देवदर्शन : भाग ३ अंतिम

Submitted by फूल on 23 June, 2017 - 08:55

भाग २ : http://www.maayboli.com/node/62899

“बाहेर जाऊया फिरायला?” अभिने हळूच कानात विचारलं.
“आत्ता?”
“हो मग? ५.३० वाजतायत... मस्त फिरून येऊ तासभर... चल... शेतात कधी फिरणार आपण असे..?”
“अरे पण मावशीला...”
“मी सांगतो... तू आवर... अशीच चल... ओढणी घे फारतर...”
“अरे हो आले... तोंड धूउन येते...”

मी तयार होऊन बाहेरच्या अंगणात आले.. पुन्हा तुळशीजवळ दिवा होता... कालची रांगोळी बदलली होती... आज दोन मोर होते... कालच्या इतकेच रेखीव... रंग न भरताही रांगोळी इतकी सुंदर दिसत होती... हळद कुंकू मात्र होतंच... अभि आला आणि आम्ही निघणार तोवर मावशीचा आवाज आलाच...
“जाताना एवढं निर्माल्य नेऊन पलिकडच्या पाटात सोडून द्या काय?... आणि दारावरचं सुकलेलं तोरणहि काढून ने... अज्याला अनेकदा सांगितलं तो नेहमी विसरतो... माझा हात पोचना.... ती बाहेरची झाडं छाटायला अज्या माणूस पाठवायलाय अजून... आज गेलास संध्याकाळी की आठवण कर त्याला... ”

आम्ही बाहेर पडलो तेव्हा नुकतं झुंजूमुंजू होत होतं... हा अनुभव खूप रोमांचकारी होता... पहाटेच असं शेतात दोघांनी फिरायला जायचं... मनात खूप प्रश्नही होते... अभिच्या हातात हात घालून चालत होते... बराच वेळ दोघंही शांतच होतो... मग अभिनेच विचारलं,
“कसं वाटलं घर? आणि मावशी...? any regrets? का आले इथे उगाच असं काही वाटत नाहीये नं?”
“छे रे... एवढे लाड माझ्या घरीही नाही झालेत कधी... मावशी मस्तच आहेत... प्रेमात पडले मी त्यांच्या...”
“हम्म... प्रेमात पडावं अशीच आहे ती... आणि मी तिला बघतोय तेव्हापासून अशीच आहे हं... मला कधीच ती वाकडं तोंड करून बसलेली आठवत नाहीये... तसं सहन तर तिने खूप केलंय... पण..”
“हो म्हणजे मी विचारणारच होते... पण...”
“म्हटलं हाच सांगतोय का स्वत:हून काही ते बघावं...” अभि मिश्कीलपणे म्हणाला...
“तसं नाही रे... कळत नव्हतं... आत्ता विचारू की आपण परत आपल्या घरी गेलो की एखाद्या निवांतवेळी...?”
“विचार... विचार... अश्या गोष्टी फारवेळ आत दाबून ठेवू नयेत... not good for health...” अभि पुन्हा चेष्टा करत म्हणाला...
“जाऊ दे.. नाही विचारत...”
“अगं... गंमत केली... विचार.. विचार...”
“त्यांचं लग्नं कधी झालं?”
“हम्म... जरा उशीराच... त्याकाळी मुलगी दिसायला नुसती देखणी असून उपयोग नव्हता... हुंडा द्यायला हवा... आजोबांकडे हुंड्यासाठी पैसाच नव्हता... आज्जीच्या आग्रहाने आई आणि मावशी शिकल्या तरी... आजोबांचं म्हणणं मुलींनी नोकरी करायची नाही... मग काय... तिचं वय वाढत गेलं... तरी लग्न होईना... शेवटी एका बिजवराच्या गळ्यात माळ घालावी लागली...”
“ohh... मग कशी होती ती माणसं?”
“तो माणूस दिसायला बरा होता म्हणे... पण मंडळी बड्या घरची... आर्थिक परिस्थिती उत्तम... देर है मगर अंधेर नही म्हणत या सगळ्यांनीहि समाधान मानून घेतलं... पहिल्या delivery साठी मावशी घरी आली... आणि तिकडे त्या हरामखोराने दुसरी बाई आणून ठेवली...”
“आई ग्ग्ग...तुझ्या जन्माच्या आधी झालं असेल नं हे सगळं?”
“हो... आईने आत्ता आलिकडे सांगितलं मला हे सगळं.. मला आठवतंय तेव्हापासून मी तिला याच घरात बघतोय...”
“मग पुढे?? मावशींना काय झालं? मुलगा की मुलगी?”
“मावशीला अगदी मस्त देखणा मुलगा झाला... पण तिचा नवरा तिला परत न्यायला तयारच नाही... शेवटी राम मामा आणि आजोबांनी खनपटीला लागून त्याला मावशीला घेऊन जायला लावलं... तिला सासरी घेऊन जाताना वाटेत घाटातच तिच्या नवऱ्याने गाडी थांबवली... खरा घडलेला प्रकार सांगितला तिला... माझी चूक पदरात घे नाहीतर या दरीत उडी घेतो असा धमकीवजा आर्जव... मावशी तरी काय करणार होती... गेली घरी... त्यानंतर तिचा भयंकर छळ केला गेला... तिच्या नवऱ्याचे आणि त्या बाईचे नको नको ते चाळे उघड्या डोळ्याने बघावे लागले तिला... ती दुसरी बाई pregnant आहे कळल्यावर शेवटी मुलाला घेऊन परत आजोबांकडे निघून आली मावशी... ”
“ऐकवत नाहीये अभि... काय हे अत्याचार... ”
“I know... तिकडे त्या बाईला मुलगी झाली... मग या शहाण्याला मंदामावशीचा मुलगा प्रिय झाला... एक दिवस आला इकडे आजोबांकडे... मावशीला म्हणाला मुलाला फिरवून आणतो आणि तो नालायक माणूस तिच्या मुलाला पळवून घेउन गेला गं... जेमतेम दोन-तीन वर्षांचा असेल तेव्हा तिचा मुलगा”
“देवा... एखाद्या माणसाने किती म्हणून सहन करावं...?”
“खरंच... काही महिने मावशी अगदी मोडून पडली होती...”
“absolutely…I can’t even imagine this… ”
“अरे... पण मग आजोबांनी, राम मामांनी त्यांचा मुलगा परत मिळावा म्हणून काही प्रयत्न नाही का केले?”
“आजोबांचं वय झालेलं तेव्हा... त्यात मोठया मुलीच्या आयुष्यात झालेल्या वाताहातीने पार खचून गेलेले आजोबा... आणि मामावर इतरही अनेक जबाबदाऱ्या होत्या... तोवर त्याचंहि लग्न झालेलं... त्याने तसंहि मावशीला ठेउन घेतलं हेच पुष्कळ... कोट-कचेऱ्या करणं त्याला झेपलं नसतं... त्यात मावशीचं सासर म्हणजे बडया घरची मंडळी... कोर्ट कचेरी करूनही कितपत फायदा झाला असता देव जाणे... पण इथेच संपत नाही हे सगळं...”
“म्हणजे? आता अजून काय?”
“मावशीचं असं परत येणं काहीवर्ष मामीने सहन केलं पण मग घरात कुरबूर सुरू झाली... मामी घर सोडून निघून गेली... ती गेलीच... राम मामाचा घटस्फोट झाला आणि एक मुलगा मामाकडे आणि एक मामीकडे अशी संसाराची वाटणी झाली...”
माझ्या डोळ्यातून एव्हाना पाणी वहायला लागलेलं...
“मामाच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे अजयला मावशीने आपलं केलं... शहाणं केलं... तो मावशीला खूप मानतो... आईच म्हणतो तिला..”
“तो आलेला नं आपल्या लग्नाला?”
“हो होता नं... त्याची बायको, मुलगी सगळे होते... आज संध्याकाळी तिकडेच जायचंय...”
“ह्म्म्म... मग मावशींना घेऊन का नाही जात अजय आपल्या घरी?”
“हज्जारदा सांगून झालंय... पण स्वाभिमानी आहे ती... आणि सुजाणहि.. उगाच एकत्र राहून वाद होण्यापेक्षा वेगळं राहिलेलं उत्तम हे कळलंय तिला... अजयची बायको चांगली आहे गं... पण मावशी म्हणतेय या घरात आज्जी-आजोबांच्या आठवणी आहेत... मी मेले की विका नाहीतर काहीही करा”
“राम मामा कश्याने गेले?”
“झाली ४-५ वर्षं... तापटच होता तो आजोबांसारखा... BP चा त्रास होताच... त्यात diabetese... गोळ्या ओषध काही घ्यायचा नाही... मग काय होणार...? त्यात मामाचा नाही म्हटलं तरी संसार मावशीमुळे विस्कटला.. तो सल मनात कायम होता... कधी बोलून नाही दाखवलं त्याने पण तिचा राग राग करायचा... तरी मामावर ओझं म्हणून रहायचं नाही या भावनेनं तिनं हे दुकान सुरू केलं...”
“पण अजूनही मंगळसूत्र घालतात त्या...?”
“नवरा जिवंत आहे तिचा म्हणे... आधी मंगळसूत्र घालत नव्हती... पण दुकानात येणारी लोकं भलत्या नजरेने बघायला लागली म्हणून मग मंगळसूत्र आणि ठसठशीत कुंकू तेव्हापासून वागवते...”
“या सगळ्यांची आजारपणं त्यांनीच काढली असतील नं रे?”
“अर्थात... मामा एकटा काहीच करू शकला नसता... ती होती म्हणून निभावलं तिने... आज्जी, आजोबांचं आजारपण, अजयचं लग्न, मग मामाचं आजारपण एवढं सगळं करून अजूनही कशी उभी आहे ती....? मला हीच positivity भावते तिची... म्हणूनच घेऊन आलो तुला इथे... बाकी देवांची दर्शनं होतीलच पण या देवाचं दर्शन आणि तेही याच मंदिरात सगळ्यांना घडायचं नाही...”
मी हतबुद्ध होऊन ऐकत होते... अभि माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला...
“मीही असाच अवाक झालेलो जेव्हा हे सगळं रामायण ऐकलं तेव्हा... माझा विश्वासच बसत नव्हता की या हसऱ्या चेहऱ्याआड एवढं मोठं दु:खं लपलंय... ”
“मलाही खरं वाटत नाहीये... किती शांत, स्वच्छ, नितळ दिसतो त्यांचा चेहरा...!”
माझ्या बोलण्याने अभि सुखावला... त्याच्याइतक्याच मलाही मावशी आवडल्या याचा त्याला आनंद झाला... हातातलं निर्माल्य वाहत्या पाटात सोडून तिथेच जरावेळ पाण्यात पाय सोडून बसलो... माझ्या अपेक्षेपेक्षा पाट बराच रुंद होता... छान उजाडलं होतं... उबदार सूर्यकिरणं अंगावर घेत तिथे बसून होतो... बायका कपडे धुवायला पाटावर यायला लागल्या... तशी हळू हळू गर्दी वाढायला लागली... आणि आम्ही निघालो...

आमच्या बोलण्याच्या नादात घराजवळ कधी आलो कळलंच नाही... दुकान उघडलेलं लांबूनच दिसलं... आमची पावलं आपसूकच दुकानाच्या दिशेने वळली... डोक्यात विचारचक्र चालू होतं...

आजवर खूप कष्ट केलेली, खूप मानसिक यातनांमधून गेलेली माणसं थोडीफार बघितालीयेत पण या माणसांमध्ये त्यांच्याही नकळत तयार झालेला एक प्रकारचा कडवटपणा जाणवतो, प्रसंगी ज्यांचं चांगलं होतंय त्यांच्याबद्दल किंचित मत्सरही जाणवतो पण इथे म्हणजे सगळंच उलटंय... अगदी भरल्या घरात वावरत असल्यासारख्या वावरत होत्या त्या तिथे... गतकाळाचा तर नाहीच पण घराबाहेर अस्ताव्यस्त वाढलेली झुडूपं, कोळिष्टकं, जुना वाडा, बंद खोल्या या कसल्याचाच त्यांच्यावर परिणाम झालेला दिसत नव्हता... जेव्हा बघावं तेव्हा एक समाधानी, प्रसन्न चेहरा डोळ्यासमोर यायचा... खरोखरी हे घर मंदिरासारखं वाटलं मला... आणि त्या मंदिरात वावरणाऱ्या मावशी म्हणजे देवीचं रूपंच... पण तरीही मनात एक प्रश्न होताच... कसं पचवलं असेल त्यांनी एवढं दु:खं?

सकाळच्या वेळी पाटावर कपडे धुवायला निघालेली कुणी धनगराची लेक साबणचुरा घ्यायला दुकानात आलेली... तिला मावशींचा उपदेश चालू होता... तिला समजेल अश्या भाषेत...

“आपुन घरास्नी आलंल्या माणसाला कारल्याची भाजी खायला घालतू का? न्हाई... कायतरी गोड-धोड मसाला-गिसाला घालून चमचमीत असलं कायतरी करणार... का तर आपले मोट्टे काय सांगितलेत का आपल्याकडचं काय चांगलं आसंल ते दुसऱ्यास्नी द्याव... मग तसंच बोलताना पण ग्वाडच बोलावं की आपल्याकडचा कडूपणा का द्यावा... आता तू इचारशीला का आपल्याजवळच्या कडूजाराचं काय करायचं? तर तो पंचगंगेत नेऊन सोडायचा... देवाला फुलं व्हाताना त्याच्यापाशी काय असंल ते सांगून घ्याचं... का निर्माल्यासंगती तो कडूपणा ग्येलाच बघ पंचगंगेला...”

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं... आमच्या संसाराच्या सुरुवातीलाच या अनुभवसंपन्न देवीचं दर्शन आम्हाला घडणं हा शुभयोगच होता...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिली. Happy
छान लिहीलंय. आवडले तिन्ही भाग. विशेषतः "आपले मोट्टे काय सांगितलेत का आपल्याकडचं काय चांगलं आसंल ते दुसऱ्यास्नी द्याव... मग तसंच बोलताना पण ग्वाडच बोलावं की आपल्याकडचा कडूपणा का द्यावा.." हे. जास्त आवडलं.
लिहीत रहा.

खूप छान!!
मी पण मवशीच्या प्रेमात पडले.

फारच छान जमून आलीय ही कथा! मंदा मावशी डोळ्यासमोर उभी राहिली!
खुप दिवसांनी सशक्त लिखाण वाचल्याचं समाधान मिळालं!

देवीचं रूप खरोखर. >> +९९९

लेखनशैली अप्रतिमच..

फारा दिवसांनी इतके सुंदर लिखाण वाचायला मिळाले...

मी तिन्ही भाग सलग आजच वाचले. खूप चपखलपणे मावशी साकारल्या आहेत. तुमचे लिखाण खूप ओघवते आणि नैसर्गिक आहे. लिहित रहा. पुलेशु!