हॅना आरेण्ट !

Submitted by अदित्य श्रीपद on 2 June, 2017 - 13:35

हॅना आरेण्ट -१९६० च्या सुमारास

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो
१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चीरफाडही आणि
२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.
पण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्वज्ञान किंवा विचार घेऊन येतात कि त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यातला प्रतिपाद्य विषय ह्याना वेगळेच वळण लागते.

हॅना आरेण्ट हा चित्रपट असाच आहे

म्हणजे रूढ अर्थाने पाहू जाता हा चित्रपट नाझी राजवटीत ज्यू लोकांचे जे अनन्वित हाल झाले, छळ झाले, हत्याकांड झाले त्याला जबाबदार असलेल्या लोकांपैकी एक अडोल्फ आईशमन ह्याच्या खटल्याशी संबंधीत आहे. आहे पण ह्या विषयावर आलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘द पियानिस्ट’ किंवा अगदी प्रदीर्घ अशा ‘न्युरेम्बर्ग’ ह्या चित्रपटासारखा मात्र तो नाही. नक्की हा चित्रपटात काय घडते ते थोडक्यात सांगून मग ह्या चित्रपटात नक्की काय सांगायचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यावर माझ्या आकलनाप्रमाणे प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच म्हणजे अगदी अजून नावं दाखवली जातायत तेव्हाच, रात्रीच्या वेळी एका निर्मनुष्य , सुनसान रस्त्यावरून चाललेल्या एका वृद्धशा माणसाला काही तरुण जबरदस्तीने उचलून, एका ट्रक मध्ये घालून त्याचे अपहरण करून नेताना दाखवली आहेत. हाच तो कुप्रसिद्ध नाझी क्रूरकर्मा अडोल्फ आईशमन. त्याला उचलून नेणारे असतात इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्था मोसाद चे गुप्तचर. सगळ्या जगभरात लवकरच इस्रायलचे पंतप्रधान डेविड बेन गुरियन हे अडोल्फ आईशमानला अर्जेन्तिनात पकडल्याचे आणि त्याच्यावर इस्रायलच्या न्यायालयात खटला चालवणार असल्याचे जाहीर करतात. अमेरिकेच्या ‘न्यूयार्कर’ ह्या प्रसिद्ध दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहून हॅना आरेण्ट आपल्याला ह्या खटल्याचे वार्तांकन करण्यासाठी जेरुसलेम-इस्रायलला पाठवण्याची विनंती करणारे पत्र लिहिते. हॅना ही जन्माने एक ज्यू. १९३३ साली जर्मन गुप्त पोलीस-गेस्टापोनी अटक केल्यावर, मोठ्या शिताफीने जर्मनीतून निसटून अमेरिकेत गेलेली. पुढे प्राध्यापिका - लेखिका - तत्त्वज्ञ म्हणून भरपूर मान्यता पावलेली कर्तबगार, निर्भीड स्त्री. तिची विनंती मान्य होऊन ती जेरुसलेमला येते. संपूर्ण खटला ती बारकाईने आणि शांतपणे बघते. तिथेच तिला तिचा जुना मित्र कूर्त ब्लूमफिल्ड भेटतो. दोघांमध्ये आईशमन, खटला आणि त्याने केलेलं ज्यूंचे हत्याकांड ह्या निमित्ताने चर्चाही होते. हळू हळू तिला आईशमन बाबत एक वेगळीच गोष्ट जाणवू लागते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
अडोल्फ आईशमन- नाझी राजवटीतील फोटो - लष्करी गणवेशातला

तिला जाणवते कि आइशमन हा खरेतर एक फडतूस, क्षुद्र माणूस म्हणून देखील अस्तित्वात नाही.त्याला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच नाही. एखाद्या य:कश्चित किटकाला त्याच्या पेक्षा अधिक स्वत:बद्दल जाणीव असेल.पण आदेश, व्यवस्था, कर्तव्य, निष्ठा असल्या पोकळ कल्पनांच्या आहारी जाऊन, वरिष्ठांच्या आज्ञेबरहुकूम वाट्टेल ते करायला तयार होणारा. स्वतंत्र विचार करणं हे जे माणूसपणाचं लक्षण तेच सोडून दिलेला असा तो जंतू आहे. पण इतका क्षुद्र माणूस हाती अधिकार आल्यावर किती पराकोटीचा सैतानीपणा करतो हे पाहून, त्या क्रौर्याच्या मूर्तिमंत साक्षात्कारानं ती चरकते.. तिला जाणवते कि आईशमनच्या मनात ज्यु बद्दल द्वेष नाही तो फक्त ज्यांची चाकरी करतो ( किंवा करीत होता) त्याचा तो निष्ठावंत चाकर आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तो ब्रह्मवाक्य म्हणून मानतो, करतो. थोडे ओळखीचे वाटते हे? ज्या गोष्टीवर, तत्वज्ञानावर आपली अनन्य श्रद्धा आहे त्या साठी मरायला-मारायला तयार होणारे मानव समूह इतिहासाला (आणि वर्तमानालाही ) नवखे नाहीत. सर्वसमावेशक(totalitarian) विचारप्रणाली माणसाच्या व्यक्तीमत्वाचा, सद्सद विवेकबुद्धीचा ताबा घेते, आणि या भांडवलावर मग असलं भयानक हत्याकांड घडतं. फक्त हिटलर सारख्या एखाद्या माणसाच्या सैतानी मेंदूवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही, हे ती ठामपणे आणि जाहीरपणे लिहिते - मांडते.त्याच बरोबर ती तत्कालीन ज्यू नेत्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका ही ह्या नृशंस हत्याकांडाला कारणीभूत असल्याचे ठासून सांगते. अर्थात ह्यामुळे आईशमनवर असलेली पापाची, हत्याकांडाची जबाबदारी ती कमी करायचा प्रयत्न करते असा त्याचा अर्थ घेतला जातो. लोकांमध्ये विशेषत: ज्यू लोकात संतापाचे उद्रेक होतात.पण लोकांच्या संतापाचे, टीकेचे हल्ले झेलूनही ती आपल्या मतावर ठाम राहते.
त्याकाळच्या अमेरिकेतल्या ताकदवान ज्यू लॉबीची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर तिला झालेल्या विरोधाची धार आपल्याला कळू शकेल.
बार्बरा सुकोवा या जर्मन नटीनं हॅनाचं काम सुरेख केलं आहे. लोक हॅनाला नाझीधार्जिणी, ज्यू द्रोही म्हणू लागल्यावर ती एका जाहीर भाषणातून आपली भूमिका पुन्हा मांडते. ह्या भाषणात बार्बराने अभिनय फार सुरेख केला आहे. भाषणाच्या सुरुवातीला तिच्या मनात थोडी चलबिचल सुरू असलेली जाणवते. "आज सुरुवातीलाच सिगारेट शिलगावतेय, समजून घ्या," असं ती म्हणते त्यातून हीच तिच्या मनातली कालवाकालव दिसते.
समाजमान्य-लोकप्रिय सत्याहून निराळं काही बोलणारी. त्यात लोकसंतापाला न जुमानणारी. 'उद्धट', 'भावनाशून्य', 'उलट्या काळजाची', 'बेईमान' अशा अनेक शेलक्या विशेषणांनी तिची संभावना झाली नसती, तरच नवल. अगदी जवळचे मित्र, गुरुस्थानी असलेले सुहृद, विद्यार्थी - चाहते - वाचक, अशा अनेक बाजूंनी तिच्यावर हल्ला होतो. या हल्ल्यांमुळे हॅना जराही विचलित होत नाही असे दाखवले असते तर ती अमानवी वाटली असती. पण बार्बरानं रंगवलेली हॅना अमानवी नाही. तिचं आपल्या पतीवर, मित्रांवर, गुरूवर विलक्षण प्रेम आहे. "कीसशिवाय कसं काय काम करणार?" अशी मिश्कील विचारणा करण्याइतकी ती जिवंत आहे! ती या हल्ल्यांनी घायाळ होते. दुखावली जाते. पण विचाराची कास मात्र सोडत नाही. "विचार करणं हेच जिवंत असण्याचं, माणूस असण्याचं सर्वांत मोठं लक्षण आहे." हे बजावून सांगते.विवेक,सद्सद्विवेक बुद्धीची साथ सोडली तर माणसांची फक्त जनावरं नाही बनत तर ती एका मोठाल्या यांत्रातली गिअर व्हील्स किंवा स्पेअर पार्टस बनून जातात – संवेदनाहीन, विचारशून्य. पडेल ते काम गप गुमान करणारी.
इथे चित्रपट संपतो. हा काही फार नाट्यमय रोमहर्षक असा चित्रपट नाही पण मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे केवळ मनोरंजन हे जर चित्रपटाचे मुख्य उद्दिष्ट मानले तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात. पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट-गाजलेले, चाललेले सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही तो सिनेमा संपवून थेटरातून बाहेर पडताना सिनेमा डोक्यात घेऊन बाहेर पडला पाहिजेत. हा चित्रपट पाहून झाल्यावर केवळ तो डोक्यात फिरत राहत नाही तर इतर अनेक प्रश्न उभे करतो.

प्रश्न फक्त एकट्या दुकट्या हिटलर किंवा स्टालिनचा नाही. हा नरसंहार त्यांनी एकट्यानी घडवून नाही आणला तसा ते घडवून आणू शकलेही नसते. आईशमन्सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज उभी करून त्यांच्या कडून हे काम त्यानी करून घेतले. ह्यातले बरीच माणसे कुटुंबवत्सल , स्वत:च्या बायको मुलांवर अगदी घरातल्या कुत्र्या मांजरावर प्रेम करणारी होती, काही हळवी संवेदनशील, काही तर कलाकारही होती. पण निरपराध लोकांवर बंदुकीच्या फैरी झाडताना, त्यांना विषारी वायुच्या कोठड्यात ढकलताना ह्या सहृदय माणसांचे हात पाय कापत नसत. हे कसे शक्य आहे? ती केवळ आज्ञा पाळणारी विचार न करणारी माणसं होती ती असे म्हणून समाधान कसे होणार? जितके ह्या विषयावरचे चित्रपट डोक्युमेंटरीज, पहात होतो तितका हा प्रश्न अधिकच सतावू लागे.म्हणून बरीच शोधाशोध केल्यावर कळले कि ह्या हॅना आरेण्ट नावाच्या बाई मुळे आणि तिच्या ह्या धक्कादायक मांडणीमुळे प्रश्न पडून अमेरिकेतल्या येल युनिवर्सिटीचा मानसशास्त्राचा प्राध्यापक स्टेनले मिल्ग्राम हा असा एक प्रयोग करायला उद्युक्त झाला कि ज्याचे निष्कर्ष त्याच्या सकट सगळ्यांनाच धक्कादायक ठरले. अनेक वेळा हा प्रयोग केला गेला अनेक प्रकारे केला गेला, अनेक जणांनी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या देशात, विद्यापीठात ह्याचे प्रयोग केले पण निष्कर्ष तेच आले. काय होता तो प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष ...

हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)
स्टेनले मिल्ग्राम

न्युरेम्बर्ग खटल्याच्या वेळी देखील अनेक नाझी क्रूरकर्म्यानी आपण फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले होते. हा युक्तिवाद किंवा पळवाट न्यायालयात टिकणार नाही हे माहिती असून देखील/ आता ही हॅना आरेण्ट सुद्धा असलेच काही म्हणत होती. पण ती तर आरोपी नव्हती कि त्यांची वकीलही नव्हती त्यांच्याशी सहानुभूती असलेली कुणी हितसंबंधीय ती नव्हती मग हे काय गौड बंगाल आहे ह्याचा सोक्ष मोक्ष लावायचा निर्धार ह्या येल युनिवर्सीटीच्या मानस शास्तराच्या प्राध्यापकाने लावायचे ठरवले .

ह्या प्रयोगात तीन लोक सामील होत असत. एक जन स्वत: प्रयोग करणारा निरीक्षक , एक शिक्षक आणि एक विद्यार्थी . ह्यातला विद्यार्थी सुद्धा खरेतर निरीक्षकाचा मदतनिसच असे पण शिक्षक झालेल्या स्वयंसेवकाला ते माहिती नसे. तर ह्यात शिक्षकाला एक प्रश्नावले दिली जात असे आणि त्याचे उत्तरेही असत. जो विद्यार्थी आहे तो शिक्षकाला दिसणार नाही पण त्याचा आवाज ऐकू येईल असा शेजारील खोलीत बसलेला असे.शिक्षकाने एक एक प्रश्न त्याला विचारायचा आणि जर उत्तर चुकीचे दिले तर सामोरास्लेल्या टेबलावरचे बटन दाबायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला विजेचा शॉक बसत असे.हळू हळू ह्या शॉकचे प्रमाण वाढत जाई तसतसा विद्यार्थी आरडा ओरडा किंकाळ्या ते अगदी शिक्षकाला तसे न करण्यासाठी गयावया करीत असे अगदे रडत भेकत असे.( प्रत्यक्षात त्याला काहीही शॉक वगैरे दिला जात नसे तो फक्त नाटक करीत असे पण शिक्षकाला वाटे कि त्याला खरेच यातना होताहेत.)
अपेक्षा आणि वास्तव
ह्यात भाग घेतेलेले लोक अगदी सर्व सामान्य लोक असत आपल्या सारखे. मग आपल्याला वाटेल कि त्या माणसाने पहिल्यांदा विध्यार्थ्याची किंकाळी ऐकली कि तो प्रयोग थांबवायला सांगत असेल.आपण जर त्या शिक्षकाच्या जागी असू तर नक्की हेच करू नाही का. (हा एक सांगायचे राहिले , त्या शिक्षकाला प्रयोग सुरु होण्यापूर्वी सांगितले जात असे कि काय वाट्टेल ते झाले , ह्या प्रयोगात विद्यार्थ्याला गंभीर इजा ते अगदी त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याचे जबाबदारी पूर्णपणे निरीक्षकाची असेल, शिक्षकाचे नाहे.) हा प्रयोग अनेक विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर केला जात असे . पण पहिल्या किंकालीला प्रयोग थांबवून बाहेर पडणार्यांची संख्या शेकडा फक्त १-३ असे. अनेक जन विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून काळजी व्यक्त करीत, खरेच अशा यातना द्यायची गरज आहेका म्हणून विचारत. पण ६० – ६५ % लोक कोणताही आक्षेप न घेता प्रयोग पुढे चालू ठेवत. जे लोक आक्षेप घेत , काळजी व्यक्त करत ह्या शॉकची गरज आहे का म्हणून विचारात त्यांना खालील प्रकारे सांगितले जात असे.
१. कृपया प्रश्न विचारू नका , प्रयोग पुढे सुरु ठेवा
२. तुम्ही हा प्रयोग पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
३. तुम्ही साथ नाही दिली तर प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही.

कुठेही त्याना आदेश दिला जात नसे आणि तीन वेळा विनंती करूनही जर त्यांनी थांबायचीच इच्छा व्यक्त केली तर प्रयोग थांबवला जात असे.पण तरीही फक्त ५-६% लोक प्रयोग थांबवत बाकीचे प्रयोग पूर्ण करत असत.

निष्कर्ष –

सर्वसामान्य माणस जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे. आश्चर्य म्हणजे ह्या प्रयोगात स्त्रियाही सामील केल्या गेल्या आणि पुरुष आणि स्त्रीयामध्ये काहीही फरक सापडला नाही.
आपण असे का आहोत? मिल्ग्राम ह्याने निष्कर्ष काढला कि माणूस लाखो वर्षापासून उत्क्रान्य होता असताना समूहाच्या नेत्याची आज्ञा पाळणे हा त्याचा सहजभाव (instinct) बनला आहे. समूहाच्या नेत्याचे( alphaa male) न ऐकणे, समूहातून वेगळे होणे, बहिष्कृत होणे म्हणजे मृत्यू हे समीकरण पिढ्यानू पिढ्या भिनले आहे इतके कि त्यापुढे क्रूर वर्तन , स्वत:च्या साद साद्विवेकाशी प्रतारणा , दुबळ्या घटकांवर अत्याचार करतना त्याला काही वाटत नाही.
सर्व प्रकारच्या विचारधारा मग त्या धर्म असो वा साम्यावादा सारखे सामाजिक विचार असो त्यांना मुळ पकडायला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज असते आणि त्या विचारधारा जितक्या अधिक कठोर पाने माणसांच्या कृती नियांत्र्र्त करत असतील तितक्या त्या जास्त लोकप्रिय होतात.
आपल्या कडच्या जातिव्यवस्थेच्या यशाचे स्पष्टीकरण कदाचित ह्याप्रकारे होऊ शकेल. अजून तसा प्रयत्न केल्याचे मला माहिती नाही .

माणूस इतक्या सहजपणे आपले माणूसपण हरवून बसू शकतो नव्हे हरवतोच. तसे इतिहासात अनेक वेळा झालेले आहे पण त्यामागची कारण मीमांसा शोधण्याच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध प्रयत्न १९६२ साली प्रथम झाले आणि त्यामागची प्रेरणा ठरली हॅना आरेण्ट.

हॅना आरेण्ट. चित्रपटाची माहिती
• दिग्दर्शक: मार्गारेटं फॉन ट्रोटा
• कलाकार: बार्बरा सुकोवा, जेनेट मॅकटीअर, क्लाउस पोल, निकोलस वूडंसन, ऍक्सेल मिल्बर्ग
• भाषा: जर्मन
• प्रदर्शन वर्ष: २०१३
• निर्माता देश: जर्मनी
• तिच्या शेवटच्या भाषणाची ( इंग्लिश)यु ट्यूब लिंक-संपूर्ण चित्रपट free viewing मध्ये उपलब्ध नाही.

https://www.youtube.com/watch?v=wmBSIQ1lkOA
तिच्या मुलाखतीची लिंक
https://www.youtube.com/watch?v=dsoImQfVsO4

मागे मी एक इस्रायल आणि मोसाद वर लेखमाला लेहायला घेतली होती, तिच्या पहिल्या भागानंतर आलेल्या प्रतिक्रियात मला एकाने प्रश्न विचारला होता, त्याचे समाधानकारक उत्तर मलाच न मिळाल्याने मी पुढे लिहिण्याचे थांबवले होते. तो भाग साधारण असा

आपण ज्यू लोकांच्या हत्याकांडाशी साम्बंधीत काही जुने(खरे) विडीयो यु ट्यूब वर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुल, अगदी तान्ही बाळ ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गास चेंबर मध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वाड समोर उभे केले जात असलेले दिसते, आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्या पैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही! मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही? लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.पण हे यहुदी! हि तर माणसं होती! मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली? ते पण आपल्या म्हातार्या आई वडील बायको ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले.

मी ह्यात स्पष्ट लिहिले आहे कि त्याचे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही. gas chambers ही त्यांना न्हाणी घरच आहेत असे वाटत राहिले, जर्मनांनी व्यवस्था अशी लावली होती कि त्यांना कळूच नये आपण मरायला चाललोय हे स्पष्टीकरण मी हि ऐकले/ वाचले आहे मला ६० लाख मृताची हि प्रचंड संख्या पाहता ते पटत नाही इतकेच. तसेच यहुद्यानी अगदीच प्रतिकारही केला नाही असे अजिबात नाही पण ते प्रयत्न फार कमी आणि अगदी अपवादात्मक म्हणावे असे होते. त्यामानाने पराभूत फ्रान्स मधली भूमिगत चळवळ जर पहिली तर कुणाही फ्रेंच माणसाचा उर अभिमानाने भरून येईल असा तो होता ... त्यामुळे ६० लाखांच्या शिरकाणाबद्दल जेव्हढा राग जर्मनाबद्दल किंवा नाझ्यान्बद्दल ज्यूंना वाटतो तसेच जे ६० लाख मेले त्याच्या मृत्युला ते शहादत मानत नाहीत, ते स्वातंत्र्य लढ्यात मेले नाहीत ह्याची जाणिव त्यांना आहे. असो यहुदी नंतर ह्यातून खूप शिकले हा सगळ्यात महत्वाचा भाग. आनि ह्याबद्दल स्वत: याहुद्यानीच अनेक वेळा वरील प्रमाणे विचार व्यक्त केले आहेत.
मला अजूनही ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले...अजूनतरी!
शोध चालू आहे!

--आदित्य

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाच्या अनुषंगाने मांडलेले दोन्ही प्रश्न आवडले.

>>सर्वसामान्य माणस जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे. ---हे पटले.

>> नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते.---- विरोध करणार्यांना सटासट गोळ्या घातल्या जात होत्या ना. दुसर्याच्या हातात बंदुक असल्यावर कसला प्रतिकार करणार?

माहिती आवडली.
दुसरी बाजू पण विचारात घेण्यासारखी आहे.

<<नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते.---- विरोध करणार्यांना सटासट गोळ्या घातल्या जात होत्या ना. दुसर्याच्या हातात बंदुक असल्यावर कसला प्रतिकार करणार?>>

इतकं सरधोपट ते नाहीये. चीन मध्ये तियांन मेंन स्क्वेअर मध्ये विद्यार्थी निदर्शन करत असताना लष्कराने रणगाडे आणले होते. तिथे एक बाप नि:शस्त्र एकटा समोर उभा राहिला. त्यावेळी का त्याला माहिती होते पुढे काय होणार आहे? त्याचा काय पाडाव लागणार होता पण त्या विद्यार्थयांमध्ये त्याचा मुलगा होता मग शांत कसा बसणार तो? वेड धाडस म्हणा काही म्हणा... अशी अनेक उदाहरणं आहेत. काही, नव्हे बरीच अयशस्वी आहेत. पण ...
ज्यू लोकांना मोकळ्या मैदानात ट्रक भरून आणले जाते , आधीच खड्डे खणलेले असतात , त्यात आधीच्या दुर्दैवी जीवांची प्रेत पडलेली असतात , त्यांना काठावर उभे करतात म्हातारे कोतारे तरुण , बायकांच्या कडेवर मूलं असतात ...सगळं स्वच्छ दिसत असते, एक आई , एक बाप एक तरुण उठत नाही , कमरेचा बेल्ट, पायातला बूट, मैदानातला दगड काहीही घेऊन धावून जात नाही, असफल का होईना जीव वाचवायचा प्रयत्न म्हणून .... (पहा न्युरेम्बर्ग चित्रपट) पटत नाही. त्यांच्याकडे बंदुका होत्या मग प्रतिकार ना करून जीव वाचायची आशा होती का?
परत सांगतो मला असली स्पष्टीकरण पटत नाहीत, पटली नाहीत, तुम्हाला हवेतर तुम्ही विश्वास ठेवू शकता ...मी अजून उत्तर शोधतोय... पहिल्या प्रश्नाचे मिळाले दुसऱ्याचे ही मिळेल, असे प्रश्न अनेकांना पडले असणारच कुणी तरी उत्तर शोधणेही असेल... मला ही सापडेल.
हा विरोध नाही .... लोभ असावा

<<<माहिती आवडली.
दुसरी बाजू पण विचारात घेण्यासारखी आहे.>>>+१

परत सांगतो मला असली स्पष्टीकरण पटत नाहीत, पटली नाहीत, तुम्हाला हवेतर तुम्ही विश्वास ठेवू शकता ...मी अजून उत्तर शोधतोय... पहिल्या प्रश्नाचे मिळाले दुसऱ्याचे ही मिळेल, असे प्रश्न अनेकांना पडले असणारच कुणी तरी उत्तर शोधणेही असेल... मला ही सापडेल.>>

मलाही अशा स्पष्टीकरणामागचं लॉजिक समजलं नाही. फार दूर कशाला, आपलंच उदाहरण घ्या. किमान ७०० वर्षे तरी अर्ध्या अधिक भारतावर मुघलांची सत्ता होती, भले नाझींनी केले तितके अत्याचार मुघलांनी केले नसतील, पण एकानेही ५०० वर्षात एवढासा विरोध केला नाही. महाराष्ट्रात शिवाजी निर्माण व्हायला २०० वर्षे लागली, तोवर जाळपोळ, लुटालूट आणि अत्याचार रोजचेच होते.

अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या गुलामगिरीची कथा पण जवळपास अशीच आहे.

माझ्या मते तरी प्रचलित समाजव्यवस्थेत बदल घडवायला समाजाला एका नेत्याची गरज असते, मग बदल कुठलाही असो. एखादी जुलमी प्रथा मोडणे, नवी व्यवस्था आणणे, अन्यायाला विरोध करणे, हे समाज स्वतःहून, सर्वसहमतीने करू शकत नाही. इथे कोणीतरी जबाबदारी घेणारा लागतोच. आंबेडकर नसते, तर दलित समाज जागा व्हायला कदाचित अजून १०० वर्षे गेली असती (शिक्षण अन बाकी साधने मिळून सुध्दा). गांधी व इतर नेते नसते, तर भारतीय समाज एक व्हायला कदाचित अजून दोन -तीनशे वर्षे लागली असती. नेत्यांची गरज शांततेत जितकी असते, त्याहून जास्त ती कठीण परिस्थितीत असते.

ज्यूंच्या बाबतीत कदाचित जवळपास सगळ्या नेत्यांनी आधीच जर्मनी सोडायचा निर्णय घेतला होता. मग जेव्हा बाकीचे ज्यू छळछावण्यात अडकले, तेव्हा त्यांना नेतृत्व करणारा कोणीच भेटला नाही.

आता लोकांना नेहेमी नेताच का लागतो , हे मात्र मला अजून नीटसे कळलेलं नाही . मेंदूचा किंवा उत्क्रांतीचा यामागे काही हात असावा. एकदा तुमच्या बायकोला याबद्दल विचारून पहा, आणि कळवा Happy

विलभ
बरोबर आहे...तिलाच खरेतर विचारायला हवे.

माहितीपूर्ण विचार करायला लावणारा लेख.

>>>> सर्वसामान्य माणस जर त्यांच्यावर परिणामांची जबाबदारी टाकली नाही तर जो परिणामांची जबाबदारी घेत असेल त्याच्या आज्ञांचे शब्दश: पालन करीत, त्यांचा विवेक, सद्सद विवेक बुद्धी त्याच्या आड येत नसे <<<<
हे वाक्य सर्वात महत्वाचे आहे.
अन हाच आशयही व्यक्तिच्या वैयक्तिक पातळीवरील वागण्याबद्दलही महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आज अक्षरशः रोजच्या रोज दर क्षणी हजारो/ लाखो लोक, सर्व देशभर बेशिस्तपणे साध्या "रोड ट्रॅफिक सिग्नल" ला तोडुन जात असतात, व त्या त्या चौकातला अपघाताचा "धोका" (जो सिग्नल पाळणार्‍यांनाही असतो) कित्येक पटींनी वाढवुन ठेवतात. ते हे करु धजतात, कारण एकच की "सिग्नल तोडला" तर होणार्‍या दंडाची भिती नसते, व भिती का नसते, तर दंड वसुल करणारी यंत्रणा सक्षम नाहि. अर्थातच, सिग्नल पाळा वा न पाळा, याची /त्याबद्दलच्या शिक्षेची कशाचीच "जबाबदारी" जेव्हा व्यक्तिशः जाणवत नाही, तेव्हा अशीच कृत्ये घडतात.
तेव्हा माझे मते, वरील विवेचन , हे केवळ कुणीतरी नियंत्रित केलेल्या समुहालाच लागु पडते असे नाही, तर "जबाबदारी" नसलेल्या, वा जबाबदारीची जाणिव नसलेल्या कोणाही "एकांगी व्यक्तिकडुनही" असेच घडते. फक्त तो कुणाचा "आदेश " वगैरे पाळीत नसतो.