दिसतं तसं नसतंच.... पण किती???

Submitted by विद्या भुतकर on 25 July, 2017 - 20:16

डिस्क्लेमर: लिहिताना माणूस कुठल्या टोन मध्ये बोलत आहे हे कळत नसल्याने अनेक गैरसमज होऊ शकतात. तसे झाले तरी ते स्वतःजवळच ठेवावेत. या पोस्टमधून कुणालाही दुखवण्याचा काडीमात्रही हेतू नाहीये. माझ्या चिकित्सक स्वभावामुळे पडणारे प्रश्न मोठया व्यासपीठावर मांडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे इतकंच.

आयुष्यात (मला एकदा माझ्या किती पोस्ट 'आयुष्य' या शब्दाने सुरु होतात ते पाहिलं पाहिजे. असो. पुन्हा कधीतरी.) तर सामान्य माणूस म्हणून माझ्या आयुष्यात अनेक गैरसमज होते. त्यात अनेक वेळा प्रसारमाध्यमं टिव्ही किंवा सिनेमा यांनी भरच घातली होती. ते हळूहळू दूर होत राहिले. काही अजूनही प्रश्न म्हणून डोक्यात येत राहतातच. त्यातले अनेक गैरसमज 'झोपण्याबद्दल' आहेत. म्हणजे झोपणे या क्रियेबद्दल. उगाच त्यात गैरसमज नको.

मला नेहमी वाटायचं की चित्रात, सिनेमात एक प्रेमी जोडपं एकमेकांना किती छान गुरफटून झोपलं आहे. अगदी चादरही दोघांच्या अंगावर कशी समान वाटलेली आहे. इथे एक पांघरूण पुरत नाही. आणि मुळात एखाद्याला कमी जाड दुसऱ्याला जास्त जाड हवं असेल तर? बरं, घेतलं अगदी एकच आणि खूप मोठं असलं ते तरी, एकाला तोंडावर हवं असतं, तर दुसऱ्याला हाताखाली. मग काय करायचं? त्यात पोरं असली तर ती मध्ये येऊन त्याच पांघरुणावर झोपली की बोंबच. दोन्ही बाजूला आम्ही काकडणारे. अर्थात मी माझं पांघरूण कितीही केलं तरी सोडत नाही असं मला अनेकवेळा सांगितलं आहे. त्यामुळे मी तरी सुटले. बिचारा नवरा.

ते झालं पांघरुणाचं. दोघांनी अगदी ठरवलं की नाहीच येऊ द्यायचं पोरांना किंवा समजा नसतील मुलं. पण त्या घोरण्याचं काय? दोघांपैकी एखादा तरी घोरणारा नक्की असतोच. मग दुसऱ्याने काय, कानांत बोळे घालून झोपायचं? शिवाय, विक्स, झेंडूबाम यांचे वास असतातच. मुळात मला तरी वाटतं की हे असं इतक्या जवळ झोपून एकाच्या नाकातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑकसाईड दुसऱ्याच्या नाकात नसेल का जात? माझं जीवनशास्त्र एकदम पक्कं असल्याने मला असे प्रश्न पडत असतील कदाचित.

पुढचा मुद्दा म्हणजे या केसांचा. 'आपकी जुल्फोंकी छाँव' म्हणे. डोंबल. आता सर्वांचेच केस लांब नसतात, मग बाकीच्यांचं काय? बायकोचे केस कितीही मोठे लांब , सुंदर आणि दाट असले तरी तिच्या केसांना गोंजारत बसणारा कुणी भेटला तर मला बघायचा आहे. एकतर त्यात तिचे केस किती तुटतील याची चिंता मला असतेच. शिवाय त्याला तसं झोपून दम घुसमटत नाही का? हाही प्रश्न पडतो. आणि हो एखादा त्याच्या तोंडात गेला तर? ईईईई... जाऊ दे. बायकोने अगदी साईडला ठेवून दिले केस त्याला झोपण्यासाठी तर सकाळी उठेपर्यंत त्यातले किती तिच्या डोक्यावर असतील आणि किती गळलेले काय माहित. आहे ते केस जागेवर ठेवायला किती कष्ट करावे लागतात. त्यामुळे एखादीच्या डोक्याला मेंदीचा, अंडयाच्या, दही, आणि अनेक प्रकारची तेलं या सर्वांचे वास असतीलच. ते येणार नाहीत का त्याला?

बरं आता केस आणि मिठी हे सर्व धरून दोघे झोपले प्रेमाने. सकाळी त्यातला एकजण उठून दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे बघत बसत असेल यावर माझा काडीभरही विश्वास नाहीये. उलट मी तर म्हणते दुसरा उठेपर्यंत आपणही झोपायचं सोंग करणारे अनेक जण असतील. कोण पहिलं उठून आंघोळ करणार सांगा? आणि हे असं चेहऱ्याकडे बघत बसायला आपलं तोंड तरी असतं तसं? पिक्चर मध्ये एकदम आताच मेकअप रूममधून बाहेर आलेल्या हिरोईन बेडवर पडलेल्या असतात. त्यांच्याशी आपली काही तुलना तरी आहे का? उगाच म्हणजे तोंड बघत बसायचं. इतका अवतार असतो की त्याने ते बघत बसावं असं मी मुळी सांगणारही नाही. असो.

हे हिरो लोक नुसते गर्लफ्रेंडकडे बघत नाहीत, स्वतः उठून ब्रेकफास्ट बनवून बेडमध्ये आणून देणारेही असतात. मला आजपर्यंत कळले नाहीये की हे असं बेडमध्ये ब्रेकफास्ट करण्याचं प्रयोजन काय? एकतर सकाळी उठून आधी तोंड धुतलं पाहिजे. निदान बाथरूमला तरी जावंच लागणार ना? म्हणजे तेही नाही करायचं? डायरेकट खायचंच? त्यातही मला ते असे काटे, चमचे, दूध, कॉफी, ज्यूस गादीवर म्हणजे डेंजरच वाटतं. नाही का? उगाच जरा धक्का लागायचा आणि आख्खी गादी चिकट. म्हणजे काही सांडलं तर एकतर घाईत उठलं पाहिजे, बेडशीट काढून घ्यायचं. त्याच्यावरच राहिलं तर ठीक. ते धुता तरी येतं. गादीमध्ये आत गेल्यावर काय? ती कशी धुणार?

एकूण काय तर दिसतं तसं नसतंच पण किती खोटं? काही मर्यादा आहे की नाही? अजून बरेच मुद्दे आहेत ज्यावर मला असे अनेक प्रश्न पडतात. सुरुवात केली तेंव्हा सर्वच लिहिणार होते. पण झोपेचेच इतके मुद्दे होते की बाकी लिहायला वेगळा लेख लिहावा लागेल. Happy तोवर तुम्हीही तुमचे मुद्दे सांगून ठेवा. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@विद्या माझ्या मनातील प्रश्न येथे मांडल्याबद्दल धन्यवाद. हे सगळेच कसे गुडीगुडी असते हा प्रश्न मला नेहमी पडतो.

आणि ओल्या केसांच पाणी तोंडावर मारून उठवणार्या बायका ( किन्वा नवरा) पाहिला की कित्ती कौतुक वाटत .
सर्व सामान्य घरात , " अरे , उठतोयस ना ! वाजले बघ किती . पटापट आवर ना . मला पण उशीर होईल नाहीतर" अशा हाका असतात .

हाहाहा, मस्त लिहिलंय...

टिव्ही सिनेमात दिसणार्या गोष्टी खर्यावाटतात ह्याचीच गंमत वाटते...≥>>>>>>>>>
त्या खऱ्या असाव्यात अशी इच्छा करताना मनात येणारे प्रश्नच तर मांडले आहेत, ज्यामुळे त्या गोष्टी खऱ्या नसणार याची लेखिकेला खात्री पटते.

Happy मस्त लिहिलंय्स. इथे उठुन आवरुन, डबा करायला सुरुवात होउन, चपात्या होत आल्या तरी नवरा उठला नाही की मग माझं सगळंच गुडीगुडी सुरु होतं सकाळी. Happy

डबा करायला सुरुवात होउन, चपात्या होत आल्या तरी नवरा उठला नाही की मग माझं सगळंच गुडीगुडी सुरु होतं सकाळी. Happy>>> :haahaa:

अगदी अगदी असच होत.
मला नेहमी वाटायचं की चित्रात, सिनेमात एक प्रेमी जोडपं एकमेकांना किती छान गुरफटून झोपलं आहे. अगदी चादरही दोघांच्या अंगावर कशी समान वाटलेली आहे. इथे एक पांघरूण पुरत नाही. आणि मुळात एखाद्याला कमी जाड दुसऱ्याला जास्त जाड हवं असेल तर? बरं, घेतलं अगदी एकच आणि खूप मोठं असलं ते तरी, एकाला तोंडावर हवं असतं, तर दुसऱ्याला हाताखाली. मग काय करायचं? त्यात पोरं असली तर ती मध्ये येऊन त्याच पांघरुणावर झोपली की बोंबच. दोन्ही बाजूला आम्ही काकडणारे.
मस्त लिहलय.

छान लेख,
चित्रपट शाहरूखचे कमी आणि ईरफानचे जास्त बघाल तर हे प्रश्न हळूहळू कमी होत नाहीसे होतील Happy

छान लिहिले आहे.

१. कॉलेजमध्ये काही कामधंदा नसल्यासारखे दर २ मिनिटाला पी. टी. सदृश नाच करणारे निरुद्योगी विदयार्थी. कॉलेजमधले प्रोफेसर तर इतके वाईट दाखवतात. की त्या सिनेमाशी संबंधित लोकांनी कधी कॉलेजचे तोंड पाहिले आहे की नाही अशी शंका येते.
२. पूर्वीच्या सिमेनात बी.ए. पास झाल्याझाल्या मॅनेजरची नोकरी मिळणारे हिरो.
३. दागदागिने, जरीच्या साड्या, पूर्ण मेकप वर झोपणार्‍या बायका
४. स्वयंपाक करताना फ्रेश दिसणार्‍या, घाम वगैरे न येणार्‍या बायका
५. २५-३० लोकांचे एकत्र कुटुंब असले तरी छोट्याश्या कढईमध्ये जेमतेम पावशेराची भाजी (हलवा, दाल, कढी, किंवा काहीही ) करणार्‍या बायका.
६. हिरोचा अकाली मृत्यू झाल्यास (किंवा तशी भिती असल्यास) त्याच्या बहिणीला/बायकोला "कोठ्या" शिवाय दुसरा ऑप्शन नसणे. अरे!!! शिक्षण वगैरे असते ना. नोकरी नाही का करू शकत????

अजून आठवले तर लिहिन

छान, आवडलं! बेड टी बद्दल माझेही हेच विचार आहेत.

>>>५. २५-३० लोकांचे एकत्र कुटुंब असले तरी छोट्याश्या कढईमध्ये जेमतेम पावशेराची भाजी (हलवा, दाल, कढी, किंवा काहीही ) करणार्‍या बायका.
६. हिरोचा अकाली मृत्यू झाल्यास (किंवा तशी भिती असल्यास) त्याच्या बहिणीला/बायकोला "कोठ्या" शिवाय दुसरा ऑप्शन नसणे. अरे!!! शिक्षण वगैरे असते ना. नोकरी नाही का करू शकत????
--- हा हा. सुमुक्ता अगदी.

विद्या.... Happy अगदी अगदी.........
झोपच नाही लागत अ‍ॅक्च्युअली असं बिलगून झोपलं तर! आणि सकाळी उठल्या उठल्या एकदम खायचंच..? किती घाण वाटेल!
मला तर वाटतं की असं ते हिरो जेव्हा पहात बसतात तेव्हा हिरॉईन गुपचूप आधी उठून फ्रेश होऊन आलेली असते आणि मग झोपून राहते...... शक्यच नाही अदरवाईज.......:-)

छान लिहिले आहे.
असे प्रश्न मला नेहमीच पडतात. लेख वाचताना 'अगदी अगदी' झाले Happy

सर्वान्चे मनापासून आभार. Happy
हिरो जेव्हा पहात बसतात तेव्हा हिरॉईन गुपचूप आधी उठून फ्रेश होऊन आलेली असते आणि मग झोपून राहते...... शक्यच नाही अदरवाईज.......:-)>>+1 Happy

मस्त धम्माल लिहिलंयस विद्या. Rofl
विक्स, झेंडूबामचे वास, कार्बन डायऑक्साईड भारी... Biggrin

घेतलं अगदी एकच आणि खूप मोठं असलं ते तरी, एकाला तोंडावर हवं असतं, तर दुसऱ्याला हाताखाली. मग काय करायचं?>> हे वाचून अगदी माझीच स्टोरी वाटली गं. मला डोक्यावरुन पांघरूण हवं असतं नि अर्धांगाला हाताखाली. मग मोठं पांघरुण असून पण खेचाखेची होतेच. Happy

फार मस्त लिहिलंय... सगळे मुद्दे पटले आहेत. Happy

घोरणे, अजून दुसरे कसले आवाज येणे त्यासोबतचे वास Proud चादर ओढाओढी हे पिक्चर मधे काही दाखवत नाहीत. सकाळचे पिंजारलेले केस, मुखदुर्गंधी हे तर लांबच राहिले. एकच बाथरूम असेल तर आधी कोण जाणार यावरूनची तणतण हाही एक वेगळाच विषय Proud
चिकटून झोपलो तर एक हात जो आपल्याच अंगाखाली येतो त्याचं काय करावं कळत नाही आणि दुसर्ञाच मिनिटाला चला मी आता आरामात झोपते / झोपतो म्हणत घोरायला लागतो/लागते Proud

अजून आठवलेले
१. सिनेमा/सिरिअलीतल्या बायका कधीही दमत नाहीत. कितीही स्वयंपाक करुन, मुलांचे करून नेहेमी ताज्यातवान्या असतात.
२. आज जेवायला /नाश्त्याला काय करायचं असले प्रश्न यांना पडत नाहीत.
३. नवर्‍याचे सतत प्रेमळ कटाक्ष मिळत असतात.
४. नवरे सतत मागून मिठ्या मारत असतात आणि सारखे प्रेमातच असतात.
५. घरातले लोक किती आणि त्यानुसार वापरायच्या भांड्यांचा साईज यावर लिहिलेच आहेस... अजून एक म्हणजे सगळे लोक उशीर झालाय म्हणून नाश्ता अर्धवट सोडुन जातात ... पॅक करून न्यावे ना सोबत आमच्यासारखे Happy
६. ७-८ लोकांसाठी कितीहि थालिपिठं मेघना आणि सखी गोखले करायच्या मला ३-४ केली की च कंटाळा याय्ला लागतो... एक थापुन ठेवले आणि एक तव्यावर असेल तर तो चिकट हात धरून बसावे लागते.
७. दिवाळी किंवा तत्सम सण असेल तर सगळि जय्यत तयारी झालेलीच असते कधी आमच्यासारखं हे राहिलंच, ते राहिलंच, जाऊदे जी मिळाली साडी, ब्लाऊज ला कशाला इस्त्री नाहीतरी एकच बाही दिसणार असं कधी होत नाही.

लेख छान लिहिला आहे.
स्वानुभवावरून काही उपाय सांगतो आम्हाला कळायला २० वर्षे लागली Happy करून पहा.

१) तुम्ही बेडच्या कुठल्या बाजुला झोपता (आणि कुठल्या कुशीवर) त्यावर जवळ जवळ झोपता येणे न येणे अवलंबून असू शकते. अदलाबदल करून पहा. कधी असा बदल खूप छान वाटू शकतो.
२) दोघांपैकी एकाने (शेजारी शेजारी न ठेवता) , उशी थोडी खाली सरकवली (तुम्हाला जितकी योग्य वाटेल तेव्हडी Wink ) तर बरेचसे (सगळे नाही) प्रश्न सुटू शकतात. पांघरूणाची पोझिशन, कार्बन डाय ऑक्साईड, सकाळी उठल्यावर तोंडाचे वास इत्यादींची तिव्रता थोडी कमी होते. फक्त पिक्चरमधेच दिसणारे हे छोटे आनंद घेता येतात.
>चिकटून झोपलो तर एक हात जो आपल्याच अंगाखाली येतो त्याचं काय करावं कळत नाही
कुशीवर झोपून एका बाजूची उशी खाली करून हेही अ‍ॅडजस्ट करता येते. प्रयत्न सोडू नका.

मला CO2 सोडल्यास जवळ झोपण्याचा कुठलाच त्रास होत नाही. उपाय - एकमेकांकडे तोंड करून न झोपता एका दिशेला तोंड करून झोपणे. मला त्याच्या मोठ्याने घोरण्याचा ही त्रास होत नाही आणि माझ्या मोठ्या केसांना तो सांभाळून घेतो.
बाकी उठल्यानंतर च्या सगळ्या गोष्टी अगदी पटणाऱ्या आहेत.
अजून एक खटकणारी गोष्ट, मुंबईतलं सर्वसामान्य घर असतं आणि अंगावर पांघरूण घेऊन झोपलेले असतात. एसी असेल तर ठिक आहे पण असं काही नसतं. आठवा, कादिप मधलं सावंतांचं घर.

इथे उठुन आवरुन, डबा करायला सुरुवात होउन, चपात्या होत आल्या तरी नवरा उठला नाही की मग माझं सगळंच गुडीगुडी सुरु होतं सकाळी. >> हे मात्र अगदी खरं आहे.

एकदम मस्त लिहलंय विद्या. असेच प्रश्न पडतात मला. जी गोष्ट अति चांगुलपणाची तीच अति वाईटपणाचीसुद्धा.
- एखादी सासू किंवा नणंद इतकी दुष्ट की तिला सुनेचा/वाहिनीची काम बिघडवण्याचं training दिलं असावा आणि तिला स्वतःला इतर कामे, ऑफिस, college असं काही नसतंच ?? रोज उठून फक्त दुसऱ्याला त्रास देण्याचं planning करताना अजूनतरी कोणी दिसलं नाही. तेवढा सुद्धा वेळ कोणाकडे नसतो. आणि सून लगेच सतीसावित्री कशी? कोणी काही म्हटलं तरी ऐकून घेणारी.
- छोट्या घरच्या लग्नामध्ये सुद्धा, संगीत, १००० लोकं जेवायला, नवरी मुलगी top -to -bottom सोन्याने मढलेली. लाँटरी लागते की काय?
- मुलांच्या बेडरूम्स किंवा सगळं घरचं इतक नीटनेटक कसं असतं देव जाणे !
दिसतं तसं नसतं हेच खरं Happy

गोदरेज सोप नन्बर १ च्या जाहिरातीत ती मोडेल सगळ्या गोश्टी हसत हसत करत् असत.
काहीही दाखवतात.

Pages