आय एम अ‍ॅट पीस - ऊत्तरार्ध

Submitted by हायझेनबर्ग on 7 August, 2017 - 01:27

गुड मॉर्निंग डॉक्टर ग्रे.

गुड मॉर्निंग मिस करी....बरोबर ?.. तुम्हीच मेल पाठवलात ना काल रात्री, सकाळची पहिली अपॉईंटमेंट मिळेल का म्हणून? - सत्तरी पार केलेले, दाट पांढर्‍या आणि कुरूळ्या केसांचे डॉ.ग्रे त्यांच्या सोनेरी फ्रेमच्या चष्म्यातून त्यांच्या केबिनच्या दारात ऊभ्या डॉ. करींकडे बघत म्हणाले.

हो डॉ. ग्रे मीच पाठवला होता आणि धन्यवाद एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही मला भेटायचे मान्य केलेत.

मला आनंदच आहे माझ्या दिवसाची सुरूवात तुमच्यासारख्या सुंदर मुलीशी भेटीने होत आहे. आता वयोमानामुळे मी प्रॅक्टिस करीत नसलो आणि विजिटर्सना मी दुपारनंतरच भेटणे पसंत करत असलो तरी, माझ्या रिसर्चच्या कामासाठी मी सकाळीच ऑफिसला येतो. तुम्ही माझ्या १९९२ च्या टोरोंटो कॉन्फरन्सचा हवाला देत भेट हवी म्हणालात तेव्हा खरं सांगतो एवढ्या वर्षांपुर्वीचा रेफरंस लक्षात ठेवून कोणी येत आहे म्हंटल्यावर माझा ईगो जरा सुखावलाच.
या, तुम्ही ह्या ईथे सोफ्यावर बसा आणि मी ह्या बाजूच्या खुर्चीत बसतो. तुम्हाला सांगतो मी जेव्हा प्रॅक्टीस करत असे तेव्हा ह्या खुर्चीत बसून खूप केसेस मी सोडवल्या आहेत. तुम्ही काही केस नाहीत पण ऊगाच थोडी जुन्या दिवसांची आठवण, हॅ हॅ हॅ.

ओह, धन्यवाद डॉक्टर! तुमच्या कुठल्याही स्पीचचा रेफरंस विसरण्यासारखा नसतो आणि केसेस बद्दल तुम्ही म्हणालात ते नक्कीच खरे असेल.

बरं बरं! आता तुम्ही मला खजील करत आहात. सांगा बरं तुमची काय मदत करू शकतो मी ?

डॉ. मला मानवी मेंदूच्या निर्णयक्षमतेबद्दल काही महत्वाचे जाणून घेवून त्याबाबतीत तुमच्याशी चर्चा करायची आहे. ह्या विषयात तुमच्या ज्ञान आणि योगदानाशी बरोबरी करणारा दुसरा तज्ञ कोणी नाही. ह्या विषयातल्या तुमच्या शब्दाला आणि संशोधनाला मोठा मान आहे असे मला माझा रिसर्च सांगतो.

हे काही खरे नाही मिस करी. ह्या विषयात, डॉ. हिलमन, डॉ. हॅसेट ह्यांचेही काम खूप मोठे, महत्वाचे आणि प्रशंसनीय आहे . आजवर आम्हाला म्हणजे आपल्याला मानवी मेंदुचे निर्णय कार्य कसे चालते ह्याबाबत जी काही माहिती ऊपलब्धं आहे ती काही कोण्या एकाची कामगिरी नक्कीच नाही. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचेच फळ आहे ते.
असो! तुम्ही डिसिजन मेकिंगबद्दल विचारले पण काही नेमका प्रश्नं आहे का ज्याचे ऊत्तर रेफरंस बुक्स किंवा सायन्स जर्नल्स वाचून मिळाले नसते. एखादे टोक पकडून चर्चा सुरू करणे बरे पडेल आपल्याला.

डॉ. मला ह्या विषयाच्या शास्त्रीय मानवी आणि मेंदुच्या मेडिकल डीटेल्स मध्ये रस नाही, त्याची ईत्यंभूत माहिती मला आगोदरंच आहे. पण ह्युमन सायकॉलॉजीचा थोडक्यात मानसशास्त्राचा धागा पकडून तुम्ही मला सांगू शकाल का -
'जर माझ्या दोन हाताला दोन दरवाजे आहेत आणि त्या दरवाज्यांपलिकडे काय आहे हे मला माहित नाही तर मी कुठला दरवाजा पहिले निवडेन?'

हं! एवढ्याश्या माहितीवर सोडवण्यासाठी भलताच अवघड प्रश्नं आहे हा, मिस करी.
तुम्ही तिथे त्या दरवाज्यांसमोर का ऊभ्या आहात ते कळेल का?

नाही. काहीच कारण नाही पण आपण असे समजू तिथून पुढे जाण्यासाठीचा जिना दोघांपैकी एकाच दरवाजातून गेल्यास मला मिळू शकतो. पण नेमक्या कुठल्या ते मला माहित नाही.

अच्छा. दोन्ही दरवाज्यांचा रंग?

रंग, त्या रंगाची शेड, ऊंची, रुंदी सगळं अगदी तंतोतंत सारखं आहे.

तुम्ही एका पेक्षा दुसर्या दरवाजाच्या जवळ ऊभे असाल तर तुम्ही जवळचा दरवाजा निवडण्याची शक्यता जास्तं आहे.

नाही. मी दोन्ही दरवाजांपासून अगदी समसमान अंतरावर ऊभी आहे. ना एक ईंच ईकडे ना एक ईंच तिकडे.

तुम्हाला दरवाजाच्या दिशा माहित आहेत का पूर्व-पश्चिम, ऊत्तर दक्षिण असे?

नाही. अशी कुठलीही माहिती माझ्याकडे नाही.

तुमच्या घराचे वा ऑफिसचे दरवाजे कमी अधिक प्रमाणात साधारणतः कुठल्या हाताला आहेत?

समजा त्यांचीही म्हणजे ऊजव्या आणि डाव्या हाताला ऊघडणार्या दरवाज्यांची संख्या समसमान आहे.

तुम्ही स्वतः ऊजव्या हाताच्या आहात की डावखुर्‍या?

समजा मी दोन्ही हातांनी सगळी कामं करू शकते, मी अँबीडेक्स्ट्र्स आहे.

खरंतर कुठलाही अँबीडेक्स्ट्र्स मनुष्य एका हाताने कांकणभर का होईना डॉमिनेटिंग असतोच, पण चला ह्या खेळासाठी आपण तुम्ही 'ट्रू अँबीडेक्स्ट्र्स' आहात असे समजू. आता तुम्ही खरेतर हे फारंच अवघड बनवून टाकले पण आम्हा सायकॉलॉजिस्ट लोकांची ऊत्सुकता फार दांडगी असते मिस करी. मी आत्तापर्यंत दिलेल्या सगळ्या ऊत्तरांमध्ये मेंदू कसा चढत्या भाजणीने एक निर्णय घेण्यासाठी कारणं शोधतो त्याचे प्रत्यंतर दिले. पण आता हे वेगळ्या लेवलवर जात आहे असे वाटते. - डॉ. ग्रे खुर्चीत हलकेच सावरून बसल्याचे डॉ. करींच्या नजरेने टिपले.
मला वाटते माझे पुढचे वाक्यं तुमच्या प्रश्नाचे ऊत्तर मिळण्यासाठी नक्कीच मदत करेल. पण मी तुम्हाला आता ऊत्तर न देता ऊलटप्रश्नंच विचारणार आहे. - 'तुमचे अंतर्ज्ञान तुम्हाला काय सांगते? जिना ऊजव्या दरवाज्यातून असेल की डाव्या?'

अंतर्ज्ञान? ते मला का काही सांगेल डॉ. जर त्या जागी यापूर्वी मी कधीच आली नसेल?

आपला मेंदू ही मोठी गंमतीशीर गोष्टं आहे मिस करी. ज्यात काही स्वाभाविक गोष्टी (instinct) आणि काही अंतर्ज्ञान (intuition) आगोदरंच ठासून भरलेले असते. हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला काही वेगळा प्रयास करावा लागत नाही. हो! तुम्ही प्रयत्नपूर्वक ह्या ज्ञानाचा दर्जा नक्कीच सुधारू शकता. ऊदा. तुम्ही खाली पार्किंगमध्ये गाडीच्या ड्रायवर सीटमधून ऊतरला तेव्हा तुमचा आजिबात गोंधळ ऊडाला नाही की तुम्हाला ऊजवा पाय बाहेर टाकायचा आहे की डावा. तुम्ही स्वाभाविकपणे आपोआप डावा पाय बाहेर टाकला. ऊद्या तुम्ही दुसर्या कार मध्ये बसलात तरी तुम्ही ऊतरतांना तोचा डावा पाय पहिल्याने बाहेर टाकाल त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागणार नाही.
अंतर्ज्ञान ही पुढची पायरी. एखादी गोष्टं करण्यासाठी पुरेशी माहिती ऊपलद्बं नसतांनाही तुमचा मेंदू तुम्हाला बहूतेक वेळा अचूक कौल देतो आणि त्यासाठी तुम्हाला काही कारणीमीमांसा करत बसण्याची गरज पडत नाही.
ऊदाहरणार्थ तुमचेच दोन दरवाजाचे ऊदाहरण पुन्हा बघू. समजा तुमच्यामागे कोणी सुरा घेवून मारण्यासाठी आले?
आता तुम्ही तरूण आणि सुंदर आहात त्यामुळे तुमच्याबरोबर असे काही होणार नाही ह्याची मला खात्री आहे, पण माझ्यासारख्या खत्रुड म्हातार्याच्या बाबतीत असे नक्कीच होऊ शकते हॅ हॅ हॅ.
पण समजा एखादा माणूस सुरा घेवून तुमच्या मागे आलाच तर तुमचा मेंदू तुम्हाला पटकन एका निश्चित दरवाजातून जाण्यास सांगणार. तेव्हा तुम्ही ऊजवा की डावा निवडाल ह्यासाठी काही ठोस कारण तुमच्याकडे असेलच असे नाही पण तुम्ही ताटकळत न राहता ह्या एका दरवाजाच्या मागेच जिना असेल ह्या विश्वासाने ऊजवा किंवा डावा दरवाजा ऊघडून जाल. आता खरंतर नेमका त्याच दरवाज्यामागे जिना असण्याची शक्यता दुसर्या दरवाज्याएवढीच म्हणजे ५०% च आहे पण तुमच्या मेंदुने तुम्हाला ताटकळत न ठेवता कौल दिला हे महवाचे.

पण डॉ. माझ्या मागे सुरा घेवून लागलेला माणूस आणि मी ऊजव्या हाताचा दरवाजा निवडणे ह्यातला परस्पर संबंध नेमका काय? मी का ऊजव्याच हाताचा दरवाजा निवडीन.

कारण तुम्ही घाबरलेला असाल आणि लवकर सुटका करून घेण्याची तुमची प्रबळ ईच्छा असेल, तेव्हा तुमचा मेंदू तुम्हाला ऊजवीकडे किंवा डावीकडे जाण्याचा कौल देईलच.

पण हातात सुरा असलेल्या माणसाला मी का घाबरीन? आणि घाबरले म्हणून मी बरोबर दरवाजा कसा निवडू शकेन?

मग तुमच्या मते तुम्ही काय कराल?

मला जोपर्यंत ठाम माहित नाही कुठल्या दरवाजामागे जिना आहे तोवर मी तिथेच ऊभी राहीन. सुरा घेवून कोणी माणूस येत असेन तरीही मी तिथेच थांबून राहीन.

आणि मग त्याने तुम्हाला मारण्यासाठी सुरा ऊगारला तर?

तर मी त्याला म्हणेन 'तू असे करू नकोस, विनाकारण कुणाला मारणे चूक आहे.'

जर त्याने सुरा दाखवत तुमच्या गळ्यातल्या ह्या मोत्यांच्या नेकलेसची मागणी केली तर.

तर मी त्याला म्हणेन 'हे नेकलेस माझे आहे आणि ते मी तुला द्यावे अशी माझी ईच्छा नाही'

आणि मग तुम्ही नेकलेस दिले नाही म्हणून त्याने खरंच चाकूचा वार केला तर?

असे झाले तर तर ते फार दुर्दैवी असेल.

विनाकारण तुम्ही जखमी व्हाल, वेदना होतील, रक्त ही येईल.

हो असे होईल हे खरे आहे.

हे सगळे टाळणे शक्य होते जर तुम्ही एखादा दरवाजा ऊघडला असता.

असे म्हणता येणार नाही. कारण त्या माणसाचा असे काही करण्याचा ईरादा असेल हे मी आधीच कसे सांगू शकणार? दरवाजा ऊघडण्यासाठी तुम्ही माझ्या मनात भितीची भावना ऊत्पन्न करून मेंदूला मुळात अस्तित्वातंच नसलेले कारण कसे देवू शकता.

हं! आता ह्या चर्चेने फारंच आश्चर्यकारक वळण घेतले आहे. - खुर्चीत पुन्हा एकदा सावरून बसलेल्या डॉ. ग्रेंच्या डोळ्यात डॉ. करींना अस्वस्थता डोकावलेली दिसली.
मला सांगा मिस करी तुम्ही ऊदासीनता (apathy) शब्दं ऐकला आहे का? त्याचा नेमका अर्थ तुम्हाला माहित आहे का?

हो नक्कीच हा शब्दं ऐकला आहे आणि त्याचा अर्थही मला ठाऊकच आहे.

तर मग मला आता सांगा, हातात सुरा घेवून येणारा माणूस पाहूनही तुम्ही जीव वाचवण्यासाठी एखादा दरवाजा ऊघडून बघणार नाही म्हणता....

हो, कारण दरवाजा ऊघडण्यासाठी माझ्याकडे...

हो हो मला माहित आहे नेमका दरवाजा ऊघडण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी माहिती नाही. - आपले वाक्यं मध्येच तोडतांना डॉ. ग्रेंच्या आवाजात डोकावलेला किंचित वैताग लक्षात येवूनही डॉ. करींच्या चेहर्यावर एकंही भाव ऊमटला नाही. पापणी लवली नाही की नजर हटली नाही.

बरोबर.

तर मग मला सांगा.. तुम्ही तुमच्या सुरक्षिततेप्रती ऊदासीन आहात असे आपण म्हणू शकतो का?

नाही. मी माझ्या सुरक्षिततेप्रती ऊदासीन नाही? एक दरवाजा ऊघडून जाण्यासाठी पुरेशी माहिती नसणे हे काही ऊदासीनतेचे कारण होत नाही.

तुम्ही काही कारणाने जसे काम, कुटुंब, मित्रं वगैरे निराश आहात असे म्हणता येईल का?

नाही. मी निराश नाही. माझ्या कामाबद्दल मला आवड (passion) वाटते. सध्या मला कोणी कुटुंब नाही पण मित्रं आहेत आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते.

मग त्या माणसाकडून वेदना मिळण्याची जी शक्यता आहे ती आजमावण्याची ईच्छा तुम्हाला आहे का?

नाही. मला अपघाताने झालेल्या शारिरिक वेदनेचा अनुभव आहे. मला कुठलीही वेदना नको आहे.

मग तुमच्या मनात ह्या ईहलोकातून चटकन निघून जाण्याची किंवा आत्महत्येसारखी काही भावना रुजली आहे का?

नाही. मला आयुष्यं जगण्याची, काम करण्याची, सुरक्षित राहण्याची ईच्छा आहे.

हे अशक्यं आहे मिस करी हे अशक्य आहे. तुम्ही दोन्ही पैकी एक दरवाजा ऊघडलाच पाहिजे. तुम्ही ताटकळत ऊभ्या राहू शकत नाही. तुमचा मेंदू तुम्हाला असे करण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही एक तरी दरवाजा ऊघडून आत गेलंच पाहिजे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे. कुठलाही नॉर्मल माणूस घेईल, भितीची भावना, जाणीव ठाऊक असलेला कुठलाही जिवंत प्राणी निर्णय घेईल. - डॉ. ग्रेंचा चढलेला आवाज डॉ. करींनी नक्कीच टिपला होता पण त्याने त्यांना काहीच फरक पडला नव्हता हे कुणाही बघणार्याच्या लक्षात आले असते.

काय निर्णय घेईल नॉर्मल माणूस डॉ. ग्रे? डावा दरवाजा ऊघडावा की ऊजवा? आणि काय कारण असेल त्याच्याकडे दरवाजा ऊघडण्यासाठी?

एक सायकॉलॉजिस्ट म्हणून तुम्हाला पटण्यासारखे तुमच्या प्रश्नाचे ऊत्तर माझ्याकडे नाहीये मिस करी आणि मला हे सांगतांना अतिशय खेद वाटतो आहे. आपली मिटिंग आपण आता आवरती घेऊया मला काही महत्वाचे काम संपवायचे आहे.

हे खरे नाहीये डॉ. ग्रे. माझ्या प्रश्नाचे ऊत्तर तुमच्याकडे आहे आणि ते तुम्हालाही माहित आहे. १९९२ च्या टोरोंटो मधल्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही त्याचा ऊल्लेखही केला होतात. आपली ईथपर्यंत झालेली चर्चा मी कुठल्याही सायकॉलॉजिस्ट बरोबरही करू शकले असते पण मी ईथे येण्याचे खास कारण की...

कारण मी फिलॉसॉफीमध्येही डॉक्टरेट मिळवली आहे आणि १९९२ च्या त्या टोरोंटो कॉन्फरन्समधल्या माझ्या रिसर्च पेपरचा तो खास विषय.

बरोबर, डॉ. ग्रे. तुम्ही अचूक ओळखलेत.

खूप जुनी गोष्टं आहे ती मिस करी आणि त्या कॉन्फरन्स नंतर त्या विषयावरचे माझे संशोधनही मी थांबवले आहे. - डॉ. ग्रेंच्या आवाजात निराशा अवतरली होती.

मला माहित आहे. सायकॉलॉजीशी तुमच्या फिलॉसॉफी विषयातल्या मुशाफिरीची सांगड घालत जो रिसर्च पेपर त्या अतिशय खाजगी आणि मोजक्याच फिलॉसॉफीतल्या तज्ञ लोकांच्या वर्तुळात तुम्ही वाचला होता तेव्हा तुमची बरीच खिल्ली ऊडवली गेली होती. निराश होत तुम्ही फिलॉसॉफीशी निगडीत चालू केलेले संशोधन बंद करून पूर्ण वेळ सायकॉलॉजीलाच वाहून घेतले.

खरे आहे हे मिस करी. फार जिव्हारी लागली होती ती टीका माझ्या.
पण तुम्ही तर वयाने फार लहान दिसता फार फार तर पंचविशीच्या असाल, मग तुम्हाला माझ्या तीन दशकांपूर्वीच्या रिसर्च पेपर बद्दलची माहिती कुठून आणि कशी मिळाली? - डॉ. ग्रेंच्या चेहर्यावर साशंकता आणि त्याजोडीला त्यांच्या चष्म्याएवढे प्रश्नचिन्हं सप्ष्टं दिसत होते.

त्या कॉन्फरन्समध्ये सगळ्याच तज्ञांनी तुमच्या संशोधनाची खिल्ली ऊडवली असली तरी एक व्यक्ती अशी होती जिला तुमच्या संशोधनाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास वाटत होता. तुमच्या संशोधनाने त्यांना नवी दृष्टी, नवा मार्ग मिळवून दिला. ईतर तज्ञांनी वाळीत टाकू नये ह्या भितीपोटी त्यांनी ऊघडपणे तुमचे म्हणणे ऊचलून धरले नाही की कधी तुमच्याशी संपर्क साधला नाही. पण तुम्ही दाखवलेल्या शक्यतेवर त्यांनी लपतछपत का होईना स्वतःचे शोधकार्य चालू ठेवले.

काय सांगता मिस करी. हे सगळे अविश्वसनीय आहे. माझा आजिबात विश्वास बसत नाहीये तुमच्या बोलण्यावर पण तुमची नजर आणि चेहर्यावरती आजिबात न दिसणारा अभिनिवेष मला सांगत आहे की तुम्ही खोटे बोलत नाही आहात. - डॉ. ग्रेंच्या चेहर्यावरच्या साशंकतेची जागा अचानक ऊत्सुकतेने घेतली.

मी कधीच खोटं बोलत नाही डॉ. ग्रे. मी सांगितलेले सगळे खरे आहे.

कोणं? कोण आहेत ते तज्ञ? मला त्यांना भेटायचे आहे. त्यांच्याशी त्यांच्या संशोधनाविषयी चर्चा करायची आहे. मला कृपया त्यांची माहिती द्या.

माफ करा डॉ. ग्रे, ते शक्य नाही कारण ती व्यक्ती आता हयात नाही.

काय? अरेरे हे फार वाईट झाले.

काय नाव म्हणालात त्यांचे? कुठल्या युनिवर्सिटीशी संलग्न होते ते?

नाही. त्यांचे किंवा त्यांच्या युनिवर्सिटीचे नाव मी तुम्हाला अजून सांगितले नाही. ती माहिती मी तुम्हाला सांगणारही नाही कारण हे सगळे गुप्तं रहावे अशीच त्यांची कायम ईच्छा होती.

पण का?

कारण मला माहित नाही डॉ. ग्रे. पण तुम्ही आजिबात चूक नव्हतात आणि तुमचे संशोधन योग्य होते हे तुम्हाला कळावे हे त्यांना आवर्जून वाटंत होते.

ठीक आहे मिस करी. त्यांच्या ईच्छेचा मान आपण राखला पाहिजे. एक शास्त्रज्ञ जेव्हा त्याच्या शोधाचे अस्तित्व जगापासून लपवून ठेवू ईच्छितो तेव्हा त्याची कारणे नक्कीच तितकी महत्वाची असतात असे मला माझा अनुभव सांगतो.
पण मग तुम्ही मला हे सगळे आता का सांगता आहात ?

कारण मला माझ्या प्रश्नाचे ऊत्तर हवे आहे डॉ. मी कोणता दरवाजा निवडेन आणि का?

तुमच्या प्रश्नाचे ऊत्तर तत्वज्ञानात आहे मिस करी, मानसशास्त्रात नव्हे.
तुम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही, कुठलाही दरवाजा ऊघडणार नाही. तुम्हाला सुरा हातात असलेल्या माणसाची भितीच वाटेल की नाही हा पहिला प्रश्नं आहे. मुळात अशी भितीच तुमच्या मेंदुला माहित नसल्याने तुम्ही कुठलाही दरवाजा न ऊघडता तिथेच थांबाल. - अचानक चालता चालता जुन्या ओळखींच्या वाटा दिसल्यावर वाटसरूच्या झपाझप पडणाअर्‍या पावलांना वाटावा तसा विश्वास डॉ. ग्रेंच्या चेहर्यावर झळकला.

पण असे मी का करेन डॉ.

प्रशांतता मिस करी, प्रशांतता (ataraxia). भिती सारखी प्रशांतता ही काही मानवी मनात अस्तित्वात असलेली भावना नाही की मनाची स्थिती नाही. कठोर साधनेने कदाचित काही क्षणांसाठी मिळवता येईल अशी अवस्था आहे प्रशांतता म्हणजे. ह्याबाबतीत प्राचीन लोक आपल्यापेक्षा फार नशीबवान म्हणावे लागतील.
प्राचीन ग्रीक कालखंडात एपिक्युरस ने ही अवस्था प्राप्त करण्यासाठी स्वतःला जगरहाटीतून दूर नेले, प्रेमळ आणि स्वच्छंदी लोकांचा मोठा गोतावळा जमवला. घर, पैसा, मान, वासना ह्यांचा त्याग केला. त्याकाळी लोकांच्या रोमारोमात भरून राहिलेली 'देवांबद्दलची भिती' देखील त्याने मनाच्या पटलावरून कायची पुसून टाकली.
पिरोहने तर आपल्या मनाच्या अगदीच शाश्वत अश्या हे चांगले ते वाईट असे वर्गीकरण करण्याच्या मूलधर्मालाच बदलण्याचे कसब कठोर मेहनतीने आत्मसात केले. हा मूलधर्मच सगळ्या दु:खांचे, वेदनांचे मूळ आहे. जगात जे काही आहे, जसे आहे ते सर्वं चांगलेच आहे आणि म्हणून मला प्रिय आहे असे त्याने स्वतःलाच आणि ईतरांना शिकवले.
आणि स्टॉईसिझमचा पाया रचणार्‍या झेनो ने कुठल्याही गोष्टीची आवड निर्माण होणे ह्या मनाच्या प्रवाहीपणालाच बांध घालत अलिप्तता आणि आनंद असा सुरेख संगम रूजवण्याचा प्रयत्न केला.
पण एवढे सगळे विविध मार्ग पत्करून ह्या तिघांनी काय मिळवले तर काही मोजक्या आणि भंगूर क्षणांच्या प्रशांततेचा भास. ह्या तिघांच्याही आधी आणि नंतरही अनेक विद्वान आणि महात्मे ह्या मार्गाने गेले.
गौतम बुद्धांनी मात्रं नक्कीच परमसाधनेने चिरकाल टिकणारी खरीखुरी प्रशांतता अनुभवली असावी असे मला वाटते.
पण तुम्हाला सांगतो मिस करी प्रशांतता ही एक अतिशय दुर्मिळ आणि क्षणिक अशी अनुभवण्याची गोष्टं आहे, ही काही मानसिक अवस्था असू शकत नाही. म्हणून तुमच्या प्रश्नाचे ऊत्तर आपल्याला सायकॉलॉजीत नव्हे तर फिलॉसॉफीत मिळाले. कोणी प्रशांततेत घालवलेला एकही क्षण आयुष्य बदलवून टाकू शकेल त्या व्यक्तीचं आणि कदाचित जगाचंही.
"प्रगत मेडिकल सायन्स आणि सायकॉलॉजीच्या मदतीने आपण असे प्रशांततेने भारलेल क्षण तयार करून अनुभवू शकतो का?"
हाच माझा टोरोंटो मधल्या कॉन्फरन्स मध्ये मी वाचलेल्या पेपरचा विषय होता जो दुर्दैवाने कुणालाही गंभीरतेने घ्यावासा वाटला नाही. - एक दीर्घ सुस्कारा सोडत डॉ. ग्रेंची धीरगंभीर चर्या भोवर्‍यात खेचल्या जाणार्‍या हतबल नावेसारखी झाली.

आले माझ्या लक्षात. पण डॉ. प्रशांतता ही कुणाची मनोवस्था असू शकते का?

काय? हे हे! तुमचा प्रश्नं त्या नुकतीच जादुची पुस्तकं वाचू लागलेल्या लहानग्या मुलीसारखा आहे मिस करी.
ती आईला विचारते ना, 'आई परी खरेच असते का? मस्त्यकन्या खरंच समुद्रात राहतात का? मला खरेच एक दिवस परीस मिळेल का?
असा काहीसा आहे तुमचा प्रश्नं मिस करी. ज्याचे ऊत्तर द्यायला कदाचित बुद्धालाच खाली यावे लागेल. - डॉ. ग्रेंच्या डोळ्यात मिष्किलपणा डोकावला.

धन्यवाद डॉ. ग्रे. माझ्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं मला मिळाली. फार छान झाली आपली चर्चा. खूप महत्वाची माहिती मिळाली. तुमचे आभार मानण्यासाठी मी तुमच्यासाठी काही करू शकते का?

मलाही खूप आनंद झाला , खूप छान वाटले तुमच्याशी चर्चा करून मिस करी. अनेक वर्षात तुमच्या एवढा संयत आणि अभ्यासू श्रोता मिळाल्याचे
मला आठवत नाहीये मिस करी. खरे तर मीच तुमचे धन्यवाद मानायला हवेत.
पण मला माझ्या एका प्रश्नाचं ऊत्तर द्या, तुम्ही ह्या विषयात संशोधन करत आहात का?

नाही, 'अजून तरी नाही'.

जाता जाता मी एक शेवटचा प्रश्नं विचारू शकते का डॉ.?

येस्स! काय आहे तुमचा प्रश्नं?

तो सुरा घेवून अंगावर धावून येणारा माणूस देवदत्त असता तर बुद्धाने काय केले असते ?

माहित नाही मिस करी. कदाचित 'देवदत्ता तू असे करू नकोस, कुणालाही वेदना देणे चूक आहे' असे म्हणाला असता आणि न थांबता पुढे चालू लागला असता. पण त्याही परिस्थितीत प्रशांतता त्यांच्या मनात भरून राहिली असती हे नक्की.

धन्यवाद डॉ. ग्रे.

मिस करी, तुमची हरकत नसेल तर माझ्या वयाला स्मरून मी दिलेला एक सल्ला तुम्ही ऐकून घ्याल का?

हो. तुम्ही नक्कीच अधिकारवाणीने सल्ला देऊ शकता डॉ.

मागच्या तासाभरात तुम्ही एकदाही डोळ्यांच्या पापण्या मिटल्या नाहीत, माझ्या डोळ्यातली नजर हटवली नाही, तुमच्या चेहर्‍यावर एकंही भाव ऊमटला नाही की तुम्ही दिखाऊ का असेना साधे मंदसे स्मित सुद्धा केले नाही. मला वाटतं तुमच्या आयुष्यात काही तरी फार मोठे दु:ख भरून राहिले आहे ज्याने तुम्हाला फार कमी वयातंच खूप लवकर प्रौढपणा प्रदान केला आहे.
तुम्ही माझ्या पेशंट नाहीत त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही विचारण्याचा मला अधिकार नाही. पण मी एवढेच म्हणेन, दु:ख विसरून जा जीवनचा भरपूर आनंद लुटा आणि सगळ्यात महत्वाचे शांत रहा, Be at Peace my child.

But I am at peace doctor. I have always been at peace.
माझ्या आयुष्यात कुठलेही दु:ख नाही आणि तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.
येते मी. आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल अशी आशा करते.

एव्हाना बाहेर सुर्यदेवतेच्या ओसंडून वाहू पाहणार्‍या तेजाने मृत्यूदेवतेच्या धुरकट अंगरख्याला ठिकठिकाणी ऊसवण्यास सुरूवात केली असतांना डॉ. ग्रेंच्या दोन मजली पॉश ऑफिस बिल्डिंगच्या ड्राईव-वे मधून एक मर्सिडीझ हलकेच निघाली आणि एक बाकदार वळण घेत मांजरीच्या गती घेतलेल्या पावलांपेक्षाही जलद सॅनबर्ड विद्यापीठाच्या दिशेने अशी भरधाव निघाली की जणू शुन्यात थिजलेली वेळच अचानक धावू लागावी.

सप्टेंबर २०, २०१६ - डेली कॅलिफोर्नियन न्यूजपेपर

सॅनबर्ड विद्यापिठाच्या डॉ. अ‍ॅनाबेल करी ह्यांना ह्यावर्षीचे मानाचे फील्ड्स मेडल घोषित

वयाच्या नवव्या वर्षीच गणित विषयात 'चाईल्ड प्रॉडिजी' म्हणून नावारूपाला आलेल्या डॉ. अ‍ॅनाबेल करी ह्यांना ह्यावर्षीचे गणितातले नोबेल प्राईझ समजले जाणारे फील्ड्स मेडल त्यांच्या 'अल्जिब्रेक जीऑमेट्री' विषयातल्या योगदानाबद्दल घोषित झाले आहे. २४ वर्षे २ महिने आणि ६ दिवस वयाच्या डॉ. करी ईतिहासातल्या सर्वात कमी वयाच्या फील्ड्स मेडल विजेत्या बनल्या आहेत.

सप्टेंबर २०, २०१६ - सकाळी ९:२० सॅनबर्ड युनिवर्सिटी डीन डॉ. हॅरिसन ह्यांचे ऑफिस

गुड मॉर्निंग डॉ. हॅरिसन.

गुड मॉर्निंग स्टीव. माझं स्केड्यूल आज मिडिया बरोबरच्या मिटिंग्जनी अचानक भरून गेलं आहे, तू डॉ. करींच्या मेडलची बातमी वाचलीस असशीलंच. तुला सांगतो... देवाने अतिशय शांतपणाने घडवला असावा डॉ. करींचा मेंदू. अजून किती यश मिळवणार आहे ही मुलगी तो देवंच जाणे.
तू सांग, तू का आलास आज एवढ्या सकाळीच आणि तेही ईतक्या तडकाफडकी.

हो सर, डॉ करींची बातमी वाचली आणि त्या संदर्भातंच तुमच्याशी महत्वाचं बोलायला आलो.

अरे मग एवढा गंभीर का आहेस. डॉ. करींबद्दलची बातमी तर फार आनंदाची आहे.

सर, आपल्या विद्यापीठाचे संगणक सुरक्षाकवच भेदून डॉ. करींचे संशोधन काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचे माझ्या नेटवर्क सिक्युरिटी टीममधल्या लोकांनी मला कळवले आहे. प्रकरण फार गंभीर आहे सर, पण ह्या चोरीमागच्या व्यक्तींबाबत आणि संगणकाबाबत त्यांच्या हाती काही ठोस पुरावेही लागले असल्याचेही त्यांनी मला सांगितले.

सप्टेंबर २०, २०१६ - सकाळी ११:४० सॅनबर्ड पोलिस हेडक्वार्ट्स

डिटेक्टिव स्पेन्सर, डिटेक्टिव स्पेन्सर, ऑलिविया....थांब. - ऑफिसर करूसो झपाझप पावलं टाकत जिन्यावरून ऊतरणार्‍या डिटेक्टिव ऑलिविया स्पेन्सर ला मागून हाका मारत आला.
हे बघ, आत्ताच कुरियरबॉय ने माझ्या डेस्कवर हे पाकीट आणून दिले. ज्यात एक सीडी आहे आणि ही एक नोट.

कसली सीडी आहे ऑफिसर करूसो आणि काय लिहिलंय ह्या नोट मध्ये ?

कुठल्यातरी सिक्युरिटी कॅमेराचे फुटेज असावे. सीडी मध्ये एक पुरूष एका स्त्रीवर अतिप्रसंग करतो आहे असे दिसते. नोट मध्ये 'हे सॅनबर्ड विद्यापीठात काल घडलं' असं लिहिलं आहे.
आणि 'प्रकरण दाबून टाकले जाण्याआधी तुम्ही ह्या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई करा' असे लिहिले आहे. पाठवणार्‍याने नाव, पत्ता नंबर वगैरे काही माहिती दिली नाही. हे काही तरी विचित्रं प्रकरण दिसते आहे. तू 'स्पेशल विक्टिम्स युनिटची' लीड डिटेक्टिव आहेस म्हणून मी हे घेवून तडक तुझ्याकडे आलो.

धन्यवाद ऑफिसर करूसो. मी बघते पुढे काय करायचे ते, द्या ते पाकीट माझ्याकडे. - आणि डिटेक्टिव ऑलिविया स्पेन्सर माघारी आपल्या केबिनकडे जाण्यास वळाली.

- समाप्तं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक कळले नाही, जर करी इतकीच भावनांच्या पलीकडे गेली असेल , तर तिने बॉयफ्रेंड निवडायचे कष्ट तरी का घेतले? म्हणजे तिच्या या मनस्थितीत तिला साथीदार मिळाला तरी तिला आनंद होईल असे वाटत नाही...

तसेच जर आरोपींना सजा होणार की नाही याने तिला काहीच फरक पडत नसेल तर तिने पुरावे उघड करण्याची तसदी तरी का घेतली असावी ? बहुधा पुन्हा त्या माणसाकडून अशा प्रकारची जबरदस्ती होऊ नये म्हणून. या मागे न्याय मिळावा अशी इच्छा सुद्धा करींच्या मनात नसावी.

सुंदर कथा आणि त्यावरचे प्रतिसाद.
संशोधन लीक झालं आहे हे करीना माहीत होते, त्यावर त्यांनी action घेतली नाही, कुणाला बोलल्या नाहीत हे त्याच्या मनोवृत्तीनुसार ठीकच. पण त्या कार्लच्या (मी नावात गोंधळ करत असेन कदाचित) हातात करींना त्यांच्या रिसर्चचे पेपर्स दिसले हे कार्लला कधीच कळलं नाही का? ते इल्लिगल आहे, कळलं तर आपली घडगत नाही, आणि करी action घेणार नाहीत हे कार्लने का मानले?

संशोधन चोरलं पण त्याचं श्रेय डॉ. करींना मिळालं म्हणजे त्याचा गैरवापर झाला नाहीये. सेफ्टी लूप होल म्हणून तो सिक्युरिटी हेड वरीड आहे ना?

कथेत पोलीस स्टेशनचा शेवट केला नसता तर? असा विचार करतोय.

मस्त, बर्ग! पण हा भाग कळायला भागासकट चर्चासुद्धा वाचावी लागली Happy

डॉ. ग्रे खुर्चीत हलकेच सावरून बसल्याचे डॉ. ग्रेंच्या नजरेने टिपले >>> इथे दुसरं नाव 'करी' हवंय बहुतेक.

मला एक कळले नाही, जर करी इतकीच भावनांच्या पलीकडे गेली असेल , तर तिने बॉयफ्रेंड निवडायचे कष्ट तरी का घेतले? म्हणजे तिच्या या मनस्थितीत तिला साथीदार मिळाला तरी तिला आनंद होईल असे वाटत नाही... >> साथीदार, मित्रं असणं म्हणजे भावना गुंतवणं असंच काही नाही. संपर्कात येणारा, चांगला वागणारा प्रत्येक जण मित्रं होऊ शकतो. जास्तं संपर्कात येणारा जास्तं चांगला मित्रं. कार्लला त्यांच्या नात्यातला कोरडेपणा कळाला असेल म्हणूनही तो करींना टाळत असेल. रिसर्च चोरण्याआधीची असूया आणि नंतरचे गिल्टही असेल.
एपिक्युरसनेही मित्रांचा गोतावळा जमवला होता. पिरोहचे विश्लेषण बघा तो गोष्टींची, माणसांची चांगले, वाईट अशी वर्गवारी करायला नकार देतो.
डॉ. करींनी कार्ल आणि रॉस दोघांनाही वाईट म्हंटलेलं नाही की त्यांची निर्भत्सना केली नाही. फक्तं त्यांना त्यांच्या बाबतीत घडलेल्या आणि न पटलेल्या गोष्टी त्या दोघांनी केल्या म्हणून त्यांचा नकार प्रदर्शित केला आणि कृतीला चूक म्हंटले ईतकेच. बुद्धालाही शिष्य होते काही जुने, जवळचे होते काही नवीन लांबचे होते.
करींच्या मर्जीविरूद्धं (अतिप्रसंग, आरोप वा जाब विचारणं) होऊनही त्या साध्या जजमेंट्लही होत नाहीत. नको/नाही म्हणणं हे भावना असल्याचं लक्षण आहे, नसल्याचं नाही. Happy apathy आणि ataraxia, ऊदासीनता आणि प्रशांतता मधला बेसिक फरक.

तसेच जर आरोपींना सजा होणार की नाही याने तिला काहीच फरक पडत नसेल तर तिने पुरावे उघड करण्याची तसदी तरी का घेतली असावी ? बहुधा पुन्हा त्या माणसाकडून अशा प्रकारची जबरदस्ती होऊ नये म्हणून. या मागे न्याय मिळावा अशी इच्छा सुद्धा करींच्या मनात नसावी. > डॉ. करींनी काहीही केले नाही, ना पुरावे ऊघड केले ना न्यायाची अपेक्षा ठेवली.

हातात करींना त्यांच्या रिसर्चचे पेपर्स दिसले हे कार्लला कधीच कळलं नाही का? ते इल्लिगल आहे, कळलं तर आपली घडगत नाही, आणि करी action घेणार नाहीत हे कार्लने का मानले? >> असुया. भावाभावातही असते. कदाचित चांगली मैत्री असल्या कारणाने कार्ल ने हक्काची भावनाही अझ्यूम केली असावे. तो रॅशनली विचार करत नाहीये भावनांच्या आहारी जाऊन काही कृती करतो आहे. ज्याचे परिणाम त्याला भोगावे लागतीलच चांगले वा वाईट दोन्ही.
हेच करींच्या बाबतीतही खरे आहे. भावनांच्या आहारी न जावून कृती न केल्याचेही परिणाम त्यांना भोगावे लागले चांगले आणि वाईट दोन्ही, कारण समोरच्याची ईरॅशनलिटी त्यांच्यावर बेतते आहे.

संशोधन चोरलं पण त्याचं श्रेय डॉ. करींना मिळालं म्हणजे त्याचा गैरवापर झाला नाहीये. सेफ्टी लूप होल म्हणून तो सिक्युरिटी हेड वरीड आहे ना? >> हो बरोबर.

कथेत पोलीस स्टेशनचा शेवट केला नसता तर? असा विचार करतोय. >> आपण डॉ. करी नसल्याने आपल्याला क्लोजर हवे आहे. Happy
आणि तीच खरी गोम आहे. एखाद्याला न्याय न मिळणे, आपल्या भावनेचे क्लोजर आपल्याला न मिळणे भलेही आपण विक्टिम असो वा नसो आपल्यासाठी जरूरी आहे. विलन जिंकलेला सिनेमा बघून आपण आनंदाने बाहेर पडू का थिएअटरच्या. सत्याचा विजय होणे आपली भावनिक गरज आहे.
डॉ. करींना मुळात अश्या क्लोजरची गरज नाही, पण वाचक म्हणून आपण करींना/बुद्धाला समजून घेतले तरी त्यांच्यासारखे वागणे आपल्याला जमत नाही, पटत नाही. Happy

धन्यवाद रमड.
चूक दुरुस्तं केली आहे.

डॉ. करींना मुळात अश्या क्लोजरची गरज नाही, पण वाचक म्हणून आपण करींना/बुद्धाला समजून घेतले तरी त्यांच्यासारखे वागणे आपल्याला जमत नाही, पटत नाही>>>>>>>>

नेमके हेच मलाही वाटले. कथेचा दुसरा भाग वाचताना आधी आकर्षक वाटलेल्या प्रशांततेची दुसरी बाजू लक्षात येत गेली आणि ती अवस्था कायमची राहणे अतिशय भयंकर आहे असे वाटायला लागले. स्थितप्रज्ञता कितीही आदर्श वाटली तरी त्यालाही ही दुसरी बाजू आहेच.

हा.ब. तुम्ही कथेवर खूप मेहनत घेतलीत. कथा खूप विचार प्रवर्तक वाटली. मला वाचताना आगासीचे आत्मचरित्र आठवत होते. टेनिस खेळताना मनातून तिरस्कार करत तो खेळला. जर त्याच्यावर प्रशांततेचा प्रयोग झाला असता तर कदाचित किती वेगळा खेळाडू दिसला असता.

वेगळी कथा हाब, विचारप्रवर्तक वगैरे Happy कथा आणि प्रतिक्रिया, स्पष्टीकरणं वाचून माझं मत हेच होत चाललं होतं की अशी व्यक्ती खरोखर आपल्या पाहण्यात असेल तर आपली, म्हणजे माझी रिअ‍ॅक्शन नक्की काय असेल? तेव्हाच तुमचं हे वाक्य <वाचक म्हणून आपण करींना/बुद्धाला समजून घेतले तरी त्यांच्यासारखे वागणे आपल्याला जमत नाही, पटत नाही. > दिसलं आणि एकदम बिंगो! असं झालं Happy

हा भाग सुस्साट डोक्यावरुन गेलेला. पण प्रतिसाद वाचुन आलं थोडं डोक्यात.
मस्त कल्पना हाब. ग्रेट वर्क.

धन्यवाद सगळ्यांनाच.
मलाही ह्यावर विचार करतांना फार छान वाटत होते जसे तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून पुन्हा वाटते आहे. Happy

कथा वेगळी आहे. आवडली Happy शेवट कळायला जड आहे. Dr. करी स्वतःविषयीचे प्रश्न सोडवायला जातात हे कळालं आणि बुद्ध जसा वागला त्यामध्येच dr . करी ना उत्तर मिळते, हे सुद्धा समजले. शेवटी जरा गडबड होते. नक्की कोण आणि का पोलिसांना मदत करतं ते कळत नाही. आत्ता खुलासा वाचला आणि मग कळलं. पण वेगळा विषय आहे. यावर लिहिणं सोप नाही. नेहमीच्या प्रेमकथा, गूढकथापेक्षा खूप दिवसांनी वेगळं वाचायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद!

बरीच समजली आणि बरीच झेपली नव्ह्ती ती प्रतिसादांमधल्या चर्चेत कळली. नेहमीच्या कथांपेक्षा खुप हटके विषय आहे. फारच आवडली. तुमच्याकडुन अजुन असे वेगळे विषय वाचायला आवडतील.

हायझेबर्ग तुम्ही अभ्यास करुन आणि बराच विचार करुन लिहिली आहे कथा. :Thumbs up:

कथा छानच आहे , पण सायकॉलॉजि ,भारतीय  तत्वज्ञान, आणि ,spirituality या गोष्टी चढत्या क्रमाने येतात , तुम्ही बुद्धिझम बद्दल बोललात , त्यात हे नमूद करावंसं वाटतं  कि गौतम बुद्ध हे फक्त तत्वज्ञ नव्हते तर ते Enlightened  होते. Oneness ही कन्सेप्ट आपल्याला फक्त माहिती आहे , फक्त कन्सेप्ट माहिती असणे  आणि ती realize होणे यात  फरक आहे .  बुद्धांना , आपल्या संताना ती realize झाली  होती आणि म्हणून आपल्यासामोर सुरा घेऊन येणारा माणूस आणि आपण एकच  आहोत हे बुद्धांना कळलं  असतं  . म्हणून 'मुक्ताबाईनी म्हटलं आहे ,'विश्व्  पट  ब्रम्ह दोरा  , ताटी उघडा ज्ञानेश्वरा  !!.. 

Pages