वेड सेल्फीच

Submitted by शिवाजी उमाजी on 23 July, 2017 - 06:47

वेड सेल्फीच

काय अजब गोष्ट आहे ना ही सेल्फी? स्वतःचा वा आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा स्वतःच फोटो काढायचा कुठेही, कसाही आणि कधीही, कसलीही तमा न बाळगता अगदि सहजपणे, किती सोप्प झालय आज हे सारं! ही सारी किमया साध्य झाली आहे ती केवळ नविन आलेल्या स्मार्ट मोबाईल फोनमुळे.

एक काळ असा होता जेव्हा फोटो काढणं म्हणजे एक छानसा सोहळा असायचा, आजच्या सारखं प्रत्येक गोष्टी साठी फोटो लागत नसतं, ना तेवढी गरज भासत असे, कधीकाळी फोटो काढायचा असला तर नविन कपडे घालणं आलं, गेला बाजार छान स्वच्छ धुवुन ईस्त्री केलेले कपडे घालुन व्यवस्थित पावडर वगैरे लावून, भांग पाडून, फोटो साठी तयार व्हायचं, तर कधी कधी रूबाबदार दिसण्यासाठी छाती पेक्षा मोठा टाय अडकवुन झकास पोज देत उभ राहुन फोटो काढण्याचा कार्यक्रम चाले. त्यातही चुकुन एखादी चुक झाली तर पुन्हा पहीले पाढे पंचाववन्न.

काय थाट असायचा तेंव्हा फोटोग्राफरचा? आल्या आल्या तो आपली बँग उघडुन सारी आयुधं म्हणजे कँमेरा, बँटरी प्रसंगा नुसार उपयोगी पडणारी लेंन्स वगैरे बाहेर काढुन त्यांची जुळवा जुळव करणार, दरम्यान त्याच्या साठी कोल्ड ड्रींक, सरबत वा चहा पैकि काहीतरी येत असे, दुसऱ्या बाजुला उत्सव मुर्ती वा मुर्त्या त्याची चातका प्रमाणे वाट बघत घाम पुशित बसलेल्या असत. यथा अवकाश फोटोग्राफरचं चहापान आटोपलं कि घरातल्या तमाम दर्शकांचा विशेष सुचना देण्याचा कार्यक्रम सुरू होई, "अरे बबन त्या शर्टाची काँलर जरा वर उचल... कुत्र्याच्या काना सारखी झालीए बघ" हे ऐकुन बबन हैरान होतो, काँलरकडे हात नेईस्तोवर आणखी एकजण म्हणतो "कुणीतरी त्याच्या कपाळीचा घाम पुसा रे" तेंव्हा घाम पुसता पुसता बबनचा भांग विस्कटतो, मग तो निट करण्या साठी आणखी काही सुचना, अशा सर्व सुचना, शर्ट, टाय इत्यादि गोष्टी आप आपल्या योग्य ठीकाणी स्थिरस्थावर झाल्यावर एकदाचा फ्लँशच्या दिव्याचा लखलखाट होई व फोटो निघाला हे समस्त उपस्थित श्रोत्यांना उमजत असे, जी गत बबनची तशीच अवस्था थोडया फार फरकाने बऱ्याच मंडळीच्या बाबत होत असे.

महिला मंडळीचा फोटो काढण्याचा कार्यक्रम या पेक्षा थोडा वेगळा असे, तो कार्यक्रम खास करून मुलगी वयात आल्यावरच खऱ्या अर्थाने सुरू होई, वरपक्षाला दाखवण्यासाठी मुलींचे काही खास फोटो काढले जात, त्यावेळी अगदि मुलीच्या रंगाला मँच होणारी साडी, ब्लाउज काही विशेष दागिने शोधेस्तोवर एखाद दोन दिवस सुध्दा उलटुन जात, साडी दागिने मिळालेच तर बऱ्या पैकि मेकअप करून देणारी त्या मुलीच्या एखादया सिनियर अर्थात लग्न झालेल्या अनुभवी मैत्रीणीचा शोध सुरू होई, कशीबशी एखादि भेटलीच तर... ती असल्याच कार्यक्रमात त्या वेळी स्वतःची झालेली गम्मत खरं तर फजिती, आठवत आठवत हे काम किती जबाबदारीचे व महत्वाचे आहे हे पटवुन देता देता हया मुलीचा मेकअप पार पाडीत असे, व त्या नंतर फोटोग्राफर सारी सुत्रे आपल्या हाती घेत असे पाच सहा कोनातून, आई वडील वा घरातील मंडळीसह फोटो काढण्याचा एक प्रयोग होई, त्या दरम्यान एकमेकांस सुचना देण्याचा कार्यक्रम अविरत सुरू असे, सरते शेवटी आठ दहा फोटो काढुन झाल्यावर तो आपलं साहित्य आवरायला घेत असताना, कापऱ्या आवाजात मुलीची आज्जी म्हणते "अरे चांगले स्वच्छ धुवुन दे रे बाबा आमच्या मंगीचे फोटो, नाहीतर आई सारखी सावळीच दिसेल ती" हे सांगता सांगता आपली सुन कशी सावळी आहे याची उजळणी आजी करून घेत असे.

नंतरच्या काळात मात्र थोडा फरक पडू लागला, लोक शिकू लागले, म्हणता म्हणता तंत्रज्ञान सुध्दा प्रगत होवु लागलं, विदेशी कल्पना रूळू लागल्या, कळत नकळत त्यांच अनुकरण होवु लागलं, एक नवा वर्ग तयार झाला. पुर्वी केवळ श्रीमंताचा असलेला हा शौक आता नव श्रीमंताना सुध्दा परवडू लागला, गल्लो गल्ली फोटो स्टुडीयो आले मग मात्र सर्व सामान्य माणुस पण हया कलेच्या प्रेमात पडला. अगोदरच चित्रपट सृष्टीचे वेड! मग काय वेग वेगळया नट नटयांच्या ईश्टाइल मधी फोटो निघु लागले, पुर्वी अगदिच काहीबाही घटना झाल्यावर भिंतीवर फोटो लागत, परंतु आता केवळ फलाण्या हिरो/हिरोईन वरच्या प्रेमा पोटी त्यांच्या सारख्या पोशाखात व श्टाईल मध्ये काढलेले फोटो सर्रास भिंतीवर दिसु लागले, आणि त्यात सुध्दा एक वेगळीच गंम्मत होती त्या वेळी.

पुढे पुढे सर्वच बदलु लागलं, आर्थिक सुधारणां होवु लागली, सर्व सामान्यांच्या हाती रीळ वाले जावुन पोर्टेबल, डिजीटल कँमेरे दिसु लागले आणि फोटो वगैरे काढणं सोपं झालं. एरवी परीक्षा व नोकऱ्या साठी फोटो पाठवण्याची गरज भासु लागली व ती नित्याचीच बाब झाली. पण जशी मोबाईल मध्ये कँमेऱ्याची सोय झाली तसं वेडयागत फोटो काढण्याची बिमारी वाढली. प्रसंगी फोटो काढणे समर्थनिय आहे, पण हल्ली कसलाच धरबंद नाही, चार मित्र मैत्रिणी भेटल्या कि काढ फोटो, जर त्या सेल्फीत चार जण असतील तर प्रत्येकाची नजर कँमेरा सोडून भलतीकडेच दिसते, त्यात भर म्हणून कि काय व्हिक्टरीची खुण म्हणुन दोन बोटं दाखवणं, वेडेवाकडे चेहरे करून बाहेर काढलेली जीभ, कशाचाही संदर्भ कश्याशी नाही, परस्पर पुरक नाही, पहाताना कसं विचित्र दिसतं ते? चला, काही अंशी तेही ठिक आहे गम्मत म्हणुन.
पण सार्वजनिक ठीकाणी? काही वेळा धावत्या बस, ट्रेन मध्ये दारात उभं राहून फोटो साँरी सेल्फी काढण्याची कसली स्टाईल? तीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता? हया स्टाईल मुळे काही वेळा जीवावर बेतणारे अपघात सुध्दा घडले आहेत, जसं वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणं धोकादायक आहे तेवढच अशा पद्धतीने हे सेल्फी काढणं सुध्दा धोकादायक आहे.

जाणकार लोकांच्या मते हि एक प्रकारची विकृतीच आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा अवास्तव, असंबधित व अती वापर हा विकृतीत मोडणारा विषय होतो. सामजिक व विधायक कार्या साठी याचा संतुलीत उपयोग झाला तर चांगलच आहे.

सेल्फीच वेड केवळ तररूणांनाच आहे अस नाही, हल्ली बऱ्याच लोकांना हयाची लागण झाली आहे, अगदि चित्रपट सृष्टीतील कलाकारां पासुन ते राजकिय नेत्यां पर्यंत हि क्रेझ पसरली आहे. आता काय तर सेल्फी स्टीक बाजारात आली आहे, तेवढीच जोखिम कमी म्हणूया, परंतु ज्याच्या कुणाची ही कल्पना असेल त्याला मानावचं लागेल, म्हणतात ना जे लोकांना आवडतं ते बाजारात येतं.
एक गोष्ट खरी ती म्हणजे काळ बदलला आहे, पुर्वी अल्बम काढुन कौतुकाने फोटोंची वर्णने ऐकवली जात ती सुद्धा अगदि मनापासुन. भावनिक गुंतवणुक असतात फोटो, म्हणुन जपले जातात, त्या त्या वेळचे संदर्भ देवुन नव्या पिढीला दाखविले जातात. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कृतीची जपणुकच होते त्यामधुन हे नाकारता येणार नाही.

नव्या पिढीला सतत नाविन्याची ओढ आहे, एक फोटो नाही जमला तर तो डीलिट करून दुसरा काढा काही वाटत नाही त्याचं त्यांना, कारण तंत्रज्ञानाने पण तशी सोय त्यांना दिली आहे, त्याचाच वापर होतोय, तो वापर चांगल्या व निखळ आनंदा साठी होत राहो हिच अपेक्षा.

© शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults