भरवसा नाही कुणाचाही कुणावर राहिला

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 June, 2017 - 21:18

प्रश्न हा सोडून दे की तो असा का वागला
भरवसा नाही कुणाचाही कुणावर राहिला

घाव छातीवर कितीही झेलले असते तुझे
सांग ना उपसू कसा खंजीर हा पाठीतला ?

एकतर दुष्काळ त्यातुन मास तेरावा सुरू
फार काही देत नाही घास घे घासातला

एक साध्याश्या कृतीतुन जाणवे आत्मीयता
अर्थ घे समजून ना उच्चारल्या शब्दातला

पाय रोवावे जिथे तेथील वाळू सरकते
श्वास घे ओढून आणिक लाग तू पोहायला

चांगला जाणून आहे डाव नशिबा मी तुझा
हरवण्यासाठी मला सामील ही नियती तुला

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users