प्रिटी वूमन - भाग ६

Submitted by sunilt on 9 March, 2009 - 02:22

मागील भाग -

प्रीटी वूमन - भाग १
प्रीटी वूमन - भाग २
प्रीटी वूमन - भाग ३
प्रीटी वूमन - भाग ४
प्रीटी वूमन - भाग ५

शनिवार १३ ऑगस्ट २००५

तो सकाळी उठला आणि कॅलेंडरवर नजर टाकली. वास्तविक हा लाँग वीकएन्ड, त्यातून मस्त भुरभुरणारा पाऊस. सगळ्या मित्रांचे कुठेकुठे जाण्याचे प्लॅन ठरले होते. कोणी माळशेज तर कोणी लोणावळा. त्याला मात्र कुठेही जाता येणार नसते कारण आज आहे इंप्लीमेंटेशनचा दिवस. गेले सात-आठ महिने खपून बनवलेली सिस्टीम आज प्रॉडक्शनमध्ये जाणार. इंप्लीमेंटेशन नेहेमी असतं ते शुक्रवारी मध्यरात्रीनंतर. पण ते क्लायंटच्या अमेरीकन वेळेनुसार. म्हणजे भारतात उजाडते शनिवारची दुपार.

सगळ्या तपासण्या अगदी व्यवस्थित काटेखोरपणे झालेल्या असल्यामुळे तो तसा निश्चिंत असतो. इंप्लीमेन्टेशन व्यवस्थित होणार याची तर त्याला खात्रीच असते. दुपारी ऑफीसला जायचे. सगळे काही सुरळीत पार पडले की चार पाच तासात कामातून मोकळे! दुपारी तो ऑफीसला पोचला तेव्हा त्याचे सहकारी तिथे हजरच होते. गेल्या गेल्या त्याने एक छोटीशी टीम मीटींग घेतली. कोणी काय करायचे याची पुन्हा एकवार उजळणी झाली.

त्याने ब्रिज कॉल चालू केला. त्याच्या ऑनसाइट सहकार्‍याच्या आवाजातील पेंग स्पष्टपणे जाणवत होती. साहजिकच आहे, त्याची मध्यरात्र उलटून गेली होती. थोड्याच वेळात रोल-आउट सुरू झाले आणि टीममधील प्रत्येक जण आपापली ठरलेली कामे करू लागला.

सगळे काही व्यवस्थित चालू असल्याचे पाहून त्याने कँटीनमध्ये जाऊन कॉफी पिण्याचा विचार केला. तीन महिने अमेरिकेत राहून आल्यापासून त्याला चहाऐवजी कॉफीची सवय लागली होती!

कडक कॉफी घेऊन तो बाहेर आला तो प्रकरण जरा वेगळे दिसले. सगळे सहकारी एका डेस्कपाशी गोळा झाले होते. चिंताग्रस्त चेहेर्‍याने समोरील मॉनिटरकडे पहात होते. त्याच्या कळजात च्रर्र झालं. घाईघाईने तिकडे जाऊन त्याने चौकशी केली.

"एक जॉब अबेंड झालाय", एकाने माहिती पुरवली.

"कुठला जॉब? कसा झाला अबेंड?", तो उडालाच.

"तेच तर बघतोय"

इंप्लीमेन्टेशन थांबलं होतं. कुठे काय चुकलं ते पाहण्यात सगळे गुंग होते.

***

एखादी गोष्ट चुकणार असेल तर, ती आधीच चुकली आहे, अशा अर्थाचा एक मर्फीचा नियम आहे. अगदी काटेखोर तपासणीनंतरही एक क्षुल्लकशी वाटणारी चूक राहून गेल्याचे त्याच्या लक्षात आले होते. दुसरीकडे अशी कुठली चूक राहिली नाही ना याची आधी खातरजमा करून नंतर थांबलेले इंप्लीमेन्टेशन पुन्हा सुरू करण्याबाबतच्या सुचना तो देणार, तोच फोन खणखणला.

"हॅलो", थोड्याश्या अनिच्छेनेच त्याने तो उचलला.

"क्या प्रॉब्लेम हो गया इम्प्लीमेन्टेशनमे?", त्याचा मॅनेजर घरून बोलत होता.

"नथिंग टू वरी सर. सब सॉर्ट आउट हो गया है. इम्प्लीमेण्तेशन फिर शुरू हो रहा है अभी", तो

"अरे लेकिन हुवा क्या था?", मॅनेजर

"कुछ नही सर. टेस्ट जेसीएल प्रॉडक्शन मे रन हो गया", त्याने स्पष्टीकरण दिले.

"ऐसे कैसे हुवा? टेस्ट नही किया था क्या", मॅनेजर अजून भडकलेलाच होता.

"सर प्रॉडक्शन जेसीएल को टेस्ट एन्व्हायरॉनमेन्ट मे टेस्ट नही कर सकते", त्याने स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला.

"क्यो?", मॅनेजर पिच्छाच पुरवीत होता.

"सर एव्हेरीथिंग इस वर्किंग फाइन नाउ. आय विल एक्प्लेन टू यू ऑन ट्युसडे", तो राग दाबत म्हणाला आणि फोन ठेउन दिला.

"अरे सोड यार. ओपन सिस्टीम वाला आहे त्याला मेनफ्रेम काय घंटा माहित. उगाच मॅनेजरगिरी करायची म्हणून कायतरी प्रश्न विचारतो साला", सहकार्‍याने दिलासा दिला.

***

रात्रीचे दहा वाजून गेले होते. कुठेही अडचण न येता इम्प्लीमेन्टेशन ठीक ठाक चालू होतं. आता शेवटचे काही जॉब संपले की बिझनेस वॅलीडेशन. एकदा बिझनेसनी रुकार दिला की इम्प्लीमेन्टेशन संपले.

आता रीलॅक्स मूडमध्येच तो उठला आणि पुन्हा एकवार कॅन्टीनम्ध्ये जाउन एक कडक कॉफीचा प्याला घेतला. परत आपल्या जागेवर येऊन त्याने इंटरनेट उघडले. गेल्या काही दिवसांपासून तर त्याला कामातून तेवढीही उसंत मिळत नव्हती. जगात काय चाललयं ते पहावे म्हणून तो बातम्यांच्या साइटवर गेला. पाहतो तो समोर आबा पाटलांचा फोटो आणि एक मोठ्ठा मथळा

"शेवटचे दोन दिवस".

कसले बुवा शेवटचे दोन दिवस असे मनाशीच पुटपुटत तो संपूर्ण बातमी वाचू लागला.

"कुठल्याही दडपणाला मी भीत नाही. पंधरा तारखेपासून राज्यातील सगळे डान्स बार बंद म्हणजे बंद", आबा गरजत होते.

अरेच्चा, तो हादरलाच. पंधरा तारखेपासून डान्स बार बंद म्हणजे..म्हणजे..म्हणजे..?

त्याच्या डोळ्यासमोर तिचा तो मोहक, मादक चेहरा तरळू लागला.

*******

"पांच करोड मांग रहा है आर आर पाटील", संतोषअण्णा बोलत होता.

संतोषाअण्णा म्हणजे हॉटेलचा सर्वात जुना वेटर. सगळ्या दुनियेची खबरबात ठेवणारा. मुली आणि इतर वेटर कोंडाळे करून त्याच्या भवती बसून त्याचे बोलणे ऐकत होते.

"ऐसे बहोत आये और गये. कुछ नही होनेवाला बंद बिंद. दस पंधरा दिन रखेगा बंद, फिर होयेगा वापस चालू"

संतोषअण्णा इतरांना धीर देत होता की स्वतःलाच?

त्याचा मोठा मुलगा बारावीत होता. त्याला इंजीनीयरींगला पाठवायच त्याच स्वप्न होतं. मुलगी शाळेत होती. तिलाही तो कॉलेजात शिकवणार होता. पत्नी घरीच असली आणि पगारही बेताचाच असला तरी त्याचे एकवेळचे खाणे हॉटेलात सुटत होते. शिवाय टीपदेखिल बर्‍यापैकी मिळे. पण आता हॉटेलच बंद झाले तर? वीस वर्षे हॉटेलातच नोकरी केलेल्या संतोषण्णाला दुसरी कुठली नोकरी मिळणेही दूरापास्त होते.

वर मेकअप रूममध्ये चांदनी खिन्नपणे बसली होती. त्याच हॉटेलातील एका वेटरशी तिने गेल्या वर्षी लग्न केले होते. पण पुढे ती काम करीत असलेल्या हॉटेलात वेटरचे काम करणे त्याला अपमानास्पद वाटू लागल्याने त्याने हॉटेल बदलले इतकेच. किसन नगर भागात, पत्र्याचं छत असलेल्या एका बैठ्या चाळीत त्यांचा संसार होता. तीन आठवड्यांपूर्वीच आलेल्या त्या महा भयंकर पावसाने त्यांचे घर अक्षरशः धुवून काढले होते. आत छतापर्यंत चढलेल्या पाण्याने घरातील एकही वस्तू वापरण्यायोग्य ठेवली नव्हती. हॉटेलातील जवळ जवळ प्रत्येकाकडून उधारी घेऊन त्यांनी संसाराला पुन्हा सुरुवात केली होती. आधी अस्मानी मग ही सुलतानी आपल्याच वाट्याला का यावी, ह्या विचाराने तिला बेचैन केले होते.

हॉटेलचा मॅनेजर पूजारी. सगळे त्याला शेठ म्हणतात. तोही काळजीतच आहे पण स्वतःचा आब राखायचा असल्यामुळे त्याला ती दाखविता येत नाहे इतकेच.

सगळ्या घोळक्यांतून फिरून मर्जिना स्टेजवर गेली. तरीही नाचायची इच्छा होईना. तशी ती पुन्हा मेकअप रूममध्ये परतली. तिची व्यथा ती कुणाला सांगणार होती? मोठ्या ऐटीत तिने सगळ्या घराची जबाबदारी एकटीच्या डोक्यावर घेतली होती. आता तेही बंद झाले तर काय ह्या विचाराने तीदेखिल मनातून हादरली होती.

सगळ्या हॉटेलभर एकच चर्चा गेले काही दिवस चालू होती. केवळ नाचगाण्याचे चॅनेल बघणार्‍या मुली गेल्या काही दिवसांपासून बातम्या पाहू लागल्या होत्या! आर आर पाटील, वर्षा काळे, मनजीत सिंग ही नावे सर्वतोमुखी झाली होती.

उद्यानंतर काय हे सर्वात मोठे प्रश्नचिन्ह आता सर्वांपुढे उभे होते.

*******

टक टक.

डेस्कवर आवाज झाला तसा तो तंद्रीतून खाडकन जागा झाला.

"सो गया क्या?", सहकार्‍याने विचारले.

"नही. ऐसेही आंख लगी", तो खोटेच बोलला.

"वॉट अबाउट इंप्लीमेन्टेशन?"

"एव्हरीथिंग फाइन. मेल देखा नही क्या?"

त्याने मेल पाहिल्या. सर्व काही सुरळीत झाल्याच्या आणि नंतर अभिनंदनाच्या काही मेल्स आल्या होत्या.

"चला निघायच ना?", सहकारी म्हणाला

"हो निघूच. ह्या मेलला रिप्लाय करतो मग जाऊ"

ऑफीसच्या बाहेर आल्यावर त्यांनी एक रिक्षा केली आणि ते जाऊ लागले. गेले काही महिने राबल्याचे आज चीज झाले होते. एक प्रकारची तृप्तता त्यांच्या चेहेर्‍यावर पसरली होती.

"अरे, कुछ गाना बाना लगाओ ना", एकाने रिक्षावाल्याला टोकले

रिक्षावाल्याने टेप सुरू केली. ऋषी कपूरचे एक जुने गाणे वाजू लागले -

और थोडी देर में बस, हम जुदा हो जायेंगे
आपको ढूंढूंगा कैसे, रास्ते खो जायेंगे
नाम तक तो भी नही, अपना बताया आपने....

"बस इधरही रोक देना", तो अचानक म्हणाला

"अरे इथे कुठे उरतोयस? काही राहिलय का ऑफीसमध्ये. आपण सगळेच जाऊ पाहिजे तर परत"

"नाही नाही. तुम्ही व्हा पुढे. मला दुसरे काम आहे"

आश्चर्यचकित झालेल्या सहकार्‍यांना सोडून तो रिक्षातून उतरला. त्यांची रिक्षा पूर्णपणे दिसेनाशी झाल्याची खात्री झाल्यावर त्याने हात उंचावून दुसरी रिक्षा थांबवली.

*******

बराच वेळ मेकअप रूममध्ये थांबून मर्जिनाही कंटाळली. विचार कर करून तर तिच्या मेंदूचा पार भूगा झाला होता. पुन्हा एकदा हॉलमध्ये चक्कर टाकावी असा विचार करून ती जिना उतरून हॉलच्या दिशेने येऊ लागली.

तेव्हढ्यात कोणी नवा कस्टमर आल्याची चाहूल लागली म्हणून तिने पाहिले आणि चमकलीच!

तो आला होता. चेहरा थोडा थकलेला वाटत होता, केसही विस्कटलेले होते. किती महिन्यांनी आलाय हा, तिने मनातच विचार केला.

त्यानेही नजर प्रथम इकडे तिकडे वळवली आणि मग स्टेजकडे पाहिले. ती स्टेजवरच उभी होती.

भरपूर जरीकाम केलेला लालचुटुक रंगाचा घागरा. शरीर सौष्ठव दाखविणारी आखूड बाह्यांची तंग चोळी. कमरेच्याही खालपर्यंत रूळणारे रेशमी मोकळे केस, मेंदी लावल्यामुळे दिव्याच्या प्रकाशात चमकणारा त्यांचा तो लालसर सोनेरी रंग, झिरझिरीत ओढणीतून दिसणारे ओटीपोट, रंगीत लेन्समुळे निळसर दिसणारे तिचे डोळे, मस्कारा आणि आय लायनर मुळे रेखीव दिसणार्‍या भुवया, रूज मुळे अगदी गुलाबागत भासणारे गोबरे गोबरे गाल आणि उजवा पाय किंचित दुमडून, मान डावीकडे झुकवून ऐटीत उभे राहण्याची तिची लकब!

तो डोळे विस्फारून पाहातच राहिला. तिही त्याच्याकडेच बघत होती.

******* ******* *******
(क्रमशः)

गुलमोहर: 

इतके लहान भाग नका हो टाकु. आता पुढचा भाग कधी?

एवढा लहान भाग टाकल्याबद्दल निषेध नोंदवण्यात येत आहे! Angry
पुढचा भाग लवकर न टाकल्यास इथे विनाकारण वाद निर्माण करण्यात येईल, ज्यामुळे वैतागून तरी लेखक लवकर पोस्टेल! Proud

मी प्रतिसाद देणारच नाहीये. इतक्या दिवसांनी एव्हढा छोटुसाच भाग टाकल्याने मी किती वैतागलेय ते मी मुळीच दाखवणार नाही!

किती उशीर... मी तर विसरुनच गेले होते की ही गोश्ट सुरु आहे.

ओ लिहा की पटापट. किती दिवसांनी आणि ते पण एवढंसं लिहीलंय. Sad माणसानं कसं दणदणीत मोठ्ठं पानभSSSSSSSSSSर लिहावं.
मस्त आहे लौकर येउ द्या.

या भागाला खरंच उशीर झाल्या सारखे वाटते... संदर्भासाठी मागचा भाग मला पुन्हा एकदा (थोडा) वाचावा लागला....

अतिशय सुरेख !! पुढचा भाग लवकर प्प्लिज.............

मी प्रतिसाद देणारच नाहीये. इतक्या दिवसांनी एव्हढा छोटुसाच भाग टाकल्याने मी किती वैतागलेय ते मी मुळीच दाखवणार नाही!
>>>>>>
खरच निषेध बर का !!!
Happy

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार. या भागाला उशीर झाला हे मान्य. यापुढील भाग वेळेत टाकण्याचा प्रयत्न राहील.

पुन्हा एकवार धन्यवाद!

सुनीत,

छान लिहिता आहात तुम्ही..
पण <पांच करोड मांग रहा है आर आर पाटील", संतोषअण्णा बोलत होता<> हा संदर्भ मला अस्थानी वाटतो आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल असे संदर्भ कथेत असू नयेत, असं मला वाटतं.

sunilt ,
पुढचा भाग कधी टाकताय ते आत्ताच्या आत्ता सांगा Happy
अहो कथा खरच खूप छान आहे पण लवकर पूर्ण करा ( अशी नम्र विनंती )