Whats app... सुविचारांचा महापूर

Submitted by फूल on 12 June, 2017 - 21:04

पूर्वी कसं होतं नं कि महात्मा गांधी, वीर सावरकर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर विचारवंत, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे संत होते... त्यांनी लिहायचं, आपण जमेल तेवढं झेपेल तेवढं वाचायचं... आणि वाचल्यावर त्यांच्या चरणांचं फक्त तीर्थच प्यावं अशी केवळ आशा बाळगायची...

पण आता काही तसं राहिलं नाही... “थोबाडपुस्तक” आणि “काय आहे” यांसारख्या तंत्र क्रांतीमुळे आता घरोघरी पावसाळ्यात कुत्राच्या छत्र्या उगवतात तसे लेखक-कवी-विचारवंत-समाज प्रबोधक-प्रवचनकार उगवलेत... त्यांना सतत काही ना काही होत असतं... कधी सुविचार होतात, कधी कविता होतात, कधी समाज प्रबोधन करणारे लेख होतात, कधी काहीच नाही झालं तर मग शुभेच्छा होतात.... असं काहीही त्यांना झालं रे झालं की लग्गेच ते भ्रमणध्वनी हातात घेतात, दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी टकटक संदेश टंकलिखित करतात आणि send…

कलेला कुठलंहि बंधन असू नये असं म्हणतात... तद्वत या कलेलाहि व्याकरण, शुद्धलेखन अश्या तुच्छ गोष्टींचं बंधन नसतं... आपण लिहिलेल्या विचारातली सुसंगती तर जाउच दे पण मुळात दोन वाक्यांचा अर्था-अर्थी काही सबंध आहे का हा अतिशय साधा, अगदी अतिसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्यानेहि करण्याजोगा विचार या संदेशांमध्ये केलेला आढळत नाही... उचलली जीभ लावली टाळ्याला... आला विचार फेकला आंतरजालावर... वा वा म्हणणारे यांच्यासारखेच हुजरे मुजरे करून तोच संदेश पुढे धाडायाला तय्यार बसलेलेच असतात... याचं त्याला आणि गाढव ओझ्याला... आता उदाहरणच द्यायचं झालं तर...

“प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल... एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल...”

फक्त भगवंत आणि कुटुंब... समाज, गुरुजन, मित्र-मैत्रिणी ह्या बाकी घटकांचा विचार करायची गरज नाही... मग एखादा अनाथ असेल तर... त्याने फक्त भगवंताला आनंदी करायचं... पण मेसेज इथेच संपत नाही... गडबड करायची नाही, एवढ्यात पाणी ओतायचं नाही... अजून मेसेज होतोय...

“जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळु द्या, चिंताना वाफ होउन उडुन जाउ द्या, दु:खाना विरघळुन जाउ द्या, चुकाना गाळुन घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.”

हा मेसेज वाचून माझी मैत्रीण म्हणाली, “माझा थोडा problem आहे... ही रेसिपी जशीच्या तशी मला नाही वापरता येणार कारण मी डीप डीप चा चहा पिते... मग अहंकाराला कधी उकळू?” मी म्हटलं, “अहंकाराला न उकळल्याची चूक गाळून घे म्हणजे झालं..” आणि हो खाली शुभ सकाळ! म्हणजे किती समर्पक मेसेज आहे... सकाळी प्रात:विधी म्हणून ज्या ज्या गोष्टी होतात त्यात हा पण एक मेसेज झाला... आता पाणी ओतायला हरकत नाही...

या मेसेजला एकच माणूस वा म्हणाला आणि तो म्हणजे माझा नवरा... मी मराठी लेखिका असल्याने मराठीत मी त्याला काहीही पाठवलं की तो कौतुक करतो... त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय.. हा मेसेज त्याला पाठवल्यावर त्याला वाटलं की तो मीच लिहिलाय... आणि उगाच वाद नकोत म्हणून तो लग्गेच कौतुक करून मोकळा झाला... परवा तर वाणसामानाची यादी मराठीत लिहून पाठवली तर त्यालाही तेच... वा वा... उभं दिसलं की कविता आणि आडवा दिसला की लेख असं मानणारा आहे तो.. त्यामुळे उभी यादी त्याला कविता वाटली पटकन... असो थोडं विषयांतर झालं... पण हा लेखही मी whats app वर टाकणार आहेच त्यामुळे थोडं विषयांतर चालेल... आणि तसंही whats app वर म्हटलंच आहे की, (हे मी दासबोधात सांगितलंच आहे किंवा भगवद्गीतेत सांगितलंच आहे अश्या अर्थी म्हणतेय हं...)
एक पेन चुक करू शकतं.
पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण
तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो.
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल.

त्यामुळे मी हा लेख पेनाने लिहिलाय असं समजूया... कारण पेन्सिलीने लिहिला जरी असता तरी माझा खोडरबर सध्या माझ्या मुलीला सांभाळण्यात व्यस्त आहे त्यामुळे मी लिहिलेलं तो खोडू शकला नसता... पेन्सिल आणि खोडरबराच्या मिलनातून दोन वर्षांपूर्वीच एक permanent marker जन्माला आलाय आणि तो सध्या आमच्या नव्या घराच्या भिंतींवर न खोडता येण्यासारख्या चुका करतोय... असो पुन्हा विषयांतर झालं पण मी लेख whats app वर post करणार आहे त्यामुळे असं विषयांतर करणं मला भाग आहे.
तर मी काय म्हणत होते की whats app वरचे मेसेजेस...

"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..!"

“का?” माझ्या एका खूप लांबच्या पण केवळ whats app मुळे खूपच जवळ आलेल्या ताईने हा मेसेज पाठवताक्षणी मी तिला विचारलं... “पण का?”

"कारण जन्म थेंबासारखा नाही तर कसा असणार? या अनंत विश्वाच्या महासागरात आपण एका थेंबासारखेच आहोत गं... आणि आपल्या आयुष्याच्या ओळी छेदतायत एकमेकांना आणि त्या तश्या छेदल्या की प्रेमाचे त्रिकोण जन्माला येतात आणि वर्तुळ... अगं म्हणजे...सगळंच समजावून सांगता येत नाही काही गोष्टी आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात..."

ती अजूनही पुढे टाईप करत राहिली असती पण तिचा मुलगा जो त्याच ग्रूप वर आहे त्याने लिहिलं... "आई घरातल्या सगळ्या थेंबांना भुका लागल्यात आणि आता तू नाही वाढलंस तर घरात भलते त्रिकोण तयार होतील..."

“प्रेम त्रिकोणासारखं असतं असं का वाटलं असेल लिहिणाऱ्याला?”, हा प्रश्न मी नवर्याला विचारला. तो अतिशय विचार केल्यासारखं दाखवून म्हणाला “त्याला त्याच्या बायकोने तसं लिहायला सांगितलं असेल... मग तो तरी काय करेल बिचारा...” पण मी काही यावर वाद घातला नाही कारण मला whats app वरचाच अजून एक मेसेज आठवला...

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातही वार 'सुखाचे' जातील !!

आठवा वार जर परिवार असू शकतो तर मग दिवार, दुश्वार, आवार, उमेदवार का असू नये... यात पण वार आहे की... नमुन्यादाखल लिहायचं झालंच तर...

"एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "दिवार"; नात्यांमध्ये हा आठवा वार उभा राहिला नाही तर सातही वार 'सुखाचे' जातील !!"

एकदा का बादरायणी संबंधच जोडायचा म्हटला की साहित्य कशाशी खातात हे माहित नसलं तरी काही फारसा फरक पडत नाही....

कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही.
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर
मुखाने करा, मनाने नाही,
लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते,
असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो.

पण मला जायचंच नाहीये सूईतून... असं मी म्हणू शकले नाही कारण मला पुन्हा पुन्हा आठवा वार (परिवार) आठवत राहतो... हे असे मेसेजेस पाठवणाऱ्या त्या आठव्या वारातल्याच (परिवारातल्या) ताई, माई, अक्का असतात... त्यांना भलते सलते प्रश्न विचारले तर माझे आयुष्यातले सगळेच वार दु:श्वार होतील...

हे आणि असे अनेक बोधपर मेसेजेस whats app आणि facebook वर फिरतायत... सगळीकडे शुभेच्छा, सुविचार, सदिच्छा, उत्सव, समारंभांचा आनंदकल्लोळ सुरू आहे... पण यातलं काहीच आत झिरपत नाही... सुखावून जात नाही... भारावून टाकत नाही... विचार करायला लावत नाही... अंतर्मुख करत नाही... कुठलीही सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत नाही.... सगळं पोकळ, कोरडं, रखरखीत, रूक्ष, फार वरवरचं वाटत राहतं... असं का?

गेल्या वर्षीच्याच दिवाळीची गोष्ट... घरात बाळाला बरं नव्हतं... साधा सर्दी ताप... पण तिच्या आयुष्यातला पहिला वाहिलाच.... त्यामुळे आमचाही अनुभव पहिलाच... मग त्यामागोमाग होणारी जागरणं, बाळाची चिड-चीड, रडा-रड असं सगळंच ४-५ दिवस चालू होतं... शिवाय दूर परदेशात येउन राहिलेलो... त्यामुळे आपण साजरी केली तर दिवाळी नाही तर रोजच्यासारखाच दिवस... पहिली अंघोळ दूरच राहिली... पण दोन दिवस माझी अंघोळही झाली नव्हती... दिवसभर रडून गोंधळ घालून संध्याकाळी बाळ झोपलं होतं... मीहि बाळाबरोबर थकून झोपले... नवरा ऑफिसातून आला तर सगळ्या घरात अंधार आणि त्याने लाईट लावला..... नवऱ्याच्या चाहुलीने मीही उठले... बाळ थकून गाढ झोपलं होतं...

फोन हातात घेतला आणि मेसेजेस बघत बाहेरच्या खोलीत आले... भांडी घासायची बाकी होती, कपडे धुवायचे बाकी होते, तीन चार दिवसात घराला अगदी अवकळा आली होती... खिडकीत कंदील नव्हता, दारात रांगोळी नव्हती, पणती नव्हती, घरात पक्वान्न नव्हती... फोनवर मात्र शुभेच्छा ओसंडून वहात होत्या... whats app वर ४०-४५ आणि फेसबुक वर शे-दोनशे मेसेजेस येउन गेलेले... मला ते पाठवणाऱ्यांची नावंही आठवत नाहीत... २४० शुभेच्छा म्हणूया हवं तर... एखाद्या माणसाला २४० शुभेच्छा मिळाल्यावर त्याने किती खूष असायला हवं? पण मी खूष नव्हते... भकास, अवकळा आलेल्या घराकडे आणि हाततल्या फोनकडे आळीपाळीने बघितलं आणि नकळत डोळे पाणावले... नवऱ्याने समजून डोक्यावरून हात फिरवला आणि हलकेच थोपटलं... स्वत: हात पाय धूवून आला आणि मलाही तोंड धुवायला सांगितलं... मग देवाजवळ गेलो, त्यानेच दिवा लावला... आणि निरांजनाच्या प्रकाशात प्रसन्न हासत मला म्हणाला... “Happy Diwali!” अमंगळाचा नाश व्हायला तेवढे दोनच शब्द पुरेसे होते...

सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहिलय.. माझा वैयक्तिक वैताग इतक्या समर्पक शब्दांत जाहीर केल्याबद्दल तुला हजार गावं इनाम, फुला.

शेवटही खूप खूप सुरेख.

छान लिहिलंय. लेख विचार करायला लावणारा.

>> सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...<<

संपुर्ण लेखाचं सार अतिशय छान सांगितलं.

Mobile phone varun lihit asalyane he asa typing karat aahe.
Pan faar chhan lihila aahe. Agadi manaat yenare vichar khoop susangat aani khumasdaar paddhatine mandale aahet.

असु देत त्या शुभेच्छा, प्रबोधन पर मेसेजस यांच्यामुळे लेखाला एका नवीन विषय मिळाला.
मेसेजस मुळे नसली तरी लेखामुळे करमणूक नक्कीच होतेय Happy

भारी लिहलय...हलकं फुलकं म्हणता म्हणता विचार करायला लावणारं. वर्तमानातलं त्रिवार सत्य!>>+१

मस्त लिहील आहे. माझ्या फेबू मधे जन्म तारीख नाहिये. मला कोणताही फ्रेन्ड ब्र्थ्डे विश करत नाही Lol

मस्त लेख.
दाद्च्या प्रतिसादाला दाद.

फूल आयडी वाचून "संयमित वातावरणातली चर्चा" आठवली.
मला या लेखात तितकी गंमत नाही वाटली. जास्तच गंभीरपणे लिहिलाय.
ते सुविचाररूपी संदेश लिहिणारी एक वेगळीच जमात असते. बहुसंख्य नुसते माना डोलावणार्‍यांसारखे फॉर्वर्ड करणारे (पुढे ढकलणारे) असतात, त्यातले वाचणारे किती हाही एक प्रश्न आहे. कारण एकाच ग्रुपवर एकच मेसेज एकाच दिवसात तिघे चौघे टाकू शकतात.
असे मेसेजेस न वाचायची सवय तशी आपसूक लागली. पण कधी कधी (आपल्याला आवडणार नाही, पटणार नाही, तरी वाचून मुद्दाम वाद घालायला जाणे हे ज्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे असा) मायबोलीकर जागा होतो
मग एखादा मेसेज वाचून त्यातल्या न पटलेल्या मुद्द्यावर लिहून अनेकांना आपल्या अंगावर ओढवून घेतल्यावर मायबोलीकरपणा मायबोलीपुरताच ठीक आहे, व्हॉट्स अ‍ॅपवर नाही, हा धडा घेतला.

मला पडलेला आणखी एक प्रश्न - आंतर्जालावर लोक दुसर्‍याचं लेखन स्वतःचं म्हणून खपवत असतात. व्हॉट्स अ‍ॅपवर आपल्या किंवा दुसर्‍याच कोणाच्या निनावी कवितांना पाडगावकर, शांता शेळके आणि व पु काळे आणि सुविचार डोसांना विश्वास नांगरे पाटील, नाना पाटेकर अशी लेबलं लावणारे लोक कोण असतील?

बरं पण "म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मि असावा" हे तुम्ही कॉपी पेस्टच केलं असावं अशी आशा आहे.

बाकी काही नाही, तरी उपयोगात नसलेलं एक देवनागरी मुळाक्षर त्याचा उच्चार बदलून वापरात आणण्याचं मोठंच काम व्हॉट्स अ‍ॅपने केले आहे.

भारी लिहलय...हलकं फुलकं म्हणता म्हणता विचार करायला लावणारं. वर्तमानातलं त्रिवार सत्य!>>+१००

भरत.

"संयमित वातावरणातली चर्चा"

हे काय आहे?

मस्तच जमलाय लेख! या सुविचारांनी आणि गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेजेस नी वैतागायला होतं! सध्या त्यावर दुर्लक्ष हा जालिम उपाय वापरत आहे!
ह्या लेखाची लिंक व्हॉट्सअप वर पाठवली तर ते किती विरोधाभासी दिसेल असा विचार करतेय!

परवा तर वाणसामानाची यादी मराठीत लिहून पाठवली तर त्यालाही तेच... वा वा... उभं दिसलं की कविता आणि आडवा दिसला की लेख असं मानणारा आहे तो.. त्यामुळे उभी यादी त्याला कविता वाटली पटकन... >>> अफाट हसले या वाक्याला

मस्तच

या सुविचार, बोधवचनं पाठवणा-यांबरोबर अजून एक जमात असते, शुभेच्छा देणारे.
हे लोक कशाच्याही शुभेच्छा देऊ शकतात. आजच सकाळी "अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा" आल्या आहेत मला Biggrin

लेख मात्र उत्तम Happy

छान आहे लेख!!
<<हे आणि असे अनेक बोधपर मेसेजेस whats app आणि facebook वर फिरतायत... सगळीकडे शुभेच्छा, सुविचार, सदिच्छा, उत्सव, समारंभांचा आनंदकल्लोळ सुरू आहे... पण यातलं काहीच आत झिरपत नाही... सुखावून जात नाही... भारावून टाकत नाही... विचार करायला लावत नाही... अंतर्मुख करत नाही... कुठलीही सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत नाही.... सगळं पोकळ, कोरडं, रखरखीत, रूक्ष, फार वरवरचं वाटत राहतं... असं का?<< हे अगदी पटल!

<<सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...<< अगदी अगदी! हा शेवटचा पॅराग्राफ अप्रतिम!!

खरच किती वरवरचे जगत असतो आपण.... थकुन जातोय या देखाव्याला... पण हे सोडवत नाहिये... पुढे पुढे ढकलण्यात आलेले मॅसेज वाचणे बंद करुन बरेच दिवस झाले... पण याचा त्रास होतोच

लेखातले काही काही मेसेज खरेच भारी हास्यास्पद आहेत Lol
खरे आलेले आहेत की तुम्ही बनवले आहेत. तुमचीच रचना असेल तर भारी Happy

बाकी या व्हॉटसपबाबत आपल्या सर्वांचे बरणीत हात अडकलेल्या माकडासारखे झालेय. असे मेसेज बोअर करतात, अगदी मनशाण्ती नष्ट करत चीडचीड व्हावी ईतके त्रास देतात. पण आपल्याच्याने व्हॉटसप अकाऊंट काही डिलीट होत नाही, की असले ग्रूप काही सुटत नाहीत..

अगदी सत्य लिहिलंय सगळं. माझ्या मनातील विचारच ह्या लेखात उतरल्यासारखे वाटले.

वैतागले बाई मी ह्या 'थोबाड पुस्तक' आणि 'काय अप्पा'ला! (वैतागले बाई मी ह्या केसांना!!! - प्रकाशचे माक्याचे तेल, ह्या चालीवर वाचा)

पण माझ्या मनात कधी कधी एक विचार येतो, की कधी काही चांगले सुचले, चांगले वाचले, चांगले पाहिले, चांगले ऐकले की असे वाटते, हे कोणालातरी दाखवावे, ऐकवावे. स्वतःजवळ ठेवले तर मन अस्वस्थ होते. अशावेळी 'थोबाड पुस्तक' आणि 'काय अप्पा' कामी येते. आणि मग सर्वच साहित्यिक आणि कवी होतात. 'थोबाड पुस्तक' आणि 'काय अप्पा'मुळे अनायासेच अशा लोकांची सोय झाली आहे ना!? त्यांच्या भावनेचा निचरा तर होतोय ना! भले एखाद्याच्या लिखाणाची प्रत हलकी का असेना.

सगळ्यांचे आभार!

भरत... "म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा">>>>>> ते कॉपी पेस्टच केलंय...

ऋन्मेऽऽष..... वरील एकूण एक मेसेज मला आलेलेच आहेत... मी निर्माण केलेले अर्थातच नाहीत... Lol

वैतागले बाई मी ह्या 'थोबाड पुस्तक' आणि 'काय अप्पा'ला! (वैतागले बाई मी ह्या केसांना!!! - प्रकाशचे माक्याचे तेल, ह्या चालीवर वाचा) Lol

मस्त आहे लेख
अजुन एक व्हाट्सअप यायच्या आधि अंगारकि संकष्टिच्या शुभेच्छा हि कोणि दिल्या नव्हत्या आज बरेच मेसेज आलेत

Pages