लेखकाची भेट ? नको रे बाबा !

Submitted by कुमार१ on 9 July, 2017 - 22:38

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात.

साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत. चांगला लेखक वाचकांना रिझवतो तर वाचक त्यांच्या प्रतिसादांतून त्या लेखकाला सुखावतात. एकप्रकारे लेखक आणि वाचक हे एकमेकाला घडवतात. लेखक हा एक कलाकार असतो पण वाचकाच्या दृष्टीने तो ‘पडद्यामागचा कलाकार’ असतो. एखाद्या चोखंदळ वाचकाला जर काही निमित्ताने लेखकाची भेट घडली तर त्याच्या दृष्टीने तो अविस्मरणीय प्रसंग असतो. पण अशा भेटीचे लेखकाच्या दृष्टीने काय मोल असते, कोण जाणे?
असो, आता प्रास्ताविक आवरतो आणि सुरू करतो माझ्या याबाबतीतल्या एका अनुभवकथनाला......
........
एका शहरातील प्रसिद्ध सभागृहात एक कलाविषयक वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. वृत्तपत्रात त्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेने ते बघायला गेलो. प्रदर्शन सुंदर होते. एकून सहा विभागांत ते मांडले होते. प्रत्येक विभागात संबंधित कलाकार उपस्थित होते. तेथील एका विभागाने माझे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे तेथे बसलेले कलाकार हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्या गृहस्थांना एका कलेत गती आहे आणि ते एक प्रसिद्ध लेखकही आहेत. त्यांच्या लेखनाचा मी तरुणपणी चाहता होतो. याखेरीज ते लेखक विविध व्यासपीठांवरून भाषणे करीत असतात. तसेच अधूनमधून त्यांच्या जाहीर मुलाखती होत असतात. त्यातून त्यांनी सांगितलेले स्वतःच्या साधी राहणी आणि कमी खर्चाची जीवनशैली याबद्दलचे अनुभव खरेच चांगले असतात. त्यांच्या अशा काही चांगल्या सवयींचे मी अनुकरण करत असतो. एक ज्येष्ठ लेखक म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

आता या प्रदर्शनात त्यांना पाहिल्यावर क्षणभर मी आनंदलो. हे लेखक माझ्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. अर्थात आम्हा दोघांच्या वयात बरेच अंतर असल्याने आमच्या शिक्षणाचा काळ वेगवेगळा होता. तेव्हा मनात म्हटले, चला आज त्यांना भेटून त्यांची ओळख करून घेता येईल. त्यांना चांगले ओळखणारे दोघे जण माझेही मित्र आहेत. त्यांपैकी एकाचे नाव त्यांना सांगायचे मी मनात पक्के केले.
प्रदर्शनास फारशी गर्दी नव्हती. ते लेखकही त्यांच्या विभागात शांतपणे बसून होते. मग मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना अभिवादन केले. मग माझे नाव सांगून आम्ही दोघे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्यावर ते फक्त ‘हूं’ म्हणाले. मग मी त्यांना आमच्या समान मित्राची ओळख सांगितली. त्यावर ते पुन्हा एकदा पण अस्पष्ट आवाजात ‘हूं’ म्हणाले. स्वतःची मान हलवण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. आता माझी अपेक्षा होती, की ते थोडा संवाद करतील. निदान, ‘बरं, तुम्ही काय करता आता’ एवढे तरी मला विचारतील. पण छे! ते निर्विकारपणे त्यांच्या हातातील एका माहितीपत्रकाकडे बघत बसले.
मी दोन मिनिटे तेथे रेंगाळलो. त्यांच्या कलाकृतींवर एक नजर टाकली अन तेथून सटकलो. एव्हाना त्यांना माझ्याशी संवाद करण्यात बिलकूल रस नव्हता, हे स्पष्ट झाले होते. अधिक काही मीहून बोलणे आता वेडेपणाचे ठरले असते. कोणतीही दोन माणसे जेव्हा एकमेकांना भेटतात आणि ओळख करू पाहतात, तेव्हा त्यातील प्रत्येकाने दुसऱ्याला ‘आपण काय करता’ एवढे माफक विचारावे, हा शिष्टाचार आहे. त्यामुळे माझी काही त्यांच्याकडून ‘फार मोठी’ अपेक्षा होती, असे मला वाटत नाही.

खरे म्हणजे अशा वलयांकित व्यक्तींच्या जवळपास फिरकायचा माझा स्वभाव नाही. याचे कारण असे, की बहुसंख्य गाजलेले लेखक, कलाकार, खेळाडू इत्यादी मंडळी ही आत्मकेंद्री असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. ही मंडळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरतात, तेव्हा त्यांच्या भोवती बऱ्याचदा खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो. या सगळ्याचा मला अगदी तिटकारा आहे. पण या वेळेस मी सपशेल चूक केली आणि पस्तावलो. त्याबद्दल नंतर मनातल्या मनात माझ्यावरच रागावलो.
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.
लेखकांच्या संदर्भात मी पूर्वी प्रसिद्ध अमेरिकी लेखक Robert Persig यांचे एक अवतरण वाचले होते. ते असे आहे, “The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment”.
वरील प्रसंगातून मला त्याची पुरेपूर प्रचिती आली. लेखकांबद्दल खुद्द एका लेखकानेच मांडलेले हे मत किती मार्मिक आहे!

…. तर असा होता माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष लेखक-भेटीचा एकमेव अनुभव. तशी आतापर्यंत काही प्रसिद्ध लेखकांशी पत्रभेट झालेली आहे आणि ती नक्कीच आनंददायी होती. एकांनी तर मला पत्रोत्तराबरोबर त्यांचे एक पुस्तकही भेट पाठवले होते.
आपल्यातील ज्यांना कुठल्याही वलयांकित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव असेल तर त्याबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. असा अनुभव गोड वा कडू असणे हे व्यक्तीनुसार अवलंबून आहे. तर मग जरूर लिहा. धन्यवाद.
**************************************************************************************************
(टीप : ‘नको रे बाबा!’ या नावाने माझा लेख ‘अंतर्नाद’ मासिकात पूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. त्यातील काही भाग या लेखात समाविष्ट.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा हा... प्रसंग एकदम डोळ्यासमोर उबा केलात... तुमचे लिखाण मास्तय...
जाऊ द्या हो.. स्वतला भारी समजणारे लोक असतात काही

एकदा वलयांकित झाले की तेही प्रतिमेत अडकतात. काही काळानंतर घुसमट होते व मग बाहेर पडायची धडपड होते. येतील बाहेर कधीतरी

छान लेख. आवडला.

लेखक हा एक कलाकार असतो पण वाचकाच्या दृष्टीने तो ‘पडद्यामागचा कलाकार’ असतो. >>> आणि वाचकाने लेखकाच्या लिखाणशैलीवरून लेखकाविषयी आपल्या मनात एक चित्र उभे केलेले असते, जे साहजिकच चुकते. तसेच चित्रपट कलावंत हे 'पडद्यावरचे कलाकार' असले तरी वास्तविक जीवनात त्यांनी पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखेपेक्षा ते अगदी वेगळे असल्याचे पहायला मिळते.

म्हणून आपण “The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment” >>> हे लिहिलेले वाक्य शब्दशः पटते.

योग्यतेपेक्षा जास्त मिळाले की सहसा अहंकार येतो. आपण स्वत:ला भारी समजू लागतो.
आंधळ्या ऋषीने त्याला भेटलेले शिपाई, सेनापती आणि महाराज कसे ओळखले ही कथा ऐकली असेलच.
एखादा छोटामोठा स्टार घमेण्डी असतो पण एखादा सुपर्रस्टार जमिनीवर असतो असेही बरेचदा आपण अनुभवतो. विद्या विनयेन शोभते हे समजायलाही ती लेवल गाठावी लागते.

बाकी याला दुसरी बाजूही असू शकतेच. प्रसिद्ध व्यक्तींना असे भेटून ओळख दाखवणारे कैक असतात. त्यामुळे दर वेळी हा त्रास टाळायला थोडा वाईटपणा घेणे सोयीचे पडत असावे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे Happy

तुमचा अनुभव खरंच थोडासा कटू आहे. दुनियेत सर्व प्रकारचे लोक असतात आणि आहेत. लेखक हे सर्वसाधारणपणे तुम्ही लिहिलेत तसेच असतात हे जरूरीचं नाही. पण कलाकार, लेखक हे थोड्याफार प्रमाणात आत्ममग्न असू शकतात/असतात त्यामुळे सर्वच लेखक तसे असतात असं विधान करणं थोडं धाडसाचं ठरेल. मी लेखक व्यक्तिना आजतागायत प्रत्यक्ष भेटले नाहिये त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही या बाबतीत.
पण काहीही फारशी कामगिरी नसताना सुद्धा या क्षेत्रात मी कसे ग्रेट काम केले आहे असे स्वतःला समजावत सुद्धा अनेक सो कॉल्ड लेखक/कलाकार आढ्यताखोरपणे वागतात हे ही नक्की.
शिवाय अशा लोकांना अनेक लोक उत्सुकतेने भेटायला जातात, बोलायला जातात, मग प्रत्येकाला यांना 'एन्टरटेन' करावे लागते. कधी कधी त्याचा कंटाळा येऊ शकतो. एखाद्या दिवशी अशा चाहत्यांचा ओव्हरडोस झालेला असू शकतो.
किंवा अगदी कुठेतरी सभेत वगैरे किंवा प्रदर्शनातच लेखकाला काहीतरी 'सुचते' आणि तो ते शब्दात कसे उतरवावे याचा विचार करत असेल आणि येणार्‍या चाहत्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले असेही होऊ शकते.

ऋ व दक्षिणा, चांगले प्रतिसाद.
संबंधित लेखक हे माझ्या कॉलेजचे माजी वि. असल्यानेच मी त्यांच्या जवळ गेलो. अन्य कोणीही असते तर मी मूकपणे प्रदर्शन पाहून निघून गेलो असतो.
आता इथून पुढे अशी 'चूक' करणार नाही, हे नक्की !

प्रत्येकाचा प्रतिसाद त्याच्या स्वभा वावर अवलंबून आहे.
एकदा वाडेश्वर मधे श्री अच्चुत गोड्बोले दिसले होते. पलिकडे काही महविद्यालयीन मुली बसल्या होत्या. त्यानी गोडबोलेंना ओळखले. त्यातली एक मुलगी त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेली. त्यानी पटकन स्वाक्षरी दिली आणि तिच्याशी बोलू लागले. मग इतर मुलीही त्यात सहभागी झाल्या. चांगले पाच - दहा मिनिटे सहज पणे त्यान्च्याशी संवाद केला त्यानी. परत जाताना आजूबाजूच्या सर्वांच्याच मनात त्यांच्या बद्दल वेगळा आदर निर्माण झाला होता.

आता इथून पुढे अशी 'चूक' करणार नाही, हे नक्की ! >> कुमार माझ्यामते काहीही चूक किंवा बरोबर नसते, तुम्ही एक प्रयत्न केला त्यात यश नाही आले, जाऊदे.. पुढे कधीतरी ही घटना मनात ठेवून तुम्ही एखाद्या दुसर्‍या कलाकाराला भेटलात आणि तो खरंच चाहत्यांच्या शब्दांचा भुकेला असेल तर तो निराश होईल.
तुम्हाला वाटेल मी दोन्हीकडून बोलतेय की काय, पण एकाच काठिने सगळी गुरं हाकता येत नाहीत. Happy

ऋन्मेष तुझा ही प्रतिसाद आवडलाय, आता नमूद करतेय.

एकाच काठिने सगळी गुरं हाकता येत नाहीत. >>> सही ! तरीपण वलयांकित व्यक्तींमध्ये आत्मकेंद्रीपणाचे प्रमाण अधिक आहे असे जाणवते. पाय जमिनीवर असणारे तसे कमीच.

तुम्ही डॉक्टर आहात का? : D

असा विचित्र अनुभव मला दिलीप प्रभावळकरांचा आला आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये आम्ही आलो तेव्हा प्रभावळकरांच्या हसवाफसवीची आम्ही आणि आमच्या काही मित्रांनी पारायणं केली होती. लहानपणी बालदरबार मधून त्यांचा आवाज नेहमी ऐकायचो. याबद्दल त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण हूं हूं शिवाय ते फारसं काही बोलले नाहीत. अर्थात त्यांना बरेच लोक भरत असतील!P

मला यात अजुन एक अँगल दिसतो हुं हुं करण्यामागे. की आपण जास्तीचे काही बोललो तर चाहते त्याचा विपर्यास करतील आणि आपलं नाव खराब व्हायला वेळ नाही लागणार असं काहिसं फिलिंग असेल का त्यांना? Uhoh
(खखो दे जा)

दक्षिणा, असू शकेल तसे. मला एवढेच वाटते की एखाद्या शांत ठिकाणी जर १-२ चाहतेच जर बोलू पाहत असतील, तर निदान त्यांची नावे व ते काय करतात एवढे २ प्रश्न तरी त्या व्यक्तीने विचारावेत.
जगातील कुठल्याही माणसाला त्याची विचारपूस केलेली आवडते.

जगातील कुठल्याही माणसाला त्याची विचारपूस केलेली आवडते. >>> अतिशय चूक आहे हा तुमचा होरा.

तुम्ही त्यांच्या कलाकृतीसंदर्भात काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलात का? ते एक साहित्या संदार्भातले प्रदर्शन/मीट अप होते ना तिथे घरगुती गप्पांची काय आवश्यकता?
कलाकार/ साहित्य्काला लोकांनी त्यांच्या कामाविषयी बोलावे अशी अपेक्षा असते. कदाचित त्या लेखकांचीही तीच अपेक्षा असावी. तुम्ही ह्याला ओळखता का त्याला ओळ्खता का असा बसमध्ये बाजूला बसलेल्या माण्साशी माराव्यात तश्या फुटकळ गप्पा मारायला लागलात तेव्हा त्यांनी तुम्हाला त्यांच्या साहित्याशी काही देणेघेणे नाही हे ताडले असेल. त्यांना जर तुमच्या फुटकळ गप्पांमध्ये काही ईंट्रेस्ट वाटत नसेल तर मग का मारतील ते गप्पा तुमच्याशी?
तुमच्या कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत येवून कोणी अश्या फुटकळ गप्पा मारत बसले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
त्या लेखकांनी मायबोलीवर 'फुटकळ गप्पा मारणार्‍यांशी भेट? नको रे बाबा' असा धागा ऊघडला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

कदाचित त्या लेखकाचा तो दिवस चांगला जात नसावा किंवा एखादी दुःखद घटना त्याच्या आयुष्यात नुकतीच घडलेली असावी किंवा त्याला बरे वाटत नसावे किंवा त्याचा मूड ही नसावा. असे ही असू शकते.

आपलं सुद्धा होत असं की, सकाळी उठल्यावर काही करायचा मूड नसतो, पण तरी कामावर जावंच लागत बाकी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.

माझी एका मैत्रीण रस्किन बॉण्ड ची मोठी चाहती आहे, ती त्यांना जेव्हा भेटली होती तेव्हा तिला ते अलिप्त जाणवले, वैतागलेले वाटले.

माझ्या मते एका प्रसंगातून आपण माणूस ओळखू शकत नाही आणि ओळखता सुद्धा येत नाही.

हुप्पाहुय्या आणि अनुश्री यांचा मुद्दा पटला, तुम्ही फारच टोकाची भूमिका घेताय, एखादा लेखक जर अबोल असेल, तर आपण तरी काय करणार ? जर लेखकाने मनमोकळ्या गप्पा मारल्या असत्या, "या लेखकाला काही कामच दिसत नाही" असा ग्रह झाला नसता का? मला वाटत सोडून द्या, यात काही विशेष नाही, लेखक जर वयोवृद्ध असेल तर वयानुसार तिरकसपना येतो.

माझ्या मते एका प्रसंगातून आपण माणूस ओळखू शकत नाही आणि ओळखता सुद्धा येत नाही. >> सहमत.
माझ्या अनुभवातून कोणतेही सरसकटीकरण करण्याचा इरादा नाही. संबंधित लेखकाबद्दल मला अजूनही आदर आहे.
वाचकांनी त्यांना आलेले असे (गोड्/कटू) अनुभव लिहावेत ही इच्छा.
लेखात उल्लेख केलेले Robert Persig यांचे वाक्य अणि माझा अनुभव अगदी जुळल्याने मला हा प्रसंग लिहावासा वाटला. त्यांच्या वाक्यावर कोणी तटस्थपणे चर्चा केल्यास आवडेल.

असे वाटत असल्यास माफी मागते... मुद्दाम किंवा काही ईंटेशनने नव्हते लिहिले.
जर ईथे त्या कलाकाराचे नाव आले असते (नाव लिहिले नाही ते चांगले आहे, पण काही प्रतिसादांमध्ये आलेच आहे तसे) तर नाहक कुणा एकाच्या चुकीच्या अपेक्षांमुळे कलाकाराची त्याच्या परोक्ष घमंडी/ आडमुठा/ आढ्यताखोर अशी बदनामी होत राहते आणि त्याच्याबद्दल काहींचे विनाकारण चुकीचे मत बनते.
एकही माणूस आजूबाजूला नसतांना ते लेखक्/कलाकार तिथे बसून होते त्यांच्याही चाहत्यांकडून काही अपेक्षा असतील म्हणूनचना?

तरीपण वलयांकित व्यक्तींमध्ये आत्मकेंद्रीपणाचे प्रमाण अधिक आहे असे जाणवते. पाय जमिनीवर असणारे तसे कमीच.
>>>>>

असे प्रमाण काढणे चुकीचे आहे.
मुळात एखाद्या व्यक्तीत अहंकार तेव्हाच येतो जेव्हा तो काहीतरी बनतो. एखादा श्रीमण्त असेल तर त्यालाच पैश्याचा अहंकार असेल. माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला का असेल? म्हणून मध्यमवर्गीयांमघ्ये अहंकारी लोकांचे प्रमाण कमी असते आणि श्रीमंतांमध्ये जास्त हा मुद्दाच चुकीचा आहे.
मजबूरीका नाम गांधीजी असेल तर कौतुक करण्यात अर्थ नाही.

माझ्या कोणत्याही लेखात मी खरी नावे देत नसतो. तेवढे भान मला आहे. इथे तर कटाक्षाने नाव दिलेले नाही.
>>>>>>

नावं द्यायचीही नसतात आणि कोणाकडे खरे खोटे करायला मागायचीही नसतात. हे बेसिक आहे. काही लोकं नाव न देता हिण्ट देतात ते आणखी चूक !

तुम्ही पण डॉक्टर ... ते लेखक पण डॉक्टर.... ते अनील अवचट तर नव्हेत?

आष्चर्य आहे!!! कारण ते एकदम जॉली म्हणुन प्रसिद्ध आहेत..... आर्थात ते असतिल तर हा..... आणि साधारण पणे डॉ मंडळींना " आमचे कॉलेज, आमची बॅच" हे दोन मुद्दे अनेक दिवस बोलायला पुरतात. त्यातही आपल्याच कॉलेज चा एक आपल्या पेक्षा लहान माणुस समोर असेल, तर हमखास "तो आमका तमका होता कारे तुला शिकवायला?" वगैरे पुरतात गप्पा मारायला!!!!

मला मीना प्रभु आणि अनन्त सामंत व दस्तुर खुद्द पु.ल. देशपांडे ह्यान्चा एक व्यक्ती म्हणुन, लेखक म्हणुन खुपच चाण्गला अनुभव आहे. तसेच विजया मेहेता, नाना पाटेकर, विक्रम गोखले, वामन केन्द्रे ह्यान्चा ही खुप चान्गला अनुभव आहे.

एका ढेरपोट्या नटाचा चा मात्र अजिबात चान्गला अनुभव नाही. गडकरी रंगायतन चे हॉटेल पुर्वी रणदिवे म्हणुन ग्रुहस्थ चालवायचे. ते असताना बाबा नेहेमी तिकडे सी.के.पी. पदार्थ खायला न्यायचे. असेच एकदा जेवत असताना समोर तो जेवत होता. बरोबर मित्र ही होते. नाटक संपुन ते लोक जेवायला उतरले असावेत. आणि मित्र साधारण टप्पोरी छाप होते. त्यान्च्या माझ्या वर व तिथे जेवणार्‍या इतर मुलींवर चाललेल्या कॉमेंट्स आम्हाला अगदी व्यवस्थीत ऐकु येत होत्या. अगदी काहीतरीच वाटत होते. शेवटी मॅनेजर ने एकंदर नुर पाहुन त्यान्ची सोय रीहर्सल रुम मधे केली असावी. नट म्हणुन तो चांगला असेल सुध्धा. पण माणुस म्हणुन....... मनातुन उतरला.

पु.ल. चा किस्सा सांगण्याजोगा आहे. मी मॅजेस्टीक गॅलरी पुणे येथे काही तरी खरेदी करत होते. आणि आतल्या केबीन मधुन खुद्द पु.ल. बाहेर आले. मी आष्चर्य चकित की काय म्हणतात ते झाले. मी बीलींगलाच उभी होते. पु.ल. नी माझ्या चेहेर्‍यावरचे "आजी मी ब्रम्ह पाहिले" भाव तात्काळ ओळखले. तेंव्हा मी १८-१९ वर्षांची होते. त्यांनी लगेच विचारले " पाहु तरी कोणती पुस्तके घेतात आज कालची मुले...." असे म्हणुन मी घेतलेली पुस्तके पहायला मागीतली. नेमके मी ग्रेस च्या कविता, आणि गंगाधर गाडगीळांची "दुर्दम्य" हे टिळकां चे चरीत्र घेतले होते.
" ग्रेस ठीक आहे... तुमचं वय आहे वाचण्याचं कविता!!! पण एकदम दुर्दम्य?... वा वा चांगलय" असे म्हणुन ती पुस्तके मला परत दिली. मीच मग आगावु पणे त्यांना त्या पुस्तकांवर स्वाक्षरी मागीतली. त्यावर तो थोर माणुस म्हणाला" ह्या दोघांच्याही पुस्तका च्या पहिल्या पानावर स्वाक्षरी देण्या येवढा मोठा नाही. म्हणुन मग त्यान्नी त्या पुस्तकांच्या मागे " चि. मीरास, अनेक शुभेछा!!! " असे लिहुन आपली स्वाक्षरी दिली.

मी इतकी भारावली होते, की घरी येताना १२ रुपये झाले असतानाही रिक्षा वाल्याला २० रुपये देवुन आले.

मोकीमी, चांगला प्रतिसाद.
साधारण पणे डॉ मंडळींना " आमचे कॉलेज, आमची बॅच" हे दोन मुद्दे अनेक दिवस बोलायला पुरतात. त्यातही आपल्याच कॉलेज चा एक आपल्या पेक्षा लहान माणुस समोर असेल, तर हमखास "तो आमका तमका होता कारे तुला शिकवायला?" वगैरे पुरतात गप्पा मारायला!!!! >>>
आभार ! अगदी बरोबर ओळखलात तुम्ही माझा मुद्दा. अहो, अशा गप्पा जाउदेत, निदान 'तुम्ही काय करता आता' एवढ्या (फक्त) एका प्रश्नाची अपेक्षा होती माझी.
एक पथ्य आपण सगळेच पाळूयात. चांगले अनुभव जरूर नावानिशी द्यायला हरकत नाही आणि कटू अनुभव अर्थात नावाविना.
अशा प्रकारे कटू अनुभव कोणालातरी सांगावा वाटणे ही माणसाची गरज असते. त्यासाठीच तर अशी संस्थळे (माध्यमे) असतात, असे मला वाटते.

एक कटू अनुभव आला. अगदी कटू ही म्हणता येणार नाही. तुम्ही संभाषणाचा प्रयत्न केलात ते इण्टरेस्टेड दिसले नाहीत, तुम्ही निघून गेलात. त्यावरून "नको रे बाबा" कशाला एवढे? तुम्हालाच इतर चांगले अनुभव ही आले आहेत असे दिसते.

मोकीमी - पुलंचा अनुभव मस्त. त्यांच्या तशा प्रकारच्या कॉमेण्ट्स त्यांच्या इतर लेखांतही आहेत.

गर्दी मधे कदाचीत असे अनुभव येवु शकतात. मागे ह्रिषिकेश जोशीं नी एक लेख लिहिला होता. त्यात प्रसिध्द व्यक्तींचे अनुभव दिले होते. त्यांची कारण्मिमांसा पटली मला. अनेक वेळा आजुबाजुचे लोक ह्या लोकांना इतके इरीटेट करतात की कावुन हे लोक हवे ते बोलतात. त्या लेखात त्यांनी सलमान खान चे उदाहरण दिले होते. सगळ्यात मजेशीर उदाहरण परेश रावल ह्यांचे होते. कोणत्यातरी मराठी नाटकाच्या महोत्सवी प्रयोगाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावले होते. तेंव्हा एका प्रसिध्ध व्रुत्त्पत्राची नटवी पत्रकार तिकडे होती. तिने सभाग्रुहात जाण्या आधी त्यांचा "छोटासा इंटर्व्ह्यु दिजियेना!!" म्हणुन पाठपुरावा केला. " ते ही म्हणाले, पुछीये.... त्यावर हिने त्यानां काय विचारावे ...." आपको आज कैसे लग रहा है नाटक के कार्येक्रम मे आने को? आप खुद हिंदी फिल्म के इतने बडे कलाकार है.... क्या आपने भी कभी स्टेज पे काम किया है?"...... हे ऐकुन आजुबाजुचे लोक भुकंप होइल तर बरं ह्या अविर्भावात तिच्या कडे पहात राहिले. आणि परेश रावल फक्त एक नमस्कार करुन पुढे चालते झाले. नन्तर मात्र अध्यक्षीय भाषणात त्यांनी तिचा नाव न घेता खरपुस समाचार घेतला.....

Pages