नाते जुडून गेले

Submitted by निशिकांत on 17 August, 2017 - 01:01

( एका नराधमाने आपल्या मुलीवर सतत नऊ वर्षे बलत्कार केल्याची घटना २००९ मधे वर्तमानपत्रात आली होती. त्या वरून पिडित मुलीचे मनोगत व्यक्त करणारी मला सुचलेली रचना ).

कसले नशीब माझे?
का हे घडून गेले?
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

रक्षा जिची करावी
तिजलाच लक्ष्य केले
निष्पाप पाडसाला
त्यानेच भक्ष्य केले
राहू समेत केतू
दारी रडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

जल्लाद हवा शिकण्या
फंदा कसा कसावा?
बापास सुळी देण्या
आक्षेप का असावा?
दररोज एक मृत्यू
जगता चिडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

नाती अनेक जगती
फसवा आलेख आहे
मादी सदा नराची
कटु सत्य एक आहे
आकाश वळचणीला
तारे झडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

नाना, नकोय मामा
काकाविना जगावे
अदृष्य राक्षसांना
झोपेत घाबरावे
भयमुक्त विश्व कोठे
आहे दडून गेले?
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

बडवू नकात टिमकी
श्रीमंत संस्कृतीची
नात्यात गुंफलेली
मी गोष्ट विकृतीची
पापात पुण्य सारे
आहे बुडून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

भगवंत मायबापा
जर का असेल माया
आई बनून येई
नेण्यास भ्रष्ट काया
बघता पित्यास, वाटे
नाते विटून गेले
अंधार वेदनांशी
नाते जुडून गेले

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users