ट्रॅव्हल डायरीज!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 3 June, 2017 - 22:32

ट्रॅव्हल डायरीज!!!
हि गोष्ट अलीकडेच केलेल्या आणखी एका कोकणवारीची! तर, एक मे म्हणजे सुट्टीचा दिवस अन त्यात तो आला सोमवारी! म्हणजे दुधात साखरच!! लागोपाठ तीन दिवस सुट्टी म्हणजे भटकंती ठरलेली. नेहमीप्रमाणे हा प्रवासही अनपेक्षित होता. अनपेक्षित यासाठी कि शनिवार सकाळपर्यंत कुठे अन कसे जायचे हे काहीही ठरले नव्हते. शनिवारी सकाळी उठलो अन तीन दिवस सुट्टी आहे तर कुठेतरी जाऊया याचा विचार चालू झाला. आता लॉन्ग वीकेंड अन त्यात बुकिंग्स केलेली नाहीत, अशा वेळी हुकमी पान म्हणजे कोकणवारी! पण कोकण जवळपास सगळचं पालथं घातलयं, शिल्लक होता फक्त दिवेआगर - काशीद पट्टा जो बर्याच दिवसांपासून वाकुल्या दाखवत होता. तर तिकडेच जाऊया असं ठरवलं अन पटापट तयारी करून निघालो. आधीही एकदा दिवेआगरला जाऊन आलो होतो त्यामुळे राहण्या-खाण्याचे बरेच ऑप्शन्स माहीत होते. मागच्या दिवेआगार भेटीत समुद्रदर्शन राहून गेलं होतं ते यावेळी झालं! कोकण दर्शन म्हटलं कि समुद्र, नारळी पोफळीच्या बागा अन कोकणी माणूस हे सारं आलंच. पण यावेळी एका फॉरेनरचही दर्शन झालं जो जाता-जाता मनाला चटका लावून गेला. आता तुम्ही म्हणाल एखादा फॉरेनर पाहून मनाला चटका लागण्याचे दिवस गेले विद्या, आजकाल काय फॉरेनर्स ढिगाने दिसतात. अगदी मान्य! ढीगानेच दिसतात आजकाल फॉरेनर्स पण मला दिसलेला हा वेगळाच होता. त्याचं झालं असं, दिवेआगरनंतर आम्हाला जायचं होतं काशिदला. मग जाता जाता मुरुड जंजिरा किल्ला पाहू अन तसेच समुद्राच्या कडेकडेने काशिदला जाऊ असे ठरवले. डावीकडे फेसाळणारा समुद्र डोळ्यांत साठवत मुरुडचा रस्ता धरला. कोकणची श्रीमंती बघून पुन्हा एकदा त्या श्रीमंतीचा गर्व वाटू लागला होता. कोकणी श्रीमंती नजरेत साठवत मुरुडला पोहोचलो. पोहोचलो अन सगळ्यात आधी पार्किंगची शोधाशोध सुरु झाली. पार्किंगच्या नावाखाली पार समुद्रातच गाडी उभी करायला लावली त्या लोकांना, ओहोटीची सुरुवात होती म्हणून ठीक ए. असो, तर पार्किंगचं दिव्यं पार पडलं अन आम्ही निघालो जंजिरा बघायला. शिवाजी महाराजांनाही ताकास तूर न लागू देणारा अन कित्येक वर्ष गुर्मीत समुद्रात ताठ मानेनं उभा असलेला जंजिरा! आम्ही चालू लागलो तितक्यात एक पांढरा फटक फॉरेनर एका गाडीतून उतरला अन माझ्या बाजूला उभा राहिला. त्याच्याबरोबर एक भारतीय कुटुंब अन आणखी एक फॉरेनर त्याची मैत्रीण किंवा बायको असावी बहुदा, असे सगळे होते. ते लोक गाडीतून अजून उतरतच होते तोवर तो माझ्या बाजूला येऊन उभा राहिला अन आमच्या मागे असलेल्या एका नाल्यामध्ये डोकावू लागला. नाला कसला गटारांच होतं म्हणा ना. माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, इतरही बर्याच ठिकाणी हेच दृश्य पाहतो आपण नाही का? मुरुडमध्ये शिरल्यापासून गाडी पार्किंग करेपर्यंत घाण अन गटारच होतं कि सगळीकडे. पण त्याला मात्र काहीतरी विशेष वाटत होतं बहुदा, अगदी डोकावून पाहत होता तो त्या गटारवाजा नाल्याकडे. त्याने तसे पाहिले अन मला माझीच लाज वाटली. काय बरं विचार केला असेल त्याने? अन घरी परत जाईल तेव्हा तिकडच्या लोकांना काय सांगेन बरं तो? म्हणजे कोकणची श्रीमंती कि या नाल्यातली घाण मनात घेऊन जाईल तो. अभेद्य जंजिऱ्याच्या गोष्टी सांगेन सगळ्यांना कि इकडच्या स्वच्छतेविषयी बोलेल? माझी आपली शंका....

विद्या चिकणे - मांढरे
https://www.facebook.com/vidya.chikne/

Group content visibility: 
Use group defaults