मी कल्कि

Submitted by aschig on 9 March, 2009 - 17:02

(आशिष महाबळ, १२ अप्रील २००८)
LAMAL विषय: चित्रपट

माझे नाव कालीकाप्रसाद, वय वर्षे २६. तसे आधुनीक असुनही माझ्या आईवडीलांनी असे जुनाट नाव ठेवले कारण माझ्या जन्माच्या आदल्या दिवशी दोघांनाही स्वप्नात माझे हे नाव ठेवावे असे कोणीतरी सांगीतले. बहुतेकांचे आपल्या रुपाप्रमाणेच आपल्या नावावरही प्रेम जडते. माझे फार काही वेगळे झाले नाही. लहानपणी मला देखिल स्वप्नात अनेक गोष्टि दिसायच्या पण कधि त्यावर विचार केला नाही. नंतर मात्र जेंव्हा स्वप्नांची यंत्र येवु लागली, Stalker सारखे काही जुने चित्रपट पाहिले, तेंव्हा मात्र मन, सुप्त इच्छा, त्यांचा बाह्य जगाशी संबंध यातील माझे स्वारस्य वाढत गेले. त्याची परिणती माझ्या आजच्या स्थितीत होईल असे मात्र मला स्वप्नातही वाटले न्हवते. पण मी भरकटतोय. आधी तुम्हाला माझ्याबद्दल थोडे अधिक सांगायला हवे.

कॉलेज मध्ये असतांना स्वप्नांचे यंत्र पहिल्यांदा वापरले. आपल्या सुप्त इच्छा आपल्याला जणु मुर्त स्वरुपात त्यातुन अनुभवता येतात. यंत्र लावुन माझा कल्पनाविलास सुरु असतांनाच मधुनमधुन त्यातुनही मझे मन भरकटायचे. स्वप्नातील स्वप्न असल्याप्रमाणे. पण ते जास्त अतर्क्य असण्याऐवजी खऱ्या आयुष्यातील काही संदर्भ मिळायचे. कधी माहीतीचे, तर कधी थोड्याअधिक शोधानंतर सापडणारे. याच अंतरसुप्त खुणांनी मला नाटकं पहायला लावली, चीत्रपट पहायला लावले, जेनेटीक्स चा तसेच तत्वज्ञानाचाही अभ्यास करायला लावला.

हे सर्व करतोच आहोत तर ऑफिशियली करावे म्हणुन मी त्यासंबंधी एका प्रबंधावर काम सुरु केले: ’स्वप्नांचे हार्डवेअर.' मनाच्या गर्तेत शिरता-शिरता मी अनेक शिखरं सर करतोय हे जाणवु लागले. ईतिहास वेगळ्या दृष्टिने पहायला शिकलो. अनेक प्रवर्तनं होवुन गेल्याची जाण झाली.
...
केवळ मनोरंजनाच्या साधनांचाचा आढावा घेतला तर ती देखील उर्वरीत विश्वाला मॅप करता येवु शकतात. गेल्या अनेक दशकांचेच पहा. नाटक (किंवा तमाशा) पुरते मनोरंजन मर्यादित न रहाता मुकपट आले. एकदा फित मिळवली की त्या नटांची गरज नाही. नंतर ध्वनीपटांनी कानांचीही भुक भागवणे सुरु केले. पुढे त्रीमितपट आले. तुमच्या त्वचेवर आणि घाणेंद्रियांवर देखिल आघात् सुरु झाले. इतरांची मने तुमच्या मनात सुप्त इच्छा अप्रकटपणे निर्माण करु लागले. याचीच पुढची पायरी होती मनपट. स्वप्नयंत्र हा त्याचा क्रुड प्रकार.

इन्वेंट युअर् ओन् एन्डींग प्रमाणे मनपट तुमच्या कल्पनेनुसार बदलु शकायचे. तुम्हाला हव्या त्या दिशेने त्यांचा प्रवास व्हायचा. तंत्रज्ञान अजुन विकसीत होवुन तुम्ही काय कल्पना करायला हवी हे तुमच्यावर लादणे देखिल मनपटांद्वारे शक्य होत आहे. मनपट हे राजकारण्यांच्या हातचं मुख्य हत्यार बनणं फार दुर नाही. हेच ज्ञान वेगवेगळ्या स्वरुपात अनादीकालापासुन उपलब्ध आहे किंवा होतं किंवा असु शकतं हे माझ्या अभ्यासातील संदर्भांवरुन उघड होते. ते पुरातन ज्ञान सहजी कुणाच्या हाती लागु नये म्हणुन त्याचे चार भाग करण्यात आले व चार गटांना वाटुन देण्यात आले. ते कसे हे समजण्याकरता आपल्याला थोडे जेनेटीक्स कडे वळावे लागेल. डीएनए चे मुख्य काम शरीरोपयोगी प्रथीने बनविणे. माकडं व मनुष्य यांच्या डीएनए मध्ये ९९% साधर्म्य असतं हे जवळजवळ सगळ्यांना माहीत असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की आपल्या डीएनए मधील ९८% भाग हा प्रथीने बनवीण्याशी संबंधीत नसतो. याला कधीकधी जंक डीएनए असे म्हंटल्या जाते. त्यातील थोड्याफार भागाचा उपयोग काय हे विज्ञानाला आत्ता-आत्ता उमगु लागले आहे. हा जंक डीएनए देखिल पिढ्यानपिढ्या न बदलता पुढे सरकत रहातो. हा जंक डीएनए म्हणजेच ४ बेसेस वापरुन मनांवर विजय मिळवण्याची किल्ली. ही ४ गटांमध्ये विभागुन देण्यात आली. त्यांना मात्र त्याबद्दल माहीत नव्हते कारण तेच तंत्र वापरुन त्यांची मनं त्या बाबतीत कोरी करण्यात आली. किल्लीचा एक भाग मात्र त्यांना मुखोद्गत करायला लावुन त्या रहस्याबद्दलची ज्योत बाह्यतः जागृत ठेवली. या प्रकारे हा एक खेळ किंवा कोडं बनलं. ते जाणुन होते की ठरावीक कालावधीनंतर या कोड्याचा भाग कुणालातरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुटणार आणी मग ते त्याचा अर्धवट का होइना वापर करुन सर्व संपवणार. म्हणुन त्याबाबतचीही तजवीज केल्या गेली.

ती स्थीति एकदा, दोनदा नाही तर अनेकदा आली. मात्र दरखेपेला योग्य वेळी हस्तक्षेप करायला तत्पर आणी सक्षम असा कुणी तयार होता. कधी त्याला शस्त्र उचलावे लागले, कधी अस्त्र वापरल्या गेले तर कधी शांतपणे लोकांना त्यापासुन दुर न्यावे लागले. क्वचित कधी माकड-अस्वलादी प्राण्यांचीही मदत घ्यावी लागली. पण खेळ नेहमीच जारी राहिला. गम्मत म्हणजे पाप-पुण्य, बरे-वाईट, खरे-खोटे, शुद्ध-अशुद्ध असे अनेक यीन-यांग ला शोभतील असे काळे-पांढरे निकश सर्व गोष्टींना लावल्या जात.

पुन्हा एकदा मनपटांमुळे व जेनेटीक्स च्या सहाय्यानी जग त्या किल्लीच्या जवळ पोचले आहे. पण आता थोडाथोडक्या भागाचा संबंध नसुन अख्खे घबाडच हातातोंडाशी आले आहे. छोट्या-छोट्या चक्रांचे वर्तुळ पुर्ण व्हायची वेळ येवुन उभी ठाकली आहे. मी अवतरलो आहे.

गुलमोहर: 

क्वचित कधी माकड-अस्वलादी प्राण्यांचीही मदत घ्यावी लागली. >> हा संदर्भ नाही कळला रे ? रामायण का ?

कोडे सोडवायला मजा आली.

छान वाटले वाचायला. आसामी तोच संदर्भ असावा. आणि खुपदा माकड आणि अस्वल यांचा एकत्र उल्लेख असतो.

राजकारण्यांनी विज्ञानाचा वापर करून ४ गटांत ज्ञान विभागणे... सही ! मनपट, यीन-यांग, छोट्या चक्रांचे वर्तुळ... मस्तच ! कथा आवडली.
मलाही रामायण वाटते. शिवाय 'माकड-अस्वलादी' प्राणी म्हटले की कासव, डुक्कर वगैरेसुद्धा आले.
>>> कधी शांतपणे लोकांना त्यापासुन दुर न्यावे लागले.
तू काय सोडत नाहीस Happy

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    नॉन कोडींग किंवा जंक डीएनएच्या बॅकड्रॉपवर छानच लिहिलं आहे.

    येशूचे १२ स्ट्रँड डीकोड होते असंही वाचलंय.
    छोट्या-छोट्या चक्रांचे वर्तुळ पुर्ण व्हायची वेळ येवुन उभी ठाकली आहे >>>> २०१२ का?
    कथेचा प्लॉट अप्रतिम आहे!!

    -----------------------
    2b || !(2b)

    आशिषच्या डोक्यात काय आहे माहिती नाही, पण मी त्या 'छोट्या चक्रांचे वर्तुळ...' याचा संबंध LHC शी जोडला Happy

      ***
      Entropy : It isn't what it used to be.

      मला वाटलं ते ४ बेसेस म्हणजे TAGC आणि 'मनपट' म्हणजे कॉम्प्यूटर/इंटरनेट सारखं माध्यम.
      जंक डीएनए मध्ये बाकीच्या अ‍ॅक्टिव्ह डीएनएचा कंट्रोल कोड आहे असे मानले तर तो कोड उलगडला की माणसाच्या धर्म, संस्कृती, सुख, स्व्प्न, प्रेम वगैरेंबद्दलच्या भावनांचा किंवा अतिंद्रिय शक्तींचा प्रेरणास्त्रोत सापडेल.
      ज्यां नेत्यांनी आत्तापर्यंत लोकांच्या या भावनांवर कुरघोडी केली त्यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा शक्ती उभी राहिली जिला हा कोड बर्‍यापैकी अध्यात्म किंवा चमत्काराच्या (by unknown means) मार्गाने उलगडला होता. उदा. राम, बुद्ध किंवा येशू.
      आता हा कोड ज्यात मानवाच्या उत्क्रांतीबद्दलचं रहस्यही लपलेलं असू शकतं विज्ञानाच्या साह्याने डीकोड करून कल्कि(बहूधा मानवच किंवा धर्माच्या परे असणारा एखादा वैज्ञानिक गट) पुन्हा अवतरेल.
      बर्‍याच वेगवेगळ्या सिद्धांतांचं विणकाम केलंय कथेत.

      असा मी या कथेचा अर्थ घेतला.
      -----------------------
      2b || !(2b)

      जबरदस्त. डोक्याला मुंग्या आणणारं.
      --------------
      नंदिनी
      --------------

      मलाही रामायण वाटते. शिवाय 'माकड-अस्वलादी' प्राणी म्हटले की कासव, डुक्कर वगैरेसुद्धा आले. >> बरोबर. शीर्षक वाचून मला दशावताराशी संबंध असेल असे वाटले होते तेंव्हा म्हणून विचारले. rather मासा, कासव, डुक्कर चपखल बसले असते का ? बहुधा नसावे, त्याच्या आधीच्या ह्या ओळींवरून "कधी त्याला शस्त्र उचलावे लागले, कधी अस्त्र वापरल्या गेले तर कधी शांतपणे लोकांना त्यापासुन दुर न्यावे लागले."

      पण मी त्या 'छोट्या चक्रांचे वर्तुळ...' याचा संबंध LHC शी जोडल > मी पण. आशीष बरोबर २०१२ जमत नाही. Happy

      लोकहो, धन्यवाद.

      रामायण ई. अर्थातच बरोबर. २०१२ किंवा एल एच सी मात्र न्हवते माझ्या मनात. दहावा म्हणजे शेवटचा अवतार, पण आधि उल्लेखिलेल्या आवर्तनांचे आवर्तन देखिल पुर्ण होणार. त्यामुळे एल एच सी म्हणायला काहीच हरकत नाहि. Make it as vague as possible but not vaguer असाच बाणा अवलंबायला हवा.
      बर्‍याच नव्या कल्पना ऐकायला मिळतात. Happy

      slarti, त्या शांतपणे दुर नेण्याबद्दल एक सिनेमालायक कथानक तयार आहे. producer-director मिळायची खोटी आहे.

      दुसरी मात्र एक कल्पना चाणाक्ष वाचकांच्या नजरेतुन सुटली आहे. एक-दोन शब्दात किंवा एखाद्या वाक्यातच मोत्याप्रमाणे (म्हणजे perl) मध्ये बसवायच्या भानगडीमुळे असे होते. निंदकांच्या बोलण्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवे. एक म्हणाला होत की या गोष्टि इतक्या dense असतात की singularity कधी बनते त्यांची कळतच नाही. किल्ली: मुखोद्गत किल्ली.

      --------------------------------------------------------------
      ... वेद यदि वा न वेद

      किल्लीचा भाग नाही लक्षात आला पण चार भाग म्हणजे चार वेद अस अर्थ धरून, त्यातून पुराण, संहिता etc उद्भवून त्यांची मने दुसरीकडे वळवली असा काहिसा अर्थ मी लावला होता. किल्लीकडे दुर्लक्ष झाले. विचार करायला हवा.

      असामी अगदी Happy वेदांचा विचार मी सुद्धा केला. पण नंतर, वेद अस्तित्त्वात आल्याच्या कालखंडात आणि नंतरही वेदाला प्रमाण न मानणारेही गट होतेच आणि वेदांचं ज्ञान त्यानंतर बर्‍याच काळानंतर आलेल्या चातुव्रर्ण्य व्यवस्थेत सगळ्यांसाठी उपलब्ध होतं का? असा प्रश्न पडला. त्यामुळे ही किल्ली किंवा तिचे ज्ञान जे चार वेदांमधून विभागून देण्यात आले आहे त्याचे समतोल आणि सर्वदूर प्रसारण कसे साधले गेले असेल. असा संभ्रम निर्माण झाला.

      त्या शांतपणे दुर नेण्याबद्दल एक सिनेमालायक कथानक तयार आहे >>> ते पण लिहा इथे आवडेल खूप वाचायला.

      -----------------------
      2b || !(2b)

      आशय वेदांचाच होता. येवढ्या छोट्या गोष्टित बाकी तपशिल authors license खाली ढकलणे आवश्यक आहे ;-(

      बो-विश, कथानक तयार आहे, डायरेक्टर्/प्रोड्युसर मिळेपर्यंत लिहिल्या जाणे कठिण आहे. नाहीतर embarrassingly short film व्हायची त्याची.
      --------------------------------------------------------------
      ... वेद यदि वा न वेद

      चार गट याचा अर्थ मी फक्त चार वेदच नाही, तर चार वर्णसुद्धा - क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र. चार गटांत विभागले गेले म्हणजे चार वेद तर झालेच, पण हेही चार गट. या चार गटांत मुखोद्गत काय ? तर तुझे जे कर्म आहे ते कर. आता हे कर्म आईबापांच्या कर्मावर ठरू लागले वगैरे वगैरे.
      पण या कथेत मला चमकवणारी बाब वाटली ती 'राजकारण्यांनी विज्ञानाचा वापर करून ४ गटांत ज्ञान विभागण'' ही कल्पना. (>>> मनपट हे राजकारण्यांच्या हातचं मुख्य हत्यार बनणं फार दुर नाही. <<<).
      >>> ती स्थीति एकदा, दोनदा नाही तर अनेकदा आली.
      ती म्हणजे नक्की कुठली ? आशिषने हे मुद्दामच अस्पष्ट ठेवले असावे. त्याआधीचा परिच्छेद वाचल्यावर मला असे जाणवले की 'ती परिस्थिती' म्हणजे "कोड्याचा भाग कुणालातरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुटणार आणी मग ते त्याचा अर्धवट का होइना वापर करुन सर्व संपवणार'' ही असावी. ही परिस्थिती आल्यावर काय झाले ? तर विधान आहे, "मात्र दरखेपेला योग्य वेळी हस्तक्षेप करायला तत्पर आणी सक्षम असा कुणी तयार होता"... म्हणजे हा तत्पर आणि सक्षम वास्तविकतः आपल्याला कोड्याच्या उत्तरापासून दूर नेणारा होता. (अस्त्रे, शस्त्रे, शांतपणे दूर न्यावे लागले इ.इ.) असे आहे. तो जो सक्षम होता तो उत्तर देणारा नव्हता, तर लोकांना उत्तर सापडू लागले की येनकेनप्रकारेण ते टाळणारा होता. हे मला जबर चमकवणारे वाटले.
      शिवाय तू पाप-पुण्य, खरे-खोटे, शुद्ध-अशुद्ध या पूर्णविरोधी कल्पनांचे यीन-यांगबरोबर तुलना करतोस... पण यीन-यांग हे फक्त परस्परविरोधी नसून ते परस्परपूरकसुद्धा आहेत. हे तर सहीच !!
      आता कल्की परत आला आहे, जेव्हा आपण घबाड मिळवायच्या उंबरठ्यावर आहोत. या युगात सर्वात प्रभावशाली अस्त्र/माध्यम काय ? तर राजकारण. राजकारणी कल्की मनपट वापरणार आणि परत आपल्याला या घबाडापासून दूर नेण्याचा प्रयत्न करणार...

      हा मला पहिल्या वाचनात लागलेला अर्थ. आता परत वाचले तर काहीतरी वेगळे दिसेल Happy पण मजा येतेच.
      .
      आशिष, लघुपट तर लघुपट. तुझी कथाही embarrassingly (-> मला) लहान वाटते Happy Mullholland Drive सारखा एखादा चित्रपट जर लघुपटरूपात केला तर तो बघताना काय होईल ? मझा येईलच Happy

        ***
        Entropy : It isn't what it used to be.

        भारी लिहिलीय! Happy
        --
        No one told you when to run; you missed the starting gun..!

        कथा जबरदस्त.
        तर लोकांना उत्तर सापडू लागले की येनकेनप्रकारेण ते टाळणारा होता. हे मला जबर चमकवणारे वाटले.>> अगदी अगदी
        हा जंक डीएनए देखिल पिढ्यानपिढ्या न बदलता पुढे सरकत रहातो>> हे मात्र खरे नाहीये,जंक डीएनए मधले अनेक जीन्स सतत स्वतःची जागा बदलतात,उपयोगी जीन्सच्या मधोमध जाउन त्यांना निकामी करु शकतात.ते मुख्यतः स्वतःच्या सतत नव्या प्रती तयार करण्याच्या क्षमतेने टिकून राहिले आहेत.कल्पना म्हणुन छान आहे पण,त्यांच्यामधे 'अ‍ॅक्टिव्ह डीएनएचा कंट्रोल कोड' वगैरे काही नाही
        ********************************
        द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

        shevat ekdamach nirasha karnara ahe. nakki kay mhanayache ahe te ulagadat nahi. artha nakkich kadhata yetil pan gutavun thevanari katha nahi. kiva kutuhal wadhavat nenari katha watali nahi.