भगवद्गीता - सोप्या मराठीत - १५

Submitted by एम.कर्णिक on 10 March, 2009 - 10:45

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय

वेदवाक्य ही पाने ज्याची, मुळे वरी, खाली फांद्या
अशा वडाच्या झाडां जे जाणती त्यां वेदज्ञ हि संज्ञा १

खाली वर शाखा, फुटती त्रिगुणांच्या पारंब्या त्याना
येती खाली कर्मबंधनी जखडायाला मनुजाना २

अशा स्वरूपी झाडाचे प्रत्यक्ष इथे दिसणे न घडे
आरंभ नि अस्तित्व अंतही ना त्याचा दॄष्टीस पडे
घट्ट मुळाच्या या वॄक्षाची हवी समाप्ती करावया
विरक्ततेच्या तलवारीने मुळासहित त्या छाटुनिया ३

अन् त्यानंतर ध्यास धरावा ब्रम्हसनातन तत्वाचा
ज्याच्या पासुन उपजे प्रवॄत्ती त्या आदीपुरूषाचा
या करण्याने होइल प्राप्ति परम अशा त्या मोक्षाची
जेथुन घ्यावी ना लागे फेरी फिरफिरूनी जन्माची ४

मान, मोह, आसक्तीपासून खरोखरी असती मुक्त
अध्यात्माचे परिपालक अन् निरिच्छ बुध्दी असतात
सुखदु:खाच्या कल्पनांमधी सदैव राखिति स्थिरमती
असे ज्ञानिजन, धनंजया, अव्ययस्थानाजवळी जाती ५

जिथुन परतुनि यावे नलगे जन्माला, ऐसे स्थान
अग्नि, चंद्र वा सूर्य न लागे उजळाया ते मम सदन ६

पार्था माझा अंश राहतो व्यापुनि या इहलोकात
शरिरांमध्ये जीवरूपाने मनाइंद्रियांसमवेत ७

जिवा लाभता शरीर होतो षडेंद्रियांमधि रममाण
शरीर सुटता त्यांना संगे घेउन करितो निर्गमन
जैसा वारा पुष्पांपासुन गंधाला वाहुन नेतो
तसा जिवात्मा मनासवे पंचेंद्रियांस घेउन जातो ८

कान, नेत्र, कातडी, जिव्हा, अन् नाक, तसे मन मनुजाचे
यांच्या योगे भोग घेइ जिव शरीरामधुनी विषयांचे ९

हा शरीरामधि राहणारा अन निघून जाणारा जीव
विषयभोग घेई होता मनि त्रिगुणांचा प्रादुर्भाव
अशा जिवाला अज्ञानी जन कदापिही जाणु न शकती
ज्ञानचक्षुनी पाहू बघती तेच तयाला ओळखती १०

प्रयत्न करता योगी या जीवात्म्याला ओळखतात
पण लाख प्रयत्नांनंतरही ना जाणति जे जन असंस्कॄत ११

सूर्य, चंद्र, अग्नीचे तेज जे समस्त जगता उजळितसे
धनंजया, ध्यानि घे, तेज ते माझ्यामधुनिच उपजतसे १२

त्या तेजायोगे भूमीमधि प्रवेशदेखिल करि पार्थ
चंद्ररसाच्या रूपाने मी वनौषधींच्या पुष्टयर्थ १३

जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे
प्राण, अपान या वायूंने मी अन्न चतुर्विध पचवितसे १४

सर्वांच्या हॄदि मी, मजपासुन मति, स्मॄति, अन् विस्मॄतिही
वेदांमधले ज्ञान मीच, अन् मी वेदांचा कर्ताही १५

क्षर अन् अक्षर दो प्रकारचे पुरूष इथे इहलोकात
जीव सर्व क्षर, मूलतत्व त्यांचे अक्षर ऐसे ख्यात १६

दोन्हीहुन वेगळा पुरूष उत्तम, त्या म्हणती परमात्मा
त्रिलोक व्यापुन राहे आणि पोषि तयासी तो आत्मा १७

क्षरापलिकडे आहे मी, अन् अक्षराहुनिही श्रेष्ठ
तरीच पुरूषोत्तम मज म्हणती त्रिलोकात अन् वेदात १८

पुरूषोत्तम मी, हे जो जाणी नि:शंकपणे, धनंजया
सर्वज्ञानी होउनि मजसि भजे भक्तिने पूर्णतया १९

गुपितामधले गुपीत ऐसे शास्त्र तुला जे कथिले मी
ते समजुन घेण्याने होइल कॄतकॄत्य बुध्दिमंतही २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला
**********

अध्यायांसाठी दुवे:
अध्याय आठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

छान रुपांतर केलेय. ११व्या श्लोकात टायपिंग ची चूक बघून घ्यावी. 'होई' हा शब्द सगळीकडे 'होरई' असा काहीतरी झालाय. कदाचित कॉम्प्युटरची गडबड असेल.

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................

उत्तम, चांगला उपक्रम, चालू ठेवा.

-हरीश

शब्दसंचय सुंदरच. टाईपो एरर टाळाल याची खात्री आहे कारण आम्हाला प्रिंट कसा नीट नेटका हवा. नाही का ????
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

धन्यवाद.
'मुद्राराक्षस' ही भूमिका या जमान्यात काँप्यूटर करीत असतो. मुद्रणातील चुका आता काँप्यूटरकडून होत असतात. मला वाटते वर्ड प्रोसेसर कोणता आहे त्यावर हे अवलंबून असावे. कारण मला माझ्या दुसर्‍या काँप्युटरवर ह्या टंकचुका दिसत नाहीत. असो. आता क्लीन-अप करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्ह एकदा सर्वांचे आभार.
-मुकुंद कर्णिक