सूर्यमय

Submitted by mrsbarve on 27 June, 2017 - 01:20

कसा तो ,सकाळी पाचलाच उठून डोळयांवर चमकत येतो !मग काय बिशाद आहे माझी अंथरुणात लोळायची?खिडक्या नाही उघडल्या तरी आडदांड मुलासारखी घुसतातच आत त्याची किरणे!आणि खाली येऊन पाहावे तर मस्त जेवणाच्या टेबलावर उन्हाच्या रांगोळीच्या तिरिपी दिसू लागलेल्या असतात. सगळं कस प्रकाशमय,चकचकीत करून टाकतो तो!पडदे सारले कि समुद्राच्या लाटांच्या रौद्र स्वरूपासारख याचही काहीसे रौद्र स्वरूपच दिसू लागतेय आज काल !

गडबडीत "काळा काळा चषमा" विसरतो,मग तर काय याचा हुम दांडगे पणा सहन करत हापिसात पोचावे तर एव्हाना गरम गरम व्हायला सुरुवात होते! एलिव्हेटर मधून जाताना कोणी तरी चिडवत,तू कुठे पेंट हौस मध्ये ना? सर्वात वरच्या मजल्याच्या चारी बाजूच्या मोठं मोठाल्या खिडक्यांतून त्याचे सहस्र् किरणे केव्हाचंची आत आलेली असतात.अक्खी सकाळ सूर्यमय झालेली असते!त्या किरणांच्या लडिं मधून जणू उत्साह,जीवन रस पाझरत असतो सगळी कडे.

तिकडे धरती माता सदैवच हिरवा शालू बिलू नेसून बसलेली असते,पण हि अशी चमकीली,सोन पिवळी उन्हाची ओढणी पांघरून सगळ्या धरतीची थोडी वेगळी वेषभूषाही मस्तच होऊन जाते!

घड्याळाचे काटे पुढे सरकायला लागतात तशी मी त्याला विसरून जाते कामाच्या पसार्यात,बघता बघता बारा वाजतात ,लंचची वेळ होते,अक्षरश: अंडे आत ठेवले तर उकडून निघेल इतके गाडीतले तापमान झालेलं असते. स्टी अरिंग व्हील प्रचंड तापलेले असते,आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे जरा वेगळ्या संदर्भाने सिद्ध होते!आता जरा त्याच्या या उष्ण आणि उग्र स्वरूपाचा थोडासा रागच येतो! पण बघता बघता परत मी कामाच्या पसाऱ्यात बुडून जाते.

जाते वेळी मात्र कसा भेटतो ,शांत ,खूप मस्ती करून दमलेल्या मुलाने थोडे शांत राहावे,वागावे तसेच काहीसे!. जेवण उरकून पावले समुद्र किनारी वळतात.आता दिवसभर डोक्यावर तळपणारा शांतपणे दूर समुद्राच्या क्षितिजावर टेकलेला.सुंदर रंगाची उधळण करत,हळू हळू सृष्टीला टाटा टाटा म्हणत तो चालू लागतो! आणि एकदम स्तब्ध व्हायला होत!काय असत त्या वेळेत काही कळत नाही! सगळे त्याच्या कडे डोळे भरून पाहत असतात त्यावेळी....मग शांतपणे बुडून जातो ,

क्षितिजावरची उन्हे मावळतात पण संधी प्रकाश अजुनी असतोच.

मी घरी परतते.

आकाशात आता चंद्राची सुंदर कोर खुणावत असते!

Group content visibility: 
Use group defaults

छान !