मुरांबा

Submitted by अनामिका. on 19 June, 2017 - 02:07

मुरांबा प्रदर्शित होऊनही आता बरेच दिवस झालेत. सिनेमा हिट आहे , गर्दी खेचतोय, प्रेक्षकांना आवडलाय यावरही शिक्कामोर्तब झालंय पण तरीही 'मुरांबा' पाहिल्यानंतर त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडत नाहीये. (हेही सिनेमाचं यशच, दुसरं काय? Happy )
मुरांबाचा टीझर बघितला त्याच दिवशी त्याच्या फ्रेशनेसची कल्पना आलेली. मिथिला पालकर, अमेय वाघ ह्यांचा ताजेपणा आणि सचिन खेडेकर, चिन्मयी सुमीत ह्यांचा प्रसन्न वावर, हा मुरंबा मुरणार हे निश्चित होतंच.
मुरांबा सुरु होतो तोच मुळात अलोक आणि इंदूच्या ब्रेकअपपासून. अगदी लहानपणापासून सोबत असलेले हे दोघे नंतर आपसूक एकमेकांच्या प्रेमात पडतात, पण या गोड़ नात्यात हलकीशी लहर येते ती ब्रेकअपच्या तिखटतेची. हल्लीची बिनधास्त पिढी स्वतःची छोटी मोठी तक्रार घेऊन लगेच आई बाबांकडे जाणाऱ्यातली नाही पण, देशमुखांच्या घरातील इंदूचा सहज आणि नेहमीचा वावर, त्यांच्यात तिचं कुटुंबीयांप्रमाणे मिक्स होणं, ई, ई. कारणांमुळे अलोकला त्याच्या घरच्यांना हि कल्पना द्यावी लागते. तिथूनच सुरु होते - खरी धमाल. सिनेमावर मुख्य पकड आहे ती सचिन खेडेकरची. हिरोच्या बाबांचा रोल असला तरीही सचिन खेडेकरनी कमाल अभिनय केलाय.(अगदी हाच हिरो आहे वाटावं इतका.) प्रत्येक प्रसंगात हलकंफुलकं वातावरण निर्माण करण्याची धडपड व त्या मागची अतिशय समजूतदार भूमिका ते लीलया साकारतात. प्रत्येक तरुण मुलाच्या वडिलांनी 'कसं असावं' ह्याचं उदाहरणच जणू. चिन्मयी सुमीतने साकारलेली आई 'आईपणात' कुठेही कमी पडत नाही. प्रत्येक क्षणी केवळ काळजी, काळजी अन काळजी. Happy सुरवातीला तिचं हायपर होणं, मुलगा चिडल्यावर दुखावणं, अंतर्मुख होणं आणि पुन्हा शांतपणे समजून घेणं हे त्यांनी खूप सहज हाताळलंय.
अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी भूमिका जगल्यात असं म्हणायला हरकत नाही. मिथिला पालकर 'गर्ल इन द सिटी' मधून ऑलरेडी प्रसिद्ध झालिये आणि अमेय वाघ 'दिदोदू' मधून. कितीही महत्वाकांक्षी असली तरी आजच्या तरुण पिढीलासुद्धा भीती वाटते, योग्य प्रकारे कधी व्यक्तं होता येत नाही हे अलोकच्या भूमिकेतून अमेय छान साकारतो. ब्रेकमुळे दुखावला गेलेला अलोक, आई बाबांना कितीही समजावलं तरी समजणार नाहीच्चे त्यामुळे हतबल झाल्या'सारखा' अलोक, स्वतःच्या मनातील तगमग, भीती हे सारं काही स्पर्शातून गर्लफ्रेंडला सांगू पाहणारा, तिची खूप काळजी घेणारा अलोक कित्त्येकांना 'आपल्यातला' वाटतो. मिथिला पालकरने साकारलेली इंदू हि पुण्यातील स्वतंत्र जग निर्माण करू पाहणारी, कणखर आणि अतिशय महत्वाकांक्षी मुलगी. मिथिलाला फारसे सलग प्रसंग नाहीत पण तरीही तिचं अस्तित्व सिनेमाभर जाणवत राहतं, कधी अलोकच्या आठवणींतून तर कधी त्याच्या आई बाबांच्या बोलण्यातून, तर कधी त्याच्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंमधून. मुळात खूप गोड चेहरा लाभलेली मिथिला प्रत्येक सीनसाठी आवश्यक असणारे सगळे भाव उत्तमरीत्या एक्सप्रेस करते. त्यामुळेच तिचं हसणं, टेन्शन घेणं, चिडणं, कामात स्वतःला झोकून देणं कुठेही अनैसर्गिक वाटत नाही.
संपूर्ण सिनेमाची कथा खरंतर फक्त एका दिवसात घडलेली दाखवलीय पण त्यातील प्रसंग इतके तुमच्या आमच्या घरात घडल्यासारखे वाटतात की खूप ठिकाणी 'अगदी अगदी' होतं. विशेष म्हणजे अख्ख्या सिनेमात एकही गाणं नाही. नायक नायिकेचा कुठल्याही सुंदर लोकेशनला क्षणात इथे तर क्षणात तिथे असा अवास्तव नाच नाही, मिनिटा मिनिटाला बदलणारे कॉस्च्युम्स नाहीत आणि तरीही सिनेमा कुठेही रटाळ, बोअर होत नाही. छोटीशी पण स्ट्रॉंग स्टोरीलाईन असल्याने मुरांबा कुठेही अनावश्यक ताणल्या गेलेला नाही, इन फ़ॅक्ट सिनेमा संपताना, "अरे, इतक्यात संपला पण. १०-१५ मिनिट अजून चालला असता की!" असं वाटून जातं. फक्तं १-२ जाणवलेल्या बाबी अशा -
१. अलोक इंदूतील ब्रेकअपच्या आधीची फुललेली प्रेमाची chemistry थोडी दाखवायला हवी होती.

२. अलोकला जसं ब्रेकअपनंतर,'नात्याचा प्रवास कुठे अन कसा चुकत गेला' ह्यातून का होईना इंदू आठवते तसंच इंदूला सुद्धा त्यांच्यातील काही प्रसंग आठवतात असं दाखवायला हवं होतं. कारण बाकी काहीही झालं तरी तिचाही अलोकवर जीव जडलेला होताच की. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, त्यामुळे सिनेमा कुठेही कमी पडतोय असं नाही.

तळटीप:
१. दिदोदू - दिल दोस्ती दुनियादारी (झी मराठी मालिका)
२. ह्या सिनेमाच्या निमित्ताने खूप खूप वर्षांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने माझ्या वाढदिवसाला "मैत्री हि लोणच्या सारखी असते, जितकी जुनी तितकी अधिक मुरते" अशा आशयाचं एक भेटकार्ड पाठवलं होतं त्याची आठवण झाली. Happy शोधायला हवं ते कार्ड.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण तरीही 'मुरांबा' पाहिल्यानंतर त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडत नाहीये. (हेही सिनेमाचं यशच, दुसरं काय?
>>>>>
येस्स एक्झॅक्टली. छान लिहिलेय. अगदी याच कारणासाठी हा बघायचा होता, कारण याचाच अर्थ रिलेट होणारा किंवा भिडणारा, डोक्यात काहीतरी किडा सोडणारा, किंवा मनात हळूवार शिरत घर करणारा वगैरे वगैरे कॅटेगरीपैकी कश्यात तरी मोडत असावा. तेव्हाच असे होते. पण दुर्दैवाने बघायचा राहिलाच. तरी येत्या शनिवारी कुठे आहे का अजून बघायला हवे. नाहीतर टीव्ही मोबाईल जिंदाबाद, योग येईल तेव्हा चुकवणार नाही.

छान लिहलंय अनामिका ! रविवारच्या लोकसत्तानेही खूप तारीफ केलीये ... बघायचाच आहे.

छान परीक्षण लिहलय अनामिका. चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे आता. सफाइदार लिखाण आहे, लिहत रहा.

बादवे, दिदोदू हा भन्नाट शॉर्ट फॉर्म आहे

@ पद्मावती, IRONMAN ,अॅस्ट्रोनाट विनय, कऊ, सुजा : धन्यवाद. तुम्ही आणि इतर सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादांमुळे आणखी लिहिण्याचा हुरूप आलाय.

छान लिहिलेय.
मी ही "मुरांबा" पाहिलाय.
अगदी माझ्या मनातील भावना मांडल्यात.