एक किलो टमाटर आणि मध्यमवर्गीय ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 July, 2017 - 13:14

मला एक वाईट सवय आहे. आईने कधी दोन रुपयाचा कडीपत्ता आणायला सांगितला तर मला भाजीवाल्याकडे तो दोनच रुपयांचा मागायची लाज वाटते. म्हणून मग मी पाच रुपयांचा घेऊन येतो.
पाच-दहा रुपयांचा मसाला घेऊन त्यात भैय्या ईसमे थोडा ये डालना, वो भी डालना, करायलाही मला संकोच वाटतो. म्हणून मी आणखी पाच रुपये त्याच्या हातावर टेकवत 'ये भी वो भी' सेपरेटच घेऊन येतो.
एकेकाळी याचे काही वाटायचे नाही, पण जॉबला लागल्यापासून मी स्वत:ला उगाचच उच्च मध्यमवर्गीय समजू लागलो होतो.
पण काल माझा हा अहंकार गळून पडला.

ऑफिसहून येताना आईचा मेसेज आला: ऋषी, समोरच्या भैय्याकडून अर्धा किलो तांबाटे घेऊन ये...
आता हा समोरचा भैय्या म्हणजे मला उगाचच 'ईंजिनीअर साहब' म्हणून हाक मारून चिडवणारा. खरे तर याला जबाबदार आमचे तीर्थरूपच. पोरगा ईंजिनीअर झाल्याचा काय तो आनंद वर्णावा, बिल्डींगमध्येच नाही तर आसपासच्या दुकान लाईनमध्येही पेढे वाटले होते. तेव्हापासून सारे दुकानदार मला ईंजिनीअर साहब, बाबू, सरजी अश्या तिरकस नावांनीच हाक मारतात. तर ते एक असो.. अश्या भैय्याच्या दुकानात जाऊन अर्धा किलो टमाटर मागणे आपल्या ईभ्रतीला धक्का देणारे वाटल्याने मी एक किलोची मागणी केली. त्याने मला असे काही न्याहाळले की जसे मी घरात पार्टी करायला बीअरचा खोकाच ऑर्डर करतोय.
तिथल्या पोरानेही मला आदराने टमाटर निवडून द्यायला सुरुवात केली. मी नेहमीसारखे मलाही त्यातले काही समजते असे दाखवत बाजूला उभा राहिलो. पण प्रत्यक्षात मला भाज्यांमधले चांगले काय आणि वाईट काय हे काssही समजत नाही. समोरच्याने मला फसवले तरी मी जे निवडेल त्यापेक्षा तो सरासरी चांगलेच देण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी ते त्याच्यावरच सोडतो.

तर अगदी सोन्याचे वजन करावे तसे काटेकोरपणे वजन करून त्याने ते टोमॅटो माझ्या पिशवीत भरले. मी पन्नास रुपयांची नोट त्याच्या हातात टेकवली आणि सुट्टे पैसे परत मिळायच्या आशेने क्षणभर तिथेच रेंगाळलो. किती झाले याची कल्पना नव्हती कारण अशी छोटीमोठी भाज्यांची खरेदी किंमत विचारत करणे हे देखील माझ्या प्रतिष्टेला साजेसे नसते.. पण झाले भलतेच.
"एक किलो लिया ना, सौ रुपया हुआ.. और पचास दे दो" .. तो असे म्हणाला आणि मी अवाकच झालो. आता मी माझ्या पिशवीतील टमाट्यांकडे बघू लागलो. भाईने चुकून सफर्रचंद तर नाही ना दिले ..

"क्या भैय्या, टमाटर स्वित्झर्लंड का है क्या?" .. मी उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. तसे त्याने पुन्हा मला एक लूक दिला, कुठून कुठून येतात लोकं टाईप्स..

"बाहर एक सौ बीस का है, वो तो मै आपके लिए सौ सौ मे बेचने बैठा हू".. त्याने आपला ठेवणीतला डायलॉग फेकला आणि मी मुकाटपणे आणखी एक पन्नास त्याच्या हातावर टेकवून बाहेर पडलो.

खिसा शंभरने हलका झालाच होता, पण आई बोललेली फक्त अर्धा किलोच आण. जेव्हा तिला समजेल की मी शहाणपणा करून एक किलो घेतले तेव्हा तिच्या किती शिव्या पडतील त्याचे एक वेगळेच टेंशन मला येऊ लागले होते.

मागेही तूरडाळ बराच काळ महाग झाली होती. तेव्हा आम्हाला काडीचाही फरक पडला नव्हता. कारण तूरडाळीवाचून आमचे काहीच अडणार नव्हते. विविध कडधान्यांच्या उसळी, आमट्या, कांद्याचे कालवण, काळ्या वाटाण्याचे सांबार, दह्याची कडी, कोकमकढी, तांबाट्याचे सार, मच्छीचे सार, मटणाचा रस्सा, खेकड्याचे कालवण, कुळदाची पिठी.. एक ना दोन, हजार पर्याय होते. किंबहुना डाळ आमच्याकडे क्वचितच बनायची.
पण आता टोमॅटो महाग झाल्याने फारच पंचाईत होणार होती. आमच्याकडे टॉमेटोची आंबट गोड तिखट झणझणीत अश्या तीनचार प्रकारे भाज्या आणि चटण्या बनवल्या जातात. शाकाहारात मोजक्याच भाज्या खाणारा मी, माझी बरीच भिस्त या टोमेटो भाज्यांवरच असते. तसेच वर उल्लेखलेल्या कालवणांपैकी तांबाट्याचे सार माझे सर्वात फेव्हरेट. एक डबल अंड्याचे ऑमलेट सोबत घेऊन मी टोपच्या टोप भात यासोबत रिचवतो. थोडक्यात कोणीतरी हवेतल्या ऑक्सिजनला टॅक्स लावल्यासारखेच मला वाटले.

घरी परतताना हातात फक्त किलोभर टोमेटो होते, पण पावले तांदळाची गोण घेऊन चालल्यासारखी जड झाली होती. कारण आता पुढचे काही दिवस आपल्या आवडत्या टोमॅटोचे हटट सोडून ताटात पडेल ते गिळावे लागणार होते. कारण आता आपली काटकसरी आई प्रत्येक पदार्थात जपून जपूनच टॉमेटो टाकणार आणि जिथे त्याशिवाय पर्याय नाही ते पदार्थ करणारच नाही हे मी समजलो होतो.

मध्यंतरी कुठेतरी मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीय मानसिकता म्हणजे काय ही चर्चा वाचण्यात आलेली. नेमका अर्थ आता समजला होता. एखादा पदार्थ महाग होताच तो कितीही आवडीचा असला तरी दैनंदिन आहारातून गायब होणे. म्हणजेच वाढत्या महागाईनुसार आपल्या आयुष्याच्या प्रायोरीटीज बदलणे, हाच खरा मध्यमवर्ग Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या टोमॅटोंवर कुठलासा रोग पडत आहे त्यामुळे टोमॅटोचे पिक घेणेच अनेकांनी बंद केलेय.
या विधानावर हे उत्तरः
आपली माहीत जास्तीत जास्त श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचायला हवी. बिचारे रोगट टमाटर खात असतील..
मनोरंजन!!!
>>>>>>>

अहो नानाकळा, त्या विधानावर ते उत्तर नव्हते, त्यांच्या आणि माझ्या प्रतिसादातील कुठलीही दोन वाक्ये कोट करू नका Happy

तळकोकणातही तंबाटे/ तांबाटे च म्हणतात रे.
>>>>>
सूनटून्या ओके.
मी फक्त ते शब्द कोकणात वापरले जाणारे असल्याची ग्यारंटी घेणार नाही असे बोल्लो. कारण माझी आजी जे शब्द वापरायची ते सारे कोकण वापरते, किंवा कोकणी शब्द आहेत असे खात्रीने सांगायचो आणि तसे नसल्यास उगाच काहीही चुकीची माहीती देतो म्हणून लोकं माझ्यावर तुटून पडायचे.. जरा हळवा आहे मी, असे काही झाले की नाही झेपत Happy

आत्ताच घरी आल्यावर पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलो ,
बायकोने फ्रीज वर सुचनाच लिहून ठेवली आहे ,
"काजू खा,बदाम खा . . पण जर टोमॅटोना हात लावला तर जिवच घेईन तुमचा .:D Lol

व्हॉटसपेवरून साभार ....

टोमॅटो काजू बदामपेक्षाही महाग झाले? >>>> ज्या घरात कधीतरीच सणवाराला काजू बदाम घातलेला शिरा हलवा बनवला जातो, मात्र टॉमेटो रोजच्या जेवनात लागतोच. त्यांन नक्कीच टॉमेटो महागाईच फटका काजू महागाईपेक्षा जास्त बसत असेल..

आणि नवरे हल्ली खरेच स्वस्त झालेत. आधी लाखोंचा हुंडा द्यावा लागायचा, आता मिळतात असेच, फुकटात Happy

आणि नवरे हल्ली खरेच स्वस्त झालेत. आधी लाखोंचा हुंडा द्यावा लागायचा, आता मिळतात असेच, फुकटात >>>>
हे दु:ख आहे काय..... Biggrin

{{{आणि नवरे हल्ली खरेच स्वस्त झालेत. आधी लाखोंचा हुंडा द्यावा लागायचा, आता मिळतात असेच, फुकटात Happy}}}

ऋभाऊ इस बातपे एक धागा तो बनता है| तो गुरु हो जा शुरु|

Pages