फ्यूज

Submitted by जव्हेरगंज on 26 July, 2017 - 10:20

मरणाची थंडी पडली हुती. म्या श्याल गुंडाळून चौकीवर गेलो. इनस्पेक्टरला म्हणलं मर्डर झालाय लवणावर. मग त्यनं गाडी काढली. फटफटी. दोघंच निघालो लवणावर. लय रात झालती. त्यो म्हणला, फुकणीच्या कुठं झालाय मर्डर?
म्या म्हणलो, फुलाच्या खाली.
मग त्याला घेऊन खाली गेलो. एक बाई पडली हुती तिथं नागडी. म्या ब्याटरी मारून त्यला दाखवलं. बघ म्हणलं.
त्यो म्हणला, रेप झाला का हिच्यावर?
म्हणलं, कुणाला म्हाईत.
त्यो म्हणला, तुला कसं कळलं?
म्या म्हणलं, लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं.
मग त्यानं ब्याटरी मारून नीट तिला बघितली. टकुरं फुटलं हुतं. नुसतं रगात. म्हटलं, दादा, तुला भ्याव वाटत न्हाय का?
त्यो म्हणला, जिंदगी गीली ह्यात. आता कसलं आलंय भ्याव.
म्या म्हनलं, बरूबर.
त्यो म्हणला, लफड्याची केस दिसतीय. पण ही इथं आलीच कशी. हीची कापडंबी कुटं दिसत न्हायीत.
म्या म्हनलं, लय झाडवान हाय हीत. पडली आसतील सांदीत.
त्यो म्हणला, मला अजून कळ्ळं न्हाय. तुला ह्ये कळलंच कसं. जरा नीट सांग.
म्हणलं, सांगितलं की. खाली येताना दिसली. यीऊन बघितलं तर ह्ये आसं.
त्यो म्हणला, आजून कोण कोण हुतं इथं?
म्हणलं, कुणाला म्हाईत.
त्यो म्हणला, फुकणीच्या मला गंडवतो का?
म्या म्हनलं, काय झालं?
त्याच्या हातात एक मोठं लांबडं दांडकं हुतं. काय कळायच्या आत त्यनं माज्या पाठीवर हाणलं.

लय पाऊस पडत हुता. येवढ्या दुपारचंपण समदं काळवंडल्यावन झालं हुतं. समदं आंग ना आंग भिजलं हुतं. ह्या भागात नुसतं डुंगूरच डुंगर. एक घर कुटं म्हणून दिसना. शेवटाला एक झोपडं दिसलं. म्हाता-म्हातारी दोघंबी शेकत बसली हुती.

म्या घरात शिरलू. म्हणलू, लय पाऊस पडतूय गड्या.
म्हातारं म्हणलं, कुटनं आलाव?
म्या म्हनलं, गाडी बंद पडलीय. इंजनात पाणी गेलंय.
म्हातारं मनलं, जारं किस्न्या, बघून यं.
तसं भिताडाच्या कडंला झोपलेला उघडाबंबू काळा माणूस जागा झाला.
म्या म्हणलं, येवढ्याश्या घरात लय माणसं ऱ्हात्यात गड्या.

किस्नानं सायकल काढली. म्हणला कुटं पडली गाडी बंद.
म्हणलं, ही काय हितंच लवणावर.
तिथं गेल्यावर तो म्हणला, नवीन दिसतीय फटफटी. बघू च्यावी.
म्या म्हणलं, फुलाच्या खाली पडली का काय, या. हुडकू.
मग त्यो मुकाट्यानं खाली चालत आला. चिखुल नुसता. झाडी गवात मायंदाळं.
फुलाखाली आल्यावर तिथं एक पोलिस दिसला मरून पडलेला. आन त्येचा जवळंच एक नागडी बाई. पार टकुरं फुटलेलं.
किस्नाची दातखिळीच बसली. पार ततपप कराय लागला.
म्या म्हणलं, मर्डर झालेला दिसतूय. आपुन लगीच पुलिसांना कळवू.
त्यो म्हणला, पण ह्ये झालंच कसं?
म्या म्हणलं, कुणाला म्हाईत.

मरणाचा पाऊस पडत हुता. आन त्या झोपड्यात म्हाता-म्हातारी शेकत बसली हुती. सायकलवर टांग टाकून मी कुडकुडत तिकडं निघालो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

! पण नावाचा संदर्भ लागला नाही... >>>+१

घटनास्थळाच्या जागेच्या वर्णनासाठी तृतीयपुरूषी एकही जास्तीचा शब्दं न वापरता पात्रांच्या नजरेतूनच ड्रामा आणि घटनास्थळ कमीत कमी शब्दात वाचकाच्या नजरेसमोर ऊभे करण्याचे तुमचे कसब एक लेखक म्हणून लाजवाब आहे.
तुमचे लेखन नेहमीच 'गोटीबंद' असते.

ही मिसली होती !
खास जव्हेरगंज टच वाली कथा.. एकदम भन्नाट

मस्त!

जव्हेरगंज नाव वाचुनच छान वाटल खुप दिवसानि.....
आणि तशिच छान जव्हेरगंज टच कथा पण...
<<<<लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं.>>>>> खुपचच्च भारि

Pages