दुःखाचा आधार पुरेसा

Submitted by santosh watpade on 9 July, 2017 - 03:08

समुद्रमंथन करण्यासाठी जसा एक मंदार पुरेसा
तसे घुसळण्या काळिज माझे प्रिये तुझा शिनगार पुरेसा...

सौख्य कधीही येते जाते त्याच्यावरती नको भरोसा
जीवन जगण्यासाठी शाश्वत दुःखाचा आधार पुरेसा...

सामसूम झालेली नाही तरी कशाला इतकी घाई
तुला हवे ते करु थांब ना... होऊ दे अंधार पुरेसा...

दात विषाचे दिले तरीही दंश नको कोणास करु
धाक लावण्या या दुनियेला तुझा एक फुत्कार पुरेसा...

गर्दन कोणी जरी छाटली तरी जीव जायचा न माझा
तडकाफडकी जीव जायला पाठीवरती वार पुरेसा...

मिठी वगैरे मागत नसतो सभोवती गर्दी असल्यावर
अशा प्रसंगी प्रिये वाटतो स्पर्श तुझा अलवार पुरेसा...

आठवड्यातिल इतर दिवसही जमेल तितके कष्ट करु या
सगळी कामे करण्यासाठी नसतो गं शनिवार पुरेसा...

माझे मीपण तुला दिले मग प्रश्न आणखी उरला कोठे
तरी अजुनही तुला वाटते हा नाही अधिकार पुरेसा...

बलाढ्य होती भूक म्हणूनच हरलो..हेतर खोटे कारण
नसेल केला तूच मनापासून तिला प्रतिकार पुरेसा...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संतोष ही गझल मी मन लावून वाचली.
प्रत्येक आणि प्रत्येक शेर खासच आहे. वाह! वाह!
हळहळ वाटते मनात की आपल्याला का नाही येत असं लिहिता.. Sad

शेर ओ शायरी हा प्रकार किमान शब्दात जास्तीत जास्त आशय आणि भावना समोरच्या पर्यंत पोहोचवतो. त्याला अनेक अर्थांचे कंगोरे ही असतात कधी कधी (आर्ट फिल्म्स सारखा शेर प्रत्येक माणसाला बहुधा वेगवेगळा समजत असेल) मला त्यतलं काही येत नाही, फक्त शेर ऐकला की वाह! म्हणता येते. बाकी फक्त शब्दांचा पसारा.. .

सो मेनी धन्यवाद्स दक्षिणा.... लिहिता येत नसले तरी वाचणे ही कलाही सोपी नाहीये...फार संयमाचे काम आहे हे....एक हजार लेखकांपेक्षा एक मनस्वी वाचक श्रेष्ठ आणि बलशाली असतो असे माझे मत आहे....

छान गझल... आवडली...
"धाक लावण्या या दुनियेला " येथे "धाक दावण्या या दुनियेला " योग्य वाटेल असे वाटते...
धाक हा दाखवला जातो, शिस्त ही लावली जाते...
अर्थात अधिकार तुमचा.....

पुन्हा एकदा... गझल... आवडली
राजेंद्र देवी