खड्ड्यात पडलेला माणूस

Submitted by सखा. on 26 July, 2017 - 01:38

सकाळची वेळ तुफान पाऊस पडून गेलेला. नाल्या तुडुंब वाहत होत्या. शाळेला निघालेली रस्त्याच्या कडे कडेने जाणारी लहान लहान मुले त्या गढूळलेल्या पाण्यात पाय आपटत मजा घेत होती.
नावा प्रमाणे शरीरयष्टी असलेले गोटीमल सेठ नित्य नेमाने फिरायला निघाले होते. शेठजीच्या अंमळ जादा वजनाने ते ज्या ठिकाणी पाय देतील तिथले पाणी जीव मुठीत धरून दुभंगत होते. एव्हढ्यात एक लबाड रिक्षावाला भरधाव वेगाने त्यांच्या बाजुने पाणी उडवीत गेला. माती चिखलाने माखलेले आणि त्या अनपेक्षित फवाऱ्यामुळे तोंडात गेलेला एक प्लास्टिकचा चमचा "ब्याकक" असा आवाज करत थुंकत, रागाने शेटजी रिक्षावाल्याला शिव्या हासडु लागले. अजून एक चार पावले बिचारे गोटीमल चालले ना चालले असतील तोच, धरतीने पोटात घ्यावे तसे शेटजी अचानकच रस्त्यावरच्या पाण्यात गडपच झाले मग दोन चारदा त्याचे मुंडके बोंबलत बाहेर आले तर दोनदा पाय झाडीत ते गटांगळ्या खाताना दिसले. आजू बाजूला असणाऱ्या लोकांनी ताबडतोब आपले सेलफोन काढून व्हिडीओ आणि फोटो घ्यायला सुरुवात केली. शेटजी जिवाच्या आकांताने "बचाव बचाव" असे म्हणत असले तरी असला व्हायरल होऊ शकणार व्हिडीओ काढायची संधी कोण सज्जन माणूस सोडणार? शेवटी जेव्हा खड्ड्यातील पाण्यातून नुसतेच बुडबुडे येऊ लागले तेव्हा मात्र दोनचार तरुण पोरांनी झपाझप उड्या मारल्या आणि गोटीमलसेठला ओढून बाहेर काढला. माणुसकी जिवंत आहे म्हणतात ती अशी. बऱ्याचवेळ ऍम्ब्युलन्सची वाट पाहून ती न आल्याने दोनचार भल्या लोकांनी सेठजीला रिक्षात घालून दवाखान्यात पोचवले. आठवडाभर हॉस्पिटलात काढून गोटीमल सेठ घरी परत आले तेव्हा मरता मरता वाचलो असे वाटून त्यांच्यात काही मानसिक बदल झाले. आपण तेव्हाच त्या गटारीच्या पाण्यात बुडून मेलो असतो तर लोकांकडून पिळू पिळू जमवलेला पैसा काही वर नेता आला नसता असे त्यांना वाटू लागले. म्हणतात ना मृत्यू दर्शना एव्हढा मोठा गुरु नाही. आता आपण सुद्धा काही तरी सामाजिक कार्य करून उरलेले जीवन सत्कारणी लावावे असे त्यांना न वाटल्यास नवल. बर अख्ख आयुष्य लोकाकडून पैसे लुबाडण्यात गेल्याने त्यांना हे काही सुचेना की कोणते बरे सामाजिक कार्य करता येईल? त्यांनी खूप विचार केल्यावर अचानक काळ्या अंधारात वीज चमकावी तसे त्यांना आठवले की अरेच्या तो नालायक खड्डा, ज्यात आपण पडलो होतो चला तो खड्डाच आपण नगरसेवकाला विनंती करून बुजवून घेऊया. कुणास ठाऊक पुढच्या पावसात कोणी बिचारा माझ्या सारखाच त्या खड्ड्यात पडेल आणि मरेल किंवा आपणच पुन्हा पडून तेव्हा वाचायच्या ऐवजी मरू.
गोटीमलशेटच्या बायकोच्या बहिणींना आणि माहेरच्यांना जिजाजी कोणत्या खड्ड्यात पडले हे पाहण्याची खूपच उत्सुकता होती त्या मुळे त्यांच्या बायकोला सुध्दा त्या खड्ड्याचा फोटो घेऊन फेसबुक वर लौकरात लौकर टाकायचा होता. त्या मुळे सकाळी सकाळी शेटाणी सुद्धा चला मी येते तुमच्या सोबत तो खड्डा पाहायला असे म्हणून त्यांच्या सोबत तरा तरा निघाली. गांधी मार्गा वर गोटीमलशेट आणि शेटाणी जेव्हा त्या बिचार्या खड्ड्याचा शोध घेऊ लागले तेव्हा त्यांना आपल्याला हवा तो खड्डा काही नेमका सापडेना कारण रस्त्यावर ऑलरेडी अनेक लहान मोठे खड्डे होते. PotHole.jpg
"तुमचं मेलं हे असच वेधळ काम एक काम धड कराल तर शप्पथ आता आपण ज्या खड्ड्यात पडलो तो तरी तुम्हाला आठवू नये का?" शेटाणी वैतागून म्हणाली
"अगं पण त्या दिवशी पाऊस होता आणि आता या रस्त्यावर एव्हढे मोठे मोठे खड्डे आहेत की सगळेच खड्डे सारखे वाटू लागले आहेत मला. " - शेटजी
"हेच तर म्हणायचं आहे मला आमच्या अक्कीचे मिस्टर बघा कसे स्मार्ट आहेत नाही तर तुम्ही वेन्धळ ध्यान मेलं" - शेटाणी कुर्यात म्हणाली
गोटीमलशेट खजील झाले बायकोचा मुद्दा बिनतोडच होता ते लाचारा सारखे आजू बाजूच्या दुकानदारांना विचारू लागले की काहो सात आठ दिवसा पूर्वी कुणी माणूस पडला होता का खड्ड्यात तुम्हाला काय आठवतंय का? ते दुकानदार म्हणू लागले अहो रोजच लोकं खड्ड्यात पडतेत काय काय लक्षात ठेवायचे काही माल घ्यायचा असेल तर बोला. मग एकदम गोटीमलशेटला आठवले की आपल्या तोंडात पाण्याच्या फवाऱ्या बरोबर एक प्लास्टिकचा चमचा गेला होता त्याच्या आकारावरून तो नक्कीच आईस्क्रीमचा असावा मग काय आस्चर्य चारपावले चालताच त्यांना एक आईस्क्रीमचे दुकान दिसले आणि दुकाना भोवताली सर्वत्र पडलेल्या चमच्या कपाच्या कचऱ्याला पाहून त्यांना जो काही आनंद झाला की ज्याचे नाव ते. त्या दुकानापाशी उभे राहून त्यांना रस्त्याच्या मधोमध जो भला मोठा खड्डा दिसला तो पाहून ते जोरात ओरडले
"अग हाच तो खड्डा हाच तो खड्डा ...."
"अय्या बघू बघू" त्यांची बायको कौतुकाने म्हणाली.
कुठलाही आनंद हा क्षण भंगुर असतो असे म्हणतात आणि बायकांना तर नवऱ्याचा आनंद जमेल तेव्हढ्या लौकर संपुष्टात आणायचा असतो असा गोटीमलशेट यांच्या अनेक वर्षाच्या वैवाहिक जीवनाचा एक अनुभव होता.
"अहो इथे तर दोन खड्डे आहेत .... यातला कुठला?" बायकोने विचारले
"आं?? दोन खड्डे ... अरे खरंच की" शेटजी बिचारे बुचकळ्यात पडले आता आली का पंचाईत.
"मला वाटते हा अलीकडचा होता..." शिक्षकाने दरडावून विचारल्यावर अजिबात अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्या सारखे चाचरत शेटजी म्हणाले
"घ्या म्हणजे त्यात पण खात्री नाही" बायको कडाडली
"अग पण ...."
"हे पहा मला अजिबात असे चालणार नाही, तुम्हाला नक्की सांगावेच लागेल की तुम्ही बुडुकन पडलात तो खड्डा कुठला?"
"अगा काय फरक पडतो आपण दोनही खड्डे बुजवण्याची विनंती करू की"
"का बर? फार देशभक्तीचा पुळका आलाय का?"
"आता यात काय देशभक्ती?"
"मग ... त्या दुसऱ्या खड्ड्याशी आपला काय संबंध? तो का तुम्ही बुजवायची विनंती करायची? हे पहा सांगून ठेवते उगाच फार पुढारीगिरी करायला जाऊ नका ..."
"अगा पण ..."
"पण नाही आणि बिण नाही मला नक्की तो कुठला तो खड्डा लौकर सांगा... मला फोटो फेसबुकवर टाकायचाय"
आता नवरा बायकोचे भर रस्त्यावर काही तरी तू तू मी मी चालले आहे म्हटल्यावर आपोआपच लोक जमू लागले.
काही चतुर लोकांनी शेटाणी कडून समस्या समजावून घेतली मग त्यावर उपस्थित लोकांची बरीच चर्चा झाली त्यात लोकांनी शेटजी फार लठ्ठ आहेत, पडलेच कशे? शहाण्या माणसाने भर पावसात मरायला चालूच नये इत्यादी प्रकारचे विचार मांडले. शेवटी एक पिवळे पातळ नेसलेल्या मावशी बाई म्हणाल्या मी काय म्हणते शेटजींनी दोन्ही खड्यात झोपून पाहावे मग त्यांना लक्षात येईल की ते नेमके कोणत्या खड्ड्यात पडले. ही आयडिया सगळ्यांनी उचलून धरली शेटजींच्या बायकोलापण ती पटल्याने शेटजींच्या नाही म्हणण्याला फारसा काही अर्थच नव्हता.
मग दोनचार लोक रस्त्याच्या दोन बाजूला उभे राहून ट्राफिक पोलिसांचे काम करू लागले. शेटजी मग पहिल्या खड्यात झोपले तेव्हा जमावाने त्यांना हात लांब करा, पाय वर करा, आता पालथे पडा, जीभ बाहेर काढा वगैरे मौलिक सूचना दिल्या. मग जमावानेच ठरवले की नाही हा तो खड्डा वाटत नाही दुसरा असला पाहिजे मग आता शेटजी उठून दुसऱ्या बाजूच्या खड्ड्यात स्वतःच जाऊन पहुडले आणि स्वतःच हात लांब करा, पाय वर करा , पालथे पडा, जीभ बाहेर काढा वगैरे कोणी सूचना न देताच करू लागले. एव्हढ्यात जोरात कोलाहल झाला शेटाणीसह बाकीचे लोक ओरडत रस्त्यावरून लांब पळाले. शेटजी आरामात पहुडलेल्या खड्ड्या वरून एक ट्रक भरधाव वेगाने धडधडत निघून गेला. इकडे भीतीने बोबडी वळालेले शेटजी जेव्हा बाहेर आले तेव्हा अनेकांनी एखाद्या विजयी वीराचे स्वागत करावे तश्या टाळ्या वाजवल्या.
"बाप्पो .... मरतच होतो" शेटजी घाम पुशीत म्हणाले.
"मला मस्त फोटो मिळाला बरका" शेटाणी
"साला तो ट्र्क वाला आमच्या बी अंगावर घालीत होता" स्वयंघोषित ट्राफिक पोलीस झालेल्या दोघा पैकी एक म्हणाला.
"दारू पिला आसन" - दुसरा स्वयंघोषित ट्राफिक पोलीस
"मग काय शेटजी कुठलावाला खडडा तुमचा हाये?" पिवळे पातळ नेसलेल्या मावशी बाई
शेटजीनी नुकत्याच जीव वाचून बाहेर आलेल्या खड्ड्या कडे केविलवाणे बोट दाखवले. गर्दीतल्या दोघा चौघांनी चरफडत १०० च्या नोटा मागे उभ्या असलेल्या विजयी चेहऱ्याच्या एका माणसाला दिल्या. बेटिंग हो दुसरे काय.
"काय चाललंय हिथं? गर्दी कशासाठी?" असा दरडावून आवाज आला तेव्हा लोकांनी मागे वळून पहिले तो एक डाकू वाटतील असे हवालदार मिशा पिळीत विचारत होते. त्यांच्या सोबत वॉर्डाचे नगरसेवक देखील आले होते. मग लगेच दोनचार माणसांनी त्यांना माहिती पुरवली.
"तुम्हीच बघुन घ्या साहेब" नागरसेवक विनम्रपणे हवालदार साहेबाना म्हणाले.
"काय नाव आपले?" हवालदार
"गोटीमल"
"ते तर दिसताच आहे ... पूर्ण नाव" हवालदार गुरकावले
"गोटीमल सु. बुंदीवाले"
"प्रॉब्लेम काय?"
"या ना या खड्ड्यात ना मी परवा ना पडलो" लहान मुलांनी बाबाला कम्प्लेंट करावी तसे बिचारे गोटीमल म्हणाले
"कशाला?"
"अहो कशाला म्हणजे काय? पावसात चाललो होतो दिसलाच नाही."
"मग?" सावत्रबाप असल्या सारखे निर्विकारपणे हवालदार साहेब म्हणाले
"अहो मग काय? हा बुजवायला पाहिजे?"
"इथे हजार खड्डे आहे मग हाच का बुजवायचा?"
"मग सगळेच बुजवायला पाहिजेत ... खड्डे धोकादायक ... पहा केव्हढा मोठ्ठा आहे हा खड्डा!"
"तुम्ही पाडला का हा खड्डा?" - हवालदार
"नाही?" गोटीमल
"मग तुम्हाला काय हक्क आहे बुजवायचा?" हवालदार
"अहो पण एक भारतीय नागरिक म्हणून?" गोटीमल
"मग मी काय फॉरेनर आहे?" हवालदार
"अहो तसं नाही साहेब?" गोटीमल
"मग कसं? रस्ता दुरुस्ती कुणाच्या अखत्यारीत येते?" नगरसेवक
"सरकारच्या" गोटीमल
"मग सरकारी मालमत्तेवर बिना परमिशन घाला घालता तुम्ही? उद्या ताजमहालाला रंग माराल तुम्ही ... आ? चालेल का? कायदा काही आहे का नाही" नगरसेवक
"अहो काय बोलताय काय तुम्ही"? गोटीमल रडवेले होत म्हणाले
"काहो लोकहो मी काय चूक बोलतोय?" नगरसेवक गर्दीला म्हणाले
"नाही नाही अजिबात नाही" गर्दीतील काही लोक एक सुरात म्हणाले
"पाहिलेत ? हे पहा तुम्ही बिना परवानगीचे लोक गोळा केले ... रास्ता अडवला ... मोर्चा काढला .... सरकार विरोधी कट रचला ... हवालदार साहेब या इसमास अटक झाली पाहिजे..." नगरसेवक ठामपणे म्हणाले
"अय्या तुमच्या खड्ड्यात जीभ काढून झोपलेल्या फोटोला १०० लाईक्स आल्या!" अचानक शेटाणी चित्कारली ... ती बिचारी फेसबुक मध्ये मग्न होती.
"अरे बघू बघू.... अरे हे शेठ इथे झोपले ... या खड्ड्यात" पोलीस महाराज शेटाणीचा फ़ोन हातात घेत म्हणाले.
"होच मुळी ... आत्ताच तर झोपले होते .... एक ट्रक पण मेला वरून गेला, मला तर वाटले मरतातच की काय!" शेटाणी मोठ्या कौतुकाने म्हणाली.
"वा ..म्हणजे अजून एक कलम ... आत्महत्येचा प्रयत्न! चला चला ठाण्यात चला " हवालदार
"अरे जाने दो साब ... वॉर्निंग दे के छोड दो ...." शेटाणी बोलली आता कुठं तिला जरा काय चाललंय ते कळू लागलं
"नाही साहेब अजिबात सोडू नका आमच्या सारख्या गरीबाचा धंदा बंद करायला निघालेत असे लोक" कोपऱ्यावर दुकान असलेला पंक्चरवाला म्हणाला.
"खरं सांगतो साहेब ह्यो खड्डेवाला गांधी मार्ग आहे म्हणून रोज पाच पंचवीस गिर्हाइकाला मरण नाही" टायरचे दुकान असलेले गोपाळसेठ म्हणाले
"अरे नमस्कार डॉकटर साहेब" नगरसेवक साहेबानी अचानक आलेल्या डॉकटर कर्णिकांना पाहून म्हणाले तसे गर्दीतल्या बऱ्याच लोकांनी डॉकटराना नमस्कार केला.
"अहो मॉर्निंग वॉकला निघालो होतो गर्दी पाहून आलो मला वाटले नवीन असिसिडेन्ट वगैरे झालाय कि काय..." डॉकटर साहेब
"छे हो ... हा माणूस हे खड्डे बुजवण्याची भाषा करतोय".... हवालदार
"काय??" डॉकटर दचकलेच. या रोडवरच्या सहा ऍक्सीडेन्ट हॉस्पिटल्सची इकॉनॉमी धोक्यात होती.
"हो ना... पण मी काही ते होऊ देत नाही साहेब आपण खात्री बाळगा" नगरसेवक डॉकटरांच्या कानात कुजबुजले.
"अहो हे खड्डे आहेत म्हणून तर आमचे पण चांगले चालले आहे साहेब मी तर नुकतीच बी एम डब्लू घेतली" डॉकटर कर्णिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणाले.
"कसं आहे लोकांना हे नुसते खड्डे दिसतात पण या मुळे पंक्चरवाला, टायरवाला, ऑटोवाला आमच्या सारखे हाडाचे डॉकटर्स यांचे उदरनिर्वहण होते" - बरेच लोकांनी माना डोलावल्या ज्यांनी जास्तच डोलावल्या त्यांना अर्थातच उदरनिर्वहण हा शब्द न कळाला नसावा. काय आहे की न कळलेल्या जोक वर माणूस जरा जास्तच हसतो.
"हो सर आपण काही काळजी करू नका फुकट पैसे नाही घेत मी आपल्या कडून तुम्ही जा घरी मी मिटवून टाकतो हे प्रकरण" - नगरसेवक साहेब चिंतीत डॉकटरसाहेबाना अश्वस्त करीत म्हणाले.
"बराय मंडळी येतो लक्षात राहूं देत... आपल्या कुठल्याही ऍक्सीडेन्ट विषयक समस्या साठी आमचे इस्पितळ चोवीस तास उपलब्ध आहे आणि आम्ही सर्व क्रेडिट कार्ड्स स्वीकारतो, येतो नमस्कार" एव्हढे बोलून डॉकटर साहेब निघून गेले.
अचानक नगरसेवकाच्या ध्यानात आले की या सगळ्या संभाषणाचा फायदा घेऊन शेटजी साफ पळून गेलेले आहेत.
"अरे ते शेटजी कुठे गेले? ती शेटाणी बी दिसत नाहीत" नगरसेवक म्हणाले ... काय झालं शेटाणी हुशार बाई जसं तीच्या लक्षात आले आता इथे थांबलो तर हे लोक आपल्या बिचाऱ्या नवऱ्याकडून पैसे उकळतात तशी ती संधी मिळताच हळूच गोटीमल शेठचा हात धरून बाजूच्या गल्लीत गडप झाली.
"जाऊ द्या .. पळालं ते आता येत नाही चांगला हाग्या दम दिलाय त्याला .... चला चला लागा कामाला .... " असे हवालदार म्हणल्यावर सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. त्या रात्री विपरीतच घडलं अचानकच कुठून कुठून कन्स्ट्रक्शनच्या गाड्या आल्या एका रात्रीत गांधी मार्गा वरील सगळे खड्डे जाऊन नवीन कोरा डांबरी रास्ता करण्यात आला लेनचे मार्किंग झाले, डिव्हायडरवर सुबक फुल झाडे लावण्यात आली इतकेच काय तर रस्त्यावरचे लाईट्स पण बसवण्यात आले.
रागाने लाल बुंद झालेल्या पंक्चरवाला, टायरवाले सेठ आणि डॉकटर कर्णिका समोर तोंडपाडून बसलेले नगरसेवक म्हणाले साहेबानो ह्यात आपला काहीच दोष नाहीये अहो मुख्यमंत्री क्रीडा संकुलाच्या उदघाटनाला उद्या या मार्गाने जाणार म्हंटल्यावर त्यांना झक मारून रस्ता बनवावाच लागतोय. तशी ऑर्डर आली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाण आवडलं.
शेवटचा परिच्छेद म्हणजे शाश्वत सत्य

लेखन आवडलं.
विनोदी लिहिलंय पण समस्या खरी गंभीर आहे.
तो फोटो कुठ्ला आहे? किती दुर्दैवी परिस्थिती आहे. Sad

मस्त! सखा, हे लिखाण तुम्ही सकाळ/ लोकसत्ता किंवा मटाला या रविवार च्या पुरवणीसाठी पाठवा की. म्हणजे आता इतर लोकांपर्यंत हे विनोदी पण मार्मिक लेखन पोहोचेल. सोबतचे फोटो पण टाका.

रश्मी धन्यवाद... नेमके कुणाकडे पाठवायचे हे माहित नाहीये ... फिरून एकदा प्रयत्न करतो.

चांगलं लिहिलेय.,
खड्यांची समस्यां खरंच गंभीर होत चाललीये ,.कालच्या पेपरात एका बाईकर तरुणीचा मृत्यू खड्ड्यात पडून झाला अशी बातमी होती Sad

हा हा .. मस्त लिहिलेय एक नंबर
आणि रश्मी म्हणतात तसे वर्तमानपत्रासाठी पाठवा.. समस्या सुद्धा आहेच ही.

बाकी तो वरचा फोटो जुना आहे.. मागे कधीतरी व्हॉटसपेवर फिरताना पाहिलेला

छान लेख.
पण तो फोटो बनावट वाटतोय. ट्रकचं मागचं चाक फसलं म्हणून!