आदिप्रश्न

Submitted by अनन्त्_यात्री on 31 July, 2017 - 02:03

धगधगे अब्ज सूर्यांचे
हे स्थंडिल निशिदिन जेथे
ल‌वलव‌त्या चैत‌न्याचे
का बीज‌ जन्मते तेथे ?

अणुगर्भ उक‌लुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?

का अंत असे ज्ञेयाला ?
का ज्ञान तोकडे ठरते?
का सीमा अज्ञेयाची,
अज्ञात प्रदेशी वसते ?

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान...
हे एक वाक्य कळले नाही - का अंत असे ज्ञेयाला ?
समजावता का कृपया.

च्रप्स, धन्यवाद!
"का अंत असे ज्ञेयाला ?" याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की मानवाच्या विविध शारीरिक / बौद्धिक / तार्किक मर्यादांमुळे त्याला ज्ञेय = ज्ञानगम्य =आकलनीय होऊ शकतील अशा गोष्टींवर / संकल्पनांवर एक मर्यादा (=अन्त) निर्माण होते.

अप्रतिम

शेवट तर अतिशय भावला . कल्पांताचा वेध घ्यायला मानवी बुध्दी कमी पडावी .

का अंत असे ज्ञेयाला ?
का ज्ञान तोकडे ठरते?
का सीमा अज्ञेयाची,
अज्ञात प्रदेशी वसते ?