एक किलो टमाटर आणि मध्यमवर्गीय ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 July, 2017 - 13:14

मला एक वाईट सवय आहे. आईने कधी दोन रुपयाचा कडीपत्ता आणायला सांगितला तर मला भाजीवाल्याकडे तो दोनच रुपयांचा मागायची लाज वाटते. म्हणून मग मी पाच रुपयांचा घेऊन येतो.
पाच-दहा रुपयांचा मसाला घेऊन त्यात भैय्या ईसमे थोडा ये डालना, वो भी डालना, करायलाही मला संकोच वाटतो. म्हणून मी आणखी पाच रुपये त्याच्या हातावर टेकवत 'ये भी वो भी' सेपरेटच घेऊन येतो.
एकेकाळी याचे काही वाटायचे नाही, पण जॉबला लागल्यापासून मी स्वत:ला उगाचच उच्च मध्यमवर्गीय समजू लागलो होतो.
पण काल माझा हा अहंकार गळून पडला.

ऑफिसहून येताना आईचा मेसेज आला: ऋषी, समोरच्या भैय्याकडून अर्धा किलो तांबाटे घेऊन ये...
आता हा समोरचा भैय्या म्हणजे मला उगाचच 'ईंजिनीअर साहब' म्हणून हाक मारून चिडवणारा. खरे तर याला जबाबदार आमचे तीर्थरूपच. पोरगा ईंजिनीअर झाल्याचा काय तो आनंद वर्णावा, बिल्डींगमध्येच नाही तर आसपासच्या दुकान लाईनमध्येही पेढे वाटले होते. तेव्हापासून सारे दुकानदार मला ईंजिनीअर साहब, बाबू, सरजी अश्या तिरकस नावांनीच हाक मारतात. तर ते एक असो.. अश्या भैय्याच्या दुकानात जाऊन अर्धा किलो टमाटर मागणे आपल्या ईभ्रतीला धक्का देणारे वाटल्याने मी एक किलोची मागणी केली. त्याने मला असे काही न्याहाळले की जसे मी घरात पार्टी करायला बीअरचा खोकाच ऑर्डर करतोय.
तिथल्या पोरानेही मला आदराने टमाटर निवडून द्यायला सुरुवात केली. मी नेहमीसारखे मलाही त्यातले काही समजते असे दाखवत बाजूला उभा राहिलो. पण प्रत्यक्षात मला भाज्यांमधले चांगले काय आणि वाईट काय हे काssही समजत नाही. समोरच्याने मला फसवले तरी मी जे निवडेल त्यापेक्षा तो सरासरी चांगलेच देण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी ते त्याच्यावरच सोडतो.

तर अगदी सोन्याचे वजन करावे तसे काटेकोरपणे वजन करून त्याने ते टोमॅटो माझ्या पिशवीत भरले. मी पन्नास रुपयांची नोट त्याच्या हातात टेकवली आणि सुट्टे पैसे परत मिळायच्या आशेने क्षणभर तिथेच रेंगाळलो. किती झाले याची कल्पना नव्हती कारण अशी छोटीमोठी भाज्यांची खरेदी किंमत विचारत करणे हे देखील माझ्या प्रतिष्टेला साजेसे नसते.. पण झाले भलतेच.
"एक किलो लिया ना, सौ रुपया हुआ.. और पचास दे दो" .. तो असे म्हणाला आणि मी अवाकच झालो. आता मी माझ्या पिशवीतील टमाट्यांकडे बघू लागलो. भाईने चुकून सफर्रचंद तर नाही ना दिले ..

"क्या भैय्या, टमाटर स्वित्झर्लंड का है क्या?" .. मी उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून बोललो. तसे त्याने पुन्हा मला एक लूक दिला, कुठून कुठून येतात लोकं टाईप्स..

"बाहर एक सौ बीस का है, वो तो मै आपके लिए सौ सौ मे बेचने बैठा हू".. त्याने आपला ठेवणीतला डायलॉग फेकला आणि मी मुकाटपणे आणखी एक पन्नास त्याच्या हातावर टेकवून बाहेर पडलो.

खिसा शंभरने हलका झालाच होता, पण आई बोललेली फक्त अर्धा किलोच आण. जेव्हा तिला समजेल की मी शहाणपणा करून एक किलो घेतले तेव्हा तिच्या किती शिव्या पडतील त्याचे एक वेगळेच टेंशन मला येऊ लागले होते.

मागेही तूरडाळ बराच काळ महाग झाली होती. तेव्हा आम्हाला काडीचाही फरक पडला नव्हता. कारण तूरडाळीवाचून आमचे काहीच अडणार नव्हते. विविध कडधान्यांच्या उसळी, आमट्या, कांद्याचे कालवण, काळ्या वाटाण्याचे सांबार, दह्याची कडी, कोकमकढी, तांबाट्याचे सार, मच्छीचे सार, मटणाचा रस्सा, खेकड्याचे कालवण, कुळदाची पिठी.. एक ना दोन, हजार पर्याय होते. किंबहुना डाळ आमच्याकडे क्वचितच बनायची.
पण आता टोमॅटो महाग झाल्याने फारच पंचाईत होणार होती. आमच्याकडे टॉमेटोची आंबट गोड तिखट झणझणीत अश्या तीनचार प्रकारे भाज्या आणि चटण्या बनवल्या जातात. शाकाहारात मोजक्याच भाज्या खाणारा मी, माझी बरीच भिस्त या टोमेटो भाज्यांवरच असते. तसेच वर उल्लेखलेल्या कालवणांपैकी तांबाट्याचे सार माझे सर्वात फेव्हरेट. एक डबल अंड्याचे ऑमलेट सोबत घेऊन मी टोपच्या टोप भात यासोबत रिचवतो. थोडक्यात कोणीतरी हवेतल्या ऑक्सिजनला टॅक्स लावल्यासारखेच मला वाटले.

घरी परतताना हातात फक्त किलोभर टोमेटो होते, पण पावले तांदळाची गोण घेऊन चालल्यासारखी जड झाली होती. कारण आता पुढचे काही दिवस आपल्या आवडत्या टोमॅटोचे हटट सोडून ताटात पडेल ते गिळावे लागणार होते. कारण आता आपली काटकसरी आई प्रत्येक पदार्थात जपून जपूनच टॉमेटो टाकणार आणि जिथे त्याशिवाय पर्याय नाही ते पदार्थ करणारच नाही हे मी समजलो होतो.

मध्यंतरी कुठेतरी मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीय मानसिकता म्हणजे काय ही चर्चा वाचण्यात आलेली. नेमका अर्थ आता समजला होता. एखादा पदार्थ महाग होताच तो कितीही आवडीचा असला तरी दैनंदिन आहारातून गायब होणे. म्हणजेच वाढत्या महागाईनुसार आपल्या आयुष्याच्या प्रायोरीटीज बदलणे, हाच खरा मध्यमवर्ग Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

udemy_home_300x250.png

छान ऋन्मेऽऽष भाऊ, आता संसार करायला टमाट्यासारखे परिपक्व झालात. दिल खुश हूवा.
जाता जाता : नविन फ्रीजाचे उद्घाटन झाले Wink

हा हा... हो बॅकच असेल. पण मी कुठे गेलो होतो. ईथेच तर पडीक असतो Happy

येनीवेज, धन्यवाद, शुभरात्री आणि एण्ड ऑफ द हॅप्पी विकेण्ड...

फक्त जाता जाता एक तळटीप जी लेखाखाली टाकायची राहिलेली :- या सुलेखात काही वाक्ये मजेखातर टाकली आहेत. त्यांची सत्यासत्यता न पडताळता मॉरल ऑफ द स्टोरीचा आस्वाद घेणे. तरीही न पटल्यास ही सुलेखा आपल्याला पटलेली नाही म्हणून गाणी न गाणे
आपलाच,
- ऋ Wink

रुमणेश भाई इस ब्याक असा म्हणायचा होता... चांगला लेख आलाय म्हणून ( तसे सगळेच लेख चांगले असतात तुमचे) ☺️

छान लिहिलेय.

टोमॅटो दरवर्षी या दिवसात याच भावाने विकले जातात. हेच टोमॅटो थंडीत 15 ते 20 रुपये असतात. 20 वर्षांपूर्वी काही भाज्या फक्त ठराविक मोसमातच मिळायच्या, त्यात टोमॅटोही होते. आता लोकांना बाराही महिने सगळ्या भाज्या हव्या असतात, त्याची किंमत द्यावी लागते.

छान लिहिलंय.

टोमॅटोला तांबाटे म्हणतात हे पहिल्यांदाच अैकले.
छान शब्द आहे.

अरे तु एकदम ट्माट्यावर... आय मीन वर्मावरच बोट ठेवलंस रे.
टमाटे १०० रु किलो. Sad आणि मला तर सगळ्या भाज्या उसळी डाळीत टमाटर घालायला लागतो. कुठे किती बचत करायची माणसाने.
आत कांद्याचाही भाव वाढेल काही दिवसांनी.

छान लिहलय
जवळपास सगळ्याच भाज्या ₹८०-१०० ह्या पटीत आहेत फक्त पाव किलो वगैरे घेत असल्यामुळे ते जाणवत नाही इतकच टोमॅटो कांदा बटाटे हे शक्यतो किलोने घेत असल्यामुळे त्याचे भाव वाढले की लक्षात येतं एवढंच.

Are bapre ... Mala navhat mahit tomato १००/kg ahet ..

Mala pan tuzyach itak dukha zalay.. Mi pan tomato fan

{{{ . शाकाहारात मोजक्याच भाज्या खाणारा मी, माझी बरीच भिस्त या टोमेटो भाज्यांवरच असते. तसेच वर उल्लेखलेल्या कालवणांपैकी तांबाट्याचे सार माझे सर्वात फेव्हरेट. एक डबल अंड्याचे ऑमलेट सोबत घेऊन मी टोपच्या टोप भात यासोबत रिचवतो. }}}

किडनी स्टोन होण्याची शक्यता आहे. टोमॅटो महाग झाल्याचे तुमच्या पथ्यावरच पडेल, आपसूक आहारात बदल होईल.

छान लिहिलंय.
आता मी माझ्या पिशवीतील टमाट्यांकडे बघू लागलो. भाईने चुकून सफर्रचंद तर नाही ना दिले ..

सफरचंद एवढे स्वस्त कधी झाले?

<<किडनी स्टोन होण्याची शक्यता आहे. टोमॅटो महाग झाल्याचे तुमच्या पथ्यावरच पडेल, आपसूक आहारात बदल होईल.>>खुपच पर्सनल आणि अननेसेसरि प्रतिसाद.

टमाटे १०० रु किलो ? हेच का तुमचे अच्छे दिन ??

ह्याला जवाबदार असलेल्या भारत सरकारचा, चीन सरकारचा, पाकिस्तान सरकारचा झालच तर
अमेरीकेचा जोरदार निषेध !!

एक भाबडा प्रश्न:
या वाढलेल्या भावाचा शेतकऱ्याला फायदा होतो का? की सगळा जास्तीचा फायदा मधल्या दलालांनाच?

शेतकऱ्यांना होत असेल तर चांगलेच ना?

छान आहे लेख.

एखादा पदार्थ महाग होताच तो कितीही आवडीचा असला तरी दैनंदिन आहारातून गायब होणे. म्हणजेच वाढत्या महागाईनुसार आपल्या आयुष्याच्या प्रायोरीटीज बदलणे, हाच खरा मध्यमवर्ग >>>> Happy

टोमॅटोला तांबाटे म्हणतात हे पहिल्यांदाच अैकले.
>>>
माझी आज्जी म्हणायची. आम्ही कोकणातले. पण कोकणातले सारेच असे बोलतात याची ग्यारंटी मी घेऊ शकत नाही.

सफरचंद एवढे स्वस्त कधी झाले?
>>>>>
क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज करायची तयारी असेल तर शंभर काय पंच्याण्णवलाही मिळतील.

Mala pan tuzyach itak dukha zalay.. Mi pan tomato fan
>>>>>
नाही हं रीया.. मी आता टोमॅटो फॅन क्लबचा धागा नाही काढणार.. जे काही टोमाटोपरेम व्यक्त करायचे असेल ते ईथेच कर Happy

क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज करायची तयारी असेल तर शंभर काय पंच्याण्णवलाही मिळतील.

अशा क्वालिटीच्या सफरचंदाचा विचारही तुमच्या प्रतिष्टेला साजेसा न वाटल्याने विचारले.

Pages