उर्वशी, एका नायिकेचा इतिहास – १

Submitted by अतुल ठाकुर on 23 July, 2017 - 23:52

1_0.jpg

कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त रुईयामहाविद्यालयात डॉ. वैशाली दाबके यांचे “उर्वशी – एका नायिकेचा इतिहास” हे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. खरं तर माझ्यासारख्या सामान्य रसिकाला प्राचीन वाङमयातील नायिका म्हटलं म्हणजे शकुंतला, द्रौपदी या पटकन आठवतात. तितक्या लगेच उर्वशीची आठवण होत नाही. दाबके मॅडमचे व्याख्यान ऐकताना मात्र या नायिकेचे हिमनगासारखे स्वरुप लक्षात आले. वर वर दिसते त्याहूनही बरेच काही अज्ञात असलेले. आणि कदाचित त्यामुळेच असेल की शतकानुशतके उर्वशी ही कलावंत आणि विद्वानांना खुणावत आहे. दाबके मॅडमनी सुरुवात आपल्या रुईयाच्या विद्यार्थी दशेतील आठवणींपासून केली. जुन्या दिवसांच्या रम्य स्मृतींचा सुगंध त्यांच्या बोलण्यात दरवळत असतानाच रुईयाला येणे म्हणजे माहेराला येणे वाटते असे म्हणत त्या अनौपचारीक बोलण्यातून अगदी सहज विषयाकडे वळल्या.

पुरुरवा उर्वशीच्या कथेचा मागोवा त्यांनी वेदकालापासून ते अलिकडल्या अरुणा ढेरे यांच्या उर्वशीवरील कादंबरीपर्यंत घेतला. त्यात क्रमाने ब्राह्मणग्रंथ होते, मग पुराणे होती, त्याच कालात कालिदासाचे प्रख्यात “विक्रमोर्वशीयम्” होते, पुढे गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची उर्वशीवरील कविता होती, विख्यात हिन्दी कवी रामधारीसिंह ‘दिनकर’ यांचे उर्वशीवरील महाकाव्य होते आणि पु. शि. रेगे यांची कवितादेखील होती. दाबकेमॅडमनी हा प्रवास त्यांना नायिकेचा इतिहास सांगायचा असला तरी शुष्क सनावळ्या, कालगणना, शके, संवत, इसवीसन यातून मात्र घडवला नाही. जेथे आवश्यक तेथेच हे उल्लेख होते. बाकी अतिशय ओघवत्या, आकर्षक शैलीतील हे व्याख्यान होते. सोबतच त्यांची अत्यंत मार्मिक अशी टिप्पणी, मते आणि त्यांना जाणवलेला अर्थ सांगत गेल्याने हे व्याख्यान रंजकतेबरोबरच नवीन विचार पेरीत गेले. किंबहूना विद्यार्थ्यांशी हितगुज करावे अशा शैलीत बोलून त्यांची जिज्ञासा जागृत कशी करावी याचा तो वस्तूपाठच होता असे म्हणायला हरकत नाही. कालिसाददिनानिमित्त हे व्याख्यान असल्याने दाबकेमॅडमनी विक्रमोर्वशीयम् चा धागा या विवेचनात सतत पकडून धरला होता. त्यांचे प्रत्येक प्रतिपादन वळून पुन्हा मूळ कथा आणि त्यात कालिदासाने आपल्या प्रतिभेने केलेले बदल याकडे येत होते. मॅडमनी सुरुवात अर्थातच पुरुरवा उर्वशीच्या ऋग्वेदातील संवादाने केली.

अखिल मानवजातीच्या काव्यम्य प्रतिभेचा अविष्कार म्हटल्या जाणार्‍या ऋग्वेदाच्या दशम मण्डलातील पंचाण्णवाव्या सूक्तात पुरुरवा उर्वशी संवाद आहे. ऋग्वेदाचा काळ साधारण इसपू. ४००० ते ४५०० वर्षे असा धरला तर पुरुरवा उर्वशी कथा ही इतकी जूनी आहे. म्हणजेच उर्वशी या नायिकेचा इतिहास इतका प्राचीन आहे हे म्हणणे भाग आहे. हा संवाद त्रोटक स्वरुपात आहे. त्यातून कथा स्वरुपात फारसे काही हाती लागत नाही. मात्र यात उर्वशीच्या स्वभावावर मात्र प्रकाश पडतो. दाबके मॅडमनी अत्यंत मार्मिकपणे यातील उर्वशी ही रोखठोक आहे असे म्हटले. पुरुरवा करुणपणे तिची विनवणी करीत असताना ती त्याला परत जाण्यास सांगते. तिला त्याची जराही दया येत नाही. अठरा ऋचांच्या या सूक्ताची सुरुवातच मुळी “हये जाये मनसा तिष्ठ” अशा विनवणीने होते. हे निष्ठुर पत्नी, जरा थांब! पुरुरव्याला नकार देताना पंधराव्या ऋचेत उर्वशी “न वै स्त्रैणानि सख्यानि” असा उपदेशही करते. स्त्रीयांशी मैत्री करु नये असे सांगणारी उर्वशी नक्की कशी आहे हे समजण्यास या सूक्ताची मदत होते असे दाबके मॅडमचे मत दिसले.

या त्रोटक संवादाने पुरुरव्याचे प्रेमात वेडेपिसे होणेआणि उर्वशीचे रोखठोक व्यवहारी असणे हे धागे हाती लागतात. अशा तर्‍हेची मांडणी दबके मॅडमनी वेदातील या संवादाच्या अनुषंगाने केली. पुढे त्याचा आधार घेऊन त्या शतपथब्राह्मणाकडे वळल्या. त्यात आलेल्या उर्वशीकथेचा मागोवा त्यांनी सामाजिक दृष्टीने घेतला. शतपथब्राह्मणाचा काळ म्हणजे यज्ञसंस्थेच्या वैभवाचा काळ. या काळात यज्ञयागांचे महत्त्व वाढले. अनेक कथांचा वापर यज्ञांची महत्ता सांगण्यासाठी केला गेला असेही त्यांनी अधोरेखित केले. उर्वशी पुरुरवा यांची कथाही त्याला अपवाद नव्हतीच. यज्ञामुळे गंधर्व लोकाची प्राप्ती कशी करता येईल हे सांगण्यासाठी ही कथा शतपथब्राह्मणात येते.

शतपथब्राह्मणकथेतील उर्वशी पुरुरव्याला तीन अटी घालते. त्यात दिवसातून तिनवेळा माझ्याशी संग करता येईल, कामेच्छा असल्याशिवाय माझ्याशी रममाण होता येणार नाही आणि माझ्यासमोर नग्न स्वरुपात कधीही यायचे नाही यांचा समावेश असतो. उर्वशीसोबत तिचे दोन मेंढेही असतात ज्यांची काळजी पुरुरव्यानेच घ्यावी अशी बहुधा तिची अपेक्षा असते. तिच्या विरहाने दु:खी झालेले गंधर्व तिने स्वर्गलोकी परत यावे यासाठी कट करतात. त्या मेंढ्यांपैकी एकाला रात्री पळवतात. त्याच्यासाठी उर्वशी आकांत करीत असताना पुरुरवा नग्नच मेंढ्याला मिळविण्यासाठी बाहेर पडतो. गंधर्व त्यावेळी प्रकाश उत्पन्न करतात आणि पुरुरवा उर्वशीला नग्नावस्थेत दिसतो. प्रतिज्ञा मोडते आणि उर्वशी परत जाते. पुढे उर्वशीच्या विरहाने व्याकुळ होऊन पुरुरवा फिरत असताना त्याची उर्वशीशी पुन्हा भेट होते. त्यावेळी एक विशिष्ट प्रकारचे अग्निहोत्र केल्यास पुरुरव्याला गंधर्वत्व प्राप्त होईल आणि त्याचे आपल्याशी पुन्हा मिलन होऊ शकेल असे उर्वशी त्याला सांगते. त्याप्रमाणे पुरुरवा गंधर्वस्थितीला प्राप्त होतो. आणि त्यांचे मिलन होते.

ब्राह्मणकाळात यज्ञांचे महत्त्व इतके वाढले होते की मर्त्य मानवाला यज्ञामुळे दुसरी योनीदेखील प्राप्त होणे शक्य आहे असे सांगितले गेले. उर्वशी या नायिकेचा इतिहास सांगताना शतपथ ब्राह्मणातील उर्वशी ही ऋग्वेदाप्रमाणेच रोखठोक आणि पाषाणहृदयी वाटते अशी टिप्पणी दाबके मॅडमनी केली. ही टिप्पणी योग्य वाटते कारण कुठेही उर्वशी नमताना किंवा तिचे हृदय पुरुरव्याची अवस्था पाहून फारसे द्रवताना दिसत नाही. ही कथा सांगताना ऋग्वेदातील मूळ कथा आणि यज्ञांचे महत्त्व वाढल्याने तिचे शतपथब्राह्मणात केले गेलेले रुपांतर याकडे लक्ष वळवून पुढे दाबके मॅडमनी पुराणांमध्ये येणार्‍या उर्वशीच्या कथेबद्दल बोलण्यास सुरुवात केली.

पुराणांच्या काळाबाबतीत मतभेदांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की पुरुरवा उर्वशीचा संयोग आणि वियोग हा शापामुळे झाला ही कल्पना मूलतया पुराणांमधील आहे. पद्मपुराण, ब्रह्मपुराण, मत्स्यपुराण, विष्णुपुराण यात उर्वशीची कथा आली आहे. पैकी मत्स्यपुराण आणि विष्णुपुराणतील कथेशी कालिदासाच्या “विक्रमोर्वशीयम्” चे साम्य दिसून येते. मात्र कालिदासासमोर हे नाटक लिहिताना कुठले पुराण होते हे नक्की सांगता येत नाही. यापैकी मत्स्यपुराणात भरतमुनिंनी उर्वशीला दिलेल्या शापाची कथा आली आहे. केशी दानव उर्वशी व तिची सखी चित्रलेखा यांना पळवून नेत असताना पुरुरव्याने त्याला पराभूत करून दोघींना सोडवले. या दानवाकडून इंद्रही पराभूत झाला होता. त्यामुळे इंद्र दरबारात पुरुरव्याचे महत्त्व वाढले. उर्वशी त्याच्यावर अनुरक्त झाली. त्याच्याकडे संपूर्ण लक्ष लागल्याने भरतमुनिंनी बसवलेल्या “लक्ष्मीस्वयंवर” नाटकात काम करत असताना तिच्याकडून चूक झाली आणि त्यामुळे भरतमुनिंनी क्रोध येऊन तिला पुरुरव्याचा वियोग घडेल आणि पंचावन्न वर्षे लतेच्या रुपात भूतलावर राहावे लागेल असा शाप दिला.

मत्स्यपुराणातच पुरुरव्याला अर्थ व काम यांनी दिलेल्या शापाचीही कथा आहे. त्यात धर्माला झुकते माप दिल्याने अर्थ व काम रागावून शाप देतात. त्यातही उर्वशीच्या वियोगाचा उल्लेख आहे. पुराणांमधील कथेबाबत बोलताना दाबके मॅडमनी पुन्हा त्याचे सामाजिक दृष्टीन विश्लेषण केले. ज्या देवाचे माहात्म्य पुराण सांगते त्या देवाचे महात्म्य अधोरेखित करण्याच्या दृष्टीने उर्वशीच्या कथेत पुराणांमध्ये बदल झालेले आढळतात. उदाहरणार्थ पद्मपुराणात विष्णुचे माहात्म्य वर्णिलेले आहे. विष्णुच्या वरदानामुळे उर्वशी पुरुरव्याच्या प्रेमात पडते अशी कथा त्यात आहे. प्रत्येक कालखंडातील कथेत झालेल्या बदलाचा उल्लेख करीत असताना त्याच्या सामाजिक कारणांचाही थोडक्यात उहापोह केल्याने माझ्यासारख्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी दाबके मॅडम करीत असलेली मांडणी महत्त्वाची होती. पुराणांमधील उर्वशीच्या कथेचे विवेचन संपवून त्यांनी व्याख्यानाचा गाभा असलेल्या कविकुलगुरु कालिदासाच्या “विक्रमोर्वशीयम्” कडे आपला रोख वळवला. (क्रमशः)

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chaan Happy

छान माहिती । राजा रवि वर्मा कादंबरी मध्ये या उर्वशी पुरूरवा प्रसंग बद्दल वाचले होते। त्यांनी चित्र काढले होते । तुम्ही खूप छान माहिती दिली आहे। पुढील भागाच्या प्रतिक्षेत....