ताम्हिणी घाटात एक रात्र

Submitted by Mandar Katre on 11 July, 2017 - 02:53

एक सौदीवाला , एक कुवेतवाला आणि एक ओमानवाला अशा तीन मित्रांची ओळख फेसबुकवर झाली २०१० मध्ये ... एक समान धागा म्हणजे तिघेही कोकणातले... सहासात वर्षात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर धमाल मस्ती चाललेली ... पण तिघांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो या वर्षी फेब्रुवारीत ... त्याच वेळी ठरले की या पावसाळ्यात कुठेतरी जंगलात एक रात्र काढायची... आम्ही गेली ३/४ वर्षे चालवलेल्या "भुताटकी"पेज ला नवीन स्टोरीज साठी काहीतरी मटेरियल सुद्धा मिळेल ही अपेक्षा Wink

तर शेवटी होता होता ८-९ जुलै तारीख अन ताम्हिणी घाट फिक्स झाले . आम्ही दोघे रत्नागिरीकर पहाटेच्या रत्नागिरी दादर पॅसेंजर ने सकाळी १० ला कोलाड ला पोहोचलो . दोघे पनवेलकर आणि एक पेणकर असे तिघे मित्राच्या नव्याकोर्‍या एर्टिगा मधून दुपारी आले. त्याना यायला उशीर झाला म्हणून आम्ही थोडीशी पेटपूजा कोलाडला हायवेच्या एका धाब्यावर उरकली .. एर्टिगा आली आणि दोन वाजता आम्ही ताम्हिणी घाटाकडे प्रयाण केले . वाटेत एका रिक्शाच्या टपावरून ४/५ राफ्टिंग बोट्स वाहून नेताना पाहून मजा वाटली... मग २०११-१२ च्या फेसबुकवरील धम्माल आठवणी शेअर करत अन "चिल्लम ट्रान्स" ऐकत घाटमाथ्यावर पोहोचायला साडेचार वाजले...

पोहोचताच आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला ... कारण आम्ही ज्या भूत बंगल्याची अपेक्षा करत होतो तो सापडला . घाटमाथ्यावर एक जुनाट पडिक पीडब्ल्यूडी गेस्टहाउस आहे. मग तिथेच बंगल्याच्या
आवारात आम्ही डेरा टाकला . सर्वानी रस्त्याच्या कडेला असलेल्या धबधब्याखाली आंघोळीचा मनमुराद आनंद लुटला ...

येताना जेवणाचे सामान ,कोळसा आणि पावसासाठी प्लास्टिक्चा कागद आणला होताच ...जेवण बनवायला सुरुवात केली . चूल मान्डली , कोळसा तर होता पण वरून पाऊस आणि खालून ओली जमीन यामुळे रॉकेलशिवाय विस्तव पेटवणे महाकर्मकठीण झाले होते...तरी पण प्रयत्न सुरूच होते... मग बाकी विसरलेले सामानाच्या शोधात घाटाच्या पायथ्याशी असलेल्या विळे गावात एक चक्कर टाकली असता सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या ...फक्त थोडीशी शोधाशोध अन तंगडतोड करावी लागली इतकेच Happy

परत आमच्या भूतबंगल्यावर आलो तोवर रात्रीचे आठ वाजले होते..आमच्याप्रमाणेच इतर अनेक पर्यटक तिथे होते... पण रात्री तिथे थांबणारे कोणीच नव्हते..भात चुलीवर चढला होता ...पण विस्तव पेटण्याचे नाव घेत नव्हता ... त्यामुळे उपस्थित ५ जणांमध्ये दोन तट पडले... अर्धे म्हणत होते जवळ कुठे हॉटेल असेल तर शोधूया आणि तिकडेच जेवून घेवूया ... पण आमचे दोन उत्साही शिलेदार इथेच जंगलात जेवण करायचे म्हणून अडून बसले... शेवटी सोबत असलेल्या प्लास्टिक बॉटल्स /पिशव्या , थर्माकोल डिश इत्यादी जाळून अग्नी प्रज्वलित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले . मग अशा अथक प्रयत्नांतून शेवटी दहा वाजता भात शिजला ... शाकाहारींसाठी भाजी आणि मांसाहारींसाठी चिकन मसाला तयार होईपर्यंत रात्रीचे पावणेबारा झाले . मग झोपलेल्याना जागे करून रात्री बारा वाजता जेवण झाले... जेवून दीड वाजता मन्द आवाजात जुनी हिन्दी गाणी ऐकत आणि ताम्हिणीतल्या भूतकथांवर चर्चा करतकरत निद्राधीन झालो....

रानातील पशुपक्ष्यांच्या आवाजाने सकाळी सहाच्या आधीच जाग आली . चहा नव्हताच कारण पुन्हा विस्तव पेटवण्याचे महादिव्य करण्याचे मनोधैर्य कोणातच नव्हते ... पुन्हा एकदा धबधब्यावर आंघोळी करून फोटोसेशन करत घाटात पुढे निघालो ... रायगड-पुणे चेकपॉइन्ट्च्या पुढे "शिवराज"म्हणून एका हॉटेलवर नाश्ता केला आणि मग काळकाई मन्दिरात पोहोचलो. अतिशय शान्त आणि निर्जन वातावरणात हे देऊळ आहे . तिथे थोडा टाइमपास करून मागे फिरलो आणि घाट उतरलो. वाटेत देवस्थानाना भेट देवून नागोठणे गाठले. तिथून पेण-पनवेल वाले गाडीने पुढे गेले आणि आम्ही रत्नागिरीकर एस टी ने मार्गस्थ झालो . घरी पोहोचायला रविवारचे रात्रीचे १० वाजले. पण एक अविस्मरणीय रात्र अनुभवल्याची स्मॄती कायम मनात घर करून राहील !

फोटोज---http://s1153.photobucket.com/user/Mandar_Katre/library/?sort=3&page=1

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.
मात्र ताम्हीणी घाटासारख्या निसर्गरम्य ठीकाणी जाऊन, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी 'सोनेरी पेय' पिऊन धिंगाणा घालणार्‍या पर्यटकांचा मला भयंकर राग येतो.

ओके , आजकाल जे ऑउटिंगच्या नावाखाली निसर्गरम्य ठिकाणी जाऊन दारू वगैरे पिणं चाललं आहे त्याला अविस्मरणीय अनुभव असं नाव आहे तर . शब्दांच्या वाख्या बदलत चालल्या आहेत एकंदरीत Sad कठीण आहे

प्रसाद. आणि चिनूक्स +१

आता तुम्ही सरळसरळ लिहिलंत परंतू इतर लोक हेच करतात.
बाजारात एक तयार पाकिटात कुरकुरे टाइप परंतू त्रिकोणी चपटे खाणे मिळते ते तुकडे चांगले पेटतात. चूल पेटवायला उपयोगी.
( हिस्ट्री चानेलवर एक लाइफ हॅकर प्रोग्राममध्ये दाखवलेलं. बार्बेक्यु बागेत करताना या पाच तुकड्यांत कोळसे पेटले.)

१. प्राप्त परिस्थितीत जे करता आले ते करून विस्तव पेटवला . चूल न पेटती तर उपाशी झोपावे लागले असते जे अशक्य होते कारण एकदोघाना डायबेटिस होता ...

२. पर्यावरणाचे म्हणालात तर आजूबाजूला प्रचंड प्रमाणात बियरच्या अन मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा खच पडलेला होता .क्त्यानी केला का पर्यावरणाचा विचार?

३. दारूबद्दल- जे पिणारे होते त्याना आम्ही सांगून काही उपयोग नव्हता. नसती भांडणे वाढवून एका चांगल्या ट्रिपचा विचका करायला कोणीच तयार नव्हते