विद्वान बनण्याचे सात नियम...!

Submitted by अतुल ठाकुर on 28 May, 2017 - 23:20

1.jpg

कुणाला अशी शंका आली की हे लेखन पुलंच्या सुप्रसिद्ध "तुम्हाला कोण व्हायचंय" या लेखावर बेतलंय तर ती शंका अगदी खरी आहे. त्यावरुनच हे उचललंय. आमच्या इतक्या वर्षांच्या सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेसच्या अनुभवावरून काढलेलं लवकरच या सात नियमांचं आमचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही रेल्वे बुकस्टॉलवर मिळेल. आमचे नियम अगदी साधे आहेत. आजच्या काळाला अनुसरून त्यात कसलेही परिश्रम नाहीत. फक्त त्यांचा विचार करायचा. जमेल तसं करायचं आणि बाकी विश्वातील शक्तीवर सोडून द्यायचं. सतत मनात घोळवत राहिलं की विश्वातील शक्ती तुमच्यासाठी ते सर्व प्रत्यक्षात आणतात. सातच का? तर सात हा महत्त्वाचा आकडा. सात स्वर्ग, सात पाताळ वगैरे.

तर नियम नंबर एक. शक्य ते सेमिनार आणि कॉन्फर्न्सेस अटेंड कराव्यात ही विद्वान बनण्याची पहिली पायरी. कळोत न कळोत पण आपली हजेरी तेथे असावी. थोड्याच दिवसात तुम्हाला काही लोक ओळखु लागतात. विद्वानांच्या सभेत वेशभूषेचा बाबतीत पर्टिक्युलर राहणे आवश्यक. सेमिनार्सला जाताना जाकीट वापरावे, नाहीतर सूट. त्यामुळे तुम्ही लोकांच्या लक्षात येता आणि तुम्ही विद्वान बनण्याकडे एक पाऊन टाकता.

दुसरा नियम शब्द वापरण्यात हूशारी दाखवा. बोलताना कडक इंग्रजी येत असेल तर काम बरेच सोपे होऊन जाते. मात्र तेवढ्यावर भागत नाही. तुम्ही एक्सीस किंवा अबंडन्स असले शब्द वापरले तर इतर विद्वान तुमच्याकडे साफ दुर्लक्ष करून समोर फुकट मिळालेले फोल्डर्स चाळू लागतील किंवा मोबाईलमध्ये वा लॅपटॉपमध्ये तोंड खुपसतील. त्याऐवजी "प्लेथोरा" हा शब्द वापरावा. टेर्रीन, मार्जिनल, अनार्की, डोमेन, नॉलेज रिप्रोडक्शन, एपिस्टेमॉलॉजी, आँटोलॉजी, मेथॉडॉलॉजी असे शब्द माहित करून घ्यावे आणि त्यातून फारसं सांगण्यासारखं तुमच्याकडे काही नसलं तरी खुबिने पेरीत राहावे. लोकं कान टवकारतात. तुम्ही आणखी एक पाऊल पुढे जाता.

नियम नंबर तीन. जर तुम्ही मार्क्सवादी असाल तर त्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही. मग तुम्हाला हे लेखन वाचण्याची मुळी गरजच नाही. कुणी कसलाही पेपर वाचो सतत त्यामागच्या आर्थिक कारणाबद्दल बोलत राहावे. प्रश्न करत राहावे. त्याने आर्थिक कारण मांडले तर आपण सांस्कृतिक कारणांबद्दल बोलावे. त्याने दोन्ही मुद्दे मांडले असल्यास जातापात हे खुले कुरण आहे. त्याबद्दल बोलावे. कुणी अगदी तेही मांडले तर "पॉवर स्ट्रक्चर" हा शब्द वापरावा आणि प्रश्न विचारावेत. अशावेळी फुको, डेरीडा, मार्क्स, क्रिटिकल मार्क्सीझम, पोस्ट मोडर्निझम, पोस्ट स्ट्र्कचरलीझम याचे वाचन असल्यास मजा येईल. समोरची माणसे डोळे विस्फारून तुमच्याकडे पाहू लागतील.

चौथा नियम, मार्क्सवादी नसाल तर निदान गेला बाजार तुम्ही फेमिनिस्ट तरी असणे अत्यावश्यक. मग स्त्रीयांच्या शोषणाबद्दल बोलावे. त्यासाठी इसवीसनापूर्वीचे वेद, उपनिषद यांच्यातले पुरावे हुडकून काढले तर तुमच्या विद्वत्तेवर आयएसओ मार्कच लागेल. तेथे 'क्रॉस कल्चरल हा शब्द लक्षात ठेवावा. मग सर्व जातींमधल्या स्त्रीयांच्या शोषणाबद्दल बिनधास्त बोलावे.

पाचवा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या दुर्दैवाने खरोखर प्रत्यक्ष ग्रासरूट लेव्हलवर काम करणारी मंडळी तेथे असतील तर त्यांना शक्यतोवर टाळावे. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. ते तुम्हाला सर्व लोकांमध्ये उघडे पाडू शकतात. त्यातला कुणी बुजलेला असेल तर त्याच्यासमोरही तलवार फिरवू शकाल पण आक्रस्ताळा असेल तर सावध राहावे.

सहावा नियम, आपला पेपर वाचताना मला पेपर तयार करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही हे आधी स्पष्ट करावे. त्यामुळे यावर आणखी काम सुरु आहे असे लोकांना वाटेल आणि तुम्हाला खिंडीत गाठणारे प्रश्न कुणी विचारणार नाही. भरपूर अ‍ॅनिमेशन असलेले रंगिबेरंगी पॉवरपॉईंट करावे म्हणजे लोकांचे लक्ष तेच बघण्याकडे जाईल आणि तुमचे काम सोपे होईल.

सातवा नियम, स्वतःचा पेपर सकाळी कधिही ठेऊ नये. बाकीचे विद्वान जरा त्यावेळी फ्रेश असतात. प्रश्न विचारु शकतात. त्यापेक्षा मटणाचे जड जेवण झाल्यावर दुपारी वातानुकूलित हॉलमध्ये पेपर वाचन करावे. बहुतेक जण जेवल्यावर निघुन जातात. जे राहतात त्यातले थोडेच जागे असतात. तुम्हाला विषय माहीत नसेल आणि बोलायची वेळ आली तरी घाबरु नये. सुरुवात "धीस इज नॉट अ क्वेश्चन बट जस्ट माय ऑबझर्वेशन्स.." अशी सुरुवात करावी आणि अधून मधून जाग आली असता जे शब्द कानावर पडले असतील त्यावर बोलावे.

आमचे पुस्तक लवकरच रेल्वे स्टॉलवर दिसेल. आपली कॉपी आगाऊ बुक केल्यास सवलत देऊ. पुस्तकात नियम याहूनही जास्त चांगल्या तर्‍हेने समजवण्यात येणार आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍या नियमातल्या इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग किंवा अर्थ कुणि विचारल्यास साफ दुर्लक्ष करावे, फार वेळा विचारले तर एक तु. क. टाकून, "या साध्या शब्दाचे अर्थ नि स्पेलिंग सुद्धा तुम्हाला माहित नाही का" असे मोठ्ठ्याने विचारून लोकांचे लक्ष वेधून घ्यावे. कुणाची हिंमत होणार नाही तुम्हाला उलट प्रश्न विचारण्याची!
नि नुसते हेच शब्द नाही, असले नवनवीन शब्द काय आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.
पूर्वी अनॅलिसिस म्हणत आता अनॅलिटिक म्हणावे, असे.
अशावेळी फुको, डेरीडा, मार्क्स, क्रिटिकल मार्क्सीझम, पोस्ट मोडर्निझम, पोस्ट स्ट्र्कचरलीझम याचे वाचन असल्यास मजा येईल.
कारण त्यातले कुठलेहि वाक्य चालू विषयाशी संबंधित नसले तरी खुश्शाल वापरावे.
मायबोलीवर असेल तर सरळ आय क्यू काढून मोकळे व्हावे!

जरा जुनं

A sophistical rhetorician, inebriated with the exuberance of his own verbosity

टोटल नवं
Exasperating farrago of distortions, misrepresentations & outright lies ...

तुम्ही एक्सीस किंवा अबंडन्स असले शब्द वापरले तर इतर विद्वान तुमच्याकडे साफ दुर्लक्ष करून समोर फुकट मिळालेले फोल्डर्स चाळू लागतील
>>>>
देवा, मला तर हे सुद्धा वापरता येत नाहीत Happy

बाकी नियम छान !
पण मला वाटते की खोटे खोटे विद्वान बनून त्याचे ओझे मनावर बाळगण्यापेक्षा खोटेनाटे बावळट बनून आयुष्य जास्त एंजॉय करता येते Happy

पण मला वाटते की खोटे खोटे विद्वान बनून त्याचे ओझे मनावर बाळगण्यापेक्षा खोटेनाटे बावळट बनून आयुष्य जास्त एंजॉय करता येते

पण भल्या मोठ्या एमेन्सि त कन्सल्टंट असाल तर खोटे खोटे विद्वान बनून, पापी पेट का सवाल है!, असे म्हणत त्याचे ओझे मनावर बाळगणे आवश्यक.

पण मला वाटते की खोटे खोटे विद्वान बनून त्याचे ओझे मनावर बाळगण्यापेक्षा खोटेनाटे बावळट बनून आयुष्य जास्त एंजॉय करता येते
>>
हे तुझ्या ह्या अवताराचे सार का रे रु? Wink

छान लिहिलय. Happy

>>>> नियम नंबर तीन. जर तुम्ही मार्क्सवादी असाल तर त्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही. ................... मजा येईल. समोरची माणसे डोळे विस्फारून तुमच्याकडे पाहू लागतील. <<<<<<

हे बरं नै हं, कम्युनिजम्/मार्क्सवाद यांना अत्रतत्रसर्वत्र "मध्ये" आणण्याचा हक्क आमचा, तो तुम्ही हिरावुन घेताय... Proud

झकास ..... तुमचा अभ्यास अफाट आहे... कृपया मला तुमचे नविन ३ पेपर पाठवता का? मि एका रिव्ह्यु पेपरवर काम करतोय, वेळ मिळाला कि डिस्कस करुच.... +१