लेखकाची भेट ? नको रे बाबा !

Submitted by कुमार१ on 9 July, 2017 - 22:38

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात.

साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत. चांगला लेखक वाचकांना रिझवतो तर वाचक त्यांच्या प्रतिसादांतून त्या लेखकाला सुखावतात. एकप्रकारे लेखक आणि वाचक हे एकमेकाला घडवतात. लेखक हा एक कलाकार असतो पण वाचकाच्या दृष्टीने तो ‘पडद्यामागचा कलाकार’ असतो. एखाद्या चोखंदळ वाचकाला जर काही निमित्ताने लेखकाची भेट घडली तर त्याच्या दृष्टीने तो अविस्मरणीय प्रसंग असतो. पण अशा भेटीचे लेखकाच्या दृष्टीने काय मोल असते, कोण जाणे?
असो, आता प्रास्ताविक आवरतो आणि सुरू करतो माझ्या याबाबतीतल्या एका अनुभवकथनाला......
........
एका शहरातील प्रसिद्ध सभागृहात एक कलाविषयक वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. वृत्तपत्रात त्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेने ते बघायला गेलो. प्रदर्शन सुंदर होते. एकून सहा विभागांत ते मांडले होते. प्रत्येक विभागात संबंधित कलाकार उपस्थित होते. तेथील एका विभागाने माझे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे तेथे बसलेले कलाकार हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्या गृहस्थांना एका कलेत गती आहे आणि ते एक प्रसिद्ध लेखकही आहेत. त्यांच्या लेखनाचा मी तरुणपणी चाहता होतो. याखेरीज ते लेखक विविध व्यासपीठांवरून भाषणे करीत असतात. तसेच अधूनमधून त्यांच्या जाहीर मुलाखती होत असतात. त्यातून त्यांनी सांगितलेले स्वतःच्या साधी राहणी आणि कमी खर्चाची जीवनशैली याबद्दलचे अनुभव खरेच चांगले असतात. त्यांच्या अशा काही चांगल्या सवयींचे मी अनुकरण करत असतो. एक ज्येष्ठ लेखक म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

आता या प्रदर्शनात त्यांना पाहिल्यावर क्षणभर मी आनंदलो. हे लेखक माझ्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. अर्थात आम्हा दोघांच्या वयात बरेच अंतर असल्याने आमच्या शिक्षणाचा काळ वेगवेगळा होता. तेव्हा मनात म्हटले, चला आज त्यांना भेटून त्यांची ओळख करून घेता येईल. त्यांना चांगले ओळखणारे दोघे जण माझेही मित्र आहेत. त्यांपैकी एकाचे नाव त्यांना सांगायचे मी मनात पक्के केले.
प्रदर्शनास फारशी गर्दी नव्हती. ते लेखकही त्यांच्या विभागात शांतपणे बसून होते. मग मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना अभिवादन केले. मग माझे नाव सांगून आम्ही दोघे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्यावर ते फक्त ‘हूं’ म्हणाले. मग मी त्यांना आमच्या समान मित्राची ओळख सांगितली. त्यावर ते पुन्हा एकदा पण अस्पष्ट आवाजात ‘हूं’ म्हणाले. स्वतःची मान हलवण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. आता माझी अपेक्षा होती, की ते थोडा संवाद करतील. निदान, ‘बरं, तुम्ही काय करता आता’ एवढे तरी मला विचारतील. पण छे! ते निर्विकारपणे त्यांच्या हातातील एका माहितीपत्रकाकडे बघत बसले.
मी दोन मिनिटे तेथे रेंगाळलो. त्यांच्या कलाकृतींवर एक नजर टाकली अन तेथून सटकलो. एव्हाना त्यांना माझ्याशी संवाद करण्यात बिलकूल रस नव्हता, हे स्पष्ट झाले होते. अधिक काही मीहून बोलणे आता वेडेपणाचे ठरले असते. कोणतीही दोन माणसे जेव्हा एकमेकांना भेटतात आणि ओळख करू पाहतात, तेव्हा त्यातील प्रत्येकाने दुसऱ्याला ‘आपण काय करता’ एवढे माफक विचारावे, हा शिष्टाचार आहे. त्यामुळे माझी काही त्यांच्याकडून ‘फार मोठी’ अपेक्षा होती, असे मला वाटत नाही.

खरे म्हणजे अशा वलयांकित व्यक्तींच्या जवळपास फिरकायचा माझा स्वभाव नाही. याचे कारण असे, की बहुसंख्य गाजलेले लेखक, कलाकार, खेळाडू इत्यादी मंडळी ही आत्मकेंद्री असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. ही मंडळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरतात, तेव्हा त्यांच्या भोवती बऱ्याचदा खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो. या सगळ्याचा मला अगदी तिटकारा आहे. पण या वेळेस मी सपशेल चूक केली आणि पस्तावलो. त्याबद्दल नंतर मनातल्या मनात माझ्यावरच रागावलो.
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.
लेखकांच्या संदर्भात मी पूर्वी प्रसिद्ध अमेरिकी लेखक Robert Persig यांचे एक अवतरण वाचले होते. ते असे आहे, “The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment”.
वरील प्रसंगातून मला त्याची पुरेपूर प्रचिती आली. लेखकांबद्दल खुद्द एका लेखकानेच मांडलेले हे मत किती मार्मिक आहे!

…. तर असा होता माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष लेखक-भेटीचा एकमेव अनुभव. तशी आतापर्यंत काही प्रसिद्ध लेखकांशी पत्रभेट झालेली आहे आणि ती नक्कीच आनंददायी होती. एकांनी तर मला पत्रोत्तराबरोबर त्यांचे एक पुस्तकही भेट पाठवले होते.
आपल्यातील ज्यांना कुठल्याही वलयांकित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव असेल तर त्याबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. असा अनुभव गोड वा कडू असणे हे व्यक्तीनुसार अवलंबून आहे. तर मग जरूर लिहा. धन्यवाद.
**************************************************************************************************
(टीप : ‘नको रे बाबा!’ या नावाने माझा लेख ‘अंतर्नाद’ मासिकात पूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. त्यातील काही भाग या लेखात समाविष्ट.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याच्या अगदी ऊलट किस्सा सांगावासा वाटतो.
आई-बाबा,आजी आणि बहीण मी २००७ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला येतांना मुंबईला सोडायला आले होते. आम्ही मरीन ड्राईव जवळच्या हॉटेलमध्ये ऊतरलो होतो, फ्लाईट दुसर्‍यादिवशी होती म्हणून संध्याकाळी मरीन ड्राईवर वर फिरायला गेलो. आजी चालणार नव्हती म्हणून ती एके ठिकाणी बसून राहिली आणि आम्ही सगळे चालत पुढे गेलो. आमची गाडीही रस्त्याला लागूनच पार्क केली होती, आमच्या गाडीच्या काही अंतरावरच हुबेहुबे आमच्या गाडीसारखी दुसरी गाडीही ऊभी होती.
२०-२५ मिनिटात आम्ही चालून आजीजवळ आलो तर लांबून आजी कुण्या तरूणाशी गप्पा मारतांना दिसली. जवळ जाऊन पाहतो तर चक्क ईरफान खान. आम्ही आ वासून आजी जवळ गेलो तर हा म्हणतो 'आपकी दादी बहोतही अच्छी है .. ऊनका खयाल रखना.. आपकी यूएस जर्नी के लिय बेस्ट लक' आणि आमचा 'आ' मिटेपर्यंत त्याचा शॉट रेडी झाला म्हणून तो निघून गेलाही. कुठल्या तरी जाहिरातीच्या शुटिंगसाठी आला होता.

आजीला विचारले तो कोण होता तुला माहित आहे का .. तर तिला बच्चन. देवानंद, राज कपूर वगैरे सोडले तर कोणी माहित नाहीत हे आम्हाला ठाऊक होते. काय बोलणे झाले तर म्हणे तो विचारत होता कुठुन आला, कशाला आलात वगैरे गप्पा मारत होता, जाहिरातीत काम करतो म्हणत होता म्हणे. आमच्या आजीला हिंदी चांगले कळते पण बोलता येत नाही. ती मराठी हा हिंदी नेमका काय संवाद झाला त्या दोघांनाच ठाऊक.

मग आम्ही दुसर्‍या दिशेने चालायला गेलो... वारा सुटला होता पावसाचा अंदाज होता म्हणून आजीला गाडीत बसवून गेलो. परत येईस्तोवर हलकासा पाऊस चालू झाला होता. पटकन गाडीत येवून बसलो तर आमच्या गाडी पुन्हा ईरफान खान आजीशी गप्पा मारत होता. नशिबाने आमचा ड्रायवरलाही ईरफानखान कोण आहे ते माहित नव्हते. पावसाची सर आल्याने तो चुकून त्यांच्या क्रूची समजून आमच्या गाडीत येवून बसला होता. आम्ही आलो तसा लागलीच हसत हसत तोंडातल्या तोंडात काहितरी बोलून त्याच्या गाडीकडे निघून गेला.

"नको रे बाबा" कशाला एवढे? >>> यातून दोन गोष्टी सुचवायच्या आहेत :
१. लेखाचे शीर्षक आकर्षक करणे. हे महत्वाचे असते कारण आपण सर्वजण प्रतिसादांच्या अपेक्षेनेच लिहीतो.
२. लेखकाच्या प्रत्यक्ष भेटीपेक्षा पत्रभेट (किंवा त्याच्या लेखनाचे वाचन-मनन) हेच अधिक चांगले. हे मी एका अनुभवावरून सांगू शकत नाही, हे मान्य. पण, Persig यांचे वाक्य मला त्याबाबत मार्गदर्शक वा टते. त्या वाक्यावर तटस्थ चर्चा झाल्यास आवडेल.

मला मंगेश तेंडूलकर यांचा चांगला अनुभव
त्यांचे व्यंगचित्र प्रदर्शन पाहून जाता जाता ते निवांत बसलेले दिसले तेव्हा जाऊन नमस्कार केला आणि तुमच्या रेषांची ताकत फार मोठी आहे मी भरावून गेलो आहे असे सांगितले.
मला वाटलेलं नुसतं ह ह म्हणून वाटेला लावतील पण त्यांनी छान गप्पा मारल्या.
जाता जाता म्हणले कोतुक वाटते तुम्हाला ही चांगली गोष्ट आहे पण अजून मला शब्दांची मदत घ्यावी लागते. जया दिवशी एकही शब्द न लिहिता माझा भाव नीट मांडू शकेन त्या दिवसाची वाट पाहतोय.

कुमार क्रुपया एका प्रसंगावरून मत बनवू नका.. माझा अनुभव पुर्ण वेगळा आहे.
साधारण ८-१० वर्षा पूर्वी आम्ही मित्र अच्युत गोडबोलेंच्या व्याख्यानाला गेलो होतो.. दीड दोन तास कार्यक्रम उत्तम रंगला... समारोपाच्या भाषणानंतर गर्दी पांगली..पण आम्ही बाहेर टंगळमंगळ करत उभे होतो..

थोड्याच वेळात लेखक आणि त्यांच्या बरोबरची मंडळी बाहेर आली.. मी समोर जाऊन 'छान बोललात आज' म्हणून सांगितलं..तर लगेच त्यांनी shake hand साठी हात पुढे केला आणि आपल्या भाषणातला एका मुद्द्यावर 'तुला ते पटलं का' ? म्हणून गप्पा चालू केल्या.. एव्हाना मित्र ही पुढं आले होते..मग तुम्ही काय शिकताय.. इथुन सुरुवात होऊन ते 'लोकसत्ते' त त्यांनी 'बोर्डरुम' लिहिले तेव्हा पासून मी त्यांचा चाहता कसा झालो..मग थोडक्यात बोर्डरुम ची जन्मकहाणी इथपर्यंत विषय रंगला..

आज इतक्या वर्षांनंतरही तो प्रसंग माझ्या मनात ताजा आहे याचं कारण अच्युतरावांसारखा राजा माणूस..

जगात ९९ चांगल्या माणसांमागे १ वाईट असणारच.. तसंच लेखक/ इतर कलाकारांचं...तुम्हाला पहिलाच वाईट भेटला म्हणून इतरांकडे पाठ फिरवू नका..

तुम्ही शीर्षक टोकाचं देता आणि तटस्थ चर्चेची अपेक्षा करता.

.>>>>लेखाचे शीर्षक आकर्षक करणे. हे महत्वाचे असते कारण आपण सर्वजण प्रतिसादांच्या अपेक्षेनेच लिहीतो.<<<<
तशी काहीच गरज नाही, शीर्षक आकर्षक नसेल काय आणि असले काय, काही फरक पडत नाही, जर तुमचे लेखन ताकदीचं असेल तर त्याला सामान्य शीर्षक सुद्धा पुरेसे आहे. चांगला लेख हा नक्कीच सर्वांपर्यंत पोहचतो.
किती प्रतिक्रिया आल्या यामुळे लेखाची गुणवत्ता ठरणार असेल, तर म्हणजे फेसबुकच्या फोटोला जास्त लाईक्स आले की फोटो चांगला होतो असे म्हणण्यासारखे आहे.
प्रतिक्रियांच्या अपेक्षेने लिहू नये, समाधानाने, समाधान मिळेपर्यंत लिहावे.

ते लेखक कोण असावेत हे लक्षात आलं. पण माझा अनुभव फार टोकाचा आहे त्यांच्या बाबतीत. माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीत मी त्यांची तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळी पुस्तकं वाचून काढली... त्यांच्या लेखनाचं एव्हढं गारुड होतं की लेबर मध्ये असताना त्यांचं एक पुस्तक जवळ बाळगलं होतं. मिडवाईफला पण त्यांच्या बद्दल आणि सुनंदा बाईबद्दल सांगितलं. त्यानंतर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना आवर्जून फोन केला होता आणि इथे परत आल्यावर पण त्यांच्याशी गप्प मारायला फोन करायचे... प्रत्येक वेळी ते खुप छान गप्पा मारायचे. अलीकडची त्यांची काही पुस्तकं मात्र मला आवडली नाहीत फारशी!

अनुभव वाईट येऊ शकतो कोणालाही. पण एकमेव अनुभवावरून असा टोकाचा निष्कर्ष काढणारे तुम्हीही ग्रेट आहात.
गंमत वाटली.
बाकी लेखक अथवा कोणत्याही कलाकाराला त्याच्या (तिच्या) कलाकृतीबद्दल बोलायचं सोडून उगीच ओळखी सांगत बसणा-या लोकांची पण कमालच असते - असं नाही का वाटत?

प्रसिद्ध व्य्क्तींच्या बाबत मला दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत. त्यांच्या फार जवळ जाउ नये हे खरे.

“The best place to meet an author is on the pages of his book. >>> +१

Pages