कुठे जायचे ठरले नाही

Submitted by निशिकांत on 5 August, 2017 - 01:30

आहे तेथे राहण्यात मन रमले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

जन्म घायचा कोणा पोटी कोण ठरवते?
भूक असो वा नसो तरीही माय भरवते
नर्णय सारे दुसर्‍या हाती, पटले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

मुंज लागता संध्या शिकलो, याच कारणे
चालत आले पिढी दर पिढी, तसे चालणे
रुढी प्रथांचे धुके जराही विरले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

गोंधळ बारावी नंतरचा आहे ध्यानी
मार्ग दावला, पुढे काय? आई बाबांनी
शिल्पकार माझा मी होणे जमले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

खेड्यामधुनी झुंडी गेल्या शहर दिशेने
नाळ तोडुनी उपरा झालो राजखुशीने
काळासंगे कसे जगावे? कळले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

वसंत हिरवा, रिमझिम श्रावण जगी झरू द्या
वठलेल्या वृक्षाचा गुदमर अता सरू द्या
सुक्या बरोबर ओले केंव्हा जळले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

उगा कासरा हाती आहे असे वाटते
जीवन अपुल्या मर्जीने चौखूर उधळते
असाह्य जगणे अंतक्षणीही सरले नाही
हजार रस्ते, कुठे जायचे ठरले नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !