काय नवल !!

माहितीचा स्रोत : आंतरजाल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख.
शेवयांचा इतिहास न् व्याप्ति माहित नव्हती. धन्यवाद. Happy