तुझ्या सोबतीनं ― भाग-१ (प्रपोज)

Submitted by र।हुल on 11 June, 2017 - 14:39

"Everything is fair in love n war!"
"होका?" डोळे वटारत तीचं विचारणं.
"गप गं तुला काय माहीती प्रेम काय असतं ते?"
"बरं मग एक सांग कोण आहे ती भाग्यवान?" खांदे उडवत तिनं म्हटलं.
"नको."
"ए चल मग काहीही नको बोलत जाऊ. काय तर म्हणे मी प्रेम करतोय. मग तिचं नाव सांगायला का लाजतोस?"
आता कसं सांगू हिला 'ती' म्हणजे तूच आहेस ते.
"ए माझा इगो हर्ट नाही करायचा हा. माझ्या स्वप्नातल्या राजकुमारीला नावे नाही ठेवायचीत,काय?" माझं दरडावणं.
"म्हणजे स्वप्नातच आहे अजून? मला वाटलं खरेच भेटली की काय कोणी तुला. तशी नाहीच भेटणार म्हणा...मुलींकडं बघायला तुला वेळ कुठं असतो ज्यामुळे तुला एखादी पसंत पडेल." 
"खरेच आहे गं एकजण. पण ..."
"पण काय? कोण आहे? तिला माहीती आहे का? की बोलायला घाबरतोस?"
"हम्म"
"मी बोलू का ती जी कोणी आहे तिच्याशी?"
"काश ऐसा हो पाता!"
"का? काय अडचण आहे? तुझ्यासाठी काहीपण!चल कोण आहे दाखव मी बोलते तिच्याशी."
"नाही गं"
"बरं नाव तर सांग."
"अं.......आरती"
"ए गप्प चल काहीपण नको बोलू. मजाक नको करू."
"जाऊदे मग."
पिनड्रॉप सायलेन्स.
"तूच राहीला होतास बाकी. अजून काही?"
"बस एवढंच!"
"मग जाऊ आता मी?" ती पर्स उचलून चालायला लागली.
"आरती उत्तर दे."
"का?"
"कारण मी....मी प्रेम करतो तुझ्यावर."
"खुपजण होते असे. अजूनही आहेत. तुम्ही सगळे सारखेच एकाच माळेचे मणी."
"फरक आहे आणि हे तुलापण माहीतीय."
"हो का? पण मी नाही करत तुझ्यावर प्रेम.मला राग येतो कोणी मला प्रपोज केलं तर. माहीतीय ना तुला?" 
"म्हणूनच तर आजवर इतके दिवस गप्प बसलोय. खुप त्रास होतो मला."
"तो तुझा प्रश्न आहे!"
बराच वेळ शांतता.
"ऐ अगं बोल ना."
"काय बोलू?"
"हेच की; love u to"
"तुला कसे माहीत?"
"तुझे बोलके डोळे सांगतात."
"माझी अडचण आहे."
"एकदा हो म्हण. सगळ्या अडचणी दुर होतील."
"बोलणं खुप सोप्पं असतं! प्रत्यक्ष निभावणं कठीण असत."
"नक्की काय म्हणायचंय तुला?" मला राग आला.
"रागावू नकोस वास्तवात ये तू. आपण एकत्र येणं शक्य नाहीये. कितीही एकमेकांवर प्रेम असलं तरी."
"असं तुला का वाटतं?"
"आपली कास्ट!"
"कुठल्या काळात वावरतेस तू? या जगात एकच जात-धर्म आहे आणि ती म्हणजे मानवता आणि माझा यावर विश्वास आहे." माझं समजावणं.
"हो. पण हे आपल्या दोघांच्या घरच्यांना मान्य असायला हवं ना. परंपरागत चालत आलेल्या रुढी, परंपरा, रितीरिवाज इतक्या सहजासहजी बदलणार नाहीत. यासाठी वेळ जाऊ द्यायला पाहीजे." तीचं तत्वज्ञान.
"बदलांना सुरूवात आपल्या दोघांपासून करू." माझा प्रयत्न.
"तुला म्हणायचंय, आपण पळून जाऊन लग्न करावं?" तीचं ओरडणं.
"तसंच नाही पण..." माझं अडखळणं.
"पण काय..?"
मी निरूत्तर झालो होतो. समाजरचना, परंपरा यांच्यात आमच्या दोघांमध्ये असलेल्या निखळ प्रेमाचा बळी जात होता. काहीतरी करणं गरजेचं होतं. ज्या घरांत आजवर कधीही आंतरजातीय प्रेमविवाह झालेला नव्हता, त्या घरांत याची प्रथमच बिजं रोवणं खरंच खुप अवघड होतं याची प्रखर अशी जाणिव पहील्यांदाच मला होत होती. खरं म्हणजे मी आजवर याचा जास्त विचार कधी केलाच नव्हता. पण असा विचार करून प्रेम थोडंच होतं! माझा सरळ असा विचार होता,'आमचे स्वभाव एकमेकांना आवडतात, एकमेकांना आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतो, आमचे विचार जुळतात आणि 'हे' म्हणजेच आमचं एकमेकांवर असलेलं प्रेम आहे.
"मला वेळ दे, विचार करू दे." शांततेचा भंग करत तिनं म्हटलं आणि वातावरणातला तणाव हलका झाला. 'आशा' कीती मस्त शब्द आहे ना! सगळं जग या एकाच शब्दावर चालतं.
असेच दिवस निघून जात होते. याअगोदर आमच्यात दररोज होणारा संपर्क तिनं पुर्णपणे थांबवला होता. मी एकदोनदा फोनवरून बोलण्याचा प्रयत्नही करून पाहीला मात्र तिनं मोजकंच बोलून माझा भ्रमनिरास केला.
आता यापुढे बाजू सावरणं मनोमन अवघड वाटू लागलं. 
आज जवळजवळ पंधरा दिवस झालते तिच्याशी शेवटचं बोलून. सुट्टीचा दिवस होता. संध्याकाळ होत आलेली. बाहेर प्रसन्न वातावरण पसरलेलं होतं. घरात एकटाच स्वत:च्याच विचारांत हरवलेलो होतो एवढ्यात मोबाईल वाजायला लागला. फोनच्या स्क्रीनवर तिचाच फोटो नावासहीत झळकत होता. फोन उचलायला सरसावलेले हात क्षणभर थांबले पण पुढे लगेच स्वत: च्या नकळत फोन उचलून कानाला लावला गेला. माझं सगळं लक्ष कानावर केंद्रित झालं.
"कसा आहेस?" तिनं विचारलं.
"मी ठिक आहे, तू कशीय?" मी.
"बरीय" तिची प्रतिक्रिया.
"आज कसकाय आठवण काढलीयेस?"
"कोणाला विसरलं तरच आठवण काढली जाते. ज्यांचा विसरच पडत नाही त्यांचं कसलं आलंय आठवण काढणं!"
"फोन का केलास?"
"का? मी फोन पण नाही करू शकत का आता?"
"तसं नाही पण असं एकदम पंधरा विस दिवसांनी फोन करणं म्हणजे.."
"म्हणजे काय राहुल?" तिच्या बोलण्यात रडवेलंपण डोकावत होतं.
"का खेळतेस माझ्या भावनांशी?तुझ्यासाठी फार सोप्पय ना हे सगळं." 
"तुलाच असं वाटतंय फक्त."
"बरं सोड. कशाला भांडण ऊगाच. काय म्हणायचं होतंस?"
"राहुल...ल..लव्ह यू टू!"
"काय?..प..परत बोल..बरी आहेस ना तू?" माझ्यातला लहरीपणा अचानक जागा झाला. मी हसायला लागलो.
"खरेच मी नाही राहू शकत तुझ्याविना!" ती रडत होती. मी मात्र माझ्याच धुंदीत! आता मला तीला चिडविण्याची एकही संधी घालवायची नव्हती.
"का? गेल्या पंधरा दिवसांत कोणी पटलं नाही का?"
"बी सिरीयस राहूल. मी फार मीस केलंय गेल्या पंधरा दिवसांत तुला. सॉरी."
"सॉरी मीस आरती. मला दुसरी मुलगी भेटलीय."
"होका? बरं मग कोण आहे ती सांग बघतेच कशी मध्ये येते ते." खोडकर आरती परत जागी झालेली दिसत होती.
"तू खूप उशीर केलास. आता वेळ निघून गेलीये." मी बेफिकीर झालो.
"उद्या सकाळी दहा वाजता सिटीबाहेरचा आपला नेहेमीचा कैफे. तुझी वाट बघतेय.."
"अगं पण कसं शक्य आहे, तीला काय सांगू? नाही येता येणार मला. समजून घे." मी माझ्याच धुंदीत.
"उद्या ये मग पाहू आणि हो ती कोण आहे ना तिलापण घेऊन ये.." तिचं खळाळून हसणं.
"नाही आलो तर..?"
"तू येशील!"
"कशावरून?"
"पेहला प्यार भुलाया नहीं जाता मिस्टर राहूल! आप आओगे..जरूर आओगे." तीचा फिल्मी अंदाज.
"आरे वा! एवढा आत्मविश्वास..!"
"तुच तर दिलास तो."
"मी नाही येणार.."
"बरं.ठेवते बाय. सी यू टुमारो." तीनं फोन ठेवला होता.
'भावना' कशा झरझर बदलतात ना!  मनाजोग्या गोष्टी घडताच क्षणात वातावरण पालटतं. मरगळलेल्या वातावरणात चैतन्यमय लहरी प्रवेशतात. आणि या सगळ्या खेळाला मिळूनच 'जिवन' म्हटलं जात असावं. तिच्याकडून होऊन आलेल्या एका सकारात्मक फोननं क्षणार्धात किती बदल घडविले. आता उत्सुकता होती उद्याची !
सकाळचे साडेनऊ वाजत आलेले मी नेहेमीच्या कॉफीशॉप मध्ये बसलेलो होतो. आजवर कितीतरी वेळा आम्ही इथं भेटलो होतो पण त्यावेळचे संदर्भ वेगळे होते आजचं भेटणं वेगळं होतं, खास होतं. मला आमची पहीली भेट आठवली.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

'भावना' कशा झरझर बदलतात ना! मनाजोग्या गोष्टी घडताच क्षणात वातावरण पालटतं. मरगळलेल्या वातावरणात चैतन्यमय लहरी प्रवेशतात. आणि या सगळ्या खेळाला मिळूनच 'जिवन' म्हटलं जात असावं. अगदी बरोबर बोललात राहुल..
मस्त सुरुवात...!!
पु भा प्र..

आवडीचा विषय आहे.
मला स्वत:लाही याच आंतरजातीय झेंगाटावर मात करून लग्न करायचे आहे. त्यामुळेच बहुधा लवकर लग्न करावे अशी ईच्छा असूनही बहुधा उशीर होणार... असो, आपल्या कथेत काय घडतेय हे वाचण्यास उत्सुक

आपल्या कथेत काय घडतेय
मी आत्तापर्यंत जे काही लिहीलंय त्याचं लास्ट डेस्टिनेशन मी ठरवलेलं होतं. ह्या कथेचं मात्र नाही. मलाही माझी उत्सुकता आहे मी नक्की काय लिहील याबद्दलची. Happy

मला स्वत:लाही याच आंतरजातीय झेंगाटावर मात करून लग्न करायचे आहे. ...
घरघर की कहाणी... Wink

छान लिहिलंय राहुल.
आमच्या आयुष्यात कुणी नसल्याने तटस्थ वाचन चालू आहे