केशरी सोवळे

Submitted by santosh watpade on 18 July, 2017 - 07:15

कटीझाकला केशरीजर्द शेला कुणी चंद्रवाटेवरी सोडला
खुले सोडुनी केस गंधाळलेले कुणी पाय पाण्यामधे टाकला..

खुणा केशरी ओलसर पावलांच्या नभाच्या किनारी दिसू लागल्या
खुला केशसंभार ओलावलेला तिने गौर पाठीवरी ल्यायला...

तिच्या चिंब ओठातल्या केशराने झरा केशरी होत गेला जरी
मदोन्मत्त तारुण्य शोषून ओले सभोवार झाल्या शिळा केशरी...

निराधार दारे जुन्या राउळांची जुने केशरी उंबरे घासले
झुगारुन साम्राज्य अंधारलेले धृवाने जणू सोवळे नेसले ...

कदंबावरी केशरी कृष्णलीला कदंबातळी याचना लाघवी
तिची केशरीपापणी चिंब झाली विनावस्त्र न्हाते जशी जान्हवी...

स्वतःची चिता केशरी मांडल्यावर दिवाकर निघाला पुढे बापुडा
सती जायला चालली सांध्यछाया फुलांचा तिच्या पावलांवर सडा..

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users