भाव विठुचे दाटले

Submitted by निशिकांत on 30 June, 2017 - 06:58

भाव विठुचे दाटले---( सारा महाराष्ट्र वारीत आणि विठ्ठलाच्या भक्तिरसात चिंब झालेला आहे या घडीला. या निमित्त माझी एक जुनी रचना. )

वाट धरिता पंढरीची
दु:ख सारे आटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

ज्ञानया तुकया आले अन्
तेज दिंडीस लाभले
टेकुनी माथा, फुलांनी
पालखीला सजवले
भजन गजरी धुंद सारे
भान कोणा कोठले?
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

भक्तिमय सारेच झाले
टाळ, मृदंग अन् वीणा
शोध घेता सापडेना
एकही मन विठुविना
किर्तनी रंगून सारे
पुण्यमार्गी लागले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

घालण्या मार्गात रिंगण
वारकरी सरसावले
पाहुनिया दृष्य सुंदर
देवही भारावले
पुष्पवृष्टी वरुन होता
धन्य भक्ता वाटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

वारकरी चौफेर दिसती
आसमंत भरुनी वाहिला
आतुरल्या त्यांच्याच नयनी
सावळा मी पाहिला
दो

दिव्य झाले वस्त्र अंगी
होते जुने जे फाटले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

चंद्रभागी वाळवंटी
वारकरीगण झोपले
सर्व नेत्री स्वप्न एकच
नाते विठुशी गुंफले
अंगणी छायेत हरीच्या
ब्रह्म त्यांना गावले
विसरुनिया मोहमाया
भाव विठुचे दाटले

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users