स्वभाव

Submitted by वैशाली अ वर्तक on 18 June, 2017 - 05:29

स्वभाव
रूप म्हणे मनाला,
"माझ्यामुळेच सर्व
वाखाणती मानवाला
जिकडे तिकडे माझीच वाहवा
सर्वत्र माझ्याच सौंदर्याची चर्चा"

मन म्हणाले ," नाही रे रुप.
"माझ्यात दडलेली ,भरलेली वृत्तीच
ओळखली जाते स्वभाव म्हणून.
अन् स्वभावाने जो उजवा ,
वाखाणला जातो सर्व लोकांत"

असती त-हा ,अनेक स्वभावाच्या ,
म्हणूनच वदती, "जितक्या व्यक्ती वल्ली तितक्या"
कधी तापट तर कधी मवाळ
संकुचित तर , कोणी दिल-खुलास
घडते दर्शन त-हांचे वृत्तीतून
वाणीतून , व्यवहारातून वा वर्तणुकीतून.

कोणी स्वभावाने असे भोळा-भाबडा,
तर कधी जसा लबाड-कोल्हा.
असतो भित्रट , जणू ससा कोणी,
कशाचे धाडस नसे अंगी,
भितीचे सावट, वसे सदा मनीं.

असे स्वभाव दिसती प्राणी-मात्रात
स्वभावाने असता हाडाने-गरीब
म्हणती तिजला जणू गाय-गरीब
काही वृत्तीने उदार , दानी-दातार
जसे नांव कर्णाचे,दानवीर महान,

जे असते आपणा जवळी
ते सोडूनी , धावे नसत्या पाठी
अशी वृत्ती पण दिसे स्वभावी
असावी सदा वृत्ती मात्र समाधानी.

स्वभावाची जडण घडण होते बालपणात
जसा होतो मानव मोठा, ज्या त्या वातावरणात
परिस्थितीने बदलते रूप स्वभावाचे
मिळता धडे-बोल आयुष्यात अनुभवाचे.

"रे रूपा , तू तर बदलत राहशी,
"स्वभाव" मात्र जीवनभर साथ देई,
जोडून ठेवी जनांशी-आप्तांशी
सहजपणे जोडला राही विश्वाशी.

Group content visibility: 
Use group defaults